(मंचाचा निर्णय : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
- // आ दे श //-
(पारित दिनांकः 03/12/2015)
तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, त्यांचे तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणे आहे.
1. तक्रारकर्ते श्री. श्रीहरी छावा आणि त्यांची पत्नी श्रीमती माणीक छावा यांनी दि.29.05.2014 रोजी चेंगलपट्टू ते नागपूर (बोर्डींग- विजयवाडा) प्रवासासाठी आर.एम.एम. वाराणासी एक्सप्रेस गाडी क्र.14259 चे एसी टू टायरचे दोन तत्काळ टिकीट दि.27.05.2014 रोजी पीएनआर क्रमांक 426/3070235 रु.4,290/- देऊन नागपूर येथून खरेदी केले होते. सदर टिकीटांप्रमाणे त्यांना कोच नं. ए-1 मध्ये बर्थ क्र.11 आणि 12 देण्यांत आले होते, सदर टिकीट दस्त क्र. 1 वर दाखल केले आहे.
2. वरील गाडीची दि.29.05.2014 रोजी विजयवाडा येथून सुटण्याची नियोजीत वेळ 20.20 वाजताची होती. रेल्वे स्टेशनवर पोहचण्यापूर्वी तक्रारकर्त्यांनी रेल्वेच्या चौकशी क्र.139 वर फोन करुन गाडीच्या आगमनाची वेळ विचारली असता गाडी 45 मिनीटे उशिरा धावत असुन विजयवाडा येथून 21.00 वाजता सुटेल असे सांगण्यांत आले. सदर माहितीवर विश्वासुन तक्रारकर्ते गाडी सुटण्याच्या ½ तास आधी 20.30 वाजता विजयवाडा रेल्वे स्टेशनवर पोहचले. त्यावेळी वरील गाडी वेळेवर म्हणजे 20.23 वाजता स्टेशनवरुन सुटल्याचे ऐकूण त्यांना धक्का बसला.
3. तक्रारकर्त्यांनी विजयवाडा रेल्वे स्टेशनवर स्टेशन मॅनेजरची भेट घेऊन त्यांनी फोन क्र.139 वरुन गाडी सुटण्याची चुकीची वेळ सांगितल्यामुळे त्यांचा कोणताही दोष नसतांना गाडी ते येण्यापूर्वी सुटून गेली याबाबत लेखी तक्रार केली सदर तक्रारीची प्रत दस्त क्र.2 वर दाखल आहे. तक्रारकर्त्यांनी मुख्य टिकीट इन्स्पेक्टर यांची भेट घेऊन रेल्वेच्या चुकीमुळे त्यांनी खरेदी केलेल्या टिकीटावर त्यांना प्रवास करता आला नाही म्हणून टिकीटाचे पैसे परत करण्याची विनंती केली. परंतु तक्रारकर्त्यांनी खरेदी केलेले टिकीट ‘तत्काल’, असल्यामुळे पैसे परत करण्यांस त्यांनी नकार दिला. टिकीटाचे पैसे परत करावे म्हणून तक्रारकर्त्यांनी सिनीअर सीडीएम यांना मुख्य टिकीट इन्स्पेक्टरच्या शे-यासह लेखी विनंती केली. त्याची प्रत दस्त क्र.3 वर आहे.
4. तक्रारकर्त्यांना रात्रीचे वेळी निवासाची सोय करण्यासाठी भटकावे लागले आणि शेवटी हॉटेल श्रीपादमधे किरायाची रुम घेऊन रात्र काढावी लागली. दुस-या दिवशी दि.30.05.2014 रोजी दुपारच्या गाडीने तक्रारकर्ते विजयवाडयावरुन निघाले आणि दि.31.05.2014 रोजी नागपूर येथे पोहचले. तक्रारकर्त्यांना निवासासाठी हॉटेल भाडे रु.1,979/- आणि इतर खर्च रु.1,000/- करावा लागला. हॉटेलचे बिल दस्त क्र.4 वर आहे.
5. विरुध्द पक्षाच्या चुकीच्या माहितीमुळे तक्रारकर्त्यांची गाडी चुकल्याने त्यांचे दि.30.05.2014 रोजीचे कामाचा दिवस वाया गेला तसेच त्यांना शारीरिक व मानसिक त्रास सोसावा लागला. तक्रारकर्ता क्र. 1 यांनी टिकीटांची रक्कम रु.4,290/- परत करावे म्हणून सिनिअर डिव्हीजलन कमर्शियल मॅनेजर, सेंट्रल रेल्वे, नागपूर यांना दि.31.05.2014 रोजी पत्र लिहीले त्याची प्रत दस्त क्र.5 वर दाखल केलेली आहे. त्यांनी तक्रारकर्त्यास सांगितले की, त्यांची मागणी चिफ कमर्शियल मॅनेजर, साऊथ सेंट्रल रेल्वे, सिकंदराबाद यांचेकडे पाठविलेली आहे. त्यांचेकडून टिकीटाचा परतावा परत मागणीचे प्रकरण चिफ कमर्शियल मॅनेजर (रिफंड), सेंट्रल रेल्वे, मुंबई यांना पाठविण्यांत आले. सदर पत्राची प्रत दस्त क्र. 6 वर आहे. मधल्या काळात अतिरिक्त जनरल मॅनेजर, साऊथ सेंट्रल रेल्वे यांनी त्यांच्या दि.15.07.2014 च्या पत्राप्रमाणे तक्रारकर्त्यास कळविले की, संबंधीत वेळी 139 क्रमांकावरुन गाडी क्र.14259 च्या आगमनाबाबतची माहिती स्वयंचलित यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे चुकीची प्रसारीत करण्यांत आली होती. सदर पत्राची प्रत दस्त क्र.7 वर आहे. विरुध्द पक्षाची वरील कृती ही सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब असल्यामुळे तक्रारकर्त्यांनी सदरच्या तक्रारीत खालिल प्रमाणे मागणी केलेली आहे.
1. टिकीटाची रक्कम रु. 4,290/-
2. हॉटेल चार्जेस रु. 1,9,89/-
3. आनुषंगीक खर्च रु. 1,000/-
4. पत्रव्यवहाराचा खर्च रु. 500/-
5. कामाचे दिवस बुडाल्याने भरपाई रु.10,000/-
6. मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.50,000/-
7. तक्रारीचा खर्च रु.10,000/-
एकूण रु.77,769/-
6. तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारकर्त्याने रिर्झवेशन टिकीट, विरुध्द पक्षासोबत केलेला पत्र व्यवहार, हॉटेलचे बिल, इत्यादी दस्तावेज दाखल केलेले आहेत.
7. सदर प्रकरणाची नोटीस विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना बजावण्यात आली असता त्यांनी हजर होऊन लेखीउत्तराव्दारे तक्रारीस विरोध केलेला आहे. त्यांचे असे म्हणणे की, रेल्वे कायद्याप्रमाणे प्रवाश्यांना नुकसान भरपाई मागावयाची असल्यास त्यासाठी रेल्वे क्लेम्स ट्रीबुनल ऍक्ट 1987 चे कलम 13 सह कलम 15 अन्वये केवळ रेल्वे क्लेम्स् ट्रीबुनललाच अधिकार आहे. अन्य न्यायालय किंवा ग्राहक तक्रार निवारण मंचाला अश्या क्लेम्सबाबत अधिकारकक्षा नाही.
8. त्यांचे पुढे म्हणणे असे की, तक्रारकर्त्यांनी खरेदी केलेले टिकीट ‘तत्काल’, होते. तत्काल टिकीटांचे पैसे परत करण्याची कायद्यात कोणतीही तरतुद नाही त्यामुळे टिकीटाचे पैसे परत न दिल्यामुळे विरुध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्युनतापूर्ण व्यवहार झालेला नाही. 139 क्रमांकावर जर तक्रारकर्त्याने चौकशी केली असेल आणि त्या दिवशी स्वयंचलित यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे तक्रारकर्त्यास सदर यंत्रणेव्दारे चुकीची माहिती देण्यांत आली असेल तर त्यासाठी विरुध्द पक्षाला जबाबदार धरता येणार नाही. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे विजयवाडा येथून गाडी सुटण्याची वेळ 20.20 वाजताची होती. तक्रारकर्ते स्टेशनवर 20.30 वाजता पोहचले. त्यामुळे जर तक्रारकर्त्याला गाडी मिळाली नसेल तर त्याचा दोष विरुध्द पक्षास देता येणार नाही. गाडीच्या वेळेपूर्वी स्टेशनवर येण्याची जबाबदारी ही तक्रारकर्त्यांची होती, ते स्वतः स्टेशनवर उशिरा पोहचले, त्यामुळे टिकीटाचा परतावा मिळण्याचा त्यांना कोणताही हक्क नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये नुकसान भरपाईची जी मागणी केली आहे ती अवास्तव असुन त्यास कोणताही आधार नाही. तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्षास त्रास देण्यासाठी खोटी तक्रार दाखल केली असल्याने ती खर्चासह खारिज करावी अशी विनंती केलेली आहे.
9. तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी कथनांवरुन खालीलप्रमाणे मुद्दे मंचाचे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालीलप्रमाणे आहे.
मुद्दे निष्कर्ष
1) मंचाला सदर तक्रार चालविण्याचे कार्यक्षेत्र आहे काय ? होय.
2) विरुध्द पक्षाने न्यूनतापूर्ण व्यवहार केला
आहे काय ? होय.
3) तक्रारकर्ते मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? अंशतः.
4 ) अंतिम आदेश काय ? तक्रार अंशतः मंजूर.
- // कारणमिमांसा // -
10. मुद्दा क्र. 1 बाबतः विरुध्द पक्षांचा आक्षेप असा की, तक्रारकर्त्यांनी सदरची तक्रार ही भारतीय रेल्वे विरुध्द नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे. रेल्वे कायद्याप्रमाणे प्रवाश्यांना नुकसान भरपाई मागावयाची असल्यास त्यासाठी रेल्वे क्लेम्स ट्रीबुनल ऍक्ट 1987 चे कलम 13 सह कलम 15 अन्वये केवळ रेल्वे क्लेम्स् ट्रीबुनललाच अधिकार आहे. अन्य न्यायालय किंवा ग्राहक तक्रार निवारण मंचाला अश्या क्लेम्सबाबत निर्णय देण्याची अधिकारकक्षा नाही. याउलट तक्रारकर्त्याचे म्हणणे असे की, सदर प्रकरण हे विरुध्द पक्ष रेल्वेने सेवेमध्ये अवलंबीलेल्या त्रुटीबाबत असल्याने आणि तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याने मंचाला सदरची तक्रार चालविण्याची अधिकारकक्षा आहे.
ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 3 प्रमाणे ग्राहकाला ग्राहक मंचासमोर तक्रार दाखल करण्यासाठी देण्यांत आलेले अधिकार हे अन्य कायद्यातील अधिकारांना पर्यायी नसुन अन्य कायद्यातील अधिकारांव्यतीरिक्त अतिरिक्त आहेत. म्हणून रेल्वे क्लेम्स ट्रीब्युनल ऍक्ट 1987 मधील तरतुदींमुळे ग्राहक असलेल्या तक्रारकर्त्याचा ग्राहक तक्रार मंचासमोर तक्रार दाखल करण्याचा अधिकार बाधीत होत नाही. म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाला सदरची तक्रार चालविण्याची अधिकारकक्षा आहे. वरील कारणामुळे मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
11. मुद्दा क्र. 2 बाबतः सदर प्रकरणात तक्रारकर्ते श्री. श्रीहरी छावा आणि त्यांची पत्नी श्रीमती माणीक छावा यांनी दि.29.05.2014 रोजी चेंगलपट्टू ते नागपूर (बोर्डींग- विजयवाडा) प्रवासासाठी आर.एम.एम. वाराणासी एक्सप्रेस गाडी क्र.14259 चे एसी टू टायरचे दोन तत्काळ टिकीट दि.27.05.2014 रोजी पीएनआर क्रमांक 426/3070235 रु.4,290/- देऊन नागपूर येथून खरेदी केले होते ही बाब विरुध्द पक्षाने नाकारलेली नाही. तक्रारकर्त्यांनी सदर टिकीट दस्त क्र. 1 वर दाखल केले आहे. वरील गाडीची दि.29.05.2014 रोजी विजयवाडा येथून सुटण्याची नियोजीत वेळ 20.20 वाजताची होती याची नोंद टिकीटावर आहे. तक्रारकर्त्यांचे म्हणणे असे की, रेल्वे स्टेशनवर पोहचण्यापूर्वी त्यांनी रेल्वेच्या चौकशी क्र.139 वर फोन करुन गाडीच्या आगमनाची वेळ विचारली असता गाडी 45 मिनीटे उशिरा धावत असुन विजयवाडा येथून 21.00 वाजता सुटेल असे सांगण्यांत आले. सदर माहितीवर विश्वासुन तक्रारकर्ते गाडी सुटण्याच्या ½ तास आधी 20.30 वाजता विजयवाडा रेल्वे स्टेशनवर पोहचले. त्यावेळी वरील गाडी वेळेवर म्हणजे 20.23 वाजता स्टेशनवरुन सुटल्याचे त्यांना कळले. विरुध्द पक्षाचे म्हणणे असे की, तक्रारकर्ते 20.30 वाजता स्टेशनवर पोहचले त्यामुळे वेळेवर सुटलेली गाडी त्यांना मिळाली नाही, यात विरुध्द पक्षांचा दोष नाही. तक्रारकर्त्यांनी दि.29.05.2014 रोजी 20.53 वाजता स्टेशन प्रबंधक, विजयवाडा यांना दिलेल्या तक्रारीची प्रत दस्त क्र.2 वर दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांना चौकशी क्र. 139 वरुन सांगण्यांत आले होते की, गाडी क्रमांक 14259 विजयवाडा स्टेशनवरुन 21.05 वाजता सुटेल असे 19.40 वाजता सांगण्यांत आले होते. त्याप्रमाणे ते स्टेशन वर 20.30 वाजता पोजचले परंतु गाडी 20.23 वाजताच निघुन गेली होती. चौकशी क्रमांक 139 वरुन विजयवाडा स्टेशनवरुन गाडीच्या सुटण्याच्या वेळेबाबत चुकीची माहिती प्रसारीत करण्यांत आली होती हे दर्शविण्यासाठी तक्रारकर्त्याने दस्त क्र.7 वर अतिरिक्त जनरल मॅनेजर, साऊथ सेंट्रल रेल्वे, सिकंदराबाद यांच्या पत्र क्र.जी50/06/14/54 दि.15.07.2014 ची प्रत दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, तक्रारकर्त्याच्या तक्रारीची त्यांनी चौकशी केली असता दि.29.05.2014 रोजी चौकशी क्र.139 वरुन गाडी क्रमांक 42259 च्या विजयवाडा येथुन सुटण्याच्या वेळेबाबत चुकीची माहिती प्रसारीत करण्यांत आली होती. सदरची चुकीची माहिती ही कार्यालयातील स्वयंचलित यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे देण्यांत आली होती तो बिघाड दूर करण्यांत आला आहे. वरील पत्रावरुन हे स्पष्ट आहे की, तक्रारकर्त्याने चौकशी क्र.139 वर फोनवरुन केलेल्या चौकशीत त्यांना विजयवाडा येथून गाडी सुटण्याच्या वेळेबाबत चुकीची माहिती देण्यांत आली होती. तक्रारकर्ते विरुध्द पक्षाकडून देण्यांत आलेल्या चुकीच्या माहितीवर विसंबून विजयवाडा रेल्वे स्टेशनवर 20.30 वाजता पोहचले कारण मिळालेल्या माहितीप्रमाणे गाडी 21.05 वाजता सुटणार होती. परंतु तक्रारकर्त्याना दिलेली माहिती चुकीची असल्याने गाडी तिच्या नियोजीत वेळी विजयवाडा स्टेशनवर आली आणि 20.23. वाजता सुटली. विरुध्द पक्षाकडून देण्यांत आलेल्या चुकीच्या माहितीमुळे तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्षास रु.4,290/- देऊन विकत घेतलेल्या टिकीटांवर प्रवास करता आला नाही.
विरुध्द पक्षाने चौकशी क्र.139 वर चुकीची माहिती प्रसारीत केल्यामुळे तक्रारकर्त्यांचा कोणताही दोष नसतांना गाडी ते येण्यापूर्वी सुटून गेली याबाबत लेखी तक्रार दस्त क्र.2 प्रमाणे वेळीच स्टेशन प्रबंधकाकडे केली आणि सिनिअर डिसीएम. टिकीटाचे पैसे परत करण्यासाठी विनंती केली. परंतु तक्रारकर्त्यांनी खरेदी केलेले टिकीट ‘तत्काल’, असल्यामुळे पैसे परत करण्यांस त्यांनी नकार दिला. सदर पत्राची प्रत व त्यावरील सिनिअर डिसीएम, यांचा शेरा दस्त क्र.3 वर आहे. त्यानंतर टिकीटाचे पैसे परत करावे म्हणून तक्रारकर्त्यांनी सिनीअर डीसीएम, नागपूर यांना दस्त क्र.5 प्रमाणे विनंती केली. त्यांनी ती चिफ कमर्शियल मॅनेजर (रिफंड), सेंट्रल रेल्वे, मुंबई यांना पाठविल्याचे दस्त क्र. 6 प्रमाणे कळविले. दि.03.12.2014 रोजी चिफ कमर्शियल मॅनेजर, मुंबई यांनी तक्रारकर्त्यास कळविले की, त्यांची मागणी खालिल कारणामुळे मंजूर करता येत नाही.
“TKT not surrendered/ TDR not within 2/3/3 hors (CHF/RAC/WL) of act dep. Of Trn”.
वरील दस्तावेजांचा विचार करता तक्रारकर्त्यांनी नेहमीपेक्षा अधिकचे पैसे देऊन तत्काल टिकीट खरेदी केली होती. रेल्वे प्रवाशांना गाडीच्या आवागमनाबाबत माहिती देण्यासाठी विरुध्द पक्षाकडून चौकशीसाठी 139 क्रमांकावर सेवा उपलब्ध्द करुन देण्यांत आली आहे. सदर चौकशी क्रमांकावरुन गाडीच्या आवागमनाच्या वेळेबाबत देण्यांत येणारी माहिती अचुक आहे असे समजुनच रेल्वे प्रवासी रेल्वे स्टेशनवर येतील याची पूर्ण कल्पना रेल्वे प्रशासनाला आहे. त्यामुळे सदर यंत्रणेव्दारे देण्यांत येणारी माहिती अचुक असेल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. दस्त क्र. 7 वरुन हे स्पष्ट आहे की, 29.05.2014 रोजी 139 क्रमांकावरुन गाडी क्र.14259 च्या विजयवाडा स्टेशनवर येण्याच्या व सुटण्याच्या वेळेबाबत चुकीची माहिती प्रसारीत करण्यांत आली होती. विरुध्द पक्षाकडून प्रसारीत केलेल्या चुकीच्या माहितीमुळे तक्रारकर्त्यांना सदरची गाडी 21.05 वाजता विजयवाडा येथून सुटेल असे कळविण्यांत आल्यामुळे गाडी सुटण्याच्या ½ तास आधी म्हणजे 20.30 वाजता ते विजयवाडा रेल्वे स्टेशनवर पोहचले परंतु सदर गाडी क्र.139 वरुन देण्यांत आलेल्या चुकीच्या माहितीप्रमाणे 45 मिनीटे उशिरा धावत नव्हती तर ती वेळेवरच विजयवाडा स्टेशनवर पोहचली आणि ती 20.23 वाजता सुटली. तक्रारकर्त्यांची गाडी सुटली यात त्यांचा कोणताही दोष नसुन ती विरुध्द पक्षांच्या स्वयंचलित यंत्रणेतील माहितीमुळे सुटली म्हणून जरी तक्रारकर्त्यांनी तत्काल टिकीट खरेदी केली असेल आणि सामान्य परिस्थितीत तात्काल टिकीट रद्द करुन टिकीटाचा परतावा देण्याची नियमात तरतुद नसेल तरी या प्रकरणातील विशेष परिस्थीती लक्षात घेऊन विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास टिकीटाची रक्कम परत करावयास पाहिजे होती. परंतु तसे न करता विरुध्द पक्षाने तत्काल टिकीट असल्याने परतावा देता येत नाही असे कारण सांगून त्यांची वाजवी मागणी नामंजूर केली आहे. सदरची बाब हि निश्चितच रेल्वे प्रशासनाच्या सेवेतील न्युनतापूर्ण व्यवहार आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविलेला आहे.
12. मुद्दा क्र. 3 व 4 बाबतः सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्यांनी दि.29.05.2014 चे तात्काल रेल्वे टिकीट रु.4,290/- देऊन खरेदी केले होते ते दस्त क्र.1 वर दाखल आहे. परंतु रेल्वे गाडयांच्या आवागमनाबाबत माहिती देणा-या विरुध्द पक्षांच्या 139 क्रमांकावरुन रात्री 8.20 वाजताची रेल्वे गाडी 45 मिनीटे उशिरा धावत असल्याबाबत आणि ती 9 वाजता विजयवाडा रेल्वेस्टेशनवरुन सुटणार असल्याबाबत चुकीची माहिती प्रसारीत केल्यामुळे तक्रारकर्ते रेल्वे स्टेशनवर रात्री 8.30 वा. पोहचले असता सदरची गाडी 8.23 वा. सुटून गेल्याने सदर टिकीटांवर त्यांना प्रवास करता आला नाही आणि त्यांचे टिकीटांच्या रकमे इतके रु.4,290/- चे नुकसान झाले. तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्षाकडे सदर टिकीटांच्या रकमेच्या परताव्याची मागणी केली असतांना तात्काळ टिकीट असल्यामुळे ते परत करण्यांस विरुध्द पक्षांनी नकार दिलेला आहे. म्हणून तक्रारकर्त्याची कोणतीही चुक नसतांना विरुध्द पक्षांच्या चुकीमुळे सोसावे लागलेले नुकसान रु.4,290/- परत मिळण्यांस तक्रारकर्ते पात्र आहेत. या शिवाय नियोजीत गाडी सुटल्यामुळे तक्रारकर्त्यांना त्या रात्री हॉटेलमध्ये थांबावे लागले ज्याचे बिल रु.1,979/- तक्रारकर्त्याने दस्त क्र.4 वर जोडले आहे, त्यामुळे सदरची रक्कम देखिल मंजूर करणे न्यायोचित होईल. विरुध्द पक्षांनी 139 क्रमांकावरुन रेल्वेच्या विजयवाडा येथे पोहचण्याच्या वेळेबाबत जी चुकीची माहिती प्रसारीत केली ती स्वयंचलीत यंत्रणेतील बिघाडामुळे देण्यांत आली होती व अशी चुकीची माहिती प्रसारीत करण्यात विरुध्द पक्षांचा कोणताही दुष्ट हेतू नव्हता, हे लक्षात घेता तक्रारकर्त्यांना शारीरिक व मानसिक त्रासाबाबत स्वतंत्र नुकसान भरपाई देणे उचित ठरणार नाही. मात्र तक्रारकर्त्यांना त्यांच्या टिकीटांच्या रकमेची मागणी करुनही विरुध्द पक्षांनी ती दिली नाही म्हणून तक्रारकर्त्यांना सदरची तक्रार दाखल करावी लागली म्हणून तक्रारीचा खर्च दाखल तक्रारकर्त्यास रु.3,000/- मंजूर करणे न्यायोचित होईल. तसेच विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास वेळीच परतावा न दिल्यामुळे टिकीटांची रक्कम रु.4,290/- वर दि.29.05.2014 पासुन प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12% प्रमाणे व्याज देण्याचा विरुध्द पक्षांना आदेश देणे देखिल न्याय्य होईल. म्हणून मुद्दा क्र. 3 व 4 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविलेले आहेत.
वरील निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // अं ति म आ दे श // -
तक्रारकर्त्यांची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 विरुध्द संयुक्त व वैयक्तिकरित्या खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास टिकीटांची रक्कम रु.4,290/- दि.29.05.2014 पासुन प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12% प्रमाणे व्याजाहर परत करावी.
2. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास हॉटेलच्या खर्चाबाबत रु.1,979/- अदा करावे.
3. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चाबाबत रु.3,000/- द्यावे.
4. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
6. तक्रारकर्त्यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.