द्वारा- मा.सदस्या, सौ.ज्योती अ.मांधळे. 1. तक्रारकर्तीचे संक्षिप्त कथन खालीलप्रमाणे- तक्रारकर्ती सामनेवाले 1 यांच्या सोसायटीत तिस-या मजल्यावर रहात आहे. सामनेवाले 1 हे मातोश्री सहकारी सोसायटी जी सन 2004 मध्ये स्थापन झाली आहे व सामनेवाले 1 चे सभासद आहेत व ते सदर सोसायटीत पाचव्या मजल्यावर रहातात. सामनेवाले 1 त्यांच्या सदनिका क्र.508 मध्ये स्थलांतर झाल्यावर त्यांनी त्यांच्या सदनिकेत बरीच दुरुस्ती करुन घेतली. सदर दुरुस्तीमुळे तक्रारकर्तीचया सदनिकेतील बाथरुममध्ये गळती सुरु झाली. त्याबाबत त्यांनी सामनेवाले 2 शी ताबडतोब संपर्क साधून ही बाब लक्षात आणून दिली. परंतु सामनेवाले 2 यानी काही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी सामनेवाले 1 याना ही बाब लक्षात आणून दिली. सामनेवाले 1 यांनी याबाबत असे सुचवले की, तुम्ही उभय पक्षानी बसून याबाबत काहीतरी मार्ग काढा. परंतु सामनेवाले 1 यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याने तक्रारकर्तीच्या सदनिकेतील गळती पॅसेजपासून बेडरुमपर्यंत आली. त्यांनी ताबडतोब ही बाब सामनेवाले 2च्या लक्षात आणून दिली. सामनेवाले 1 यांनी 24-8-08 रोजीच्या त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत चर्चा केली व त्यावर असा मार्ग काढला की, वरच्यासदनिकेत गळती होत असेल तर त्याबाबत दुरुस्तीचे काम वरच्या सदनिकेतील रहिवाशांनी करायास हवे म्हणजेच सामनेवाले 2 यांनी सदरचे काम करण्यास हवे व दुरुस्तीचा होणारा खर्च दोन्ही सदनिकांनी मिळून करायचा आहे. यानंतर तक्रारकर्तीने सामनेवाले 2 यांना सतत दुरुस्तीसाठी विनंती केली. तसेच दि.18-8-08 व दि.4-10-09 रोजी पत्रही पाठवले. पण सामनेवाले 1,2 यांनी त्यास काहीही प्रतिसाद दिला नाही, याबाबत तक्रारकर्तीला अतिशय आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास झाला, त्याबाबत तिला नुकसानभपाई रु.1,00,000/- मिळावी. तसेच तक्रारकर्तीची विनंती की, सामनेवाले 1 व 2 यांनी एकत्रितरित्या वा संयुक्तीकरित्या त्यांच्या सदनिकेतील गळतीची दुरुस्ती करुन दयावी, तसेच तिला झालेल्या मानसिक त्रासाबाबत रु.10,000/- दयावे व तक्रारीच खर्चही दयावा अशी तक्रारकर्तीने विनंती केली आहे. 2. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारअर्जासोबत नि.2 अन्वये प्रतिज्ञापत्र व नि.3 अन्वये कागदपत्रांची यादी दाखल केली आहे. त्यात मुख्यतः दि.14-8-08 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेमधील ठराव, दि.6-10-09रोजी सामनेवाले 2 यांनी तक्रारर्कीस पाठवलेल्या पत्राचे उत्तर, इ.कागदपत्र दाखल करणेत आले आहेत. 3. नि.5 अन्वये मंचाने सामनेवाले 1 व 2 यांना नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. नि.8 अन्वये सामनेवाले 1 यांनी प्रतिज्ञापत्रासोत आपला लेखी जबाब दाखल केला. सामनेवाले 1 हे आपल्या लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारकर्ती सामनेवाले2 हे त्यांचे सभासद असून सामनेवालेंचे कमिटी सभासद आहेत. दि.14-8-08 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसधारण सभेत असे ठरवलेले होते की, तक्रारकर्ती व सामनेवाले 2 या दोघांनी मिळून पाणी गळतीसाठी होणारा खर्च निम्मा निम्मा सोसायचा आहे व सामनेवाले 2 हे तक्रारकर्तीला मदत करणार आहेत. हे दोन्ही पक्षाला मान्य असल्याने, त्यांनी त्या दिवशी मिनीटबुकवर सहया केल्या. त्यामळे तक्रारकर्तीने दाखल केलेल्या तक्रारीत तथ्य नसून व त्यांचेविरुध्द केलेले आरोप बिनबुडाचे व कायदयाला धरुन नाहीत. वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर तकारकर्तीने त्यांच्याकडे पाण्याच्या गळतीसंबंधी कधीही तक्रार केली नाही व सदरच गळती ही तिच्या घरामध्ये होत असल्याने त्यांची त्यासाठी कोणत्याही प्रकारची जबाबदारी दिसून येत नाही. तसेच तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, सामनेवाले 2 यांनी त्यांच्या सदनिकेतील संडास बाथरुममध्ये फेरबदल केले आहेत, परंतु सामनेवाले 2 यांनी सदर फेरबदलासाठी परवानगी घेतली नसल्याने त्यांना या बाबीची कल्पना नाही. त्यांना या बाबीची कल्पना नाही की, तक्रारकर्तीने सामनेवाले 2 यांना सदर पाणी गळतीबाबत कळवले होते व नंतर सामनेवाले 2 यांनी तक्रारकर्तीला सहकार्य केले नाही, तसेच त्यांना हे ही मान्य नाही की सदर पाणी गळतीचा त्रास वाढत गेला असून त्यामुळे तक्रारकर्तीला मानसिक, शारिरीक, आर्थिक त्रास झाला. सामनेवाले 1 पुढे म्हणतात की, सदर पाण्याची गळती ही सदनिकेत असल्यामुळे त्यांचा या पाण्याच्या गळतीशी काहीही संबंध नाही. तक्रारकर्तीने दाखल केलली तक्रार खोटी व बिनबुडाची असल्याने ती खर्चासह फेआळण्यातयावी असे सामनेवाले 1 चे म्हणणे आहे. 4. -नि.12 अन्वये सामनेवाले 2 ने लेखी जबाब प्रतिज्ञापत्रासोबत दाखल केला. सामनेवाले 2 लेखी जबाबात म्हणतात की, त्यांच्यात व तक्रारकर्तीमध्ये ग्राहकाचे संबंध नसल्याने मंचाला ही तक्रार चालवण्याचा अधिकार येत नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी. तसेच ते पुढे म्हणतात की, सिडको महामंडळाने मौ.नेरुळ. सेक्टर 42 येथील भूखंड क्र.31 हा सिडकोच्या कर्मचा-यांच्या सोसायटीस फक्त सिडकोच्या कर्मचा-यांसाठी भाडेतत्वावर दिली होती. सिडकोच्या कर्मचा-यांनी सदर भूखंडाची किंमत सिडकोकडे जमा केल्यानंतर सदर भूखंडाचा ताबा सामनेवाले 1 ला दिला होता. त्यामुळे ते सामनेवाले 1 यांचे सभासद आहेत. सामनेवाले 1 यानी सदर भूखंडावर इमारत बांधण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली व त्यांचेकडून बांधकामाचे काम पूर्ण करुन घेतले व सामनेवाले 1 ने नगरपालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र घेतल्यावर सामनेवाले 1 ने त्यांना सन 04 मध्ये सदनिका क्र.508 चा ताबा दिला. सन 04 मध्ये सामनेवाले 1 च्या ठेकेदारानी केलेल्या कामाबाबत तक्रारदारानी तक्रार केल्याने त्यांनी रु.8,000/-चा खर्च करुन तक्रारकर्तीच्या तक्रारीचे निवारण केले होते. त्यांनी माणुसकीच्या नात्याने खर्च उचलला होता. तसेच तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे कोणती गळती त्यांनी त्यांचे सदनिकेत केलेल्या कामाने झालेली नव्हती. सामनेवाले 1 च्या ठेकेदाराने केलेल्या कामामुळे सदरची गळती उदभवली होती. त्यामुळे ते या गळतीस जबाबदार नाहीत. त्यांनी त्यांच्या सदनिकेत कोणत्याही प्रकारच्या अंतर्गत बदल केलेले नाहीत. ते पुढे म्हणतात की, तक्रारकर्तीने दि.14-8-08 रोजीच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांची तक्रार मांडली होती व सदर सभेत मांडले होते की, सामनेवाले 2 ने तक्रारदारांना पाणीगळतीबाबत दुरुस्ती करुन दयावी व येणारा खर्च दोघात अर्धा अर्धा वाटून घ्यावा हे म्हणणे पुरेपूर खोटे आहे. तक्रारकर्तीचा सदरचा वाद हा मंचाचे अधिकारक्षेत्रात येत नसल्याने सदरची तक्रार खर्चासह फेटाळावी असे सामनेवाले 2 चे म्हणणे आहे. नि.14 अन्वये तक्रारकर्तीने कोर्ट कमिशनर नियुक्तीसाठी अर्ज दाखल केला. नि.15 अन्वये सामनेवाले 2 यांनी तक्रारकर्तीच्या अर्जावर म्हणणे दिले. नि.17 अन्वये मंचाने तक्रारकर्तीच्या सदनिकेत वर्षा सदनिकेतून पाण्याची गळती होत आहे व सामनेवाले या दुरुस्तीबाबत आवश्यक ती दुरुस्ती करत नाहीत ही वस्तुस्थिती मंचापुढे येणेसाठी कोर्ट कमिशनर यांची नियुक्ती केली. नि.19 अन्वये कोर्ट कमिशनर यांनी वादग्रस्त सदनिकेचा तपासणी अहवाल छायाचित्रांसह दाखल केला आहे. नि.20 अन्वये तक्रारकर्तीने काही निवाडे दाखल केले आहेत. 5. दि.5-3-11 रोजी सदर तक्रार अंतिम सुनावणीसाठी आली असता तक्रारकर्ती व सामनेवाले 1 चे वकील हजर होते. सामनेवाले 2 स्वतः हजर होते. उभय पक्षाचे वकीलांनी व सामनेवाले 2 ने स्वतः युक्तीवाद केला व त्यानंतर सदरची तक्रार मंचाने अंतिम आदेशासाठी निश्चित केली. 6. तक्रारदारानी दाखल केलेली तक्रार, प्रतिज्ञापत्र, दस्तऐवज, तसेच सामनेवाले 1 व 2 ने दाखल केलेला लेखी जबाब, प्रतिज्ञापत्र, दस्तऐवज या सर्वांचा विचार करुन मंचाने खालील मुद्दे निश्चित केले- मुद्दा क्र.1- सामनेवाले 1 व 2 हे तक्रारदाराना दिलेल्या दोषपूर्ण सेवेसाठी जबाबदार आहेत काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.2- सामनेवाले 1 व 2 यांनी तक्रारदाराना त्यांच्या सदनिकेची दुरुस्ती करुन देणे आवश्यक आहे काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.3- तक्रारदार हे सामनेवाले 1 व 2 यांचेकडून नुकसानभरपाई व न्यायिक खर्च मिळणेस पात्र आहेत काय? उत्तर- होय. विवेचन मुद्दा क्र.1- 7. या मुद्दयाबाबत मंचाचे असे मत आहे की, नि.19 अन्वये कोर्ट कमिशनर यांनी आपला तपासणी अहवाल दाखल केला आहे व त्यानुसार व त्यातील छायाचित्रांचे अवलोकन केले असता असे दिसते की, तक्रारकर्तीच्या सदनिकेत वरच्या सदनिकेतून त्यांच्या टॉयलेटमध्ये गळती होत आहे. त्याप्रमाणे कोर्ट कमिशनर यांनी सदर दुरुस्तीसाठी किती खर्च येईल याचेही सविस्तर विवेचन केले आहे. तसेच फोटो पाहिले असता असे दिसते की, तक्रारकर्तीच्या वरील सदनिकेतून त्यांच्या सदनिकेत पाण्याची गळती होत आहे व त्या गळतीमुळे घरातील भिंती खराब होत आहेत. सदरच्या गळतीमुळे सदनिकेतील पॅसेज व बेडरुमपर्यंत गळती दिसत आहे. सदर अहवालानुसार हे निश्चित झाले की, तक्रारकर्तीच्या घरात पाण्याची गळती होत आहे. साहजिकच त्यांचेवर रहात असलेले सामनेवाले 2 च्या सदनिकेतून ही गळती होत असल्याचे लक्षात येते. सामनेवाले 2 हा तक्रारकर्तीचा जरी ग्राहक नाही तरीही तो सामनेवाले 1 चा सभासद व ग्राहक आहे. तो सामनेवाले 1 चा सभासद असल्याने तो तक्रारकर्तीशी अप्रत्यक्षपणे बांधील होतो. सामनेवाले 1 ने त्यांचे लेखी जबाबात असे म्हटले आहे की, दि.14-8-08 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जेव्हा तक्रारकर्तीच्या तक्रारीचा विषय ठेवणेत आला होता तेव्हा असे ठरले होते की, तक्रारकर्ती व सामनेवाले 2 या दोघांनी मिळून पाणीगळतीचा होणारा खर्च निम्मा निम्मा सोसायचा आहे. त्याबाबत दि.27-8-08 रोजीच्या नि.3 अन्वये दाखल केलेल्या दस्तऐवजावर याबाबतचा उल्लेख केला आहे. त्यावरुन असे लक्षात येते की, सामनेवाले 1 ला याबाबतची माहिती होती. वार्षिक सर्वसाधारण सभेत ठरल्यानुसार सामनेवाले 2 यानी तक्रारकर्तीला सदर दुरुस्ती करुन दिली नाही व त्यामुळे तिच्या घरातील बाथरुम व टॉयलेटमधील गळती वाढत गेली व याबाबत सामनेवाले 1 ने काहीही दखल घेतली नाही. तसेच कोर्ट कमिशनर यांचे तपासणी अहवालावरुन हे सिध्द होते की, तक्रारकर्तीच्या टॉयलेट बाथरुममध्ये गळती होत आहे. यासाठी सामनेवाले क्र.1 व 2 तक्रारकर्तीला दिलेल्या दोषपूर्ण सेवेसाठी जबाबदार असल्याचे मंचाचे मत आहे. विवेचन मुद्दा क्र.2- 8. तक्रारकर्ती सामनेवाले 1 यास इमारतीचा देखभालीचा खर्च देतात तसेच सामनेवाले 1 ही सहकारी संस्था असल्याने इमारत देखभाल करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर आहे. त्यासाठी दरमहा ती प्रत्येक सभासदाकडून देखभाल खर्च घेते. त्यासाठी प्रत्येक सभासदाची तक्रार ऐकून त्याचे निराकरणाचे कामही त्यांचेच आहे. दि.14-8-08 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी असा ठराव केला होता की, तक्रारकर्ती व सामनेवाले 2 या दोघांनी मिळून पाणी गळतीसाठी होणारा खर्च अर्धा अर्धा सोसायचा आहे व सामनेवाले 2 यांनी तक्रारकर्तीला मदत करायची आहे. परंतु सन 08 मध्ये झालेल्या ठरावाची अंमलबजावणी झाली का नाही हे पहाण्याची जबाबदारीही त्यांची होती. परंतु ठरावाची अंमलबजावणी झाली नसल्याने तक्रारकर्तीने मंचात तक्रार दाखल कली व तक्रार चालू असताना तक्रारकर्तीने दि.15-6-10 रोजी मंचाकडे कोर्ट कमिशनर नियुक्तीसाठी अर्ज दिला व त्याप्रमाणे कोर्ट कमिशनरची नियुक्ती होऊन मंचाकडे अहवाल प्राप्त झाला. याकामी उभय पक्षांच्या कागदपत्राचे अवलोकन केले आहे त्यामुळे कोर्ट कमिशनरचे अहवालाप्रमाणे सामनेवाले 1 व 2 यांनी काम करुन घेण्याबाबतचा आदेश पारित करणे उचित होईल असे मंचाचे मत आहे. सामनेवाले 1 यांनी सामनेवाले 2 चे मदतीने कोर्ट कमिशनर यांचे तपासणी अहवालावरुन तक्रारकर्तीच्या घरात सदनिकेमधील गळतीचे काम पूर्ण करुन दयावे व याबाबतचा संपूर्ण काम पूर्ण झाल्याचा व परत गळती होणार नाही याची खात्री देणारा अहवाल संबंधित ठेकेदाराकडून घेऊन त्यानी तक्रारकर्तीस उभय पक्षाच्या सहीसह दयावा. दुरुस्तीचे काम करण्याचा खर्च सामनेवाले 1 ने सामनेवाले 2 कडून घ्यावा. सामनेवाले 2 यानी जर हा दुरुस्तीचा खर्च केला नाही तर सामनेवाले 1 यांची ही पूर्ण जबाबदारी आहे की, त्यांनी ते काम सामनेवाले 2 कडून करुन घ्यावे. जर सामनेवाले 2 यांनी सामनेवाले 1 ला सहकार्य केले नाही तर सामनेवाले 1 यांनी स्वखर्चाने तक्रारकर्तीच्या सदनिकेतील गळती कोर्ट कमिशनर यांच्या तपासणी अहवालाप्रमाणे करुन दयावी. कारण संपूर्ण इमारतीची देखभाल व संरक्षण करण्याची जबाबदारी सामनेवाले 1 यांची आहे. केवळ सदनिकेची अंतर्गत बाब म्हणून सामनेवाले 1 ला ही जबाबदारी टाळता येणार नाही. विवेचन मुद्दा क्र.3- 9. या मुद्दयाबाबत मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्तीच्या घरातील गळतीबाबत तिने सामनेवाले 1 व 2 ला कळवले होते त्याप्रमाणे सामनेवाले 1 यांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा ठराव केला होता की, तक्रारकर्ती व सामनेवाले 2 यांनी मिळून पाणीगळतीचा होणारा खर्च निम्मानिम्मा सोसायचा आहे व सदर दुरुस्तीसाठी सामनेवाले 2 हे तक्रारकर्तीला मदत करणार होते. हाठराव झाल्यावरही सामनेवाले 1 व 2 ने त्याना प्रतिसाद दिला नाही, त्यांचे सदनिकेतील गळती चालू राहीली, त्यासाठी त्यांना तक्रार दाखल करावी लागली व नंतर कोर्ट कमिशनरच्या नियुक्तीचा अर्ज दयावा लागला. व गळतीमुळे त्याना शारिरीक, मानसिक त्रास झाला यासाठी ते दोन्ही सामनेवालेकडून वैयक्तिक व संयुक्तीकरित्या नुकसानभरपाई रक्कम रु.10,000/- व न्यायिक खर्च रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. 10. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो- -ः आदेश ः- 1. तक्रार क्र.209/09 मंजूर करण्यात येते. 2. आदेश पारित तारखेच्या दोन महिन्याचे आत सामनेवाले 1 यांनी सामनेवाले 2 यांच्याकडून तक्रारकर्तीच्या सदनिकेतील गळतीच्या दुरुस्तीचे काम करुन दयावे व संपूर्ण काम पूर्ण झाल्याचा व परत गळती होणार नाही याची खात्री देणारा अहवाल संबंधित ठेकेदाराकडून तो तक्रारदारास दयावा. 3. सामनेवाले 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारकर्तीला खालीलप्रमाणे रकमा दयाव्यात- अ. नुकसानभरपाईची रक्कम रु.10,000/-. (रु.दहा हजार मात्र) ब. न्यायिक खर्चाची रक्कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) 3. उपरोक्त आदेशाचे पालन सामनेवाले 1,2 ने न केल्यास तक्रारकर्ती आदेश पारित तारखेपासून ते रक्कम मिळेपर्यंत संपूर्ण रक्कम 9टक्के व्याजाने वसूल करणेस पात्र राहील. 4. सदर आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकाराना पाठवण्यात याव्यात. ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई. दि.5-4-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति. ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |