निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) रिलायन्स मोबाईल इंडियाच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तकारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदाराकडून तीन मोबाईल क्रमांक 9370514686, 9397676006 आणि 9325217349 द्वारे मोबाईल सेवा घेतली आहे. त्याने सर्व मोबाईलची देयके वेळेच्या आत भरली होती. त्याच्या पोस्ट पेड सेवेला रु 10,000/- ची क्रेडीट लिमीट होती. परंतु त्याने ज्यावेळी रु 2,000/- चे कॉल केले त्याचवेळी त्याची सेवा देय तारखेपूर्वीच बंद केली व त्यांनी रोख रक्कम भरुन रिचार्ज करण्याबाबत संदेश पाठविला. तसेच रिलायन्स मोबाईल वरुन रिलायन्स मोबाईलवर कॉल मोफत असताना त्याने 9370514686 या मोबाईलवरुन 9397676006 या मोबाईलवर दिनांक 20/12/2006 ते 26/12/2006 या कालावधीत केलेल्या कॉल्सबद्दल गैरअर्जदाराने रक्कम आकारली. अशाप्रकारे गैरअर्जदार रिलायन्स मोबाईल कंपनीने त्रुटीची सेवा दिली म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की त्यास गैरअर्जदारानी रु 1,00,000/- नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदारांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यंचे म्हणणे असे आहे की, त्यांनी तक्रारदाराला रु 10,000/- ची क्रेडीट लिमीट दिलेली नव्हती. साधारणपणे सर्व ग्राहकांना रु 800/- ची क्रेडीट लिमीट दिलेली असते. क्रेडीट लिमीट वाढविण्याबाबत ग्राहकांना लेखी माहिती दिली जाते. तक्रारदाराची सेवा कधीही बंद केलेली नाही व त्यास कोणतेही नुकसान झालेले नाही. तक्रारदाराने रिलायन्स वरुन रिलायन्स मोबाईल सेवेवर केलेले कॉल्स मोफत असताना त्यास रक्कम आकारली हे म्हणणे खोटे आहे. रिलायन्स वरुन रिलायन्स मोबाईल सेवा फक्त महाराष्ट्र व गोवा येथेच मोफत असुन बाहेर राज्यात गेल्यावर रिलायन्स ते रिलायन्स सेवा मोफत नाही. तक्रारदाराची तक्रार खोटी आहे. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे 1. गैरअर्जदारांच्या सेवेत त्रुटी आहे काय? नाही. 2. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 :- तक्रारदार युक्तीवादाच्या वेळी हजर नाही. गैरअर्जदारांच्या वतीने अड कार्लेकर एस.जी. यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराला गैरअर्जदार रिलायन्स मोबाईल कंपनीने कोणत्या क्रमांकाला रु 10,000/- ची क्रेडीट लिमिट दिली होती याचा खुलासा तक्रारदाराने तक्रारीमध्ये केलेला नाही. त्याने त्याच्या पोस्ट पेड क्रमांकाला क्रेडीट लिमिट होती असे म्हटले आहे परंतु त्याच्याकडे असलेल्या तीन पैकी कोणता क्रमांक पोस्टपेड होता याचा खुलासा तक्रारदाराने केलेला नसुन त्याला रु 10,000/- ची क्रेडीट लिमिट देण्यात आल्याबाबत त्याने कोणताही पुरावा दिलेला नाही. तसेच त्यास रिलायन्स ते रिलायन्स कॉल्स मोफत असुनही त्याने दिनांक 20/12/2006 ते 26/12/2006 या कालावधीत मोबाईल क्रमांक 9370514686 वरुन 9397676006 या क्रमांकावर लावलेल्या कॉल्सबद्दल रक्कम आकारली या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने कोणताही पुरावा दिलेला नाही. त्याने तक्रारीमध्ये नि “ए” वर देयके सादर केल्याचा उल्लेख केला आहे परंतु त्याने निशानी “ए” असे काहीही सादर केलेले नसुन निशाणी नसलेली देयके त्याने सादर केली आहे परंतु ती देयके उपरोल्लेखीत मोबाईल क्रमांक 9370514686 ची नसुन ती सर्व देयके मोबाईल क्रमांक 9325217349 ची आहेत. तक्रारदाराने सादर केलेल्या कागदपत्रावरुन गैरअर्जदाराने त्यास रु 10,000/- ची क्रेडीट लिमीट दिल्याचे व त्याचे कॉल्स रु 2,000/- चे झाल्यानंतर सेवा बंद केल्याचे सिध्द होत नाही तसेच गैरअर्जदारांनी रिलायन्स ते रिलायन्स कॉल्स मोफत असुनही त्याने केलेल्या कॉल्सबद्दल रक्कम आकारल्याचे देखील तक्रारदार सिध्द करु शकलेला नाही म्हणून मुद्दा क्र 1 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |