::: निकालपत्र :::
(निकाल तारीख :23/02/2015 )
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार आणि त्याची पत्नी या दोघांचे गैरअर्जदार क्र. 1 च्या बँकेत संयुक्तीक खाते आहे, त्यांचा खाते क्र. 360 काढलेले आहे. गैरअर्जदार क्र. 2 ही मुख्य शाखा असुन गैरअर्जदार क्र. 3 ही सुध्दा बार्शी रोड येथे त्याच बँकेची शाखा आहे. अर्जदाराचे व गैरअर्जदार क्र. 1 चे चांगले संबंध असून, अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 हे चांगल्या प्रकारचा व्याजदर देतात म्हणुन रक्कम रु. 39,112/- हे 12 महिन्यासाठी व्याजदर 10.75 टक्के मुदत ठेवीचा असल्यामुळे दिनांक 24/07/2009 रोजी ठेवले. गैरअर्जदार क्र. 3 ने त्याची रशिद पावती दिली, जिचा नंबर 14199 दि. 24.07.2010 मुदत ठेवीची रुजु होण्याची तारीख व रक्कम रु. 43,214/- अर्जदारास देणार होती. एक वर्षानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 3 कडे भेट देवुन आपली सदरची रक्कम ही विहीत मुदत संपल्यामुळे आपणास देण्यात यावी म्हणुन गैरअर्जदार क्र. 1 ते 3 कडे भेट दिली. परंतु गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर दि. 24.08.2010 रोजी परत गैरअर्जदार क्र. 3 कडे मुदत ठेव रक्कम देण्याची, विनंती अर्जदाराने केली. परंतु गैरअर्जदार क्र. 3 ने सदरची रक्कम दिली नाही. दि. 25.08.2010 रोजी सदर गैरअर्जदारांविरुध्द जिल्हाधिकारी कार्यालय डि.डि.आर यांच्या कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर दि. 09.09.2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 ते 3 कडे आर.पी.ए.डी. व यु.पी.सी. ने नोटीस पाठवल्या. परंतु नोटीस प्राप्त होवुन ही गैरअर्जदारक्र. 1 ते 3 यांचेकडून काहीच उत्तर आले नाही. म्हणुन सदरची तक्रार देण्यात आली आहे. अर्जदाराला झालेल्या त्रासापोटी रु. 5000/- देण्यात यावे, व त्याची रक्कम दिनांक 24.07.2010 रोजीच्या रु. 43,214/- या मुदतठेव रक्कमेवर त्या दिवसापासुन 12 टक्के लावुन गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी सदरची रक्कम दयावी. अर्जदार व त्यांच्या पत्नीचे एकत्र खाते आहे. व दोघांच्याच नावे सदरची एफ.डी. काढलेली आहे.
गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी आपले म्हणणे न्यायमंचा दाखल केलेले असून, त्यांच्या म्हणण्या नुसार, अर्जदारास मुदत ठेवीची मुदत संपल्या नंतर गैरअर्जदार बँके मार्फत एकुण रक्कमे पैकी रु. 25,000/- तुर्त घेणेबाबत अर्जदारास विनंती केली होती. परंतु अर्जदाराने सदरील रक्कम घेण्यास नकार दिला. तसेच बँकेने अर्जदाराचे पैसे देण्याची हमी दिलेली आहे. सध्या बँक आर्थीक अडचणीतुन जात असल्यामुळे एक रक्कमी रक्कम त्यांना देता येणार नाही, असे बँकेने शपथेवर निवेदन केले आहे.
अर्जदाराने दि. 19 डिसेंबर 2014 रोजी अर्ज न्यायमंचात दिला की, सदर बँकेत प्रशासक म्हणुन गैरअर्जदार क्र. 4 यांना पार्टी करण्यात यावी, व अर्जदाराची सुधारणा दाव्यात करण्यात यावी, असा अर्ज दिलेला आहे, त्यावर गैरअर्जदार यांचा उजर घेण्यासाठी आदेश पारीत करण्यात आलेला
आहे. परंतु आज पर्यंत सदरच्या पार्टीने म्हणणे दिलेले नाही. सदर केस ही जुनी असल्यामुळे अर्जदाराचा अर्ज मंजुर करण्यात येतो. परंतु अर्जदाराने त्यानंतर कोणत्याही स्टेप्स घेतल्या नसल्यामुळे हे न्यायमंच गुणवत्तेवर निकाल पारित करीत आहे.
तक्रारदाराचे रु. 43214/- हे गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांना जमा असल्याची बाब मान्य असून ते ती रक्कम एक रक्कमी देवु शकत नाही, ही बाब मंचासही पटते, कारण सदयस्थीतीला सदरच्या बँकेवर प्रशासक नेमण्यात आलेला असून, सदरची बँक ही सध्या आर्थीक अडचणीतुन जात आहे. त्यामुळे हे न्यायमंच अर्जदाराची रक्कम ही तीन महिन्यात अर्जदारास गैरअर्जदाराने हप्ते पाडून दयावेत, व शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 2000/- व दावा खर्च म्हणुन रु. 1000/- हे न्यायमंच मंजुर करत आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांनी सदरची रक्कम देण्यास त्यांच्या म्हणण्यात सहमती दिलेली असल्यामुळे, अर्जदाराच्या रक्कमेचा विचार करुन, स्वत: न्यायमंचात तीन महिन्यात रक्कम भरण्यात यावी.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी, अर्जदारांची मुदत ठेवीची रक्कम रु. 43214/-, तीन महिन्यात हप्ते पाडून, न्यायमंचात जमा करावी.
- गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी अर्जदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.2000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 1000/- , आदेश प्राप्ती 30 दिवसात देण्यात यावे.
स्वा/- स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**