// तक्रारदाराच्या दि. 26/07/2021 रोजीच्या अर्जावरील आदेश //
(एम.ए./21/113)
द्वारा – श्री. डी.एस. पराडकर, सदस्य
तक्रारदाराचे म्हणणेनुसार, ते अॅगस्टस देसी को. ऑप. हौसिंग सोसायटी (एलीगंट अपार्टमेंट) मधील रहिवासी असून ते फ्लॅट क्र. 8A मध्ये गेली 45 वर्षांपासून राहतात. सामनेवाला क्र. 1 सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी व इतर मॅनेजिंग कमिटीमधील सदस्य आहेत. सामनेवाला क्र. 2 हे त्याच इमारतीत फ्लॅट क्र. 9A मध्ये राहत आहेत. तक्रारदाराचे कथनावरुन सन 2000 पासून सामनेवाला क्र. 2 हे इमारतीतील फ्लॅट क्र. 9A मध्ये रहावयास आल्यानंतर व त्यांनी फ्लॅटचे अंतर्गत भागात केलेल्या नूतनीकरण व सजावटीमुळे तक्रारदाराचे फ्लॅटमध्ये पाण्याचे गळतीमुळे नुकसान झाले. मात्र सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेमार्फत त्याबाबतीत कोणत्याही प्रकारची पूर्ण दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदारास व त्यांचे कुटुंबियांचे आरोग्यास धोका निर्माण झाला, परिणामी त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यांचे फ्लॅट मधील नोकराचे खोलीमधील पाईप डक्ट मधून गळती सुरु झाल्याने सहाव्या वेळी तीच परिस्थिती पुन्हा उद्भवल्याने दि. 30/05/2020 रोजी सामनेवाला क्र. 1 व 2 यांना कळविण्यात आले. मात्र चेअरमन व सेक्रेटरी यांनी स्वत: भेट न देता, सुरक्षा रक्षकास वस्तुस्थितीची पाहणी करण्यास पाठविण्यात आले. त्यानंतर दि. 02/09/2020 रोजी बिल्डींगमधील प्लम्बर श्री. मोफीज यांना पाण्याच्या गळतीबाबतची पाहणी करण्यास पाठविण्यात आल्यानंतर पाण्याची गळती ही सामनेवाला क्र. 2 यांचे 9A या फ्लॅट मधील नोकराचे खोलीकडील डक्टमधून होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र तसे लेखी देण्यास मनाई करण्यात आली, पुन्हा दि. 06/09/2020 रोजीचे सामनेवाला 1 यांचे पत्रानुसार तक्रारदारास कळविण्यात आले की, सामनेवाला 2 यांचेकडील वॉशिंग मशिनमधून पाणी गळत असल्याने ती दुरुस्त करण्यात आली त्यामुळे पाणी गळती बंद झाली. तक्रारदाराचे म्हणण्यानुसार, छोटया छोटया छिद्रातून त्याचप्रमाणे खराब झालेल्या सिमेंट प्लास्टरमधून खराब पाणी आत येत आहे. दि. 11/09/2020 रोजी मे. इलेक्ट्रीक मेडिया या वॉटर प्रुफींग एजन्सीकडून सर्व्हे घेण्यात आला. तक्रारदाराचे फ्लॅटमधील उत्तर-पश्चिमेकडील टॉयलेटकडून मोठया प्रमाणात जोरदार पाणी गळती होत असल्याचे दिसून आले. सदरचे सर्व्हेअर यांनी सामनेवाला यांच्या 9A फ्लॅटमधून Audit by Thermal Imaging ज्यामुळे निश्चित कोणत्या भागातून गळती होत आहे हे निश्चित सांगता येईल असे अहवालात नमूद केले. मात्र त्यानंतर कोणताही संपर्क साधलेला नाही. दि. 23/09/2020 रोजी फ्लॅट क्र. 9A मधील छतातून व पाईप डक्टमधून भरपूर पाणी गळती झाल्याने तक्रारदाराच्या सदनिकेमधील नोकराच्या खोलीत पूर्ण पाणी साचलेले होते. मात्र कोणतीही परिणामकारक उपाययोजना करण्यात आलेली नाही. सप्टेंबर 2020 चे अखेरीस तक्रारदाराचे वकीलांनी पाठविलेली नोटीस प्राप्त झाल्याने, सामनेवाला क्र. 2 यांनी वॉटरप्रुफींग एजन्सी ऑल इंडिया वॉटर प्रुफींग कंपनी यांना बोलावले. सदर कंपनीने पाणी गळती थांबविण्यापूर्वी एक छोटा पाईप बदलण्याचे सुचविले. दि. 29/12/2020 रोजी बिल्डींगमधील काम करीत असलेल्या प्लंबरने पाईप बदलला. मात्र सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी त्यानंतरचे पाण्याच्या गळती संदर्भातील कामे केलेली नाहीत. तरीसुध्दा पाणी गळतीच्या बाबतची कामे पूर्ण केल्याबाबत अहवाल देण्यात आला. पुन्हा दि. 27/02/2021 व दि. 27/03/2021 रोजी मोठया प्रमाणात पाणी गळती सुरु झाली ही बाब बिल्डींग प्लंबरलाही दाखविण्यात आली. सामनेवाला क्र. 1 यांनी ही वस्तुस्थिती पाहण्यास नकार दिला. त्याऐवजी त्यांनी बिल्डींग मधील व्यवस्थापकाला पाठविले, व्यवस्थापक तसेच प्ल्मबर या दोघांनी ही बाब मान्य केली. तक्रारदाराचे म्हणण्यानुसार, उत्तर-पश्चिम या दिशेकडील टॉयलेट दुरुस्ती करणेही बाकी होते. त्यानंतर श्री. प्रकाश बजाज, स्ट्रक्चरल इंजिनिअर तसेच श्री. एच. सथालीया यांचेसोबत सर्व्हे केला, त्यांनीसुध्दा पाण्याची गळती ही सिलींग पाईप डक्टमधून होत असल्याचे स्पष्ट केले. सामनेवाला 1 यांनी या आयोगातील एसएमएफ/52/2008 नुसार पारीत केलेल्या आदेशाचे पालन केले नाही. त्याचप्रमाणे सध्यस्थितीत उद्भवलेल्या पाण्याच्या गळतीच्या समस्येचे निराकरण सामनेवाला यांनी सोसायटीच्या बायलॉज प्रमाणे तसेच उपनिबंधक को.ऑपरेटीव्ह सोसायटी, मु्ंबई महानगर पालिकेच्या कायदयातील कलम 381 सोबत 471 चे कलमानुसार करणे आवश्यक होते. मात्र दि. 11/06/2021 रोजीचे पत्रान्वये सामनेवाला यांनी लिकेज दुरुस्त करण्यास नकार दिला. सन 2000 ते 2021 पर्यंतच्या कालावधीतील पाण्याच्या गळती संबंधी कार्यवाही करणे अपेक्षित असताना त्यांनी ती पूर्णपणे केलेली नाही. सध्याच्या कोव्हीड परिस्थितीमुळे तक्रारदार व त्यांची पत्नी तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींना आरोग्यदृष्टया त्रास सहन करावा लागला. दि. 06/09/2020 रोजीचे सामनेवाला क्र.1 यांचे पत्रानुसार तसेच सामनेवाला 2 दि. 05/09/2020 रोजीचे पत्रानुसार डक्टचे भागात ठेवलेल्या वॉशिंग मशिनमुळे गळती होत होती, त्यानंतर दि. 11/09/2020 रोजीचे सामनेवाला क्र. 1 यांचे पत्रानुसार सामनेवाला 2 यांचे मते पाणी गळती होऊन ते पाईप डक्ट मधून खाली पडते. दि. 14/10/2020 रोजी सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी ऑल इंडिया वॉटर प्रुफिंग कंपनीला भेट देऊन पाहणी करण्यास सांगण्यात आल्यानंतर त्यांनीसुध्दा जेवणाचे खोलीतील पाईप लाईनमधील पाण्यामुळे ओलसरपणा आढळून आला, तसेच बाल्कनीत ओलावा असल्याचे दिसून आले असे नमूद केले. ऑल इंडिया वॉटरप्रुफींग कंपनीचा दि. 06/10/2020 रोजीचा अहवाल तसेच इतर दोन स्वतंत्र व्यक्ती श्री. गिरीश अकोलकर व श्री. प्रकाश बजाज यांनी दि. 09/09/2020 व दि. 27/05/2021 रोजीचे अहवालावरुन स्पष्ट होते की, तक्रारदाराचे फ्लॅटमध्ये पाण्याची गळती होत होती हे सिध्द होत असल्याने तक्रारदाराचा अंतरिम अर्ज मंजूर करण्यात येऊन सामनेवाला 1 व 2 यांनी त्याप्रमाणे दुरुस्ती करावी याबाबत त्यांना आदेश देण्यात यावेत अशी तक्रारदारांनी विनंती केली.
(2) सामनेवाला 1 यांनी तक्रारदाराचे अंतरिम अर्जावर त्यांचे म्हणणे दाखल केले. सामनेवाला 1 यांच्या मते, तक्रारदाराच्या राहण्याच्या वास्तव्याचे ठिकाण वेगवेगळया ठिकाणी आहे, त्यापैकी ते फ्लॅट 8-A एलीगंट अपार्टमेंट, कुलाबा, मुंबई येथे राहत असून, त्यांचा दुसरा फ्लॅट नं.3, करीम मनोर, 8 कृष्णा संघी पथ, मुंबई -400 007 येथे असूनही त्यांनी सदरची तक्रार या आयोगात दाखल केली असून, दुसरी केस स्मॉल कॉज कोर्ट, मुंबई येथे दाखल आहे.
(3) सामनेवाला यांचे मते पाण्यामुळे होणारी गळती संदर्भात आवश्यक ती दुरुस्ती केली, त्यामुळे तक्रारदाराचे फ्लॅटमध्ये पाणी गळती होत नाही, सोसायटीचे कार्यालयातील पदाधिकारी यांनी तक्रारदाराच्या फ्लॅटमधील पाहणी केली. मात्र कुठेही बाहेरील बाजूने गळती होत असल्याचे दिसून आले नाही. दि. 09/08/2021 रोजीचा निरीक्षण अहवाल फोटोसह दाखल करण्यात आला आहे. ब-याच लोकांनी तक्रारदाराचे फ्लॅटला भेटी दिल्या परंतु पाणी गळती दिसून आली नाही. सामनेवाला यांनी वॉचमॅनला तक्रारदाराचे फ्लॅटमध्ये जाऊन गळतीची पाहणी करण्यास सांगितले नसून, तक्रारदारांनी स्वत:च वॉचमनला स्वत:चे फ्लॅटमध्ये पाहणी करण्यास बोलावले. त्यावेळीसुध्दा छतामधून गळती होत असल्याचे दिसून आलेले नाही. सामनेवाला यांचे असेही म्हणणे आहे की, बिल्डींग प्लंबरलाही अशाप्रकारची गळती फ्लॅट क्रमांक 9A मधून होत असल्याचे आढळून आलेले नाही किंवा तसा अहवाल देण्यास सामनेवाला यांनी कोणताही विरोध केलेला नाही. सामनेवाला यांचे मते खराब झालेल्या वॉशिंग मशिनमुळे गळतीची समस्या निर्माण झालेली असल्याने सामनेवाला 2 यांनी ती मशिन बदलून टाकल्याने पाण्याची गळती पूर्णपणे बंद झाली. तक्रारदाराचे फ्लॅटमध्ये पाणीगळती बाहेरुन होत असल्याचे दिसून आलेले नाही. तक्रारदार यांनी इलेक्ट्रीक मेडिया कडून करुन घेतलेल्या सर्व्हेअरचे कामास सामनेवाला यांनी आक्षेप घेऊन, त्यांनी केलेल्या सर्व्हेबाबतच्या कामाचा अहवाल सामनेवाला यांना मान्य नाही.
(4) सामनेवाला यांनी गळती थांबविण्याबाबत सर्वप्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. तक्रारदाराने सादर केलेले फोटो तक्रारदाराच्या सदनिकेमध्ये पाणीगळती सिध्द करत असल्याबाबतचा पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाहीत. तक्रारदाराने श्री. प्रकाश बजाज व त्यांचे सोबती श्री. एच सटालिया (Sathalia) यांचेकडून सर्व्हे करुन घेतला, याबाबत तक्रारदारांनी सामनेवाला 1 व 2 यांना कळविले नाही किंवा त्यांना सोसायटीचे आवारात तशी परवानगी देण्यात आलेली नसल्याने सदर सर्व्हे अहवाल फेटाळण्यात यावा.
(5) जर तक्रारदारास त्यांचे नोकराचे बाथरुममध्ये गळती आढळून आल्यास, तर ती तक्रारदाराचे फ्लॅटमधून होत असल्याने ती अंतर्गत गळती आहे. सामनेवाला यांनी फ्लॅट नं. 7A मध्ये भेट दिल्यावर पाणी गळती ही फ्लॅट नं. 7A मध्ये तक्रारदाराच्या फ्लॅट क्र. 8A मधून होत असल्याचे दिसून आले. तक्रारदारांनी सर्व्हे करण्यासाठी नेमणूक केलेले 3 सर्व्हेअर सामनेवाला यांना मान्य नाहीत, त्यासाठी स्वतंत्र सर्व्हेअरची नेमणूक आयोगाने करावी. तक्रारदार हे कोणत्याही अंतरिम नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास पात्र नाहीत.
(6) सामनेवाला 2 यांनी तक्रारदाराने दाखल केलेल्या अंतरिम अर्जावर त्यांचे म्हणणे दाखल केले, त्यांचे मते, तक्रारदाराने दि. 07/01/2021 रोजी तक्रार दाखल केली असून ती ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अन्वये दाखल केली. सबब तक्रार खारीज करण्यात यावी, तक्रारदाराचे अंतरिम अर्जातील मागणी व तक्रारीतील प्रार्थना कलमातील (a) मधील मागणी सारखीच असल्याने अंतरिम अर्जाद्वारे मागणी करणेस तक्रारदार पात्र नाहीत. सन 2000 पासून झालेल्या पाण्याचे गळतीसाठी सामनेवाला 2 जबाबदार नाहीत. तक्रारदाराने (derogatory) टिका/ अपमानास्पद कथन नमूद केल्याने मा. आयोगाने ते (refrain) टाळण्याचे आदेश देण्यात यावे. मात्र तक्रारदार चुकीचे आधारावर आरोप करत आहेत. त्यांचे मते, दि. 18/08/2021 रोजी संस्थेला याबाबत संपूर्ण माहिती दिलेली आहे. दि. 09/08/2021 रोजी चेअरमन व सेक्रेटरी यांनी स्वत: भेट देऊन दोन्ही फ्लॅटमधील नोकराच्या रुमची तसेच बाथरुमची पाणी गळतीबाबतची तपासणी केली, त्यावेळी त्यांना ओलावा असलेली कोणताही भाग आढळून आला नाही. डक्ट मधील भागसुध्दा पूर्णपणे कोरडा (सुका) असल्याचे आढळून आले, त्याचदिवशी तक्रारदाराचे फ्लॅटची पाहणी केली असता, त्यावेळी वरील नमूद जागेवरुन व छतामधून कोणत्याही प्रकारची पाणी गळती होत असल्याचे दिसून आले नाही. तसेच पाईपलाईन व डक्ट तेथील जागांमधील भाग कोरडा होता. मात्र तक्रारदाराचे फ्लॅटमधील डक्टचा भाग काही प्रमाणात ओला असल्याचे दिसून आले, या सर्व बाबी दि. 18/08/2021 रोजीचे पत्राद्वारे संस्थेला कळविण्यात आले तसेच सामनेवाला 2 यांचे मते जर कोणत्याही प्रकारची पाणी गळती त्यांचे फ्लॅटमधून
होत असेल तर ती स्वत:चे खर्चाने करुन घेण्यास ते तयार आहेत. त्याचप्रमाणे दि. 06/11/2019 रोजीचे पत्रानुसार संस्थेला विनंती करण्यात आली की, एखादा तज्ञ कॉन्ट्रॅक्टर नेमून सदरची समस्या सोडविण्यात यावी त्याचा खर्च संस्थेने करावा, संस्थेला सामनेवाला देतील असे आश्वासन त्यांनी संस्थेला दिले. सामनेवाला 2 यांनी रक्कम रु. 21,000/- चा धनादेश सदर बाब पूर्ण करण्यासाठी दिला. तक्रारदाराने चुकीचे आरोप केलेले आहेत. तक्रारदाराने केलेल्या मागण्या मिळण्यास ते पात्र नाहीत. सदर अर्ज निकाली काढण्यात यावा.
(7) तक्रारदाराने दाखल केलेल्या अंतरिम अर्जावर तक्रारदार तसेच सामनेवाला 1 व 2 यांच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारीतील अंतरिम अर्जावरील त्यांचे लेखी म्हणणे तसेच सादर केलेली कागदपत्रे व फोटोग्राफ्स विचारात घेण्यात आले. प्रस्तूत तक्रारीत तक्रारदाराची मुख्य मागणी ही सामनेवाला 2 यांचे फ्लॅटमधून होणा-या पाण्याच्या गळतीबाबत योग्य ती दुरुस्ती करुन निर्माण झालेली समस्या कायम स्वरुपी निकाली काढण्यात यावी. मात्र तक्रारीत तक्रारदाराचे फ्लॅटमधील पाणीगळतीचा प्रश्न ब-याच काळापासून निर्माण झालेला आहे असे निदर्शनास येते. त्यासंबंधित तक्रारदारांनी दाखल तक्रारीत या मंचाने यापूर्वी दि. 22/09/2009 रोजी आदेश पारीत केलेल्या आदेशाची प्रत जोडली आहे, यावरुन पाणी गळती होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात येतो. तक्रारदारांनी त्यांचे अंतरिम अर्जासोबत गिरीश अकोलकर, मे.इलेक्ट्रीक मेडिया रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट यांनी दि. 09/09/2020 रोजी तक्रारदाराचे फ्लॅट संदर्भात केलेल्या निरीक्षणा दरम्यान सादर केलेल्या अहवालात पाईप डक्ट सिलींगमधून पाणी गळती होते आहे शिवाय गळतीही 9A यांचे फ्लॅटमधून होत असल्याचा निष्कर्ष काढलेला आहे. त्यानंतर कॉम्प्यूटर हेल्प स्ट्रक्चरल इंजिनिअर अॅण्ड सॉफ्टवेअर डेव्हलपर श्री. प्रकाश बजाज त्यांचे सोबत असलेले ज्येष्ठ इंजिनिअर हजेफा सथालिया यांनी दि. 18/06/2021 रोजी तक्रारदाराचे फ्लॅटमधील नोकराचे रुममधील पाणी गळतीबाबत सादर केलेल्या अहवालात नवव्या मजल्यापासून डक्ट सिलींगमधून पाणी गळती होत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. तसेच आठव्या मजल्यावरील नोकराचे खोलीजवळील भिंतीत ओलावा तसेच भिंतीचे प्लास्टर तसेच रंग पूर्णपणे खराब झाल्याने बिल्डींगला धोका आहे शिवाय आरोग्यदृष्टया हानिकारक आहे असे निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे फोटोत दर्शविल्याप्रमाणे पाणी गळती होत असल्याचे आयोगाचे मत आहे. तसेच यासंदर्भात दि. 09/08/2021 रोजी संस्थेचे चेअरमन, सेक्रेटरी व 9A चे फ्लॅट मालक (सामनेवाला 2) यांचे समवेत पाणी गळतीबाबत तपासणी केली असता, तक्रारदाराचे फ्लॅटमधील सिलींगमधून गळती होत नसल्याचा अभिप्राय दिलेला आहे. मात्र तक्रारदाराचे बाथरुम व किचनरुममधून जोडणा-या पाईपमधून थोडया फार प्रमाणात गळती होत असल्याने ओलावा आल्याचे दिसून आले. तक्रारदाराचे मते सिलींगमध्ये छोटे छिद्र असल्याने पाणी गळती होते. मात्र या अहवालावर तक्रारदाराची सही घेण्यात आल्याचे दिसून येत नाही. सदर अर्जासंदर्भात दोन्ही पक्षकारांनी प्रत्यक्षातील फोटो काढून उपलब्ध परिस्थितीनुसार पुरावा म्हणून सादर केले आहेत.
(8) दि. 23/09/2020 तसेच दि.27/02/2021 व दि. 27/03/2021 रोजी बिल्डींग प्लंबर श्री. मोफीज यांचेसमवेत निरीक्षण केले असता, डक्ट सिलींगमध्ये पाण्याचे थेंब दिसून येत होते. तसेच डक्टचे पृष्टभागावर सांडपाणी साचलेले दिसून येते. डक्ट पाईपना पूर्णत: तडे गेले असल्याचे फोटो दिसून येतात, यावरुन मंचाचे असे मत आहे की, इमारतीचे बाहेरील ड्रेनेज पाईप खराब होऊन पाणी गळती होत असल्याचे स्पष्ट होते. तसेच दि. 23/09/2020 रोजी काढण्यात आलेल्या फोटोनुसार फ्लॅट नं. 9A मधील नोकराचे खोलीतून पाणी गळती होत आहे हे सदरचे फोटोवरुन स्पष्ट दिसून येते. वरील बाबी विचारात घेता, सामनेवाला 2 यांचे फ्लॅट नं. 9A मधून होणारी पाण्याची गळतीबाबतची दुरुस्ती त्यांनी त्यांचे स्वत:चे खर्चातून त्वरित करुन दयावी तसेच बाहेरील ड्रेनेज पाईपमधून भिंतीचे प्लास्टर व भिंतीचे तडयातून पाणी भिंतीमध्ये जाऊन भिंती ओल्या होत असल्याने तसेच ड्रेनेज पाईप खराब झाल्याने डक्टचे पृष्टभागावर सांडपाणी साचून आरोग्यास धोका पोहचणार असल्याने सोसायटीने स्वत: खर्च करुन तक्रारदाराचे पाणी गळतीबाबत त्वरित कार्यवाही करावी. सामनेवाला 2 यांनी त्यांचे दि. 18/08/2021 रोजीचे पत्रात तसे स्पष्ट कबूल केले आहे. यापूर्वी दि. 06/11/2019 रोजीचे सामनेवाला 2 यांनी संस्थेस कळविले होते की, तज्ञ कॉन्ट्रॅक्टर नेमून पाण्याची गळती बाबतची समस्या संस्थेमार्फत सोडविण्यात यावी त्यासाठी येणारा खर्च सामनेवाला 2 भरण्यास तयार आहेत, त्यासाठी त्यांनी धनादेश क्रमांक 941980 दि. 06/11/2019 रक्कम रु.21,000/- सोसायटीकडे सुपूर्त केला यावरुन स्पष्ट होते की, सामनेवाला 2 यांचे फ्लॅटमधून पाण्याची गळती होत आहे. तसेच तक्रारदाराच्या फ्लॅटमधील ड्रेनेज पाईप खराब झाल्याने बाहेरुन पाणी गळतीचा त्रास होत असल्याने तो संस्थेने स्वत:चे खर्चाने करुन घ्यावा असे आदेश देण्यात येतात. यासाठी आम्ही मा. राज्य आयोग मुंबई यांनी अपिल क्रमांक A/15/483 मध्ये दि. 14/12/2017 रोजी पारीत केलेल्या आदेशाचा आधार घेत आहोत. Arenja Tower Co.Op. Housing Society Ltd. v/s. Smt. Namita Pramod Jaiswal
// आदेश //
- तक्रारदारांनी दाखल केलेला दि. 26/07/2021 रोजीचा अर्ज क्रमांक एम.ए./21/113 मंजूर करण्यात येतो.
-
- सामनेवाला 1 यांना आदेशित करण्यात येते की, इमारतीचे बाहेरील बाजूकडील भिंतीतून तसेच ड्रेनेज पाईमधून पाणी गळती होत असल्याने संस्थेने स्वत:चे स्वखर्चाने दुरुस्ती करुन दयावी.
- सामनेवाला 2 यांना आदेशित करणत येते की, त्यांनी त्यांचे फ्लॅट क्र. 9A मधून होणारी पाण्याची गळती त्यांनी त्यांचे स्वत:चे खर्चाने दुरुस्ती करुन दयावी.
- खर्चाचे आदेश नाहीत.