निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) गैरअर्जदार बँकेच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याचे वडिल श्री शेख सरदार अहमद शेख अब्दुल अझीज यांनी दिनांक 5/3/2002 रोजी गैरअर्जदार डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक यांच्याकडून स्वत:ची स्थावर मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज घेतले होते. तो स्वत: देखील गैरअर्जदार बँकेचा भागधारक आहे. त्याचे वडिल श्री शेख सरदार अहमद शेख अब्दुल अझीज यांचे दिनांक 18/11/2006 रोजी निधन झाले. त्याच्या वडिलाने गैरअर्जदार बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम बाकी असेल तर ती रक्कम भरण्यास तो तयार आहे म्हणून त्याने गैरअर्जदारांकडे त्याच्या वडिलाच्या कर्ज खात्याचा उतारा मागितला. परंतु वारंवार मागणी करुनाही गैरअर्जदारांनी कर्ज खात्याचा उतारा दिला नाही तसेच त्याच्या वडिलांनी गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे मूळ कागदपत्र गैरअर्जदार बँकेकडे असून ते देखील बँकेने दिले नाहीत. त्याच्या वडिलाकडे गैरअर्जदारांची कोणतीही बाकी नाही परंतु गैरअर्जदार बँकेचे अधिकारी जाणीवपूर्वक त्याला कर्ज खत्याचा उतारा आणि त्याच्या मालमत्तेचे मूळ कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करीत आहेत अशा प्रकारे गैरअर्जदार बँकेने त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार बँकेकडून त्यास त्याच्या वडिलांच्या कर्ज खात्याचा उतारा आणि बँकेकडे गहाण ठेवलेले मालमत्तेचे मूळ कागदपत्र देण्यात यावेत तसेच त्रुटीची सेवा दिल्याबद्दल नुकसान भरपाई देण्यात यावी. गैरअर्जदार क्र 1 व 2 बँकेने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचा त्यांच्याशी ग्राहक म्हणून कांहीही संबंध नाही. श्री शेख सरदार अहमद शेख अब्दुल अझीज हे बँकेचे ग्राहक होते परंतु तक्रारदार हा त्यांचा मुलगा असल्याचे त्यांना माहित नाही. तक्रारदाराने तो स्वत: श्री शेख सरदार अहमद शेख अब्दुल अझीज यांचा वारस असल्याबाबतचे कोणतेही प्रमाणपत्र सादर केलेले नाही. तक्रारदाराने श्री शेख सरदार अहमद शेख अब्दुल अझीज यांचा खाते उतारा आणि त्याने गहाण ठेवलेल्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे मिळावीत म्हणून ज्यावेळी अर्ज दिला तेंव्हा त्यास तो श्री शेख सरदार अहमद शेख अब्दुल अझीज यांचा मुलगा असल्याबाबतचे वारस प्रमाणपत्र दाखल करण्यास सांगण्यात आले. परंतु त्याने वारस प्रमाणपत्र दाखल केले नाही. मूळ कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नसेल तर त्याने गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे कागदपत्र मयताच्या वारसास कर्जाची परतफेड केल्याशिवाय मिळू शकत नाहीत. तक्रारदाराच्या वडिलाकडे कोणतीही बाकी नव्हती हे तक्रारदाराने म्हणणे मान्य नाही. बँकेने तक्रारदाराला कागदपत्र देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केलेली नसून तक्रारदाराने वारस प्रमाणपत्र सादर केले नसल्यामुळे त्यास कागदपत्र देणे शक्य नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी बँकेने केली आहे. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे - गैरअर्जदार डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी होय
- बँक लि., औरंगाबाद यांच्या सेवेत त्रुटी आहे काय?
- आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणे मुद्दा क 1 :- दोन्हीही पक्षांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. तक्रारदाराने त्याचे वडिल श्री शेख सरदार अहमद शेख अब्दुल अझीज यांच्या कर्ज खात्याबाबतचा खाते उतारा गैरअर्जदार बँकेकडे मागितला होता ही बाब तक्रारदाराने सादर केलेले कागदपत्र निशानी 3/2 वरुन दिसून येते. तक्रारदाराचे वडिल श्री शेख सरदार अहमद शेख अब्दुल अझीज यांनी गैरअर्जदार बँकेकडून कर्ज घेतले होते ही बाब बँकेने मान्य केली आहे. तक्रारदाराचे वडिल श्री शेख सरदार अहमद शेख अब्दुल अझीज यांचे निधन झालेले असल्यामुळे त्यांच्याकडील कर्ज बाकी रक्कम भरण्याची तयारी तक्रारदाराने दर्शविली असून गैरअर्जदार बँकेने तक्रारदाराला मयत श्री शेख सरदार अहमद शेख अब्दुल अझीज यांच्या कर्ज खात्याचा उतारा देण्यास कांहीही हरकत नाही. कर्ज खात्याचा उतारा देण्यासाठी वारस प्रमाणपत्राची कोणतीही आवश्यकता नाही. कारण कायदयामध्ये तशी कोणतीही तरतूद नाही. गैरअर्जदार बँकेने वारस प्रमाणपत्राशिवाय मयत कर्जदाराच्या कर्जाचा उतारा देता येणार नाही अशा प्रकारचा नियम किंवा कायदा असल्याचे दाखविले नाही. तक्रारदाराच्या वडिलांनी गैरअर्जदार बँकेचे कर्ज पूर्णत: फेडलेले नसेल तर तक्रारदाराला बँकेकडून त्यांच्या वडिलांने गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे मूळ कागदपत्र मिळू शकणार नाहीत. परंतु गैरअर्जदार बँकेने तक्रारदाराला त्याच्या वडिलांच्या कर्ज खाते उतारा देण्यास कोणतीही अडचण नाही. गैरअर्जदार बँकेने तक्रारदाराला त्याच्या वडिलाच्या कर्ज खात्याचा उतारा देण्यास नकार देऊन निश्चितपणे त्रुटीची सेवा दिली आहे. म्हणून मुद्दा क्र 1 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक लि., यांनी तक्रारदाराला त्याचे वडिल मयत श्री शेख सरदार अहमद शेख अब्दुल अझीज यांच्या कर्ज खात्याचा उतारा निकाल कळाल्यापासून 1 महिन्याच्या आत द्यावा.
- गैरअर्जदार क्र 1 व 2 डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक लि., यांनी तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रु 1,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु 500/- निकाल कळाल्यापासून 1 महिन्याच्या आत द्यावेत.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री डी.एस. देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |