निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 16/12/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 23/12/2013 तक्रार निकाल दिनांकः- 13/03/2014
कालावधी 02. महिने. 18 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
निर्मला राजेसाहेब टेकाळे, अर्जदार
वय 45 वर्षे. व्यवसाय.घरकाम, अॅड.जी.बी.भालेराव.
रा. सुगाव ता.अंबेजोगाई जि. बीड.
विरुध्द
1 शाखाधिकारी, गैरअर्जदार.
युनायटेड इंडिया इन्शोरन्स कं.लि. अॅड.जी.एच.दोडीया.
दयावान कॉम्पलेक्स,स्टेशन रोड,परभणी.
2 शाखाधिकारी, अॅड.आर.व्ही.भिसे (आमले)
महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा – बर्दापूर,
ता.अंबेजोगाई जि.बीड.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने किसान क्रेडीटकार्ड विमा योजने अंतर्गत अर्जदाराच्या मयत पतीचा विमादावा प्रलंबीत ठेवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, ती सुगाव ता.अंबाजोगाई येथील रहिवाशी असून तिचे मयत पती नामे राजेसाहेब परसराम टेकाळे हे शेतकरी होते. आणि ते गैरअर्जदार क्रमांक 2 बँकेचे खातेदार होते. व तसेच ते किसानकार्ड धारक होते.
अर्जदाराचे म्हणणे की, इ.स. सप्टेंबर 2012 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 बँकेनी त्यांच्या बँकेच्या 323 किसानकार्ड धारकांसाठी विमा संरक्षणाची योजना गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे राबविली होती. त्याप्रमाणे बँकेने प्रत्येक किसानकार्ड धारकाच्या खात्यावरुन 45/- रुपये विमा हप्त्यापोटी नावे टाकुन प्रत्येक धारकासाठी 50,000/- चे विमा संरक्षण दिनांक 13/09/2012 ते 12/09/2013 पर्यंत 1 वर्षासाठी विमा कंपनीकडे 14,535/- रु. हप्ता जमा केले त्याप्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने किसान क्रेडीटकार्ड योजने अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे नावाने एकुण 323 धारकाची पॉलिसी क्रमांक 230601/47/12/43/00001171 अन्वये काढली होती.
अर्जदाराचे म्हणणे की, तिचे पती दिनाकं 23/01/2013 रोजी दाऊद खान यांचे सोबत मोटार सायकल क्रमांक MH-44-A-3562 ने अंबेजोगाईहून सुगावकडे येत असतांना इंडीका कार क्रमांक MH-24-V-3770 याने अर्जदाराच्या गाडीस जोरात धडक दिली व सदर अपघातात अर्जदाराच्या पतीस डोक्यास जबर मार लागला. त्यामुळे त्यांना अंबेजोगाई येथे प्रथोमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी लातूर येथील सहयाद्री दवाखान्यात नेले, परंतु अर्जदाराच्या पतीची डोक्याची जखम गंभीर असले कारणाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी त्यांना मॅक्स न्युरो हॉस्पीटल कासारवाडी पूणे येथे शरीक केले, परंतु दुर्दैवाने उपचार दरम्यान अर्जदाराच्या पतीचा दिनांक 04/02/2013 रोजी मृत्यू झाला.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर अपघाता बाबत संबंधीत पोलीस स्टेशनला सदर इंडीका कारच्या ड्रायव्हर विरुध्द गुन्हा नोंदविला. ज्या गुन्हयाचा क्रमांक 06/2013 असा आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या पतीच्या मृत्यूनंतर दिनाकं 11/03/2013 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे काढलेल्या किसान क्रेडीटकार्ड विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीचा विमादावा सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदार कमांक 2 यांचेकडे दाखल केला व त्यांनी तो विमादावा मंजुरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पाठविला. त्यानंतर विमादाव्याबाबत अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे चौकशी केली असता त्यांनी असे सांगीतले की, विमा कंपनीने मयताचा पी.एम. रिपोर्ट मागीतला आहे. त्यावेळी त्याने असे सांगीतले की, तिच्याकडे तिच्या मयत पतीचा पी.एम. रिपोर्ट नाही, कारण तिच्या मयत पतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती व उपचारादरम्यान पुणे येथील दवाखान्यात मृत्यू झाला. त्यामुळे मयताचे पोस्टमार्टेम करण्यात आले नव्हते.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनी विनाकारण पी.एम. रिपोर्ट कागदपत्राची मागणी करुन अर्जदाराचा विमादावा प्रलंबीत ठेवला आहे. व ते योग्य व कायदेशिर कारण नाही, कारण अर्जदाराने विमादावा दाखल करते वेळी आवश्यक ती कागदपत्रे म्हणजेच मृत्यू प्रमाणपत्र, वाहन परवाना, मरणोत्तर पंचनामा, पोलीसाचा अंतीम अहवाल, घटनास्थळ पंचनामा, मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, इ. कागदपत्रे दाखल केली होती.
अर्जदाराचे म्हणणे की, विमा कंपनीने आडवणुक करुन अर्जदाराचा विमादावा प्रलंबीत ठेवला. म्हणून तिने तिच्या वकिला मार्फत दिनांक 07/11/2013 रोजी गैरअर्जदाराना नोटीस पाठविली होती, परंतु गैरअर्जदाराने त्यास उत्तर दिले नाही वा अर्जदाराचा विमादावा अद्याप पर्यंत मंजूर केले नाही व अर्जदारास सेवेत त्रुटी दिली. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदारांना आदेश करावा की, त्याने अर्जदाराच्या मयत पतीच्या विमादाव्यापोटी 50,000/- रु. दिनांक 11/03/2013 पासून ते रक्कम अदा करे पर्यंत 12 टक्के दराने अर्जदारास द्यावेत. तसेच मानसिक त्रासापोटी 20,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 15 कागदपत्राच्या यादीसह 15 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये पॉलिसीची प्रत, विमादाव्याची प्रत, दाऊद खान याने दिलेली फिर्याद, घटनास्थळ पंचनामा, पोलीस स्टेशन पूणे यांनी मयताचा मृत्यूचा पाठविलेला अहवाल, मरणोत्तर पंचनामा, स्मशान दाखला, मृत्यूचे वैद्यकीय प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, पासबुक, वारसाचे प्रतीज्ञापत्र, ड्रायव्हींग लायसेंस, पोलीस स्टेशन बर्दापूर यांचे प्रमाणपत्र, नोटीसीची प्रत, पोच पावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 16 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा मयत पतीचा विमादावा अद्याप पर्यंत मंजूर ही केलेले नाही वा नाकारले ही नाही. कारण विमा कंपनीने गैरअर्जदार क्रमांक 2 बँकेस व अर्जदारास मयताचे पोस्टमार्टेम रिपोर्ट, व सी.ए. रिपोर्ट व तसेच अंतीम तपास अहवाल या कागदपत्राची मागणी केली होती, परंतु अर्जदाराने वा बँकेने अद्याप पर्यंत सदर कागदपत्राची पुर्तता केली नाही, त्यामुळे अर्जदाराचा विमादावा विमा कंपनीकडे वरील कारणास्तव प्रलंबीत आहे.
तसेच विमा कंपनीचे म्हणणे की, सदरची अर्जदाराची तक्रार premature असले कारणाने चालू शकत नाही व ती खारीज होणे योग्य आहे, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
लेखी जबाबाच्या पुष्टयार्था नि.क्रमांक 17 वर विमा कंपनीने आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 18 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचे मयत पती नामे राजेसाहेब टेकाळे हे त्यांचे ग्राहक होते व ते किसान क्रेडीटकार्डचे धारक होते. बँकेने सप्टेंबर 2012 मध्ये त्यांच्या बँकेतील 323 किसान क्रेडीटकार्ड धारकाची गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे पॉलिसी क्रमांक 230601/47/12/43/00001171 अन्वये पॉलिसी काढली होती. सदर पॉलिसीचा कालावधी 13/09/2012 ते 12/09/2013 पर्यंतचा होता व सदर 323 किसान क्रेडीटकार्ड धारकामध्ये अर्जदाराच्या मयत पतीचे नाव समाविष्ट होते.
गैरअर्जदार क्रमांक 2 बँकेचे म्हणणे की, अर्जदाराने सदर विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीचा विमादावा त्यांच्याकडे दाखल केला होता व त्यांनी तो विमादावा मंजुरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे विमा मंजुरीसाठी पाठविला होता, परंतु विमा कंपनीने दिनांक 25/07/2013 रोजीच्या पत्राव्दारे 1) पी.एम.रिपोर्ट, 2) सी.ए.रिपोर्ट, 3) Final Investigation Report च्या कागदपत्राची मागणी केली होती. त्याप्रमाणे अर्जदारास सदरचे कागदपत्र दाखल करा, म्हणून सुचना दिली होती व सदरच्या कारणास्तव विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा प्रलंबीत ठेवला आहे. आम्ही अर्जदारास कधीही उडवाउडवीचे उत्तरे दिले नाही व सेवेत त्रुटी दिली नाही. आम्ही आमचे काम चोखपणे केले आहे. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने किसान क्रेडीटकार्ड पॉलिसी
अंतर्गत अर्जदाराच्या मयत पतीचा विमादावा प्रलंबीत ठेवुन
अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे पती नामे राजेसाहेब परसराम टेकाळे हे किसान क्रेडीटकार्डचे धारक व बँकेचे ग्राहक होते. हे गैरअर्जदार क्रमांक 2 बँकेने दाखल केलेल्या नि.क्रमांक 18 वरील लेखी जबाबात मान्य केले आहे. तसेच बँकेने त्यांच्या शाखेतील 323 किसान क्रेडीटकार्ड धारकाचे गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे प्रत्येक 45/- रु. हप्ता भरुन पॉलिसी क्रमांक 230601/47/12/43/00001171 अन्वये काढली होती. व त्यामध्ये अर्जदाराच्या पतीचे देखील नाव होते. हे गैरअर्जदार क्रमांक 2 बँकेने आपल्या लेखी जबाबात मान्य केले आहे.
सदर पॉलिसीचा कालावधी 13/09/2012 ते 12/09/2013 पर्यंतचा होता. व प्रत्येक विमा धारकासाठी 50,000/- रु. चे विमा संरक्षण होते. ही बाब नि.क्रमांक 4/1 वर दाखल केलेल्या पॉलिसीच्या प्रतवरुन सिध्द होते.
अर्जदाराचे पती नामे राजेसाहेब परसराम टेकाळे यांचा मोटार सायकल क्रमांक MH-44-A-3562 ने दाऊद खान सोबत अंबेजोगाईहून गावाकडे दिनांक 23/01/2013 रोजी येत असतांना इंडीका कार क्रमांक MH-24-V-3770 च्या चालकाने अर्जदाराच्या मयत पतीच्या सदर गाडीस जोरात धडक दिली व त्यात अर्जदाराचे पती गंभीर जखमी होवुन अपघात झाला होता. ही बाब नि.क्रमांक 4/3 वर दाखल केलेल्या दाऊद खान यांच्या जबाबाच्या प्रतीवरुन व तसेच बर्दापूर पोलीस स्टेशनच्या नि.क्रमांक 4/4 वर दाखल केलेल्या घटनास्थळ पंचनाम्यावरुन सिध्द होते.
अर्जदाराचे पतीचा Maxi Neuro Hospital Kasarwadi Pune येथे उपचारा दरम्यान दिनांक 04/02/2013 रोजी मृत्यू झाला होता. ही बाब नि.क्रमांक 4/8 वर दाखल केलेल्या सदर हॉस्पीटलने दिलेल्या प्रमाणपत्रावरुन सिध्द होते. तसेच सदरची बाब नि.क्रमांक 4/9 वर दाखल केलेल्या मृत्यू प्रमाणपत्रा वरुन व नि.क्रमांक 4/6 वर दाखल केलेल्या Inquest Panchanama च्या प्रतीवरुन सिध्द होते.
अर्जदाराच्या पतीचा मृत्यू विमा कालावधी मध्येच झाला होता. हे वरील कागदपत्रावरुन व नि.क्रमांक 4/1 वर दाखल केलेल्या पॉलिसीच्या प्रत वरुन सिध्द होते.
अर्जदाराने किसान क्रेडीटकार्ड पॉलिसी अंतर्गत तिच्या मयत पतीचा विमादावा कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे दिनांक 11/03/2013 रोजी दाखल केला होता व तो विमादावा मंजुरीसाठी बँकेने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पाठविला होता. ही बाब बँकेने आपल्या लेखी जबाबात मान्य केले आहे.
सदरचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीने दिनांक 25/07/2013 रोजीच्या पत्राव्दारे गैरअर्जदार क्रमांक 2 यास पी.एम. रिपोर्ट, सी.ए.रिपोर्ट, Final Investigation Report च्या कागदपत्राची मागणी करुन अर्जदाराचा विमादावा वरील कारणास्तव विमा कंपनीकडे प्रलंबीत आहे. ही बाब नि.क्रमांक 20/1 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन दिसून येते.
विमा कंपनीने अर्जदारास सदरच्या कागदपत्राची मागणी करुन विमादावा प्रलंबीत ठेवणे मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने स्वतः तक्रारी मध्ये म्हंटले आहे की, तिच्या पतीचा उपचारा दरम्यान पूणे येथील दवाखान्यात मृत्यू झालेमुळे त्यांचा पोस्टमार्टेम केलेला नव्हता. याबाबत अर्जदाराचे मयत पतीचे मृत्यूचे कारण अपघाता मध्ये डोक्यास गंभीर जखम झाल्यामुळे झाला होता. हे नि.क्रमांक 4/8 वर दाखल केलेल्या Maxi Hospital कासारवाडी पूणे यांनी जारी केलेल्या form No 4
“ Medical Certificate of cause to death” च्या प्रमाणपत्रा मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. व तसेच विमा कंपनीने इतर मागणी केलेले कागदपत्र अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेले आहेत.
अर्जदाराच्या पतीचा अपघातामुळे मृत्यू झाला होता. हे वर चर्चा केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते. केवळ कागदपत्राची मागणी करुन अर्जदाराचा विमादावा प्रलंबीत ठेवुन गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने अर्जदारास निश्चित सेवेत त्रुटी दिली आहे. कारण अर्जदाराने आपल्या तक्रारी मध्ये म्हंटले आहे की, विमादावा दाखल करतेवेळी सदरची सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे दाखल केली आहेत. व ही बाब गैरअर्जदार क्रमांक 2 बँकेने आपल्या लेखी जबाबात मान्य केली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे विमा कंपनीने मागणी केलेल्या कागदपत्राची अर्जदाराचा विमादावा निकाली काढणेसाठी पॉलिसीच्या नियमानुसार आवश्यक आहेत. अशा या नियमांचा उल्लेख असलेल्या पॉलिसीच्या नियमाची प्रत विमा कंपनीने प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेली नाही.
अर्जदार सदर पॉलिसी अंतर्गत तिच्या मयत पतीच्या विमादाव्या पोटी 50,000/- रु. गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडून निश्चित मिळवणेस पात्र आहे असे मंचाचे ठाम मत आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 2 यांचा काहीही दोष नाही, म्हणून त्यांच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास विम्याची रक्कम रु. 50,000/- न देवुन निश्चित सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत
किसान क्रेडीटकार्ड विमा पॉलिसी अंतर्गत रु. 50,000/- फक्त ( अक्षरी रु.
पन्नासहजार फक्त ) अर्जदारास द्यावेत.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.