निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 21/01/2014
तक्रार नोदणी दिनांकः- 01/02/2014 तक्रार निकाल दिनांकः- 15/05/2014
कालावधी 03 महिने. 14 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
भानुदास आप्पाराव साखरे, अर्जदार
वय सज्ञान वर्षे. व्यवसाय.शेती. अॅड.जी.बी.भालेराव.
रा. पाटील नगर,वसमत जि.हिंगोली.
विरुध्द
शाखाधिकारी, गैरअर्जदार.
युनायटेड इंडिया इन्शोरन्स कं. लि. अॅड.जी.एच.दोडीया.
दयावान कॉम्पलेक्स, स्टेशन रोड,परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा नामंजूर करुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा वसमत येथील रहिवाशी असून त्याने त्याच्या वापरासाठी इ.स. 2007 मध्ये महिंद्रा कंपनीची Max Zeep खरेदी केली होती, ज्याचा क्रमांक MH-38-1535 असा आहे. सदरची जिप अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमाकृत केली होती व सदर विम्याचा कालावधी दिनांक 30/03/2010 ते 29/03/2011 पर्यंत वैध होता व सदर पॉलिसीचा नं. 230601/31/10/09/00021015 होता. सदर पॉलिसी ही 3,80,000/- करीता घेतली होती व 10,692/- रु. चा हप्ता भरला होता.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 10/11/2010 रोजी अर्जदाराची सदरची जिप भोरीगावाकडे जात असतांना वळणावर अचानक जिप पलटी झाली व रस्त्याच्या बाजुला कॅनल मध्ये पडली व जिपचे अतोनात नुकसान झाले व सदर अपघाता बद्दल अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीस कळविले, त्यानंतर अर्जदाराने सदरची जिप विमा कंपनीच्या सांगण्यावरुन दुरुस्तीसाठी नेली. विमा कंपनीचे सदर जिपची नुकसानीची पहाणी करण्याकरीता सर्व्हेअर म्हणून श्री. नलबलवार यांची नियुक्ती केली व सदर सर्व्हेअरने वाहनाचा सर्व्हे केला व त्याप्रमाणे अहवाल दिला. त्यानंतर अर्जदाराने सदरची जिप 1,00,000/- ( 1 लाख रु. खर्च करुन दुरुस्त करुन घेतली विमा कंपनीने सदर वाहनाचा फायनल सर्व्हे ब्रिजेश जैन यांच्या मार्फत केला. त्यानंतर अर्जदाराने त्याच्या अपघातग्रस्त जिपच्या दुरुस्तीसाठी आलेला खर्च मिळावा म्हणून विमा कंपनीकडे दिनांक 09/12/2010 रोजी आवश्यक त्या कागदपत्रासह विमादावा दाखल केला, परंतु विमा कंपनीने अर्जदारास केवळ 64,537/- रु. चा विमादावा मंजूर होईल, असे सांगीतले जे की, कमी होते. शेवटी नाविलाजाने सदरची रक्कम घेण्यास तयार झाला. तरी देखील विमा कंपनीने सदरची रक्कम देण्यास टाळाटाळ केली.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 19/09/2011 रोजी विमा कंपनीचे अर्जदारास पत्र मिळाले ज्यामध्ये जिप चालकाकडे वैध वाहन चालावयाचा परवाना नव्हता आणि असेल तर विमा कंपनीच्या कार्यालयात जमा करावे. अर्जदाराचे म्हणणे की, विमा कंपनीचे सदरचे कारण एकदम चुकीचे आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 28/03/2012 रोजी विमा कंपनीने अर्जदारास पत्र लिहून कळविले की, आवश्यक ती कागदपत्रे दाखल न केल्यामुळे अर्जदाराचा दावा No Claim म्हणून बंद करण्यात आला आहे. विमा कंपनीने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास आदेश द्यावा की, त्याने अर्जदाराची जिप क्रमांक MH-38-1535 ची नुकसान भरपाई म्हणून 64,537/- रु. दिनांक 19/09/2011 पासून रक्कम अदा करे पर्यंत 12 टक्के व्याजाने अर्जदारास द्यावेत. तसेच मानसिक त्रासापोटी 20,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 2 कागदपत्राच्या यादीसह 2 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये आर.सी.बुक, Repudiation Letter, कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली.
गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 12 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. व ती खारीज होणे योग्य आहे. विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही.
विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराच्या सदर जिपच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर विमा कंपनीने वाहनाचे नुकसानीची पहाणी करण्याकरीता सर्व्हेअरची नियुक्ती केली होती व संबंधीत सर्व्हेअरने अर्जदाराची जिप क्रमांक MH-38-1535 चे अपघातात 64,500/- रु. चा नुकसान झाले होते, आपल्या अहवालात म्हंटले आहे.
विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराने विमादाव्या सोबत सदर जिपच्या अपघाता वेळी संबंधीत ड्रायव्हर जबार रहेमान यांचे ड्रायव्हींग लायसेंस दाखल केले नव्हते. म्हणून विमा कंपनीने दिनांक 19/09/2011 च्या पत्राव्दारे ड्रायव्हरचे ड्रायव्हींग लायसेंस अर्जदारास मागीतले होते, परंतु अर्जदाराने ड्रायव्हरचे Valid Driving License विमा कंपनीकडे दाखल केले नाही. त्यानंतर अर्जदाराने संबंधीत ड्रायव्हरचे ड्रायव्हींग लायसेंस विमा कंपनीकडे दाखल केले. व सदर ड्रायव्हींग लायसेंसचे विमा कंपनीने आवलोकन केल्यानंतर विमा कंपनीस असे निदर्शनास आले की, सदर ड्रायव्हरचे Driving License L M V ( Transport ) करीता 21/03/2006 ते 20/03/2009 पर्यंत वैध होते. व त्यानंतर अर्जदराच्या ड्रायव्हरने सदरचे लायसेंस रिन्यू करुन घेतले नाही. व सदर ड्रायव्हरने सदरचे ड्रायव्हींग लायसेंस दिनांक 30/12/2010 रोजी रिन्यू करुन घेतले होते व जिपचा अपघात हा 10/11/2010 रोजी झाला होता. म्हणजेच अपघाता दिवशी सदर ड्रायव्हरचे लायसेंस वैध नव्हते. त्यामुळे विमा कंपनीने दिनांक 28/03/2012 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदाराचा विमादावा नाकारला होता. व No Claim म्हणून बंद केला होता. व विमा कंपनीने पॉलिसीच्या नियमानुसार योग्यच केलेले आहे. म्हणून विमा कंपनीने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
लेखी जबाबाच्या पुष्टयार्थ विमा कंपनीने नि.क्रमांक 13 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदाराची जिप क्रमांक MH-38-1535
चा अपघातात झालेली नुकसान भरपाई देण्याचे नाकारुन
अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा जिप क्रमांक MH-38-1535 चा मालक आहे. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/1 वरील आर.सी. बुकच्या प्रतीवरुन सिध्द होते.
अर्जदाराने सदर जिपचा विमा गैरअर्जदार विमा कंपनीकडे काढला होता व सदर विम्याचा कालावधी दिनांक 30/03/2010 ते 29/03/2011 पर्यंत वैध होता. ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे. फक्त वादाचा मुद्दा हा आहे की, अर्जदाराचे सदर जिपचा दिनांक 10/11/2010 रोजी झालेल्या zeep च्या अपघाता वेळी सदर जिपच्या ड्रायव्हरकडे ड्रायव्हींग लायसेंस वैध होते किंवा नाही ? याबाबत अर्जदार स्वतः आपल्या तक्रारी मधील परिच्छेद क्रमांक 5 मध्ये म्हणतो की, अपघाताच्या वेळी जरी चालकाचा परवाना वैध नसला तरी त्यानंतर तो नुतनीकरण करुन गैरअर्जदाराकडे दाखल केला आहे. यावरुन स्पष्टपणे सिध्द होते की, अपघातावेळी ड्रायव्हरचे ड्रायव्हींग लायसेंस वैध नव्हते. याबाबत विमा कंपनी आपल्या लेखी जबाबात म्हणते की, सदर ड्रायव्हरचे ड्रायव्हींग लायसेंस फक्त 20/03/2009 रोजी पर्यंत वैध होते. व सदर ड्रायव्हरने दिनांक 30/12/2010 रोजी सदरचे ड्रायव्हींग लायसेंस रिन्यू करुन घेतले आहे. म्हणजेच दिनांक 10/11/2010 रोजी सदर जिपच्या अपघातावेळी अर्जदाराच्या जिपच्या चालकाकडे Valid Driving License नव्हते, हे सिध्द होते.
अर्जदाराने त्याच्या जिपच्या चालकाचे अपघाता वेळी वाहन चालवायचा परवाना वैध होते, याबाबत कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमोर दाखल केले नाही. विमा कंपनीने नियमा नुसारच अर्जदाराचा विमा दावा नाकारले आहे. हे वरील चर्चेवरुन सिध्द होते.
याबाबत मा.राष्ट्रीय आयोग दिल्ली यांनी 2013 (2) CPR 559 (NC) National Insurance Co. V/s The Dhana Khurd Co. op Transport या प्रकरणात म्हंटले आहे की, Validity of Driving License Must be properly ascertained. सदरचा निकाल प्रस्तुत प्रकरणास तंतोतंत लागु पडतो.
तसेच मा.राष्ट्रीय आयोग दिल्ली यांनी I (2014) CPJ 106 (NC) National Insurance Co. Ltd. V/s Jagjit Sing Revision Petition No. 4276 of 2007 या प्रकरणात दिलेला निकाल प्रस्तुत प्रकरणास तंतोतंत लागु पडतो.
विमा कंपनीने अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याचे कोठेही दिसून येत नाही. अर्जदार आपली तक्रार सिध्द करणेस पूर्णपणे असमर्थ ठरला आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा सदरचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येते.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.