उपस्थिती तक्रारकर्त्या तर्फे ऍड.आर.यु. बोरकर
विरुध्द पक्ष 1 व 2 तर्फे ऍड. जे.एच.कोठारी.
दि. 21/01/2011 च्या आदेशान्वये वि.प. 3 एकतर्फी .
कारण दि. 29/12/2011 रोजी वि.प. 3 तर्फे ऍड. एम.के. गुप्ता यांना उत्तरासाठी वेळ देऊन ही ते नंतर हजर झाले नाहीत अथवा उत्तर दाखल केले नाही
( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा, श्रीमती आर.डी.कुंडले)
-- निकालपत्र --
( पारित दि. 31 जनवरी 2012)
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 कडून Tata Winger गाडी खरेदी केली. ती जुनी होती व नविन म्हणून विकली असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.
1 तक्रार थोडक्यात
1तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 स्थानिक डिलर कडून दि. 3.7.2010 रोजी Tata Winger गाडी खरेदी केली. त्याचा तपशील
Chassis No. 460003JRZU03777
Engine No. 83DL56JRZ715101
2 आर.सी. बुक तक्रारकर्त्याला उशिरा मिळाले ते पाहिल्यावर तक्रारकर्त्याच्या लक्षात आले की, गाडी सप्टेंबर 2008 मध्ये उत्पादित केली आहे. म्हणजेच तक्रारकर्त्याने खरेदी करण्यापूर्वी 2 वर्षे ही गाडी विरुध्द पक्षाकडे पडून होती. म्हणून तक्रारकर्त्याला वाटते की, जुनी गाडी नविन म्हणून त्याला देण्यात आली.
3 तक्रारकर्ता म्हणतो की, गाडीचे आयुष्य उत्पादनाच्या वर्षा पासून 14 वर्ष असते. तक्रारकर्त्याला गाडी उत्पादना पासून 2 वर्षे उशिरा प्राप्त झाल्याने त्याला ती फक्त 12 वर्षच वापरता येईल. गाडीच्या पूर्ण उपभोगापासून तक्रारकर्ता वंचित राहील. ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी ठरते.
4 यासंबंधाने विरुध्द पक्ष – 2 नागपूर येथील मुख्य विक्रेत्याशी संपर्क साधला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. वाहन जुने असल्याने सहजासहजी रजिस्ट्रेशन झाले नाही. विरुध्द पक्षाने पत्र दिल्यावरच रजिस्ट्रेशन झाले.
5 वाहन खरेदी करतांना विरुध्द पक्ष 2 यांनी टाटा फायनान्स कंपनी कडून कर्ज मिळण्याबद्दल कागदपत्रे तयार केली होती. पण प्रत्यक्षात कर्ज Indus Ind Bank कडून उपलब्ध करुन देण्यात आले. त्यासाठी तक्रारकर्त्याची परवानगी घेण्यात आली नाही.
6 तक्रारकर्त्याची मागणी विरुध्द पक्ष 1 व 2 कडून फरकाची रक्कम रुपये 3,00,000/- (रुपये तीन लाख) मिळावे. शारीरिक, मानसिक त्रासाची नुकसान भरपाई रुपये 10,000/- मिळावे. तक्रार खर्च रुपये 2000/- मिळावे.
7 तक्रारी सोबत एकूण 7 दस्त जोडलेले आहेत.
8 विरुध्द पक्षाच्या उत्तरानुसार Tata Winger हे उपरोक्त वाहन 2008 ते जुलै 2010 पर्यंत विरुध्द पक्ष 2 च्या शो रुम मध्ये सुस्थितीत होते. जुलै 2010 मध्ये हे वाहन विरुध्द पक्ष 1 कडे
म्हणजेच गोंदिया येथील स्थानिक डिलर कडे पाठविले. तेथे तक्रारकर्त्याने वाहनाची पाहणी केली. हे मॉडेल सन 2008 चे उत्पादन असल्याबद्दल तक्रारकर्त्याला सूचना दिली. म्हणूनच त्यावर
रुपये 35,000/- (रुपये पसत्तीस हजार) ची सुट आहे असे स्पष्ट केले. तक्रारकर्त्याने या सर्व गोष्टी मान्य केल्या व वाहन खरेदी केले.
9 वाहन रजिस्ट्रेशनची जबाबदारी तक्रारकर्त्याची होती. रजिस्ट्रेशन करतांना विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सर्व तो परी मदत केली. वाहनाचे sale Certificate वर उत्पादन 2008 चे असल्याबद्दल स्पष्टपणे नमूद आहे.
10 तक्रारकर्त्याने दि. 3.7.2010 रोजी किस्त देण्याची सुरुवात केली व शेवटची किस्त दि.11.2.2011 रोजी दिल्यानंतर दि. 22.02.2011 रोजी तक्रारकर्त्याला वाहनाची विक्री करुन देण्यात आली.
11 तक्रारकर्त्याची परवानगी न घेता त्याला टाटा फायनान्स ऐवजी Indus Ind Bank कडून कर्ज देऊ केले हे विरुध्द पक्ष 1 व 2 ला मान्य नाही. कर्ज कोठून घ्यावे हा निर्णय सर्वतो तक्रारकर्त्याचा असतो. कर्ज प्रकरणातील दस्ताऐवजावर तक्रारकर्त्याच्या सहया आहेत. त्यामुळे त्यासंबंधीची पूर्ण माहिती तक्रारकर्त्याला होती.
12 सन 2008 चे मॉडेल 2010 चे दर्शवून तक्रारकर्त्याची फसवणूक/दिशाभूल केली हे विरुध्द पक्ष अमान्य करतात. विरुध्द पक्षाच्या प्रत्येक दस्ताऐवजावर उत्पादनाचे वर्ष 2008 असेच नमूद केले आहे. वाहनाचे उत्पादन 2008 चे असेल तरी ते नविनच आहे. 2 वर्ष म्हणजेच विकल्या जाई पर्यंत ते विरुध्द पक्ष 2 च्या शो-रुम मध्ये सुस्थितीत होते. रजिस्ट्रेशन करतांना तसे पत्र आर.टी.ओ.ला देण्यात आले आहे.
13 विरुध्द पक्षाच्या सेवेत त्रृटी नसल्याने तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्द पक्ष करतात.
14 विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी उत्तराच्या सुरुवातीलाच अधिकार क्षेत्राबाबत प्राथमिक आक्षेप घेतला आहे. टॅक्स इनव्हाईस मधील अट क्रं. 8 नुसार वाद उपस्थित झाल्यास नागपूर येथील न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात राहील अशी अट आहे ती दोन्ही पक्षांवर बंधनकारक आहे. म्हणून गोंदिया मंचाच्या अधिकार क्षेत्रात सदर वाद येत नाही.
15 दुसरा प्राथमिक आक्षेप वाद उपस्थित झाल्यास तो लवादा कडे (आरबीट्रेशनकडे) पाठविण्यात यावे असे टॅक्स इनव्हाईस मधील अट क्रं. 7 मध्ये नमूद आहे. म्हणून ही गोंदिया मंचाला अधिकार क्षेत्र नाही असे विरुध्द पक्ष 1 व 2 म्हणतो.
16 तक्रारकर्त्याच्या वकिलांचा व विरुध्द पक्ष 1 व 2 च्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. विरुध्द पक्ष 3 यांनी उत्तर दाखल केले नाही. रेकॉर्डवरील संपूर्ण दस्त तपासले.
मंचाचे निरीक्षण व निष्कर्ष
17 विरुध्द पक्ष 1, व 2 यांनी प्राथमिक आक्षेपात या मंचाला अधिकार क्षेत्र नाही असे टॅक्स इनव्हाईस मधील अट क्रं. 8 चा हवाला देऊन म्हटले आहे. (Only th courts of NAGPUR shall have jurisdiction in any proceedings relating to this contract.) मंचाला विरुध्द पक्ष 1 व 2 च्या आक्षेपात तथ्य वाटत नाही. यासाठी हे मंच खालील केसचा आधार घेते.
A.B.C. laminart Pvt. Ltd. And another
V/S.
A.P. Agencies Salem
AIR 1989 Supreme Court 1239
Jurisdiction- the ouster clause contained in the brochure issued by the opposite party does not exclude the jurisdiction of the District Forum at Ambala- Case remanded to District Forum for disposal on merits.
18 विरुध्द पक्षाचा दुसरा आक्षेप वाद लवादा समोर चालेल मंचासमोर नाही असा आहे. (All disputes arising between the parties here to shall be referred to arbitration according to the arbitration laws of the country) मंचाला या ही आक्षेपात तथ्य वाटत नाही. यासाठी हे मंच खालील केस लॉ चा आधार घेते.
1989 – 2006 Consumer 10581 (N.S.)
Oriental Insurance Company Ltd.
V/S
M.R.Bhingerwala
R.P.No. 917 of 1998- Decided on 10 Aug. 2004
“Consumer Forums cannot direct parties to go for arbitration.”
19 या प्रकरणामध्ये एकच मर्यादित मुद्दा मंचाच्या विचारार्थ येतो. तो म्हणजे विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला सन 2008 चे जुने मॉडल सन 2010 चे नविन भासवून विकले काय ?
संपूर्ण कागदपत्रे तपासली असता वाहनाचे उत्पादन वर्ष 2008 असेच दाखविले आहे. वादातील वाहनाच्या संदर्भात रेकॉर्ड पेज नं. 23 , डाक्युमेंट 4 वर हे वाहन डेमो व ट्रायलसाठी वापरले असा उल्लेख आहे. त्यावर दि. 1.7.2010 ही तारीख आहे. यावरुन हे वाहन सन 2008 पासून दि. 1.7.2010 पर्यंत विरुध्द पक्ष 2 हे डेमो व ट्रायलसाठी वापरत होते हे स्पष्ट होते. ही बाब तक्रारकर्त्याला माहिती झाल्यावर तक्रारकर्त्याने मंचात प्रकरण दाखल करुन फरक रुपये 3,00,000/- (रुपये तीन लाख ) ची मागणी केली. ही मागणी
तक्रारकर्त्याने कशाच्या आधारे केली यासंबंधीचा कोणताही पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केला नाही. सन 2008 या वाहनाची किंमत व इतर सुट लाभ काय होते आणि सन 2010-2011
मधील विक्रीच्या वेळी किंमत सुट लाभ काय होते हे दोन्ही पक्षाचे वकील सांगू शकले नाही. त्याबद्दल कोणताही दस्त रेकॉर्डवर नाही.त्यामुळे तक्रारकर्त्याची रुपये3,00,000/-(अक्षरी - रुपये तीन लाख) फरकाची मागणी मंच फेटाळून लावते.
20 तक्रारकर्त्याच्या वाहनाचे उत्पादन वर्ष 2008 हे धरल्यास 2 वर्ष कमी वाहनाचे आयुष्य मिळेल ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी मंच मानते.
21 तक्रारकर्त्याच्या कर्ज प्रकरणाच्या वादातील मुद्दयाशी संबंध नसल्याने त्याचा विचार करण्याची गरज मंचाला वाटत नाही.
22 विरुध्द पक्ष 3 उत्पादक आहे. त्याचा वादाशी प्रत्यक्ष संबंध नसल्याने व त्याच्या विरुध्द तक्रारकर्त्याने कोणताही रिलीफ मागितला नसल्याने त्यांना या प्रकरणातून वगळण्यात येते.
23 तक्रारकर्त्याची तक्रार अत्यंत मर्यादित मुद्दयावर मंच मान्य करते. तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/-(अक्षरी -रुपये दहा हजार) आणि तक्रारीचा खर्च रुपये 2000/- हे मंच मान्य करते.
सबब आदेश
आदेश
1 तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2 विरुध्द पक्ष 1, 2 यांनी तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई रुपये 10,000/- (रुपये दहा हजार
फक्त) द्यावे. .
3 विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारीचा खर्च रुपये 2000/- (अक्षरी-रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
4 विरुध्द पक्ष 3 यांना या प्रकरणातून वगळण्यात येते.
5 विरुध्द पक्ष 1 व 2 यांची जबाबदारी वैयक्तिक आणि संयुक्तिक अशी दोन्ही स्वरुपाची राहील.
आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत करावे.