निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 06/02/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 05/03/2010 तक्रार निकाल दिनांकः- 23/08/2010 कालावधी 05 महिने 18 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. प्रकाश पिता मानिकराव सुकटे. अर्जदार वय 29 वर्षे.धंदा ड्रायव्हर. अड.एस.एन.वेलणकर. रा.गणेश नगर परभणी व्दारा-जीपीए होल्डर. युनूसखान पिता नसिर खान. वय 38 वर्षे.धंदा ड्रायव्हर. रा.मस्तान शाह नगर,हिंगोली.ता.हिंगोली. विरुध्द द ब्रँच मॅनेजर. गैरअर्जदार. युनायटेड इंडिया इंशुरंन्स कंपनी लि. अड.जी.एच.दोडीया. दयावान कॉम्प्लेक्स,स्टेशन रोड.परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती अनिता ओस्तवाल.सदस्या. ) गैरअर्जदार विमा कंपनीने सेवात्रुटी केल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने महिंन्द्रा मॅक्स जीप वर्ष 2003 मध्ये खरेदी केली व (नोंदणी क्रमांक MH -22/4415) आहे.वर्ष 2003 ते वर्ष 2005 पर्यंत अर्जदार स्वतः सदरचे वाहन प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वापरीत होता दिनांक 16/4/2005 रोजी अर्जदाराने त्यांच्या मित्रास सदरचे वाहनाचा ताबा दिला तेंव्हापासून ते अद्याप पर्यंत सदरचे वाहन त्याच्या मित्राच्याच ताब्यात आहे.अर्जदार हा बाहेरगांवी वास्तव्यास असल्यामुळे त्याने त्यांच्या मित्राला युनस खान पिता नसीर खान दिनांक 2/11/2009 रोजी सर्व अधिकार पत्र नोटरी करुन दिलेले आहे त्याच्या नोंदणी क्रमांक Sr.No. 2724/09 व त्या अधिकार पत्राव्दारे युनूस खान पिता नसीर खान यास सदरचे प्रकरण मंचासमोर चालविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सदर वाहनाची Passanger Carrying Commercial Vehicle package अंतर्गत रक्कम रु.2,25,000/- जोखमीची व दिनांक 13/3/2007 ते दिनांक 13/3/2008 या कालावधीसाठीची विमा पॉलीसी गैरअर्जदाराकडून घेतली होती. दिनांक 17/10/2007 रोजी सदरचे वाहन हिंगोली नरसी रोड वरील नरसीफाटा येथे अपघातात क्षतीग्रस्त झाले. वाहनाचे या अपघातामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले अर्जदाराने गैरअर्जदारास सदर घटनेची माहिती कळविल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने सर्व्हेअर श्री.परळीकर याने सदर वाहनाची पहाणी करुन सर्व्हे रिपोर्ट गैरअर्जदाराकडे सादर केला तदनंतर अर्जदाराने सदरचे वाहन न्युलकी वर्कशॉप हिंगोली येथे रक्कम रु. 1,25,000/- चा खर्च करुन दुरुस्त करुन घेतले.अर्जदाराने सदर वाहनाची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन विमा दावा गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केला मार्च 2008 मध्ये गैरअर्जदाराने अर्जदारास विमा दावा ना मंजूर केलयाचे पत्राव्दारे कळविले परंतु ते पत्र अर्जदाराकडून गहाळ झाल्यामुळे ते मंचासमोर सादर करता आले नाही.म्हणून अर्जदाराने मंचासमोर प्रस्तुतची तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने सदर वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 1,25,000/- अपघात तारखे पासून 12 टक्के व्याजदराने द्यावी तसेच मानसिक शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.5000/- व तक्रार अर्जाच्या खर्चाबद्दल रक्कम रु.2500/- द्यावे अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जा सोबत शपथपत्र नि.3 व पुराव्यातील कागदपत्र नि.2 व नि.5/1 ते नि.5/16 मंचासमोर दाखल केले आहेत. मंचाची नोटीस गैरअर्जदार विमा कंपनीस मिळाल्यानंतर त्याने लेखी निवेदन नि.14 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहूतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, गैरअर्जदार विमा कंपनीने नियुक्त केलेल्या सर्व्हेअर श्री.परळीकर यांच्या सर्व्हेरिपोर्ट नुसार अपघाता समयी सदर वाहनातून 15 प्रवासी प्रवास करीत असल्याचे व त्यापैकी 4 प्रवाश्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना नांदेड येथील हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट झालेले आहे. व हीच बाब दैनिक सकाळ मध्ये छापून आलेल्या बातमी मधून व पोलीस पंचनाम्यातून शाबीत झालेली आहे.वास्तविक पाहता वाहनातून फक्त 5 + 1 इतक्या प्रवाश्यांच्या वाहतूकीची क्षमता असतांना यात क्षमते पेक्षा जास्त प्रवाशी आढळून आल्याने व अर्जदाराने ति-हाईतास गाडीचा ताबा दिल्यामुळे विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होते. म्हणून गैरअर्जदाराने दिं 18/9/2008 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदाराचा विमा दावा नांमजूर केला तसेच गैरअर्जदाराचे असे ही म्हणणे आहे की, अपघात दिनांक 17/10/2007 रोजी झाल्यामुळे सदरचा वाद हा मुदतबाहय ठरतो म्हणून वरील सर्व कारणास्तव अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.15 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.21/1A ते नि. 21/7 मंचासमोर दाखल केली. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 अर्जदार याने महिंद्रा मॅक्स जीप ( नोंदणी क्रमांक MH – 22/ 4415) ची रक्कम रु.2,25,000/- जोखमीची व दिनांक 13/3/2007 ते दिनांक 13/3/2008 या कालावधीसाठीची Passenger Carrying Commercial Vehicle Package अंतर्गत पॉलीसी घेतली होती दिनांक 17/10/2007 रोजी सदर वाहनास अपघात होऊन ते क्षतीग्रस्त झाले क्षतीग्रस्त वाहनाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता गैरअर्जदाराकडे केली असता गैरअर्जदाराने अर्जदाराचा वाजवी क्लेम नामंजूर केला अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की,अर्जदाराने सदर घटनेची माहिती कळविल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने सर्व्हेअर श्री.परळीकर याची नियुक्ती केली होती सर्व्हेअर परळीकर क्षतीग्रस्त वाहनाचा सर्व्हे करुन गैरअर्जदार विमा कंपनीकडे सर्व्हे रिपोर्ट सादर केला. त्यानुसार अपघाताच्या वेळी सदर वाहनातून 15 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असल्याचे आढळून आल्याने पॉलीसीच्या अटी व शर्तीच्या भंग झाल्याचे शाबीत झाल्यामुळे अर्जदाराचा क्लेम नामंजूर करण्यात झाला मंचापुढे निर्णयासाठी मुद्दा असा आहे की, अपघाताच्या वेळी सदर वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असल्याने पॉलीसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन झाले आहे काय ? वास्तविक पाहता ही बाब शाबीत करण्याची जबाबदारी गैरअर्जदार विमा कंपनीची होती गैरअर्जदाराने ठोस पुरावा मंचापुढे दाखल करुन अपघाताच्या वेळी सदर वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असलयाचे व त्यामुळे पॉलीसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्याचे शाबीत करावयास हवे होते त्यासाठी वाहनातून प्रवास करीत असलेल्या सर्व प्रवाशांचे जबाब घेण्याची आवश्यकता होती.परंतु गैरअर्जदाराने तशी तसदी घेतल्याचे दिसत नाही.गैरअर्जदारांच्या वतीने नियुक्त करण्यात आलेलया सर्व्हेर श्री एस.पी.परळीकर याने केलेला स्पॉट सर्व्हे रिपोर्ट नि.21/2 वर मंचासमोर दाखल केला आहे यात Passenger Carrying Details या खाली Passenger Carrying At the time of accident 15 + 1 असा अकडा मोघमपणे नमुद करण्यात आला आहे कोणत्या आधारावर सर्व्हेअरने अपघाताच्या वेळी सदर वाहनात क्षेमतेपेक्षा जास्त प्रवाशी असल्याचे नमुद केले आहे याचा कुठे ही खुलासा करण्यात आलेला नाही पुढे गैरअर्जदाराने त्याने घेतलेल्या बचावाच्या पुष्टयर्थ दैनिक सकाळ मध्ये छापून आलेल्या बातमीचा व पोलीस पंचनाम्याचा आधार घेतलेला दिसतो परंतु यात दोषारोप अंतिम अहवालात ( नि.21/3 ) अपघाताच्या वेळी सदर वाहनात 15 किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी असल्याचे नमूद केलेले नाही.पडताळलेल्या साक्षीदाराचे विवरण यात ( नि.21/3 ) मध्ये देण्यात आले आहे ते सर्वच प्रवासी होते असे गैरअर्जदाराचे म्हणणे असेल तर ते अतिशय चुकीचे आहे व केवळ गैरअर्जदाराने अगदी तकलादु स्वरुपाचे कारण पुढे करुन अर्जदाराचा हक्क डावलला असे खेदाने म्हणावे लागेल म्हणून वरील सर्व कारणास्तव मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले. मुद्दा क्रमांक 2 मुद्दा क्रमांक 1 मध्ये सविस्तर विवेचना केल्या प्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे. असा प्रश्न उरतो तो म्हणजे अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अर्जदाराने क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,25,000/- 12 टक्के व्याजासह देण्याची मागणी केली आहे ती मान्य करता येणार नाही कारण सदरचे वाहन वर्ष 2003 ला खरेदी केले होते त्यामुळे क्षतीग्रस्त वाहनाचे नुकसानीचे मुल्यांकन करताना घसारा वगैरे बाबी विचारात घ्यावा लागतात म्हणून सर्व्हेअर व लॉस असेसर डी.एस.नलबलवार यांच्या बिलचेक रिपोर्ट नि.21/5 वर मंचासमोर गैरअर्जदाराने दाखल केलेला आहे तो स्वीकारणे जास्त संयुक्तीक ठरेल त्यानुसार क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन रक्कम रु.53,135.3 करण्यात आले आहे व त्या रक्कमे मधून Salvage रक्कम रु. 1535/- वजा केली असता रु. 53135.3/- रु.1535/= रु. 51.600.30/- एवढी होते तेवढीच रक्कम अर्जदारास मंजूर करणे न्यायोचित होईल तसेच अर्जदाराचा वाजवी क्लेम विनाकारण गैरअर्जदार विमा कंपनीने नामंजूर केला त्यामुळे त्याला नक्कीच मनस्ताप झाला असेल या सर्व बाबी विचारात घेवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार विमा कंपनीने निकाल कळालयापासून 30 दिवसांच्या आत क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानी पोटी रक्कम रु.51.600.30/ दिनांक 23/09/2008 पासून ते रक्कम पदरी पडे पावेतो 9 टक्के व्याज दराने अर्जदारास द्यावी. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3500/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 1500/- आदेश मुदतीत द्यावी. 4 संबंधीतांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |