जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 328/2008. प्रकरण दाखल तारीख - 04/10/2008 प्रकरण निकाल तारीख – 20/01/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य विजयकुमार पि.कीशनराव कुलकर्णी, वय, 25 वर्षे, व्यवसाय बेरोजगार, रा.हडको नविन नांदेड. अर्जदार. विरुध्द. 1. मराठवाडा ग्रामीण बँक, गैरअर्जदार. शाखा कार्यालय,सिडको,नांदेड. 2. जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एम.व्ही.नाईक. गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - अड.व्ही.डी.पाटनुरकर. गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - अड.पी.जी.हनवते. निकालपञ (द्वारा-मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) यातील अर्जदार यांची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा बेरोजगार असल्यामुळे त्याने इलेक्ट्रीकल वर्क्स (इलेक्ट्रीकल मोटार रिवायंडींग) हा उद्योग चालु करण्याची योजना आखली आणि त्यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे आवश्यकत कागदपत्रासह कर्ज प्रकरण दाखल केले. सदर कर्ज प्रकरण हे गैरअर्जदार क्र. 2 यांनी स्विकारुन गैरअर्जदार क्र. 1 यांचे मंजुरीसाठी पाठविले आणि 15 दिवसांचे आत कर्ज मंजुर होईल असे सांगितले. अर्जदार यांना उद्योगासाठी रु.5,00,000/- ची आवश्यकता होती आणि शासनाच्या योजनेचा फायदा म्हणुन रु.1,25,000/- कायमची सुट देणार होते. गैरअर्जदार क्र. 1 याने कर्ज प्रकरण दि.31/03/2008 पर्यंतच मंजुर करुन घेणे आवश्यक होते की,ज्यामुळे अर्जदारास गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडुन आर.इ.जी.पी.मणी मार्जिनचा फायदा मिळणे आवश्यक होते परंतु गैरअर्जदार क्र. 1 यांनी तसे न करता अर्जदार यांचे कर्ज प्रकरणांकडे जाणीवपुर्वक लक्ष दिले नाही आणि अर्जदार हे कर्ज प्रकरण मंजुरी पासुन वंचीत राहीले व त्यास आर.इ.जी.पी. मणी मार्जिन या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यानंतर गैरअर्जदार क्र. 2 याने अर्जदारास दि.12/06/2008 रोजी पत्राद्वारे असे कळविले की, आपण मणी मार्जिन योजने अंतर्गत दाखल केलेले कर्ज प्रकरण गैरअर्जदार क्र.1 यांचे पत्र दि.28/05/2008 नुसार नामंजुर करण्यात आले व आपणांस योजनेचा फायदा देण्यास असमर्थ आहे. ज्यामुळे अर्जदारास प्रचंड मानसिक त्रास झाला, गैरअर्जदार क्र.1 यांच्या निष्काळजीपणामुळे गैरअर्जदार हे नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदाराचे व्यवसाय करण्याचे ठिकाणाचे वारंवार पाहणी करुन तसेच अर्जदार यास गैरअर्जदार क्र. 1 याने संबंधीत बँकेचे बेबाकी प्रमाणपत्र आणावयास लावले असुन सुध्दा गैरअर्जदारक क्र. 1 यांनी सदरील प्रकरण मंजुर केलेले नाही. अर्जदार हा सुशिक्षीत बेरोजगार असुन तो त्याच्या पायावर उभे राहवे या दृष्टीने त्याने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या सहमतीनेच प्रकरण दाखल केले होते, तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या भरवश्यावर बाजारातुन बरेचशे सामान स्वतःच्या क्रेडीटवर खरेदी केले होते आणि बाजारातील प्रतिष्ठित लोकांपुढे मानहानी झाली. गैरअर्जदार क्र.2 याने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे वेळेत प्रस्ताव पाठवूनही गैरअर्जदार क्र. 1 याने जाणीवपुर्वक हेतुपुरस्सर अर्जदाराच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांचे निष्काळजीपणामुळे अर्जदारास कर्ज मिळाले नाही म्हणुन त्यांनी त्यांच्या सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदाराचे कर्ज प्रकरण मंजुर करुन त्यास आर.इ.जी.पी. मणी मार्जिन योजने अंतर्गत मिळणारा फायदा मिळावा अथवा या योजने अंतर्गत लाभार्थीस मिळणा-या फायद्याची नुकसान भरपाई म्हणुन रु.1,25,000/- अर्जदारास देण्यात यावे आणि अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.30,000/- व दावा खर्चा पोटी रु.5,000/- गैरअर्जदरांकडुन देण्यात यावे. गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले, त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराचा संबंधी गैरअर्जदार क्र. 1 शी कर्जदार या नात्याने येत नाही त्यामुळे अर्जदार त्यांचा ग्राहक होत नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचे मार्फत कर्ज प्रकरण गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठविल्याची बाब मान्य आहे. सदरील कर्ज प्रकरण हे गैरअर्जदार क्र.2 यांचेकडुन मंजुरीसाठी आर.जी.ई.पी.योजने अंतर्गत पाठविण्यात आले व या प्रकरणाची लाभाची मुदत दि.31/03/2008 पर्यंत होती परंतु अर्जदार यांनी योग्य ती कागदपत्रे दि.08/04/2008 रोजी सादर केली. त्याच वेळी अर्जदारास ही जाणीव करुन देण्यात आली आहे की,सदरील योजनेची मुदत संपलेली आहे तरीही अर्जदाराच्या आग्रह खातर गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराचे प्रकरण मंजुरीसाठी शिफारस करीत आहे. त्यानंतर दि.27/05/2008 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांनी संबंधीत योजना ही दि.01/04/2008 पासुन बंद झाल्यामुळे अर्जदाराचे प्रकरण परत पाठवुन दिले. म्हणुन गैरअर्जदार क्र. 1 यांनी सेवेत कोणत्याही प्रकारची त्रुटी केलेली नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांनी केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदाराचा अर्ज रु.10,000/- खर्चासह फेटाळण्यात यावा. यात गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराने विनाकारण गैरअर्जदार यांना त्रास देण्याच्या उद्येशाने तसेच कसल्याही प्रकारची निष्काळजी नसतांना सदरील दाव्यामध्ये पक्षकार केलेले आहे तसेच गैरअर्जदार क्र.2 यांचेवर जे काही आरोप केले आहेत ते सर्व खोटे आहेत. अर्जदाराची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदयाच्या कक्षेत येत नाही व अर्जदार यांचा ग्राहक होत नाही म्हणुन त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा. अर्जदाराचे हे महणणे खोटे आहे की, गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्यांना संपर्क साधुन मार्गदर्शन केले. अर्जदार स्वतः कर्ज मंजुरी बाबात गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे कर्ज प्रकरण पाठविल्याचे सांगितले त्या प्रमाणे गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे कर्ज प्रकरण पाठविले. गैरअर्जदार क्र.2 यांनी दि.12/06/2008 रोजी पत्राद्वारे असे कळविले की, अर्जदाराने मणी मार्जिन योजने अंतर्गत दाखल केलेले कर्ज प्रकरण गैरअर्जदार क्र. 1 यांचे पत्र दि.25/05/2008 नुसार नामंजुर केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे वेळेत प्रस्ताव पाठवुन दिला ही बाब सत्य आहे. अर्जदारा यांनी गैरअर्जदार यांना विना कारण या प्रकरणांत गुंतवलेले आहे. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 विरुध्द जी मागणी केलेली आहे ती अयोग्य आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे कर्ज प्रकरण रितसर गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे पाठविले, यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई किंवा निष्काळजीपणा गैरअर्जदार यांनी केलेला नाही. सदरील मणी मार्जिन योजना ही आयोगाने दि.01/04/2008 रोजी बंद केली असल्यामुळे अर्जदार यांना सदरील योजनेचा फायदा मिळणार नाही, असे वेळोवेळी अर्जदार यांना कळविण्यात आलेले आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार यांनी केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदार यांचा अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावी. अर्जदार याचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे म्हणणे व शपथपत्र याचा विचार होता खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे ग्राहक आहेत काय? होय. 2. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय? होय. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी त्यांच्या अर्जासोबत गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदार यांच्याकडुन आर.ई.जी.पी.मणी मार्जीन योजना मिळण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रांची पुर्तता गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे केले बाबतचे कागदपत्र अर्जदार यांनी या मंचामध्ये अर्जासोबत कागद यादीने दाखल केलेले आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी कर्ज प्रकरण मंजुर करण्या करीता अर्जदार यांचा कर्ज प्रकरण गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडुन स्विकारल्यानंतर आवश्यक असणा-या सर्व कागदपत्रांची पुर्तता अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्या मागणीनुसार केलेली आहे व सदरचे सर्व कागदपत्र अर्जदार यांनी या मंचामध्ये अर्जासोबत कागद यादीने दाखल केलेले आहे. सदरची बाब गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी म्हणणे व शपथपत्रामध्ये नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र व त्याबाबतची कागदपत्र याचे अवलोकन केले असता अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2– अर्जदार यांनी उद्योग उभारण्यासाठी गैरअर्जदार क्र.2 जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचेकडे संपर्क केला असता, गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार यांना रितसर सभासद करुन त्यांचेकडे असलेल्या आर.ई.जी.पी. मनी मार्जीन योजनेची माहीती अर्जदार यांना दिली व त्या अनुषंगाने कर्ज प्रकरण करण्यासाठी आवश्यकत त्या सर्व कागदपत्रांची माहीती दिले त्याप्रमाणे अर्जदार यांनी खालील प्रमाणे सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे दिली त्याप्रमाणे. 1. अर्जदाराचे इलेक्ट्रीकल शिक्षण घेतलेले प्रमाणपत्र. 2. विवीध कार्यकारी सहकारी ग्राम उद्योग संघ लिमीटेड यांचे सभासद असल्याचे प्रमाणपत्र. 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र. 4. ग्राम पंचायत कार्यालय गोपाळ चावडी यांचे ना- हरकत प्रमाणपत्र. 5. ग्राम पंचायत कार्यालय गोपाळ चावडी लोकसंख्या प्रमाणपत्र. 6. प्लॉट मालकाचे गांव नमुना नं. 8 चे प्रमाणपत्र. 7. भाडे करारपत्र. 8. महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ आर.ई.जी.पी. मार्जिन मणी द्यावयाचे शपथपत्र. 9. प्लॉट मालकाचे विज आकारणी बिल. 10. अर्जदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र. 11. इलेक्ट्रीकल वर्क्स कामाचे अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, बालाजी इलेक्ट्रीकल जनरल स्टोअर्स हडको नांदेड यांचे. 12. पूजा इलेक्ट्रीकल वर्क्स यांच्याकडुन फर्निचरचे कोटेशन. 13. इलेक्ट्रीकल वर्क्स उद्योगसाठी लागणारे मशिनरी यांचे कोटेशन. 14. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांनी दिलेले बँकेला शिफारस पत्र. 15. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे दि.12/06/2008 प्रकरण मंजुर झाल्याबद्यलचे पत्र. 16. प्रोजेक्ट रिपोर्ट तर्फे के.बी.माथुर आणि कंपनी चार्टर अकाऊंट विष्णू काम्प्लेक्स व्हि.आय.पी.रोड.नांदेड. ही सर्व कागदपत्रे या मंचामध्ये दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदार यांचेकडुन अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्र घेऊन अर्जदार यांचे कर्ज प्रकरण मंजुरीसाठी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे दि.31/12/2007 रोजी पुढील कार्यवाहीसाठी पाठविलेले आहे. सदरचे गैरअर्जदार क्र. 2 यांचे आर.ई.जी.पी. योजने अंतर्गत मार्जिन मणी प्रस्ताव मंजुर करणे बाबतचे पत्र अर्जदार यांनी या मंचामध्ये अर्जासोबत दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे खालील प्रमाणे कागदपत्रे सादर केली आणि यामंचामध्येही सदरील कागदपत्रे सादर केली. 1. अर्जदार हा त्यांच्या बँकेचा खातेदार असल्याचे पासबुक. 2. प्लॉट क्र.33 चे मालकी प्रमाणपत्र. 3. आर्केटेक सौदणकर यांचे प्लॉट क्र. 33 चे व्हल्युऐशन प्रमाणपत्र व त्यावर केलेल्या बांधकामाचे फोटो. 4. घरमालक यांचे प्लॉट क्र.33 चे खरेदीखत. 5. बँकेच्या वकीलाकडुन प्लॉट क्र. 33 हा नॉन इनक्युमर असलेले प्रमाणपत्र. 6. जमानतदार सुर्यभान मोरे यांचे पगारपत्र. 7. सर्व बँकाचे ना हरकत प्रमाणपत्र. 8. मासीक उत्पन्नाचा अहवला व अंदाजपत्रक. वरील सर्व कागदपत्र अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे तसेच यामंचामध्ये दाखल केलेली आहेत. सदर पत्राचे अवलोकन केले असता, गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार यांना आर.ई.जी.पी. योजने अंतर्गत मार्जिन मनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार यांचा प्रस्ताव वेळेमध्ये गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे पाठविल्याचे स्पष्ट होत आहे. सदर पत्राचे अवलोकन केले असता, त्यावर अटी व सुचना असे नमुद करण्यात आलेले आहेत, त्यामधील दोन नंबरच्या अटीप्रमाणे बँकेने प्रस्ताव मंजुरी/नामंजुरी बाबत 15 दिवसांत निर्णय घ्यावा तसे उद्योजकास व मंडळास कळवावे असे नमुद केलेले आहे. अर्जदार यांचे कर्ज प्रकरण गैरअर्जदार क्र. 2 यांचे मार्फत गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे आल्यानंतर सदर प्रस्तावास मंजुरी अगर नामंजुरी गैरअर्जदार क्र.1 यांनी 15 दिवसांत अर्जदार यांना कळवीणे बंधनकारक होते परंतु गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांना अगर गैरअर्जदार क्र. 2 यांना अर्जदार यांचा प्रस्ताव मंजुर अगर नामंजुर केले बाबत कोणत्याही प्रकारे कळविले बाबत कोणताही कागदोपत्री पुरावा या मंचा समोर दाखल केलेले नाही. अर्जदार यांनी मार्जिन मणी योजनेचा लाभ मिळण्यासाठी व त्यासाठी लागणा-या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी ब-याचसा कागदपत्र मिळवीणेसाठी व्याप करावा लागला. गैरअर्जदार क्र. 1 यांच्या म्हणण्यानुसार आर.ई.जी.पी. योजना ही दि.31/03/2008 रोजी बंद झालेली आहे व अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे कर्ज प्रकरण हे दि.08/04/2008 रोजी दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांचे म्हणणेनुसार सदरची योजना ही दि.31/03/2008 रोजी बंद झालेली होती अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांचे कर्ज प्रस्ताव दि.08/04/2008 रोजी स्विकारणे ही योग्य व कायदेशिर अशी बाब नाही. सदरचे योजना दि.31/03/2008 रोजी बंद झालेली असतांना गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांचेकडुन दि.08/04/2008 रोजी कागदपत्र स्विकारणे योग्य व न्यायाचे दृष्टीने गैर अशी बाब आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदार यांचा अर्ज कर्ज मागणी प्रस्ताव मुदतीत आला नाही, असे म्हणत असतील तर त्यांनी ते दर्शवीणारा पुरावा या मंचा समोर आणणे आवश्यक होते परंतु गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्यांच्या लेखी म्हणणे मध्ये अर्जदार यांचा प्रस्ताव दि.31/12/2007 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठविल्याचे नमुद केले आहे व अर्जदार यांनी या अर्जासोबत गैरअर्जदार क्र. 2 यांचे दि.31/12/2007 रोजी अर्जदाराचा प्रस्ताव पाठविल्या बाबतचे पत्र दाखल केलेले आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 2 यांचे अर्जदार यांचेकडुन अर्थीक सहाय मागणीचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. सदर प्रस्ताव छाननीच्या आधीन राहुन मंजुरी देण्यात येत आहे, अशा स्वरुपाचे मजकुर असणारे गैरअर्जदार क्र. 2 यांचा अर्जदार यांना दि.31/12/2007 रोजीचे पत्र देण्यात आलेले आहे. सदर पत्र हे अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडे आवश्यकते नुसार सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्याचे स्पष्ट होत आहे. परंतु गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार यांचा प्रस्तावाची योग्य प्रकारे छाननी करुन अर्जदार यांना ठराविक काळ मर्यादेमध्ये अर्जदाराचे सदरचे प्रकरण मंजुर केले अगर नाही याबाबत कळविलेले नाही अगर त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी दि.10/12/2008 रोजी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना अर्जदार यांचा प्रस्तावा बाबत मंजुरी दिली बाबत नमुद केलेले आहे. परंतु गैरअर्जदार क्र. 1 यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केले बाबत कोणतेही कागदोपत्री पुरावा या मंचा समोर आलेला नाही. अर्जदार यांचे कर्ज प्रकरण जर गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे मंजुरीसाठी आलेले होते अशा परिस्थितीमध्ये गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदर कर्ज प्रकरणांवर 15 दिवसांचे आत अर्जदार यांना निर्णय कळवीणे गैरअर्जदार क्र. 1 यांचेवर अटी व शर्तीनुसार बंधनकारक होते परंतु तसे काही केलेचे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होत नाही. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अर्जदार यांनी ठराविक मुदतीमध्ये गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह त्यांचा प्रस्ताव दिलेला होता व अर्जदाराच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर गैरअर्जदार यांनी सदर प्रस्तावास मंजुरी देऊन अर्जदारांचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे दि.31/12/2007 रोजी पाठविलेला आहे,ही बाब (क्रिष्टल क्लिअर) स्पष्ट होत आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदार यांचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठविल्यानंतर सदर अर्जातील अटी व नियमानुसार गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर कर्ज प्रकरणा बाबत 15 दिवसांचे आंत मंजुरी अगर नामंजुरी बाबत निर्णय घेणे आवश्यक व बंधनकारक होते व गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतल्याचे अगर अर्जदार यांना कळविले बाबत कोणते कागदोपत्री पुरावा या मंचा समोर दाखल केलेले नाही. अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अर्जदार यांनी आर.ई.जी.पी. मार्जिन मणी योजना योनेचा लाभ मिळण्यासाठी व त्या अनुषंगाने इलेक्ट्रीकल मोटर रिवाईडिंग हा उद्योग चालु करण्यासाठी व त्या अनुषंगाने येणा-या इतर बाबींवर पुरेसा खर्च केल्याचे दाखल कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुनही गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्यांच्या प्रस्तावावर ठरावीक मुदतीमध्ये कोणताही निर्णय न दिल्याने अर्जदार यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सदरचे कृत्य हे गैरअर्जदार क्र.1 यांचे चुकीमुळे झालेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांचा कर्ज प्रस्तावावर कोणताही निर्णय ठराविक मुदतीत घेतलेले नाही त्यामुळे अर्जदार यांना आर.ई.जी.पी. मार्जिन मनी या योजनेचा लाभ मिळालेला नाही, याचा विचार होता गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतारता केलेली आहे, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी आर.ई.जी.पी. योजने अंतर्गत त्यांचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह पाठविलेले होते. सदर कागदपत्रांची छाननी केल्यानंतर गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार यांचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे पाठविलेले होते परंतु गैरअर्जदार क्र. 1 यांनी 15 दिवसांत अगर त्यानंतरही अर्जदार यांना कर्ज प्रकरण मंजुरी अगर नामंजुरी बाबत कळवलेले नाही त्यामुळे अर्जदार यांना निश्चितपणे आर्थीक व मानसिक त्रास व खर्च झालेला आहे आणि सदर खर्च मिळण्यासाठी अर्जदार यांना या मंचामध्ये अर्ज दाखल करावा लागला आहे व त्या अनुषंगानेही खर्च करावा लागला आहे, याचा विचार होता अर्जदार हे मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चा पोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांचा लेखी युक्तीवाद त्यांनी दाखल केलेली कागदपत्र तसेच गैरअर्जदारांचे म्हणणे व शपथपत्र व त्यांनी केलेला युक्तीवाद याचा विचार होता, आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांना शासनाच्या योजने अंतर्गत मिळणारे मंडळाच्या नियमाप्रमाणे रु.1,25,000/- द्यावे. 2. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.4,000/- आणि अर्जाच्या खर्चा पोटी रु.1,000/- द्यावे. 3. संबंधीत पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघूलेखक. |