निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 30/05/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 08/07/2013
तक्रार निकाल दिनांकः-06/03/2014
कालावधी 09 महिने 06 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री प्रदीप निटुरकर, B.Com.LL.B.
सदस्या - सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.LL.B.
वैजनाथअप्पा विश्वनाथअप्पा एकशिंगे अर्जदार
वय 68 वर्षे, धंदा व्यापार, अWड.एस.एन.वेलणकर
प्रोप्रा.शंतनू ट्रेडींग कंपनी,
रा.एलदरी कॅम्प, ता.जिंतूर,
जि.परभणी.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार
पिपल्स को-ऑप.बँक लि.हिंगोली, अWड.पी.व्ही.सराफ
शाखा जिंतूर, ता.जिंतूर,
जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.प्रदीप निटुरकर, अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
(निकालपत्र पारित व्दारा – सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या)
गैरअर्जदाराने ञुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार मंचात दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
गैरअर्जदाराच्या फर्मचे नावे Secured C.C. अकाउंट ब-याच वर्षापासून गैरअर्जदाराचे बँकेत आहे. वर्ष 2011 मध्ये दिनांक 08.10.2011 रोजी अर्जदाराने सदर खात्यामध्ये रुपये 30,000/- भरले. दिनांक 23.02.2012 रोजी रुपये 21,000/- व दिनांक 19.03.2012 रोजी रुपये 2370/- Transfer Entry ने अर्जदाराच्या खात्यात जमा झाले व Computerised entry अर्जदाराच्या खात्यावर व बँकेच्या व्यवहारात नोंदविण्यात आली. वर्ष 2012 मध्ये गैरअर्जदार बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी यांनी फार मोठया रक्कमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले व त्यांच्या विरोधात संबंधीत पोलिसांनी भा.द.वि. 420, 468, 471 अन्वये FIR नोंदवुन पढील कार्यवाही सुरु केली. ही बातमी अर्जदारास कळाल्यानंतर त्याने बॅकेत धाव घेतली व त्याच्या फर्मच्या खात्यासंदर्भात चौकशी केली. परंतु कोणीच काहीही माहीती देत नसल्यामुळे अर्जदाराने दिनांक 03.12.2012 रोजी त्याच्या फर्मच्या खात्याचा खाते उतारा काढला असता त्याला अतीशय धक्का बसला कारण दिनांक 16.06.2012 रोजी अर्जदाराच्या 3 एन्ट्रीज म्हणजे रुपये 53370/- च्या एन्ट्रीज Reverse केल्या होत्या व wrongly entryas per list and wrong post entry reversed असे नमुद करण्यात आले होते. अर्जदाराने या संबंधीचा खुलासा गैरअर्जदाराकडे मागीतला असता शाखाधिकारी यांनी अपहारासंदर्भात जी यादी बॅंकेला दिली त्या यादीमध्ये अर्जदाराच्या 3 नोंदी एकुण रुपये 53370/-च्या दिल्या आहेत म्हणुन त्या entries हया reverse केल्या असा खुलासा गैरअर्जदाराने केला. Entries Reverse करतांना अर्जदारास याची कल्पना अथवा सुचना देण्यात आलेली नव्हती. म्हणुन अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने अर्जदाराच्या खात्यात दिनांक 16.06.2012 रोजी reverse केलेल्या एकुण 3 एन्ट्रीज एकुण रक्कम रुपये 53370/- च्या रद्द करुन त्याप्रमाणे खातेउतारा सुधारीत करुन द्यावा तसेच मानसीक ञासाबद्दल रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 5000/- मिळावेत अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपञ नि.2 वर व पुराव्यातील कागदपञ नि.4वर मंचासमोर दाखल केली.
मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर त्याने लेखी निवेदन नि.12 वर मंचासमोर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, गैरअर्जदार बँकेच्या जिंतूर शाखेमध्ये श्री नरेश गोलेच्छा हा शाखाधिकारी म्हणुन दिनांक 01.05.2011 ते दिनांक 16.04.2012 या कालावधीत कार्यरत होता. त्यावेळेस त्याने बँकेतील विवीध खातेदाराच्या खात्यात व बँकेच्या मुळ कार्यालयाच्या स्वतःच्या खात्यात संगणकीय प्रणालीव्दारे हेराफेरी करुन अफरातफर केली. त्यामुळे त्याच्या विरोधात भा.द.वि. 420, 468, 471 इत्यादी अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. अर्जदाराचे खात्यात संबंधीत शाखाधिकारी याने केलेली खाडाखोड हा या अपहाराचाच भाग आहे. दिनांक 08.10.2011 रोजी आरोपी शाखाधिकारी याने बँकेचे other liability/clearing suspense या खात्यावर एकुण रुपये 40,000/- नावे टाकले म्हणजेच दिनांक 08.10.2011 रोजी रुपये 30,000/- अर्जदाराच्या खात्यावर व रुपये 10,000/- त्याच्या मुलाच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. तसेच दिनांक 23.02.2012 रोजी व दिनांक 19.03.2012 रोजी बँकेचे other liability/clearing suspense या खात्यावर अनुक्रमे रक्कम रुपये 21,000/- व 2370/- नावे टाकली व रक्कम अर्जदाराच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्या. या रक्कमा अर्जदाराने भरलेल्या नाहीत. या रक्कमा बँकेच्या स्वतःच्या खात्यातुन आरोपीने वर्ग केलेल्या असल्यामुळे सार्वजनीक पैशाच्या हितासाठी चुकीच्या पध्दतीने केलेल्या नोंदी परत घेण्यात आल्या यात गैरअर्जदार बँकेने ञुटीची व निष्काळजीपणाची सेवा दिली असे मानता येणार नाही. केवळ संबंधीत शाखाधिका-याने चुकीची नोंद अर्जदाराच्या खात्या केल्याचा गैरफायदा घेवुन प्रस्तुतची तक्रार दाखल करुन बँकेकडुन रक्कम उकळण्याचा अर्जदाराचा प्रयत्न असल्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे.
गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत शपथपञ नि.11 वर व पुराव्यातील कागदपञ नि.14 वर मंचासमोर दाखल केली.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1 सदरचा वाद या मंचासमोर चालण्यास पाञ
आहे काय ? नाही
2 आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2 -
प्रस्तुत प्रकरणात कायदेशीर मुद्दा असा उपस्थीत होतो की, ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 2(1)(d)(ii) च्या तरतुदीनुसार तक्रारदार हा ग्राहक या संज्ञेस पाञ आहे काय ? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल कारण अर्जदाराने स्वतःच तक्रार अर्जातुन त्याच्या फर्मच्या नावे गैरअर्जदार बँकेत C.C.(Cash Credit) खाते असल्याचे कथन केले आहे व त्या खात्यासंबंधीत करण्यात आलेल्या सर्व व्यवहारांचा समावेश व्यावसायीक कॅटागिरीमध्ये होत असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 2(1)(d)(ii) च्या तरतुदीनुसार तक्रारदार हा ग्राहक या संज्ञेस पाञ नसल्याचे मंचाचे मत आहे. तसेच रिपोर्टेड केस Subhash Motilal Shah Versus Malgaon Merchants Co.Op.Bank 2013(2) CPR (NC) मध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने असे मत व्यक्त केले आहे की,
“Since account itself is connected and related to business transaction & such bankingactivity is required for functioning of business enterprise of appellant/complainant, services hired for that purpose would fall within category of hiring services for commercial purpose – Business bankaccount does not come under per view of Consumer Protection Act 1986.
मा.राष्ट्रीय आयोगाने व्यक्त केलेले उपरोक्त मत सदर प्रकरणाला तंतोतंत लागू पडते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 दोन्ही पक्षांना निकालाच्या प्रती मोफत पुरावाव्यात
सौ.अनिता ओस्तवाल श्री.प्रदीप निटुरकर
सदस्या अध्यक्ष