जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 13/2011 तक्रार दाखल तारीख – 20/05/2011
निकाल तारीख - 06/02/2015
कालावधी - 03 वर्ष , 08 म. 16 दिवस.
मनोहर बाबुराव बिरले,
वय – 54 वर्षे, धंदा – व्यापार,
रा. करकट्टा, ता. जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
ब्रँच मॅनेजर,
दि. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.,
लोखंडे कॉम्पलेक्स, पहिला मजला,
सिंध टॉकीज, सुभाष चौक,
लातुर, जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एस.एम.कोतवाल.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड.जे.पी.चिताडे.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदाराकडे टाटा मॅजीक एम.एच. 24 / व्ही- 1385 वाहन आहे. अर्जदाराने सदर वाहनाचा विमा गैरअर्जदाराकडे विमा मोबदला रु. 8,550/- देवून काढला आहे. सदरच्या वाहनाचा विमा कालावधी दि. 03/06/10 ते 02/06/11 होता. अर्जदाराच्या वाहनाचा दि. 23/10/2010 रोजी ढोकी लातुर रोडवर अज्ञात पांढ-या रंगाच्या टाटा सुमोने धडक दिल्यामुळे अपघात झाला. सदर अपघाताची नोंद पोलीस स्टेशनला 37/10 ने करण्यात आली. सदरच्या अपघाताचा घटनास्थळ पंचनामा करण्यात आला, त्यात अर्जदाराच्या वाहनाचे नुकसान रु. 50,000/- इतके झाले. अर्जदाराने सदर अपघाताची माहिती गैरअर्जदारास दिली. अर्जदाराने सदर वाहन दुरुस्तीसाठी सेवक अॅटोमोबाईल्स सर्व्हीसेस येथे दुरुस्तीस दिले. सदर वाहनाच्या दुरुस्तीचे कोटेशन रक्कम रु. 54,920/- दिले. अर्जदाराचे वाहन दुरुस्त करण्यासाठी रु. 41,745/- खर्च आला. गैरअर्जदाराने अर्जदारास दि. 13/01/11 रोजी वाहनाची नुकसान भरपाई रु. 23,000/- दिली. गैरअर्जदाराने अर्जदारास रु. 18,745/- इतकी रक्कम न दिल्यामुळे तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले. अर्जदाराने तक्रारी अर्जात वाहन नुकसान भरपाई रु. 18,745/- सदरचे वाहन ढोकी येथून लातुरला आणण्याचा खर्च रु. 5,000/- मानसिक व शारीरीक खर्चापोटी रु. 5,000/- तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 5,000/- असे एकूण रु. 33,745/-, 24 टक्के व्याजाने मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र, व एकूण 11 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदाराने लेखी म्हणणे अर्जदाराने सदरच्या घटनेची माहिती गैरअर्जदारास दिली. अर्जदाराचे वाहन दुरुस्तीचे सेवक अॅटोमोबाईल्स यांचे रक्कम रु. 54,920/- चे कोटेशन दिले हे गैरअर्जदारास मान्य नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराच्या कार्यालयास तडजोड करण्यासाठी सांगितले असता, गैरअर्जदाराने दि. 13/01/11 रोजी अर्जदारास क्लेम डिस्चार्ज व्हाऊचर रक्कम रु. 23,000/- नुकसान भरपाई दिली. अर्जदाराने पुर्णत: समाधानी म्हणून त्यावर सही केली. व सदरचा चेक मिळाला म्हणून स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिले. गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली नाही. अर्जदाराने गैरअर्जदारास त्रास देण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून शपथपत्र तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे :- अर्जदाराने सदर वाहनाचा विमा गैरअर्जदाराकडे मोबदला देवून काढला होता. सदरचा मोबदला गैरअर्जदाराने स्विकारल्यामुळे अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत येतो. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे :- अर्जदाराकडे वाहन क्र. एम.एच. 24/ व्ही– 1385 असून, त्याचा विमा कालावधी हा दि. 03/06/10 ते 02/06/11 आहे, हे पॉलीसीवरुन दिसुन येते. अर्जदाराच्या टाटा मॅजीक वाहनाचा दि. 23/10/10 रोजी ढोकी लातुर रोडवर अपघात झाला. सदर वाहनाचा अपघात हा विमा मुदत कालावधीत झाल्याचे दिसुन येते. सदर घटनेची पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्र. 37/10 ने करण्यात आला. अर्जदाराच्या वाहनाची विमा जोखीम गैरअर्जदाराने रु. 2,92,794/- ची स्विकारली होती. अर्जदाराने सदर वाहन दुरुस्तीचे कोटेशन सेवक अॅटोमोबाईल्स सर्व्हीस सेंटर लातुर चे रक्कम रु. 54,920/- चे दाखल केले आहे. सदर कोटेशन नि क्र. 9 व 10 वर दाखल आहे. अर्जदाराने दि. 26/11/10 रोजी एम.एच. 24- व्ही- 1385 वाहनाचे दुरुस्ती बील दाखल केले आहे, त्यावरुन अर्जदाराचा रु. 41,745/- वाहन दुरुस्तीचा खर्च झाल्याचे दिसुन येते. अर्जदाराचे नावे दि. 13/01/11 रोजी गैरअर्जदाराने रक्कम रु. 23,000/- चा चेक दिल्याचे दिल्याचे दिसुन येते. सदर चेकची झेरॉक्स प्रत निशाणी – 11 वर दाखल आहे. गैरअर्जदाराने मुळ क्लेम डिस्चार्ज व्हाऊचर दाखल केले आहे. त्यावर अर्जदाराने फुल अॅन्ड फायनल सेटलमेंट असे लिहिल्याचे दिसुन येते. त्यावर अर्जदाराची सही असल्याचे दिसुन येते. यावरुन अर्जदाराने पुर्णत: समाधानी राहून सदरची रक्कम स्विकारलेली आहे, हे स्पष्ट होते. अर्जदाराचा वाहन दुरुस्तीचा एकुण खर्च रु. 41,745/- झाला आहे. अर्जदारास सदरची नुकसान भरपाई रक्कम वाहनाच्या भागाचा घसारा न धरता धरलेली आहे. नियमाप्रमाणे अर्जदारास संपुर्ण रक्कम मागता येत नाही. म्हणून गैरअर्जदाराने योग्य ती नुकसान भरपाई अर्जदारास दिली असल्यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे :- अर्जदारास गैरअर्जदाराने वाहन नुकसान भरपाई रु. 23,000/- दिली असल्यामुळे सदरची रक्कम स्विकारल्यामुळे अर्जदार हा अनुतोषास पात्र नाही. म्हणून मुद्दा क्र. 3 चे उत्तर नाही असे आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार पुर्णत: रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.