जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 233/2011 तक्रार दाखल तारीख – 26/08/2011
निकाल तारीख - 23/02/2015
कालावधी - 03 वर्ष , 05 म. 27 दिवस.
महालिंग महादेवअप्पा जिडगे,
वय – 50 वर्षे, धंदा – व्यापार,
रा. किल्लारी, ता; औसा, जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
शाखा व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कं. लि.,
टिळक नगर, लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एस.एस.रांदड.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड. एस.एस.शिवपुरकर.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीचे वाहन क्र. एम.एच. 24/ एफ-8582 असुन सदर वाहनाचा विमा गैरअर्जदाराकडे काढला होता. त्याचा पॉलीसी क्र. 231100/31/09/01/5499 असुन त्याचा विमा कालावधी दि. 05/08/2009 ते 04/08/2010 होता. अर्जदाराच्या वाहनाची विमा जोखीम रु. 8,75,000/- ची गैरअर्जदाराने स्विकारली होती. अर्जदाराच्या वाहनाचा दि. 08/03/2010 रोजी अजिंठाजवळ औरंगाबाद जळगाव रोडवर अपघात झाला. सदर अपघातात अर्जदाराच्या वाहनाचे पुर्णत: नुकसान झाले. अर्जदाराच्या वाहनाचा सर्व्हे झाला सदर वाहन दुरुस्तीसाठी न्यु श्री गॅरेज बेलगाव यांचेकडे गेले असता दुरुस्तीचा अंदाजे खर्च दि. 30/03/2010 रोजी रु. 3,64,248/- इतके दिले. अर्जदाराने दुरुस्तीचे इस्टिमेट गैरअर्जदाराच्या ऑफीसला दिले. अर्जदारास वाहन दुरुस्तीचा खर्च रु. 3,17,980/- इतका आला. अर्जदाराने गैरअर्जदारास दुरुस्तीचे मुळ बिल व आवश्यक असणारी कागदपत्रे दिली. गैरअर्जदाराच्या सर्व्हेअरनी सदर वाहनाची पंचनामा करुन कागदपत्रे व बिल तपासल्यानंतर अर्जदाराने सदरचे बिल गैरअर्जदाराच्या कार्यालयात दिली. अर्जदाराने दि. 16/07/2011 रोजी गैरअर्जदारास नोटीस दिली. गैरअर्जदाराने अर्जदाराचे अनेक सहया को-या पेपरवर घेतल्या आणि अर्जदारास रु. 1,07,500/- नुकसान भरपाई दिली आहे.
अर्जदार हा नुकसान भरपाई रक्कम रु. 2,10,480/- त्यावर अपघात घडलेल्या तारखेपासुन 18 टक्के व्याजासह मानसिक, शारीरीक त्रासापोटी रु. 10,000/-, नोटीस खर्च रु. 1,000/- तक्रारी अर्जाचा खर्च रु. 10,000/- ची मागणी केली आहे.
गैरअर्जदाराचे म्हणणे दिले आहे. अर्जदाराची तक्रार खोटया माहिती आधारावर दाखल केली आहे. अर्जदाराने सिध्द करावे की एम.एच. 24 एफ- 8582 या वाहनाचे मालक आहेत. अर्जदाराच्या वाहनाचे सदरच्या अपघातामध्ये पुर्णत: समोरील भागाचे नुकसान झाले हे गैरअर्जदारास मान्य नाही. अर्जदाराने रक्कम रु. 3,64,248/- चे खोटे दुरुस्तीचे कोटेशन दिले आहे. अर्जदारास वाहन दुरुस्तीचा खर्च रु. 3,17,980/- आला हे गैरअर्जदारास मान्य नाही. गैरअर्जदाराचे सर्व्हेअरने सदर वाहनाचा सर्व्हे केला असून त्याचा रिपोर्ट दिला आहे. अर्जदार हा सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे रक्कम रु. 1,07,500/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. गैरअर्जदाराने सदरची नुकसान भरपाई अर्जदारास दिली आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराची सही को-या कागदावर घेतली हे अर्जदार खोटे सांगत आहे. अर्जदाराने सदरची नुकसान भरपाई रक्कम पुर्णत: समाधानी म्हणून घेतली आहे.गैरअर्जदाराने अर्जदारास रक्कम रु. 1,07,500/- घेण्यासाठी दबाव आणला नाही. अर्जदाराचा तक्रारी अर्ज खर्चासह नामंजुर करण्यात यावा. अर्जदारास सदरची तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून शपथपत्र तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर :- अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदरील वाहनाचा विमा काढला होता, त्यासाठी लागणारा मोबदला दिला आहे; सदरचा मोबदला गैरअर्जदाराने स्विकारला आहे म्हणून अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत येतो. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर :- अर्जदाराकडे एम.एच. 20 एफ-8582 वाहन आहे. सदर वाहनाचा विमा पॉलीसी क्र. 231100/31/09/01/5499 असून त्याचा विमा कालावधी दि. 05/08/2009 ते 04/08/2010 आहे. अर्जदाराचे वाहनाचा दि. 08/03/2010 रोजी अपघात झाला. सदर अपघात विमा मुदत कालावधीत झाल्याचे दिसुन येते. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या वाहनाची रक्कम रु. 8,75,000/- चा जोखीम स्विकारल्याचे पॉलीसीवरुन दिसुन येते. अर्जदाराचे सदर वाहनाचा फायनल सर्व्हे रिपोर्ट दि. 06/07/2010 रोजी सर्व्हेअरने दिला आहे. त्यात अर्जदारास सदर वाहन दुरुस्तीसाठी रु. 3,64,248/- इतका खर्च झाल्याचे दिसुन येते. अर्जदारास वाहनाच्या भागाचा असेसमेंट रक्कम रु. 1,59,518.73 इतके वजा केल्याचे दिसुन येते, म्हणून रु. 3,64,248-1,59,518 = 2,04,630 सदरचा सर्व्हे रिपोर्ट दाखल आहे. अर्जदारास गैरअर्जदाराने रु. 1,07,500/- नुकसान भरपाई दिल्याचे दिसुन येते, रु. 2,04,630 -1,07,500 =97,130 इतकी रक्कम कमी दिल्याचे सिध्द होते. गैरअर्जदाराने रक्कम रु. 8,75,000/- ची वाहनाची विमा जोखीम स्विकारली असताना अर्जदारास जोखीम स्विकारुन कराराप्रमाणे विमा रक्कम न देवून त्यांच्यात झालेल्या कराराचे पालन केले नसल्याचे दिसुन येते. अर्जदाराने सदरची नुकसान भरपाई पुर्णत: समाधानी असल्याचा व्हाऊचरवर सही केल्याचे दिसुन येत नाही, याबद्दलचा पुरावा गैरअर्जदाराने दिलेला नाही. अर्जदाराने संपुर्ण वाहन नुकसान भरपाई रक्कम स्विकारल्याचे स्पष्ट होत नाही. गैरअर्जदाराने नियमाप्रमाणे अर्जदारास वाहन नुकसान भरपाई दिली नसल्यामुळे गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केल्याचे दिसुन येत नाही. म्हणून मुद्दा क्र. 2 उत्तर नाही असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे उत्तर :- अर्जदारास नियमाप्रमाणे नुकसान भरपाई रक्कम रु. 97,130/- व मानसिक व शारिरीक त्रासापोटी तसेच तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 6,000/- अनुतोषास मिळण्यास पात्र आहे. हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 97,130/-(अक्षरी
सत्यानव हजार एकशे तीस रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या
आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.