घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी त्यांच्या टाटा इंडिका कारसाठी गैरअर्जदार विमा कंपनीकडून पॉलिसी घेतली होती. पॉलिसीचा कालावधी दिनांक 1/3/2007 ते 29/2/2008 असा होता. दिनांक 22/2/2008 रोजी तक्रारदाराकडे आलेल्या कांही नातेवाईकांना जालना येथे पोचविण्यासाठी त्यांच्या टाटा इंडिका गाडीमध्ये ड्रायव्हरसोबत जालना येथे पाठवून दिले. जालनाहून गाडी औरंगाबाद येथे परत येत असताना गाडी अचानक नंदनवन धाबा करमाड येथे रात्री 1 वाजता बंद पडली. ड्रायव्हर शेख फैज शेख रहीम यांनी ती गाडी नंदनवन धाबा जवळ लॉक करुन तो औरंगाबाद येथे निघून आला. याबाबतची माहिती त्यांनी गाडीचे मालक तक्रारदार यांना दिली. गाडीच्या मेकॅनिकला घेऊन ड्रायव्हर हा दुस-या दिवशी म्हणजे दिनांक 29/2/2008 रोजी सकाळी 9:30 वाजता पोचला असता त्यांना त्यांची कार तेथे आढळून आली नाही. ही बातमी ड्रायव्हरने त्यांच्या मालकास म्हणजे तक्रारदारास कळविली. त्यानंतर दिनांक 26/2/2008 रोजी पोलीस स्टेशन येथे याबद्दलची तक्रार केली. तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या ड्रायव्हरने हॉटेल नंदनवन धाब्या जवळ ही गाडी पार्क केली होती व तसे तेथील नोकरास सांगितले तसेच पोलीस स्टेशन करमाड यांनाही कळविले. तेथील पेट्रोलींग ऑफिसर व दरोडा प्रतिबंधक पेट्रोलींग कर्मचारी यांना या संदर्भात माहिती दिली. ड्रायव्हरने नंदनवन धाबा मालकास व कर्मचा-यास गाडीची काळजी घेण्यास सांगितले. अशा प्रकारे तक्रारदाराच्या ड्रायव्हरने गाडीची काळजी घेतलेली होती. गाडीची किंमत ही रु 3,51,000/- होती असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदारानी विमा कंपनीस याबाबत कळविले. पोलीसांनी गाडीच्या चोरीबाबत चौकशी करुन गाडी मिळालेली नाही म्हणून मा.जेएमएफसी औरंगाबाद येथे केस ए समरी म्हणून बंद केली. तक्रारदारास क्लेमची रक्कम मिळाली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून रु 4 लाख आणि इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदारानी त्यांच्या लेखी जवाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पॉलिसीच्या अट क्रमांक 4 नुसार तक्रारदारानी गाडी रोडवर अनअटेंडेड स्थितीत ठेवली हयामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झाला म्हणून तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करण्यात आला. तक्रारदारानी त्यांची गाडी कुठलीही काळजी न घेता रस्त्यावर उभी (पार्क) केली. त्या गाडीमध्ये त्यावेळेस कोणीही हजर नव्हते. त्यामुळे तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करावा अशी मागणी ते करतात. गैरअर्जदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच इन्व्हेस्टीगेटरचा अहवाल आणि त्यांचे शपथपत्र दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराची गाडी जालना येथून औरंगाबाद येथे येत असताना करमाड येथील नंदनवन धाब्या जवळ अचानकपणे बंद पडली त्यामुळे तक्रारदाराच्या ड्रायव्हरने त्यांची गाडी नंदनवन धाब्याजवळ पार्क करुन तो स्वत: औरंगाबाद येथे निघून आला. गैरअर्जदारानी तक्रारदाराचा क्लेम हा त्यांच्या ड्रायव्हरने गाडी अनअटेंडेड स्थितीतध्ये रस्त्यावर ठेवली त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झाला म्हणून क्लेम नामंजूर केला आहे. त्यावर तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, गाडी नंदनवन धाब्या जवळ लावली त्यावेळेस त्यांनी धाब्याच्या मालकास, तेथील कर्मचा-यास गाडीकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते. तसेच करमाड पोलीस स्टेशन यांना पण तशी कल्पना दिली होती. त्यानुसार करमाड पोलीस दरोडा प्रतिबंधक पथकास गाडीवर लक्ष ठेवण्यास सांगितले तरी सुध्दा गाडीची चोरी झाली. त्यासाठी तक्रारदारानी पोलीस स्टेशन करमाड यांचे प्रमाणपत्र दाखल केले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, दरोडा प्रतिबंधक पथकाचे कर्मचारी पहाटे 4 वाजेपर्यंत इंडिका गाडीवर लक्ष ठेऊन होते त्यानंतर गाडी चोरीला गेली. गैरअर्जदारानी इन्व्हेस्टीगेशनचा अहवाल दाखल केला आहे. त्या अहवालामध्ये नंदनवन धाब्याच्या मालकास आणि कर्मचा-यास याबाबत चौकशी केली असता गाडी बद्दल त्यांना कांहीही माहिती नाही असे त्यांनी उत्तर दिल्याचे नमूद केले आहे. या दोन्हीही कागदपत्रावरुन तक्रारदाराची गाडी ही अनअटेंडेड स्थितीमध्ये रस्त्यावर उभी होती हे स्पष्ट होते. गाडीच्या मालकानी किंवा गाडी ज्याच्या ताब्यात आहे त्यांनी गाडीची काळजी घेणे आवश्यक असते असे असतानाही गाडीचा ड्रायव्हर औरंगाबाद येथे निघून आल्याचे दिसून येते. अशा वेळेस गाडीच्या मालकाने ड्रायव्हरला गाडी तेथेच पार्क करुन गाडीमध्ये झोपण्यास सांगावयास हवे होते. परंतु तक्रारदारानी तसे केले नाही. म्हणजेच तक्रारदारानी आणि त्यांच्या ड्रायव्हरने गाडीची कोणतीही काळजी न घेता ती दूर्लक्षित ठेवली म्हणजेच ती अनअटेंडेड ठेवली हे स्पष्ट होते. यामध्ये तक्रारदाराची चूक असल्याचे मंचाचे मत आहे. एफआयआरमध्ये “गाडीच्या ड्रायव्हरने गाडी तेथे रोडवर ऊभी करुन निघून गेला” असे नमूद केले आहे. त्यामुळेच गैरअर्जदारानी तक्रारदाराच्या क्लेमची रक्कम दिली नाही, ही सेवेतील त्रुटी दिसून येत नाही असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच तक्रारदाराची तक्रार नामंजूर करीत आहे. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2. खर्चाबद्दल आदेश नाही. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष के/-
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |