श्री. शेखर मुळे, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याने ही तक्रार विमा कंपनीविरुध्द त्यांच्या सेवेतील कमतरतेबाबत ग्रा.सं.का.च्या कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे.
2. वि.प.ही आरोग्य विमा कंपनीचे मुख्य आणि शाखा कार्यालय आहे. ही विमा कंपनी मुख्यत्वे करुन वैद्यकीय विमा क्षेत्रामध्ये काम करते. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 कडून स्वतःकरीता आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आरोग्य विमा पॉलिसी घेतली होती आणि दरवर्षी तो नियमितपणे त्या पॉलिसीचे नुतनीकरण करीत होता. त्याला त्या विमा पॉलिसीमध्ये त्याचा मुलगा अथर्व यांचे नाव समाविष्ट करावयाचे होते. त्यामुळे त्याने वि.प.क्र. 1 कडे आवश्यक त्या दस्तऐवजांसह प्रपोजल दिले. पॉलिसी दि.17.04.2016 पासून नुतनीकृत करावयाची होती. त्याने विम्याचा हप्ता रु.13,597/- भरला. वि.प.क्र. 1 च्या निर्देशानुसार त्याचा मुलगा अथर्व याची वैद्यकीय तपासणीसुध्दा करण्यात आली. त्याच्या वैद्यकीय अहवालामध्ये कुठलाही रोग किंवा अॅबनार्मेलिटी दिसून आली नाही. परंतू वि.प.च्या पॅनेलवरील डॉक्टर्सनी त्यांच्या मुलाचे नाव विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट करण्याचे प्रपोजल स्विकारु नये असे वि.प.ला कळविले. दि.22.04.2016 ला वि.प.ने त्याच्या मुलाचे नाव समाविष्ट करण्याबद्दलचे प्रपोजल नामंजूर केल्याचे तक्रारकर्त्याला कळविले आणि कारण असे दिले की, त्याचा मुलगा अथर्व हयाचेवर तो 27 दिवसांचा असतांना Pyeloplasty झाली होती. वि.प.चे हे कारण स्वैर/मनमानी आहे असा तक्रारकर्त्याने आरोप केला आहे. म्हणून या तक्रारीद्वारा त्याने अशी विनंती केली आहे की, वि.प.ला आदेशीत करण्यात यावे की, त्याने विमा पॉलिसीमध्ये त्याच्या मुलाचे नाव समाविष्ट करण्याबद्दलच्या त्याच्या प्रपोजलचा फेरविचार करावा आणि त्याला झालेल्या मानसिक आणि शारिरीक त्रासाबद्दल रु.1,25,000/- , रु.10,000/- तक्रारीचा खर्च द्यावा.
3. वि.प.क्र. 1 व 2 ने आपला लेखी जवाब नि.क्र.12 वर दाखल केला. त्यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याच्या मुलगा अथर्व याचे नाव विमा पॉलिसीमध्ये विमाधारक म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहे, तसेच ती पॉलिसी दि.16.04.2017 पर्यंत नुतनीकृत करण्यात आलेली आहे. तक्रारकर्त्याने केलेले सर्व आरोप नाकबूल करुन पुढे असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याचा मुलगा अथर्व वय – 1 वर्ष 3 महीने ज्याच्यावर Pyeloplasty झाली होती, त्याचे नाव पॉलिसीमध्ये समाविष्ट करण्याचे प्रपोजल तक्रारकर्त्याकडून मिळाले होते. त्यावेळी अथर्वची वैद्यकीय तपासणी केली होती आणि त्याच्या सोनोग्राफी अहवालानुसार “Mild fullness of right renal pelvis seen (9mm)” असे निदान करण्यात आले होते. त्या कारणास्तव सुरुवातीला त्याचा प्रपोजल फॉर्म नामंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तक्रारकर्त्याकडून देण्यात आलेल्या नोटीसवरुन वि.प.ने त्याचे प्रपोजल स्विकारुन त्याच्या मुलाचे नाव पॉलिसीमध्ये विमाधारक म्हणून समाविष्ट करण्यासाठी जास्तीचा विमा हप्ता भरण्याची विनंती केली होती. परंतू बरेचदा विनंती करुनही तक्रारकर्त्याने विमा हप्ता भरला नव्हता. ज्यावेळी विमा हप्ता भरण्यात आला होता, त्यावेळी नविन पॉलिसी जारी करण्यात आली व त्यामध्ये अथर्वचे नाव समाविष्ट केले होते आणि ती पॉलिसी तक्रारकर्त्याला 02.09.2016 देण्यात आली. अशाप्रकारे वि.प.च्या सेवेत कुठलीही कमतरता नव्हती. तक्रारकर्त्याने मागितलेली नुकसान भरपाई अवाजवी आणि बेकायदेशीर आहे, म्हणून तक्रार खारिज करण्याची विनंती करण्यात आली.
4. सुनावणी दरम्यान तक्रारकर्ता आणि त्याचे वकील हजर नव्हते, त्यामुळे वि.प.च्या वकिलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच दस्तऐवजाचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
5. तक्रारकर्त्याने वि.प.कडून स्वतःकरीता आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांकरीता वैद्यकीय प्रतीपूर्तीबाबत विमा पॉलिसी काढली होती याबद्दल वाद नाही. परंतू त्या पॉलिसीमध्ये अथर्वचे नाव त्यावेळी टाकण्यात आलेले नव्हते. त्यामुळे तक्रारकर्त्याला अथर्वचे नावसुध्दा पॉलिसीमध्ये टाकावयाचे होते आणि त्यानुसार त्याने वि.प.कडे प्रपोजल फॉर्म दिला होता. यावरुन असे दिसून येते की, त्या प्रपोजल फॉर्मवर कारवाई होण्यास थोडा विलंब झाला होता. वि.प.च्या वकिलांनी युक्तीवादात असे सांगिते की, ज्यावेळी विमा पॉलिसीचे प्रपोजल विमा कंपनीला प्राप्त होते त्यावेळी काही औपचारिकता करावी लागते. तक्रारकर्त्याची पॉलीसी आरोग्य विमा पॉलिसी असल्याने त्या अंतर्गत वैद्यकीय खर्चाची प्रतीपूर्ती मिळण्याची तरतूद होती. विमाधारकाला वैद्यकीय चाचणी करुन घेणे आवश्यक होते आणि त्यानंतरच विमा कंपनी विमा पॉलिसी जारी करावी की नाही याचा निर्णय घेते. त्यानुसार अथर्वला काही वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितले होते. त्याच्या वैद्यकीय चाचणीमध्ये त्याच्यामध्ये काही वैद्यकीय दोष आढळून आला होता. परंतू नंतर वि.प.ने अथर्वचे नाव त्या पॉलिसीमध्ये समाविष्ट केले आणि पॉलिसीचे नुतनीकरण केले. वि.प.तर्फे त्या नविन नुतनीकरण करण्यात आलेल्या पॉलिसीची प्रत दाखल केली आहे, ज्यामध्ये अथर्वचे नाव विमाधारक म्हणून समाविष्ट केल्याचे दिसून येते. ती पॉलिसी 17.04.2016 ते 16.04.2017 या कालावधीकरीता नुतनीकृत करण्यात आली होती. तक्रारकर्त्याने ही तक्रार 05.07.2016 ला म्हणजेच पॉलिसीचे नुतनीकरण झाल्यानंतर आणि पॉलिसीमध्ये अथर्वचे नाव समाविष्ट केल्यानंतर दाखल केली आहे. त्यामुळे पॉलिसीमध्ये अथर्वचे नाव समाविष्ट करण्यासंबंधी तक्रारकर्त्याला तक्रार दाखल करतेवेळी कुठलेही कारण नव्हते.
6. ज्याअर्थी, वि.प.ने तक्रारकर्त्याचा मुलगा अथर्व याचे नाव तक्रार दाखल करण्यापूर्वी विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट केले होते, त्याअर्थी त्यासंबंधीच्या विनंतीसंबंधी कुठलेही निर्देश देण्याची गरज नाही. तक्रारकर्त्याने वि.प.कडून सुरुवातीला त्याचे प्रपोजल नामंजूर केल्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु.1,25,000/- ची नुकसान भरपाई मागितली आहे. परंतू वि.प.ने तक्रारकर्त्याची ती विनंती अगोदरच मान्य केलेली आहे आणि त्या प्रपोजलला विलंब का झाला याचे स्पष्टीकरणसुध्दा वि.प.ने दिलेले आहे. या सर्व बाबी तक्रार दाखल करण्यापूर्वीच पूर्ण झाल्या असल्या कारणाने तक्रारकर्त्याला आता नुकसान भरपाई मागण्याचा काही अधिकार नाही. तसेच तक्रारकर्त्याने त्याला एक प्रकारची हानी, तोटा किंवा क्षती झाली याबद्दलसुध्दा काही स्पष्ट लिहिले नाही. तक्रारकर्त्याचे असेसुध्दा म्हणणे नाही की, त्याचा मुलगा अथर्व याचेवर वैद्यकीय उपचारासाठी त्याने खर्च केला होता ज्याची प्रतीपूर्ती अथर्वचे नाव पॉलिसीमध्ये पूर्वी समाविष्ट नसल्याने करता आली नाही. त्याशिवाय, तक्रारीतील मुख्य विनंती ही वि.प.ने पूर्वीच मान्य केलेली असल्याने आता नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. वरील कारणास्तव ही तक्रार खारिज करण्यात येते.
तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.