- आ दे श –
(पारित दिनांक – 19 जुलै, 2018)
श्री. शेखर प्र. मुळे, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार न्यु इंडिया अॅशूरंस कंपनी आणि हेरीटेज हेल्थ टीपीए प्रा.लि. यांचेविरुध्द त्याचा विमा दावा मंजूर न केल्यामुळे दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्ता हे पती पत्नी आहेत. त्यांनी प्रत्येकी स्वतःसाठी वि.प.क्र. 1 कडून हेल्थ पॉलिसी विकत घेतली. त्याचा प्रत्येकी हप्ता रु.2,391/- असा होता. त्या पॉलिसी अंतर्गत दोन्ही तक्रारकर्त्यांना जी सुरक्षा प्रदान करण्यात आली होती, त्यामध्ये जर सामान गहाळ किंवा चोरी झाले तर 1000 यु.एस. डॉलर ची सुरक्षासुध्दा देण्यात आली होती. पॉलिसीचा अवधी दि.15.05.2009 ते 11.06.2009 असा होता. तक्रारकर्त्याजवळ टुरीस्ट व्हिसा होता आणि त्याने दि. 15 मे, 2009 ला अमेरीकेला जाण्याचे ठरविले होते. अमेरीकेवरुन त्याचा परतीचा प्रवास दि.05.06.2009 ला होता. त्यानुसार त्याने जेट एयरवेजचे तिकिट खरेदी केले आणि वि.प.क्र. 1 कडून सदरहू हेल्थ पॉलिसी विकत घेतली. दि.15.05.2009 ला सकाळी ते मुंबईवरुन न्यूयॉर्कसाठी जेट एयरवेजने निघाले आणि 15 मे 2009 च्या रात्री न्यूयॉर्क एयरपोर्टला उतरले. त्यांच्याजवळ 2 बॅग्स होत्या. न्यूयॉर्क एयरपोर्टवर उतरल्यावर त्यांना त्या दोन बॅग्स गहाळ झाल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी लगेच त्याची तक्रार त्याच तारखेला एयरपोर्ट अधिका-याला दिली. प्रत्येक बॅग्समध्ये किमती कपडे होते, ज्याची किंमत प्रत्येकी रु.48,000/- होती. त्या घटनेची चौकशी केल्यानंतर जेट एयरवेजने तक्रारकर्त्यांना इंटरनॅशनल वेट लॉस पॉलिसीनुसार गहाळ झालेल्या सामानाची नुकसान भरपाई म्हणून रु.22,960.78 दिले. त्यामुळे सामानाची उर्वरित रक्कम मिळण्यासाठी तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 व 2 कडे 15.11.2009 ला विमा दावा दाखल केला. वि.प.क्र. 1 आणि 2 यांनी तो दावा वि.प.क्र. 3 कडे सोपविला. वि.प.क्र. 3 ने तक्रारकर्त्याकडून काही दस्तऐवजांची मागणी केली. दि.08.07.2010 च्या पत्रानुसार तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 3 ला मागणी केलेले दस्तऐवज पुरविले आणि वि.प.क्र. 3 ने मिळाल्याबाबतची पोच दिली. परंतू त्यानंतरही वि.प.ने त्यांचा दावा मंजूर केला नाही, म्हणून त्यांनी तक्रार दाखल करुन विनंती केली आहे की, वि.प.ने गहाळ झालेल्या सामानाची उर्वरित रक्कम व्याजासह द्यावी, तसेच झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळावा.
3. मंचाचा नोटीस प्राप्त झाल्यावर वि.प.क्र. 1 व 2 यांनी तक्रारीला लेखी उत्तर नि.क्र. 8 प्रमाणे दाखल केले. त्यांनी तक्रारकर्त्याने हेल्थ विमा पॉलिसी घेतल्याचे कबूल केले. परंतू तक्रारकर्ते न्युयॉर्क येथे जात असतांना त्यांनी आपल्या बॅगमध्ये प्रत्येकी रु.48,000/- किमतीचे कपडे घेतले होते आणि त्या दोन बॅग न्यूयॉर्क एयरपोर्टवर गहाळ झाल्या होत्या हे नाकबूल केले. तसेच दावा तपासून पाहण्यासाठी तक्रारकर्त्याने मागितलेले दस्तऐवज पुरविले हेही नाकबूल केले. तसेच दोन बॅग्स पॉलिसीच्या अवधीमध्ये गहाळ झाल्या होत्या ही बाबसुध्दा नाकबुल केली आहे. पुढे असे नमूद केले की, दोन्ही तक्रारकर्त्यांनी गहाळ झालेल्या सामानाची नुकसान भरपाई जेट एयरवेजने दिलेली आहे, त्यामुळे आता पुन्हा ते सामानाची नुकसान भरपाई मागू शकत नाही, म्हणून ही तक्रार विचारात घेतल्या जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने कपडयांच्या किमतीबद्द्ल एकही बील सादर केले नाही. पुढे असे नमूद केले की, त्यांनी त्यांच्या बॅग्स एयरपोर्टवर दि.14.09.2009 ला सुपूर्द केल्या. म्हणजेच पॉलिसी अंतर्भूत बॅग्स एयरपोर्टच्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या आणि म्हणून त्यांचा दावा दाखल करण्यायोग्य नाही. पुढे असे नमूद केले आहे की, या सर्व प्रकरणात वि.प.क्र. 2 चा काहीही संबंध नाही कारण विमा कंपनीचे शाखा कार्यालयाच्या दैनंदिन कामाकाजाशी वि.प.क्र. 2 चा संबंध नसतो आणि वि.प.क्र. 2 विरुध्द तक्रार दाखल करण्यास कारणही घडलेले नाही. अशाप्रकारे त्याची सेवेत कुठलीही कमतरता नाही. इतर आरोप नाकबूल करुन तक्रार खारजि करण्याची विनंती केली आहे.
4. वि.प.क्र. 3 ला नोटीस मिळूनही कोणीही हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाईचा आदेश पारित करण्यात आला.
5. मंचाने सदर प्रकरणी दाखल उभय पक्षांचे अभिकथन आणि दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
6. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 कडून विमा पॉलिसी घेतली होती, जिचा अवधी दि.15.05.2009 ते 11.06.2009 असा होता ही वस्तुस्थीती वादातीत नाही. पॉलिसी अंतर्गत प्रवासा दरम्यान जर सामान गहाळ झाले तर 1000 यु.एस.डॉलर प्रत्येकी तक्रारकर्त्यांना विमा सुरक्षा म्हणून देण्यात आली होती. तक्रारकर्त्यांनी वि.प.कडे जे विमा दावा प्रपत्र सादर केले त्यानुसार त्यांनी मुंबईवरुन दि.15.05.2009 ला सकाळी 2-20 वा. न्युयॉर्कसाठी प्रयाण केले आणि त्याच तारखेला रात्री 12-20 वा. ते न्युायॉर्क एयरपोर्टवर उतरले. जेथे त्यांच्या बॅग्स गहास झाल्या होत्या. याठिकाणी हे नमूद करणे आवश्यक राहील की, मुंबईवरुन प्रयाण केल्याची तारीख आणि न्युयॉर्क पोहोचल्याची तारीख ही 15.05.2009 ही एकच आहे. त्याचे कारण असे की, भारत आणि अमेरिका या दोन्ही देशामध्ये काही तासांचा टाईमझोनमध्ये फरक पडतो. न्युयॉर्क एयरपोर्टवर दोन बॅग गहाळ झाल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही, कारण जरीही वि.प.ने ते लेखी उत्तरात नाकारले असले तरीही जेट एयरवेजने सामान गहाळ झाल्यासंबंधी नुकसान भरपाई तक्रारकर्त्यांना दिली होती. त्याप्रमाणे जेट एयरवेजने घटनेची सखोल नक्कीच केली असेल आणि समाधान झाल्यावरच नुकसान भरपाई देण्यात आली हे गृहित धरणे चुक होणार नाही. त्यामुळे दोन बॅग गहाळ झाल्या ही बाब वादग्रस्त नाही.
7. तक्रारकर्त्याचे जे सामान गहाळ झाले त्याची प्रत्यक्ष किंमत या तक्रारीद्वारा मागत आहे. त्यांच्या सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बॅगमध्ये रु.48,000/- किमतीचे कपडे-लत्ते होते. जेट एयरवेजकडून त्यांना रु.22960.78 नुकसान भरपाई मिळालेली आहे. त्यामुळे गहाळ झालेल्या सामानाची एकूण किंमत रु.96,000/- पैकी त्यांना केवळ रु.22960.78 मिळालेले आहे आणि म्हणून ते विमा पॉलिसी अंतर्गत वि.प.कडून उर्वरित रक्कम रु.73,039/- मागण्यास पात्र आहे असे तक्रारकर्त्याच्या वकिलांनी सांगितले. यावर वि.प.च्या वकिलांनी असा युक्तीवाद केला की, जर एकदा गहाळ सामानाची नुकसान भरपाई मिळाली असेल तर पुन्हा त्याच सामानांतर्गत नुकसान भरपाई मागणे कायद्यानुसार योग्य नाही आणि तशी मागणी करण्याचे अधिकार तक्रारकर्त्याला प्राप्त होत नाही. परंतू मंच या युक्तीवादाशी सहमत नाही कारण जेट एयरवेजने इंटरनॅशनल बॅग लॉस रुल्स प्रमाणे नुकसान भरपाई दिली, जी सामानाच्या वजनानुसार मिळत असते. तक्रारकर्ता आता पॉलिसी अंतर्गत गहाळ सामानासाठी जी सुरक्षा त्यांना देण्यात आली होती, त्यानुसार वि.प.कडून विमा राशी मागीत आहे आणि ही सुरक्षा राशी वि.प.ने दिलेली नाही. पुढे वि.प.च्या वकिलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारकर्त्यांनी बॅगेमधील तथाकथीत कपडयांच्या किमतीबद्दल एकही बिल सादर केले नाही. त्यामुळे ते म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक बॅगमध्ये रु.48,000/- किमतीचे कपडे होते या म्हणण्याला कुठलाही पुरावा नाही आणि ते पुराव्याविना ग्राह्य धरता येणार नाही.
8. ही बाब सत्य आहे की, गहाळ झालेल्या बॅग्जमध्ये अंदाजित किती किमतीचे कपडे होते याच्या पुराव्यादाखल एकही बिल दाखल केलेले नाही. परंतू ती बीले तक्रारकर्त्याकडे असणे हेसुध्दा अपेक्षित नाही. तक्रारकर्ते अमेरिकेला गेले होते आणि तेथे त्यांचे वास्तव्य 20 दिवसांचे होते. जर एखादी व्यक्ती परदेशात इतक्या मोठया कालावधीकरीता वास्तव्यास जात असेल तर ती निश्चितच आपल्या सोबत भारी किमतीचे कपडे घेऊन जाईल. तक्रारकर्ते हे सधन व्यक्ती आहे आणि त्यांच्याजवळ भारी किमतीचे कपडे असणे अपेक्षित आहे. कुठलाही प्रवासी प्रवास करतांना आपल्या सोबत घेऊन जात असलेलया कपडयांची बिले बाळगत नाही. त्यामुळे वि.प.तर्फे याबद्दल जो युक्तीवाद करण्यात आला ते पटण्यायोग्य नाही. गहाळ झालेल्या बॅग्जमध्ये असलेल्या कपडयांची एकूण किंमत तक्रारकर्ते म्हणतात त्याप्रमाणे नेमकी रु.96,000/- नसेलही. परंतू वि.प.ला त्यांचा दावा त्यापेक्षा कमी किमतीमध्ये मंजूर करता आला असता. मंचाचे मते प्रत्येक बॅगमध्ये असलेल्या कपडयांची किंमत रु.35,000/- याप्रमाणे एकूण रु.70,000/- ठरविली तर ते योग्य आणि वाजवी ठरेल.
9. वि.प.च्या वकिलांनी पुढे असा युक्तीवाद केला की, तक्रारकर्त्याने त्यांना हवे असलेले दस्तऐवज पुरविले नाही. परंतू वि.प.क्र. 3 च्या दि.10.08.2010 च्या पत्रावरुन वि.प.चे हे म्हणणे योग्य वाटत नाही. वि.प.क्र. 3 ही एक Third Party Administrator आहे जीची नेमणूक वि.प.क्र. 1 ने अशाप्रकारच्या दाव्याकरीता केली होती. वि.प.क्र. 3 ने दि.08.07.2010 च्या पत्रांन्वये तक्रारकर्त्याकडून काही दस्तऐवजांची मागणी केली होती. असे दिसते की, ते दस्तऐवज वि.प.क्र. 3 ला देण्यात आले होते कारण त्याने दि.01.02.2011 च्या पत्रांन्वये वि.प.क्र. 3 ला मागणीप्रमाणे सर्व दस्तऐवज दिले आहे असे कळविले होते. वि.प.क्र. 3 ने त्याही पत्राची पोच दि.21.02.2011 च्या पत्राद्वारे तक्रारकर्त्यांना दिली आणि असे कळविले की, गहाळ सामानाबद्दलच्या त्यांच्या दाव्यासंबंधी ते जेट एयरवेजसोबत संपर्कात आहे आणि एयरवेजकडून काही कळविण्यात आले तर त्याची सूचना ते तक्रारकर्त्याला देतील. त्यानंतर वि.प.कडून तक्रारकर्त्याला कोणताही पत्रव्यवहार झालेला दिसून येत नाही. त्यामुळे वि.प.चे हे म्हणणे बरोबर वाटत नाही की, तक्रारकर्त्याने मागितलेले दस्तऐवज दिले नव्हते.
10. या प्रकरणात वि.प.क्र. 1 च्या सेवेत कमतरता दिसून येते. त्यांनी विमा दाव्यावर निर्णय घ्यायला हवा होता. मात्र मंच वि.प.च्या या म्हणण्यास सहमत आहे की, प्रकरणात वि.प.क्र. 2 चा काहीही संबंध नाही. कारण या विमा दाव्यावर निर्णय घेण्यास वि.प.क्र. 1 सक्षम आहे. त्याचप्रमाणे वि.प.क्र. 3 हे एक Third Party Administrator Agency असल्याने त्यांची तक्रारकर्त्यासोबत कुठल्याही कराराद्वारे जबाबदारी त्यांच्यावर येत नाही. अशा प्रकारे वरील कारणास्तव ही तक्रार केवळ वि.प.क्र. 1 विरुध्द मंजूर होण्यायोग्य आहे. करिता खालिलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
तक्रारकर्त्याची तक्रार वि.प.क्र. 1 विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
1 ) वि.प.क्र. 1 ला आदेश देण्यात येतो की, त्याने तक्रारकर्त्याला विमा पॉलिसी अंतर्गत गहाळ झालेल्या सामानाची नुकसान भरपाई म्हणून रु.47,039/- तक्रार दाखल तारखेपासून तर रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने द्यावी.
2) वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्याला मानसिक, शारिरीक त्रासाची नुकसान भरपाईदाखल रु.5,000/- प्रत्येकी व तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावी.
3) वि.प.क्र. 2 व 3 विरुध्दची तक्रार खारिज करण्यात येते.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी वि.प.क्र. 1 ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत करावी.
- आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.