रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक – 24/2009 तक्रार दाखल दि. 5/2/09 निकालपत्र दि. 21/4/09 श्रीमती जन्नत मुकबुल बिद्री, रा. बिद्री मंजिल, कर्जत, जि. रायगड. ..... तक्रारदार
विरुध्द
1. शाखा प्रबंधक, एल.आय.सी. ऑफ इंडिया, उत्सव कमर्शिअल बिल्डींग, बाजारपेठ, खोपोली, जि. रायगड. 410203. 2. मॅनेजर, यु.एल.टी.पी. लाईफ इन्शुरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ठाणा डिव्हीजन ऑफीस, जीवन चिंतामणी, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे – 400604. ..... सामनेवाले उपस्थिती – मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष मा. श्री.भास्कर कानिटकर, सदस्य तक्रारकर्तीतर्फे – प्रतिनिधी श्री.शशिकांत देसाई. सामनेवालेतर्फे – अँड. आर.व्ही. ओक. -: नि का ल प त्र :- द्वारा मा.सदस्य, श्री.भास्कर कानिटकर तक्रारकर्ती ही कर्जत येथील रहिवासी असून तिने सामनेवाले 1 कडून एल.आय.सी. फयुचर प्लस या योजनेखाली प्रत्येकी रु. 1,00,000/- किमतीच्या दोन पॉलिसीज पॉलिसी नंबर 923560204 व 923560205 अन्वये दिनांक 7/3/2006 रोजी गुंतवणुक करुन घेतल्या होत्या. त्यावेळी त्याचा दर (N.A.V.) 13.1000 होता. तक्रारकर्तीने सामनेवालेंच्या खोपोली शाखेमध्ये दि. 17/11/06 वरील दोन्ही पॉलिसीज सरेंडर करण्यासाठी दिल्या व त्याची पोच घेतली. त्या दिवशीचा दर 15.4587 होता. त्यानंतर दि. 22/11/06 रोजी सामनेवाले 1 च्या खोपोली शाखेमधील मॅनेजरने टेलिफोन वरुन पॉलिसी क्र. 923560204 ही सापडत नसल्याचे तक्रारकर्तीला कळविले. त्यामुळे तक्रारकर्तीने सामनेवाले 1 कडे अर्ज देऊन त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही पॉलिसीज रद्द करण्याविषयी कळविले व त्या अर्जाची पोच घेतली. 2. दि. 4/12/06 रोजी तक्रारकर्तीला पॉलिसी क्र. 923560205 ची रक्कम रु. 1,11,025/- ही चेकद्वारे मिळाली. तसेच पॉलिसी क्र. 923560204 ही पॉलिसी पुनर्वटावाचा अर्ज रद्द केल्यामुळे तक्रारकर्तीकडे नोंदणीकृत डाकेने परत आली. वस्तुतः ही पॉलिसी सामनेवाले यांच्या कार्यालयात सापडत नव्हती. तर ती त्यांनी परत कशी पाठविली ? त्याचप्रमाणे एकूण युनिट 7489.943 असताना ते 7339.612 इतके कमी कसे झाले ? याबाबत सामनेवाले 1 यांच्या मॅनेजरकडे विचारले असता, त्यांनी तक्रारकर्तीला समाधानकारक उत्तर दिले नाही. 3. दि. 15/1/08 रोजी तक्रारकर्तीने पॉलिसी क्र. 923560204 ही पुन्हा दाखल (Re-surrender) करुन घेण्याबाबत सामनेवाले 1 कडे अर्ज दिला. त्या दिवशीचा दर 19.0081 असा होता. असे असूनही तक्रारकर्तीला परताव्याची रक्कम देताना मात्र दि. 17/11/06 रोजीच्या दराप्रमाणे म्हणजेच 15.4587 प्रमाणे धरण्यात आली. पैसे परत करताना सदर पॉलिसीची युनिटस ही 7489.943 ऐवजी 7339.612 धरण्यात आली. म्हणजे तक्रारकर्तीला सुमारे रु. 4,000/- ची रक्कम कमी करण्यात आली. सदर पॉलिसीची परीपक्व होण्याची मुदत एक वर्षाची होती. तक्रारकर्तीने 22 महिन्यांनंतर पॉलिसी मोडायला दिली होती. दि. 17/1/08 रोजी याबाबतचा अर्ज सामनेवाले 1 च्या खोपोली शाखेकडे दिला. दि. 28/1/08 रोजी तक्रारकर्तीला रकमेची अत्यावश्यकता असल्यामुळे तक्रारकर्तीने सामनेवाले 1 ला कळवून निषेध व्यक्त करुन त्यांनी दिलेला चेक वटविला. परंतु दि. 15/8/08 पर्यंत त्यांचेकडून रक्कम मिळाली नाही. वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही त्यांचेकडून रक्कम मिळाली नाही. शेवटी दि. 25/8/08 रोजी सामनेवाले यांना International Consumer Rights Protection Council या संस्थेमार्फत नोटीस देऊनही सामनेवाले यांनी तक्रारकर्तीला फरकाची रक्कम दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्तीला ग्राहक मंचात तक्रार दाखल करणे भाग पडले. 4. तक्रारकर्तीची मंचाला विनंती की, अ. सामनेवालेंकडून पॉलिसी क्र. 923560204 पोटी चुकीच्या युनिटचा दर लावून कमी मिळालेली रक्कम रु. 33,448/- मिळावी. ब. पॉलिसी लॉकींग पिरीएडच्या आत न मोडल्यामुळे कापलेली रक्कम रु. 4,000/- परत मिळावी. क. एकंदर पॉलिसीच्या झालेल्या युनिटच्या रकमेमधील फरकापोटी रु. 2,858/- परत मिळावी. ड. तसेच देय रकमेवर दि. 17/1/08 पासून दर साल दर शेकडा 12 टक्के व्याज दराप्रमाणे रु. 4,837/- व्याज मिळावे. इ. तसेच तक्रारीचा खर्च रु. 2,000/- द्यावा व मानसिक त्रासापोटी नुकसानी म्हणून रु. 25,000/- सामनेवाले कडून मिळावेत. 5. नि. 1 अन्वये तक्रारकर्तीने आपला तक्रार अर्ज दाखल केला असून नि. 2 वर तक्रारीच्या पुष्टयर्थ्य आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि. 3 वर दाखल कागदपत्रांची यादी जोडली आहे, त्यामध्ये एकूण 26 कागद दाखल आहेत. तसेच नि. 4 वर तक्रार चालविण्यास अधिकृत प्रतिनिधी नियुक्त करण्याविषयीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. नि. 5 अन्वये सामनेवाले 1 व 2 यांना नोटीसा काढण्यात आल्या. त्या नोटीसांच्या पोचपावत्या नि. 6 वर उपलब्ध आहेत. नि. 8 अन्वये सामनेवाले तर्फे अँड. आर.व्ही.ओक आपले वकीलपत्र दाखल केले आहे. नि. 11 वर सामनेवाले यांनी आपला लेखी जबाब दाखल केला आहे व नि. 12 वर सामनेवाले यांनी आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. 6. आपल्या लेखी जबाबात सामनेवाले यांनी तक्रारकर्तीची तक्रार नाकारली आहे. सामनेवाले यांनी तक्रारकर्तीच्या पॉलिसी क्र. 923560204 बाबतीतील सरेंडर व्हॅल्युमधील फरकाची रक्कम रु. 26,695/- चेकद्वारे दिल्याचे कथन केले आहे व ती रक्कम त्यांनी स्वीकारल्याचेही म्हटले आहे. सामनेवाले यांच्या कार्यालयात तक्रारकर्तीची पॉलिसी गहाळ झाल्याचे तक्रारकर्तीचे कथन सामनेवाले यांनी अमान्य केले आहे. दि. 16/1/08 रोजी (N.A.V.) दर रु. 19.0081 असा होता हे तक्रारकर्तीचे विधान त्यांनी अमान्य केले आहे. दि. 16/1/08 रोजी फयूचर प्लस योजनेतील ग्रोथ फंडाचा दर (N.A.V.) रु. 18.8545 असा होता. तक्रारकर्तीला पैसे पाठविताना केलेला हिशोब हा संगणक प्रणाली मधील चुकीमुळे दि. 16/1/08 ऐवजी दि. 17/11/06 रोजी असलेल्या फयूचर प्लस ग्रोथ फंडाचा दर (N.A.V.) रु. 15.4587 प्रमाणे तक्रारकर्तीची सरेंडर व्हॅल्यु निश्चित करण्यात आली. दि. 16/1/08 रोजी तक्रारकर्तीचे खाती 7339.612 इतकी युनिटस् शिल्लक होती. त्यामधून सरेंडर व्हॅल्यू रु. 2768.03 ही रक्कम वजा करुन रु. 1,35,616.68/- इतकी रक्कम तक्रारकर्तीला देय होती. परंतु संगणकाच्या चुकीमुळे त्या रकमेऐवजी रु. 1,08,922/- इतक्या रकमेचा चेक तक्रारकर्तीला देण्यात आला. तक्रारकर्तीच्या पॉलिसी क्र. 923560204 बाबतीतील सरेंडर व्हॅल्युमधील फरकाची रक्कम रु. 26,695/- आधीच चेकद्वारे दिली आहे. सामनेवाले यांनी तक्रारकर्तीला झालेल्या या त्रासाबाबत दि. 4/4/08 रोजीच्या पत्राने दिलगीरीही व्यक्त केली आहे. तक्रारकर्तीला झालेल्या त्रासाबद्दल ज्या काही रकमांची वजावट ही तक्रारकर्तीला समजावून सांगण्यात आली असून त्यांनी ती मान्य असल्याचेही कबूल केले आहे. त्यामुळे आपण तक्रारकर्तीला कोणत्याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिलेली नाही असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. म्हणून तक्रारकर्तीची तक्रार फेटाळण्यात यावी असे त्यांचे म्हणणे आहे. 7. दि. 20/4/09 रोजी तक्रार अंतिम सुनावणीस मंचासमोर आली असता, उभयपक्ष हजर होते. उभयपक्षांनी केलेला युक्तीवाद मंचाने ऐकला. त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन मंचाने केले व तक्रारीच्या अंतिम निवारणार्थ खालील प्रमुख मुद्यांचा विचार केला.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ? उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - तक्रारकर्तीचा अर्ज त्यांनी मागणी केल्याप्रमाणे मंजूर करता येईल काय ? उत्तर - अंतिम आदेशात नमूद केल्याप्रमाणे. विवेचन मुद्दा क्रमांक 1 - तक्रारकर्तीने सामनेवाले कडून फयुचर प्लस योजनेतंर्गत प्रत्येकी रु. 1,00,000/- किमतीच्या 2 पॉलिसीज घेतल्या होत्या. त्यातील पॉलिसी क्र. 923560204 बाबत तक्रारकर्तीची तक्रार आहे. तक्रार दाखल केल्याबाबत अंतिम सुनावणी पर्यंत तक्रारकर्तीला देण्यात येणा-या रकमेमधील तफावती बाबत आवश्यक असलेली रक्कम रु. 26,695/- सामनेवाले यांनी तक्रारकर्तीला दिली असल्याचे दाखल असलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येत आहे. एकंदर केलेली वजावट तक्रारकर्तीला मान्य असल्याचे तिने कबूल केले आहे. तक्रारकर्तीला तिने गुंतविलेल्या पॉलिसीचे पैसे तिला अत्यावश्यक असलेल्या वेळी सामनेवाले यांनी दिले नाहीत अशी तिची प्रामुख्याने तक्रार आहे. आपल्या तोंडी युक्तीवादामध्ये तक्रारकर्तीने सामनेवाले यांनी वजा केलेली रक्कम तिला दिली असल्याचे तक्रारकर्तीने कबूल केले आहे. तक्रारकर्तीने पॉलिसी क्र. 923560204 ही सामनेवाले कडे वटविण्यासाठी दि. 16/1/08 रोजी दिली होती. त्याच्या पैशांचा चेक सामनेवालेंकडून तक्रारकर्तीला दि. 17/1/08 रोजी मिळालेला आहे. परंतु ती रक्कम कमी दिली असल्याची तक्रार तक्रारकर्तीने सामनेवाले यांचेकडे केली व त्याबाबत बरीच स्मरणपत्रेही तिने सामनेवालेंना पाठविली. परंतु सामनेवाले कडून त्याबाबत काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तक्रारकर्तीला मंचात तक्रार दाखल करावी लागली. मंचात तक्रार दाखल केल्यानंतर मात्र सामनेवाले यांनी कमी दिलेल्या रकमेपोटी रु. 26,695/- इतकी फरकाची रक्कम चेकद्वारे दि. 5/2/09 रोजी तक्रारकर्तीला दिली. म्हणजेच 17/1/08 ते 5/2/09 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांनी तक्रारकर्तीला हे पैसे दिले. सामनेवाले यांच्या तोंडी युक्तीवादामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे संगणकाच्या प्रणालीमुळे झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्यास त्यांना बराच कालावधी लागला. हे त्यांचे म्हणणे मान्य करता येण्यासारखे नाही. तक्रारकर्तीला देय असलेली रककम लॉकींग पिरीएड नंतर परत करताना योग्य ती काळजी सामनेवाले यांनी घेतली नाही असे दिसून येते. जरी पॉलिसीचे देय असलेले पैसे त्यांनी त्वरीत परत केले तरी ते देताना चुकीच्या दराने हिशोब केला. ही सामनेवाले यांची दोषपूर्ण सेवा आहे असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होय असे आहे. विवेचन मुद्दा क्रमांक 2 - तक्रारकर्तीने आपल्या तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे मंचाकडे मागणी केलेल्या फरकाची रक्कम तिला मिळावी अशी विनंती केली आहे व ही फरकाची रक्कम तिला जवळ जवळ 1 वर्ष 15 दिवस इतक्या विलंबाने मिळालेली आहे. त्यावर तक्रारकर्तीने दर साल दर शेकडा 12% दराने व्याज मागितले आहे. हा व्याजाचा दर अवास्तव असल्याचे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्तीला विलंबाने मिळालेल्या रकमेवर म्हणजेच रु. 26,695/- या रकमेवर सामनेवाले यांनी दर साल दर शेकडा 8% दराने दि. 17/1/08 पासून व्याज द्यावे असे मंचाचे मत आहे. तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु. 25,000/- ची मागणी तक्रारकर्तीने केली आहे तीही मंचाला अवास्तव वाटत आहे. योग्य वेळी स्वतःचे गुंतवणूक केलेले पैसे न मिळाल्याने तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक त्रासापोटी रु. 7,000/- सामनेवाले यांनी द्यावेत असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्या खर्चापोटी त्यांनी मागितल्याप्रमाणे रु. 2,000/- सामनेवाले यांनी तक्रारकर्तीला द्यावेत असे मंचाचे मत आहे. सबब, आदेश पारीत करण्यात येतो की, -: अंतिम आदेश :- आदेश पारीत तारखेच्या 45 दिवसांचे आत, सामनेवाले यांनी तक्रारकर्तीला खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. 1. आधी दिलेल्या रक्कम रु. 26,695/- (रु. सव्वीस हजार सहाशे पंच्याण्णव मात्र) वर दि.17/1/08 पासून ते पैसे देईपर्यंत दर साल दर शेकडा 8% दराने व्याज द्यावे. 2. मानसिक त्रासापोटी रु. 7,000/- (रु. सात हजार मात्र) सामनेवाले यांनी द्यावेत. 3. तक्रारीच्या खर्चापोटी रु. 2,000/- (रु. दोन हजार मात्र) सामनेवाले यांनी तक्रारकर्तीला द्यावेत. 4. विहित मुदतीत वरील आदेशाचे पालन सामनेवाले यांनी न केल्यास वरील सर्व रकमा वसूल करण्याचा अधिकार तक्रारकर्तीला राहील. 5. या आदेशाच्या प्रती तक्रारकर्ती व सामनेवाले यांना पाठविण्यात याव्यात. दिनांक :- 21/4/09 ठिकाण :- रायगड - अलिबाग.
(भास्कर मो. कानीटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |