मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई ग्राहक तक्रार क्रमांक – 223/2006 तक्रार दाखल दिनांक – 11/08/2006 निकालपत्र दिनांक - 19/03/2011 श्री. अशोक महादेव पिलनकर, रा. इएसआयएस हॉस्पीटल क्वॉर्टर्स, टाईप-3, बिल्डींग डी/72, 2 रा मजला, आकुर्ली रोड, कांदिवली(पूर्व), मुंबई 400 101. ........ तक्रारदार विरुध्द
दि ब्रँच मॅनेजर, अलाहाबाद बँक, परेल ब्रँच, मुंबई 400 012. ......... सामनेवाले
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती – उभयपक्ष गैरहजर - निकालपत्र - - द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारदाराने नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांच्याकडे त्याचे बचत खाते क्रमांक 515880 होते, व त्यात त्याने वेळोवेळी रक्कम जमा केलेली आहे. तक्रारदाराने नमूद केलेले आहे की, जानेवारी 2001 पासून त्याची बदली भांडूप मुंबई येथे झाल्यामुळे त्याने त्याच्या बचत खात्यात कमी व्यवहार केला. तक्रारदाराने पुढे असे नमूद केले आहे की, तो वेळोवेळी त्याच्या बचत खात्यातून सन 2004 पर्यंत रक्कम काढीत होता. तक्रारदाराने नमूद केले आहे की, त्याने दिनांक 06/07/2001 रोजी रुपये 15,000/- व रुपये 3,500/- जमा केले होते. त्यादिवशी त्याने पासबूक हे गैरअर्जदार यांचेकडे नोंदी घेण्याकरीता दिले होते, व त्या दिवशी त्याच्या खात्यात रुपये 64,633/- जमा होते परंतु सदर नोंदीची तपासणी तक्रारदाराला करता आली नाही. तक्रारदाराने पुढे नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांनी त्याच्या खात्यात चूकीच्या नोंदी केल्या आहेत. तसेच त्याच्या खात्यातून दिनांक 11/04/2001 रोजी रुपये 11,000/, दिनांक 16/05/2001 रोजी रुपये 12,000/- व दिनांक 17/08/2001 रोजी रुपये 15,000/- इतकी रक्कम खात्यातून काढली आहे. त्यामुळे त्यांनी गैरअर्जदाराविरुध्द तक्रार नोंदविली होती. तसेच तक्रारदार यांनी गैरअर्जदाराबरोबर पत्रान्वये संपर्क साधून त्याच्या खात्यातून गैरकायदेशीररित्या ही रक्कम काढली होती त्याची चौकशी करण्याबद्दल तक्रार नोंदवली होती. तक्रारदाराने नमूद केले आहे की, त्याच्या खात्यात अफरातफर (फ्रॉड/फॉर्जरी)करुन रक्कम काढली आहे त्याकरीता गैरअर्जदार हे जबाबदार आहेत. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार ही रुपये 38,000/- रकमेची व्याजासह मागणी केलेली आहे.
2) मंचाच्या मार्फत गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार हे हजर झाले व त्यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे, तो येणे प्रमाणे -
गैरअर्जदार यांनी तक्रारदारांनी लावलेले सर्व आरोप अमान्य केले आहेत. तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केल्यामुळे ती खारिज करण्यात यावी. गैरअर्जदार यांनी पुढे असे नमूद केले आहे की, त्यांनी तक्रारदाराच्या खात्यात अचूक नोंदी घेतलेल्या आहेत. गैरअर्जदार यांनी पुढे असे नमूद केले आहे की, त्यांनी तक्रारदाराच्या खात्यात रुपये 15,000/- व रुपये 3,500/- या नोंदी घेतलेल्या आहेत. गैरअर्जदार यांनी नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी त्याच्या खात्यातून रुपये 38,000/- काढलेले आहेत. गैरअर्जदार यांनी पुढे असे नमूद केलेले आहे की, त्यांनी सेवेत कोणतीच त्रृटी दिलेली नाही. गैरअर्जदार यांनी पुढे असे नमूद कले आहे की, त्यांनी अर्जदाराच्या खात्यात कोणतीच अफरातफर (फ्रॉड/फॉर्जरी) केलेली नाही व सेवेत त्रृटीही दिलेली नाही. गैरअर्जदार यांनी पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी भोईवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविलेली आहे, व त्या अंतर्गत 3 विथड्रावल स्लीप व स्वाक्षरी नमुन्याचे पत्र हे पोलीसांनी तपासाअंती जप्त केलेले आहेत. तसेच सदर गुन्हयाचा तपास हा त्यांच्याकडे प्रलंबित आहे त्यामुळे सदर तक्रार ही खारिज होण्यास पात्र आहे.
3) प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तीवादाकरीता दिनांक 10/03/2011 रोजी आली. तक्रारदार व त्यांचे वकील, तसेच गैरअर्जदार व त्यांचे वकील यांचा पुकारा केला असता ते गैरहजर होते. रोजनाम्याचे अवलोकन केले असता दिनांक 21/10/2010 पासून उभयपक्ष सतत गैरहजर आहेत. त्यामुळे मंचाने उभयपक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आलेले आहे - निष्कर्ष प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांचे गैरअर्जदार बँकेकडे बचत खाते होते ही बाब गैरअर्जदार यांनी मान्य केली आहे मंचाच्या मते गैरअर्जदार हे तक्रारदाराला बँक सेवा देते त्यामुळे तक्रारदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे. प्रस्तुत तक्रारीत तक्रारदार यांचे त्यांच्या खात्यात एकूण दिनांक 11/04/2001 रोजी रुपये 11,000/-, दिनांक 16/05/2001 रोजी रुपये 12,000/- व दिनांक 17/08/2001 रोजी रुपये 15,000/- असे एकूण रुपये 38,000/ तक्रारदाराची फसवणूक करुन इतर व्यक्तीने बँक कर्मचा-यांशी संगमत करुन खात्यातून काढल्याबद्दल तक्रारदाराने सदर रक्कम परत मिळण्याबाबत विनंती केलेली आहे.
प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती व सदर गुन्हयात पोलीस अधिकारी यांनी बँकेकडून बचत खात्यासंबंधी विथड्रॉ स्लीप जप्त केली आहे. सदर दस्तऐवज गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी जबाबासोबत दाखल केलेले आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीसोबत बचत खात्याच्या पासबुकाचा खातेउतारा दाखल केलेला आहे. परंतु सदर रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा दर्शविलेली नाही. तसेच तक्रारदाराच्या खात्यातून दिनांक 02/11/2011 रुपये 11,000/-, दिनांक 16/05/2001 रोजी रुपये 12,000/- व दिनांक 17/08/2001 रोजी रुपये 15,000/- असे एकूण रुपये 38,000/ तक्रारदाराच्या खात्यातून काढलेले आहेत असे दर्शविलेले आहे परंतु त्या संबंधीची नोंद बचत खाते पासबुकात आढळून येत नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारदाराच्या बचत खात्यात योग्य त्या नोंदी घेतलेल्या नाहीत. याउलट तक्रारदार यांनी दाखल केलेल्या त्याच्या बचत खात्यातून पासबुकामध्ये एकूण रुपये 38,000/- काढल्याबद्दल व रुपये 18,500/- जमा केल्याबद्दलच्या हस्तलिखित नोंदी दाखविलेल्या आहेत. वास्तविक तक्रारदाराच्या पासबुकात पूर्वी संगणकाद्वारे नोंदी घेतलेल्या आढळून येतात. तक्रारदार यांनी त्याच्या खात्यातून गैरकायदेशीररित्या रक्कम काढल्याबाबत वेळीच गैरअर्जदार यांचेकडे तक्रार नोंदविली होती. तसेच भोईवाडा पोलीस स्टेशन येथे पोलीस तक्रार नोंदविलेली आहे. मंचाच्या मते गैरअर्जदार यांनी तक्रारदाराच्या पासबुकामध्ये आवश्यक त्या नोंदी न घेता रकमेची अफरातफर केलेली आहे हे स्पष्टपणे दस्तऐवजांवरुन दिसून येते असे मंचाचे मत आहे.
प्रस्तुत प्रकरणात माझे पूर्व अध्यक्ष यांनी दिनांक 03/04/2007 रोजी आदेश पारित करुन भोईवाडा पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी यांना तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीतंर्गत हस्ताक्षरतज्ञांकडून अहवाल प्राप्त झाला आहे किंवा नाही असा निर्देश दिला होता, त्यांना दिनांक 30/04/2007 पर्यंत त्यांचा अहवाल सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. मंचाने त्यानंतर वेळोवेळी अनेकवेळा संबंधित पोलीस स्टेशन यांना पत्र पाठवून अहवालाची मागणी केली होती. त्यामुळे सदर अहवाल मंचास प्राप्त न झाल्यामुळे व पोलीस अधिकारी यांनी दस्तऐवज हस्ताक्षर तज्ञाकडे पाठविले किंवा नाही त्यासंबंधी कोणतीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच तक्रारदार यांनी कोणताच सबळ पुरावा दाखल केला नाही. तथापि मंचाने वर नमूद केल्याप्रमाणे गैरअर्जदार यांनी तक्रारदाराच्या बचत खात्यात आवश्यक त्या नोंदी घेतल्या नव्हत्या व त्या कालावधीमधेच तक्रारदाराच्या बचत खात्यात पैशांची उचल झालेली आहे, तसेच तक्रारदाराला त्याच्या बचत खात्याचे पासबूक परत न केल्याने त्याला नोंदी तपासता आल्या नाहीत. यासर्व बाबींमुळे मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदार यांनी सदर रक्कम ति-हाईत व्यक्तीला उचलण्याची परवानगी दिलेली आहे मंचाच्या मते गैरअर्जदार यांनी रक्कम उचलते वेळेस आवश्यक ती काळजी/खबरदारी घेतलेली नाही. वास्तविक पहाता बचत खात्याच्या पासबुकामधे विथड्रॉवल स्लिपच्या आधारे रक्कम बचत खात्यातून काढावयाची झाल्यास त्यासोबत पासबूक देणे हे आवश्यक आहे. खात्यातून विथड्रॉवल स्लीपद्वारे रक्कम काढल्यास त्वरित बचत खात्याच्या पासबूकामधे त्याची नोंद घेतली जाते परंतु तशी नोंद बँकेने वेळेवर घेतलेली नाही. त्यामुळे बँकेने तक्रारदाराच्या बचत खात्यातून रुपये 38,000/- ति-हाईत व्यक्तीने काढलेले आहेत, व सेवेत त्रृटी दिलेली आहे. त्यामुळे सदर रक्कम तक्रारदाराला तक्रार दाखल दिनांकापासून दर साल दर शेकडा 9 टक्के दराने ते रक्कम पूर्ण अदा होईपर्यंत व्याजासह परत करावयास पाहिजे असे मंचाचे मत आहे. तसेच गैरअर्जदार यांनी सेवेत त्रृटी दिल्यामुळे तक्रारदार यांनी शारिरीक मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- ची मागणी केली आहे परंतु ही रक्कम मंचास संयुक्तिक वाटत नाही. सबब गैरअर्जदार यांनी तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये 5,000/- द्यावेत. तसेच तक्रारीच्या खर्चाची रक्कम गैरअर्जदार यांनी रुपये 3,000/- द्यावेत. प्रस्तुत प्रकरणात उभयपक्षांनी दाखल केलेले दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहेत - - अंतिम आदेश - 1) तक्रार क्रमांक 223/2006 अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार यांनी तक्रारदाराच्या बचत खात्यातून ति-हाईत व्यक्तीने काढलेली रक्कम रुपये 38,000/- (रुपये आळतीस हजार फक्त) तक्रारदाराला तक्रार दाखल दिनांकापासून दर साल दर शेकडा 9 टक्के दराने ते रक्कम पूर्ण अदा होईपर्यंत व्याजासह परत करावी. 3) गैरअर्जदार यांनी तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावेत. 3) 4) गैरअर्जदार यांनी तक्रारदाराला तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 3,000/- (रुपये तिन हजार फक्त) द्यावेत. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे. 6) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी. दिनांक – 19/03/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. सही/- सही/- (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./- |