तक्रारदाराकरिता : श्री.संजय बेंडल, वकील
सामनेवाले क्र.1 व 2 करिता : श्री.अनिल अग्रवाल, वकील
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- *-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- *-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्र
तक्रारीचे संक्षिप्त स्वरूप खालीलप्रमाणेः-
सामनेवाले क्र.1 ही कंपनी कायद्याखाली नोंदविलेली कंपनी असुन सामनेवाले क्र.2 हे तिचे शेअर्सचा व्यवसाय सांभाळण्याकरिता सामनेवाले क्र.1 यांनी नेमलेली प्रतिनिधी आहे.
2 तक्रारदारांच्या तक्रारीतील असे कथन आहे की, त्यांनी 1,000 शेअर्स खरेदी केले होते परंतु त्यापैकी 100 व 50 असे एकुण 150 शेअर्स हस्तांतरणामध्ये गहाळ झाले. त्यानंतर, तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे त्या शेअर्सची मागणी करणे कामी तगादा लावला. सामनेवाले क्र.2 यांनी त्यास दाद न दिल्याने तक्रारदारांनी मा.उच्च न्यायालयाकडे दिवाणी दावा क्र.3117/1994 दाखल केला. परंतु त्यानंतरही सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांना गहाळ झालेले शेअर्स परत केले नाहीत अथवा कार्यवाही केली नाही. त्यानंतर, तक्रारदारांनी सामनेवाले यांना नोटीसा दिल्या व प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
3 दरम्यान, शेअर्सची किंमत रु.537/- वरुन रु.527/- दराने किंमत कमी झाल्याने तक्रारदारांनी 500 शेअर्सची नुकसानभरपाईची रक्कम रु.26,000/- अधिक नुकसानभरपाई रक्कम रु.1,00,000/- वसुल होणे कामी सामनेवाले यांचेविरुध्द दाद मागितली आहे.
4 सामनेवाले क्र.2 यांनी आपली कैफियत दाखल केली व असे कथन केले की, तक्रारदारांनी खुल्या बाजारातुन शेअर्स खरेदी केल्याने तक्रारदार ग्राहक होत नाहीत. सामनेवाले क्र.2 यांनी पुढे असे कथन केले की, तक्रारदारांनी खरेदी केलेल्या 1000 शेअर्स पैकी तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे 500 शेअर्स प्राप्त झाले नाहीत व त्यापैकी 100 + 50 = 150 शेअर्स सामनेवाले क्र.2 यांचेकडे खरेदी विक्रीचा व्यवहारात नोंदविले गेले. सामनेवाले यांनी पुढे असेही कथन केले आहे की, तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे सामनेवाले क्र.1 यांनी राहिलेल्या 350 च्या शेअर्सकरिता दुसरे प्रमाणपत्र तक्रारदारांना द्यावयास तयार होते परंतु तक्रारदारांनी त्याबद्दलच्या कागदपत्रांची पुर्तता केली नाही. या प्रकारे, तक्रारदारांनी हरविलेले शेअर्सच्या ऐवजी शेअर्सची प्रतिलिपी (Duplicate) देण्याचे संदर्भात सोयीसुविधा पुरविण्यात कसुर केली आहे या आरोपास सामनेवाले क्र.2 यांनी नकार दिला.
5 सामनेवाले क्र.1 यानी आपली वेगळी कैफियत दाखल केली. त्यातील कथने सामनेवाले क्र.2 यांच्या कथनाप्रमाणेच आहेत.
6 तक्रादारांनी सामनेवाले यांच्या कैफियतीला प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदारांनी तसेच सामनेवाले यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
7 प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफियत, शपथपत्र, कागदपत्रे यांचे वाचन केले, त्यावरुन तक्रारीच्या निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदारांना गहाळ झालेल्या शेअर्सची प्रतिलिपी देण्याचे संदर्भात सोयीसुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3 | अंतिम आदेश ? | तक्रार रद्दबातल करण्यात येते. |
कारणमिमांसाः-
8 तक्रारदारांनी तक्रारीत असे कथन केले की, खरेदी केलेल्या 1000 शेअर्सपैकी 500 शेअर्स गहाळ झाले व त्या शेअर्सची प्रतिलिपी (Duplicate) सामनेवाले क्र.2 यांनी देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाले. तक्रारदारांचे पुढे असे कथन आहे की, दरम्यान शेअर्सची किंमत कमी झाल्याने त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. सामनेवाले क्र.2 यांनी या संदर्भात असे कथन केले आहे की, ते शेअर्सची प्रतिलिपी देण्यास सदैव तयार होते परंतु तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केलेली नसल्याने सामनेवाले यांनी तक्रारदारांना शेअर्सची प्रतिलिपी देऊ शकले नाहीत. या संदर्भात, तक्रारदारांनी स्वतःच सामनेवाले यांचे पत्राची प्रत निशाणी-ब येथे दाखल केलेली आहे. त्यामध्ये सामनेवाले क्र.2 यांनी शेअर्सची प्रतिलिपी तक्रारदारांना देणे कामी आवश्यक त्या कागदपत्रे नमुद केलेली आहेत. तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये असे कुठेही कथन नाही की, सामनेवाले यांचेकडून या स्वरुपाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केली व त्यानंतरही सामनेवाले क्र.2 यांनी शेअर्सची प्रतिलिपी तक्रारदारांना अदा केली नाही. या मजकुराचे पत्र सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि.24.12.2002 रोजी पाठविले, ज्याची प्रत सामनेवाले क्र.2 यांनी आपल्या कैफियतीसोबत दाखल केली आहे.
9 तक्रारदारांनी सामनेवाले यांची कैफियत दाखल झाल्यानंतर प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले आहे, त्यामध्ये सामनेवाले यांचेकडून प्राप्त झालेल्या दि.24.12.2002 रोजीचे पत्राचा उल्लेख नाही परंतु दि.17.09.2002 च्या पत्राचा उल्लेख आहे. वर नमुद केल्याप्रमाणे, सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांना दि.19.09.2002 चे पत्र निशाणी-ब येथे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी कळविले होते. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत प्रतिउत्तराचे शपथपत्रात असे कुठेही कथन केले नाही की, त्यांनी तक्रारदारांच्या, सामनेवाले क्र.2 चे पत्र दि.17.09.2009 प्रमाणे कागदपत्रांची पुर्तता केली होती. तक्रारदारांचे असे कथन नाही की, त्यांनी कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही सामनेवाले क्र.2 यांनी शेअर्सची प्रतिलिपी तक्रारदारांना दिली नाही. या प्रकारे तक्रारदारांना डुप्लीकेट शेअर्सच्या संदर्भात सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांना सोयीसुविधा पुरविण्यात कसुर केली हा आरोप तक्रारदार करु शकत नाहीत.
10 त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे तक्रारदारांनी तक्रार दाखल करण्यापुर्वी मा.उच्च न्यायालयाने दिवाणी दावा क्र.3117/1994 दाखल केला होता व मा.उच्च न्यायालयाने दि.08.09.2003 रोजी मा.उच्च न्यायालयाने तो तक्रारदारांचा दावा मंजुर केला व दाव्यातील मागणीप्रमाणे सामनेवाले यांना निर्देष दिले.
11 तक्रारदारांचा लेखी युक्तीवाद दि.18.12.2004 ला दाखल आहे. मा.उच्च न्यायालयाचे निकालानंतर दाखल केला आहे. त्या लेखी युक्तीवादात तक्रारदारांनी मा.उच्च न्यायालयाचे दिवाणी दावा क्र.3117/1994 यातील न्यायनिर्णयामधील उल्लेख केला नाही. तसेच मा.उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाची अंमलबजावणी सामनेवाले यांनी केलेली नाही असा देखील आरोप केला नाही. मुळातच तक्रारदारांनी त्याच विषयांसंबंधात मा.उच्च न्यायालयाकडे दाद मागितली असल्याने व तक्रारदारांचा दिवाणी दावा त्याच विषयावर आधारित असल्याने मा.उच्च न्यायालयाने मंजुर केला असल्याने तक्रारदारांनी वेगळी तक्रार दाखल करुन सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाईची मागणी करु शकत नाहीत.
वरील निष्कर्षावरुन व चर्चेवरुन, या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश देण्यात येतो.
आदेश
(1) तक्रार रद्द करण्यात येते, खर्चाबद्दल आदेश नाहीत.
(2) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.