जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १४४/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २९/०८/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १८/११/२०१३
भिमराव कृष्णा घरटे ----- तक्रारदार.
उ.व.६२, धंदा- शेती
रा.मु.पो.सामोडे,ता.साक्री.जि.धुळे.
विरुध्द
(१)दि.भारत एजन्सीज, ----- सामनेवाले.
१४३७,आग्रा रोड,धुळे
(किटक नाशक व बियाणे विक्रेते)
(२)मालव सिड्स प्रायव्हेट लिमीटेड,
पत्ता-५,साहू बावडी,मानेक चौक,
रतलाम (मध्यप्रदेश)पिन कोड नं.४५७००१.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य : श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.एन.महाजन)
(सामनेवाले क्र.१ व २ तर्फे – वकील श्री.एम.एस.बोडस)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांनी सदोष बियाणे दिल्यामुळे नुकसान भरपाई मिळणेकामी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांच्या मालकीचे मौजे.सामोडे शिवार,ता.जि.धुळे येथे गट नं.५८२/२ अशी शेत जमीन असून, त्यामध्ये तक्रारदाराने ०.२७ आर या क्षेत्रात गाजर पिक घेणेकामी सामनेवाले क्र.२ यांनी उत्पादीत केलेल्या बियाण्यांची प्रति ५०० ग्रॅम प्रमाणे एकूण आठ पाकीटे खरेदी केली. या बियाण्यांची पेरणी केल्यानंतर त्या पिकास गाजर पिक लागण्याऐवजी केवळ सोटमुळ आढळून आले. सोट मुळांचे रुपांतर गाजरात होण्याऐवजी तंतुमय मुळांची वाढ मोठया प्रमाणात आढळून आली. ही बाब तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांना कळविली. तसेच दि.१७-०४-२०१२ रोजी तालुकास्तरीत बियाणे तक्रार निवारण समिती यांचेकडे तक्रार केली. संबंधित अधिका-यांनी पिक परिस्थितीचा पंचनामा केला. या अहवालाप्रमाणे गाजर पिकास गाजर लागण्याऐवजी केवळ सोटमुळे आढळून आली. सदर प्रकार हा बियाण्यातील वांझपणामुळे झाला आहे. यास दोषयुक्त बियाणे जबाबदार असल्याचे समितीचे मत आहे. तक्रारदाराने सदर पिक लावणीसाठी मशागत खर्च रु.१५,०००/- एवढा केला आहे. तसेच सदर पिकापासून येणारे अपेक्षीत उत्पन्न रु.५०,०००/- असे एकूण रु.६५,०००/- तक्रारदारांना आर्थिक नुकसान झाले असून, त्यास सामनेवाले हे जबाबदार आहेत. सामनेवाले क्र.१ व २ यांनी दोषयुक्त बियाणे देऊन तक्रारदारांची फसवणूक केली आहे. त्याकामी तक्रारदारांनी सामनेवाले क्र.१ व २ यांना नोटिस पाठविली आहे. परंतु सामनेवाले यांना नोटिस मिळूनही त्याप्रमाणे पुर्तता केलेली नाही. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज या मंचात दाखल करावा लागला आहे.
तक्रारदारांची अशी विनंती आहे की, सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांना सदोष बियाणे विक्री केल्यामुळे, तक्रारदारांच्या झालेल्या नुकसानीकामी एकूण रु.६५,०००/- सामनेवाले यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिक रित्या मिळावेत. तसेच मानसिक त्रासाकामी रु.१५,०००/- व अर्जाचा खर्च रु.१०,०००/- मिळावा.
तक्रारदार यांनी नि.नं.२ वर शपथपत्र, नि.नं.१४ वर दस्तऐवज यादी सोबत ७/१२ उतारा, बियाणे खरेदीची पावती, पिक परिस्थितीचा पंचनामा, नोटिस, बियाण्याची रिकामे पाकीट, पिकाचे फोटो इत्यादी कागदपत्र छायांकीत प्रतीत दाखल केले आहेत.
(३) सामनेवाले क्र.२ यांनी नि.नं.१४ वर त्यांचा लेखी खुलासा दाखल केला असून, त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार मान्य व कबूल नाही. तसेच सदर तथाकथित बियाणे हे तक्रारदारांनी सामनेवाले क्र.१ यांच्याडून घेतल्याचे दिसते. परंतु सदर बियाणे दोषयुक्त आहे हे मान्य व कबूल नाही. समितीच्या अहवालामध्ये बियाणे दोषयुक्त आहे हे योग्य त्या लॅब टेस्टनंतर आढळून आले असा उल्लेख नसून, सदर अहवाल मान्य व कबूल नाही. तक्रारदाराचे कथीत झालेले नुकसानीस, बियाण्याचे वापराचे प्रमाण, चुकीच्या वेळी पेरणी, तापमान, इत्यादी चुकांसह पिकाचे व्यवस्थान या बाबी कारणीभुत आहेत. तक्रारदार यांच्या या चुकांना उत्पादक व विक्रेते यांना दोषी धरता येणार नाही. तसेच तक्रारदार यांनी पेरणीच्या वेळी खुपच जास्त प्रमाणात बियाण्यांचा वापर केलेला आहे व चुकीच्या वेळी पेरणी केल्याने देखील गाजर रोपांचे पूर्ण गाजरात रुपांतर होऊ शकले नाही. सदर बियाण्यामधील दोष हे शास्त्रीयदृष्टया सिध्द होऊ शकलेले नाही. वरील सर्व बाबीचा विचार करता सामनेवाले यांनी दोषयुक्त बियाणे विकून सेवा देण्यात त्रृटी केली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे म्हणता येणार नाही. सबब सदर तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
सामनेवाले क्र.२ यांनी नि.नं.१२ वर शपथपत्र, नि.नं.१८ वर दस्तऐवज यादीसोबत छायांकीत माहितीपत्रक १ ते ३ दाखल केलेले आहे.
(४) सामनेवाले क्र.१ यांनी नि.नं.११ वर त्यांचा खुलासा दाखल करुन सदर अर्ज नाकारलेला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरचा पिक परिस्थितीचा पंचनामा मान्य नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या मागणी व इच्छेनुसार उपलब्ध बियाणे कायद्यानुसार पॅकबंद अवस्थेत केवळ एजंट म्हणून विक्री केली आहे. त्यामुळे त्यांना जबाबदार धरु नये. सामनेवाले यांनी कोणत्याही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नसून सदर तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
(५) तक्रारदारांचा अर्ज, लेखी युक्तिवाद, दोन्ही पक्षांचे शपथपत्र व कागदपत्र तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब) सामनेवाले क्र.२ यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क) तक्रारदार हे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय. |
(ड) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी नि.नं.४/२ वर बियाणे खरेदी केल्याची पावती दाखल केली आहे. सदर पावतीचे अवलोकन केले असता त्यावर तक्रारदारांच्या नांवे सामनेवाले क्र.१ यांनी गाजर महाराजा मालव, लॉट नं.९५२० या बियाण्याचे ५०० ग्रॅम वजनाप्रमाणे एकूण ८ पाकीटे प्रति १७५ रुपये प्रमाणे एकूण रु.१,४००/- या किमतीस खरेदी केले आहेत. या पावती प्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडून सामनेवाले क्र.२ या कंपनीने उत्पादीत केलेले बियाणे विकत घेतल्याचे स्पष्ट होत आहे. सबब तक्रारदार हे सामनेवालेंचे “ग्राहक” होत आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी सदर बियाण्यांची त्यांच्या शेतामध्ये लागवड केली आहे. त्या बाबतचा ७/१२ उतारा त्यांनी नि.नं.४/१ वर दाखल केलेला आहे. या ७/१२ उतारा प्रमाणे तक्रारदार यांनी त्यांचे शेत जमिनीमध्ये ०.२७ आर या क्षेत्रामध्ये गाजर बियाण्याची लागवड केली हे स्पष्ट होते. सदर बियाण्याच्या पेरणीनंतर त्या पिकास योग्य ती फलधारणा झालेली नाही. त्यामुळे तक्रारदाराने तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती, साक्री जि.धुळे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे समितीने सदर पिक परिस्थिती पंचनामा केला असून तो नि.नं.४/३ वर दाखल आहे. हा पंचनामा दि.१७-०४-२०१२ रोजी केलेला असून, या प्रमाणे “रॅण्डम पध्दतीने शेतातील एकूण पाच ठिकाणी घेतलेल्या परिक्षणानुसार गाजर पिक वाण “पुसा केसर” ची सरासरी उंची ५ फुट असल्याचे आढळून आले. तसेच झाडे उपटून बघीतले असता गाजर पिकास गाजर लागण्याऐवजी केवळ सोटमुळे आढळून आली. सोटमुळांचे रुपांतर गाजरात होण्याऐवजी तंतुमय मुळांची वाढ ही मोठया प्रमाणात आढळून आली. सदरचा प्रकार हा बियाण्यातील वांझपणामुळे आला असल्याचा समितीचा निष्कर्ष आहे. तसेच शेतात कोणत्याही प्रकारच्या गाजर पिकाचे उत्पन्न मिळणार नाही व सदरचे बियाणे हे दोषयुक्त असल्याचे समितीचे मत आहे” असे नमूद आहे.
या पंचनाम्याप्रमाणे सदर गाजर पिकास गाजर लागण्याऐवजी केवळ सोटमुळ आलेले असून सोट मुळांचे गाजरात रुपांतर झालेले दिसत नाही. सदरची बाब ही बियाण्यात वांझपणा असल्याचे दिसत आहे. त्या बाबतचे फोटो नि.नं.४/११ वर दाखल आहेत.
(८) याकामी सामनेवाले यांनी असा बचाव घेतला की, पिक पाहणी अहवालामध्ये, लॅब टेस्टच्या आधारे बियाणे दोषयुक्त आहे असे नमूद नाही, तक्रारदाराने चुकीच्या वेळी बियाण्याची पेरणी केली आहे. तसेच अधिक प्रमाणात बियाणे वापरल्यामुळे गाजराची रोपे जवळ-जवळ उगवली व वनस्पतीजन्य वाढ अधिक झाली. त्यामुळे गाजराची वाढ होऊ शकलेली नाही. हे मुख्यत: कारण दिसून येत आहे.
या बचावाचे पुष्टयर्थ सामनेवाले यांनी, बियाणे विक्री कामी त्यांच्या कंपनीचा लॅब टेस्ट रिपोर्ट दाखल केलेला नाही. तसेच सदर पिकास फलधारणा का होऊ शकली नाही, याचे कोणतेही शास्त्रीय कारणांचा शोध तक्रारदार यांचे शेतात जाऊन केल्याचे दिसत नाही. तसेच त्याकामी कोणताही ठोस पुरावा सामनेवाले यांनी दाखल केलेला नाही.
सामनेवाले यांनी नि.नं.१८/१ वर गाजर पिकाचे माहितीपत्रक दाखल केले आहे. यामध्ये “ पुसा केसर, नानटीस, पुसा मेथाली या गाजराच्या सुधारीत जाती आहेत. हंगाम आणि लागवडीचे अंतर - महाराष्ट्रात गाजराची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. रब्बी हंगामातील गाजर हे गोड आणि उत्तम दर्जाचे असतात, रब्बी हंगामातील लागवड ऑगष्ट ते डिसेंबर तर खरीप हंगामातील लागवड ही जून ते जुलै महिन्यात करतात. लागवड बी फेकून करतात....” असा मजकूर नमूद आहे. या माहिती पत्रकाप्रमाणे सदर गाजर पिक हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. रब्बी हंगामाचे पिक हे ऑगष्ट ते डिसेंबर या कालावधीत लागवड केली जाते. या प्रमाणे तक्रारदार यांनी त्यांच्या शेतात सदर बियाण्याची लागवड दि.०२-०१-२०१२ रोजी केलेली आहे. यावरुन तक्रारदारांनी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या कालावधीत बियाण्यांची लागवड केलेली दिसते. तक्रारदार यांनी रब्बी हंगामाचे जवळपास लागवड केली आहे हे स्पष्ट होते.
(९) वरील सर्व कागदपत्रांवरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदारांनी सदर गाजर बियाण्याची लागवड केलेली असून, त्यांच्या रोपांची वाढ योग्य रितीने झालेली आहे. परंतु सदर गाजर पिकास गाजर आलेले नाही. यावरुन सदर बियाणे हे वांझपणाचे असल्याचे दिसत आहे. आमच्यामते सदर बियाण्यांची तक्रारदाराने लागवड केली त्यावेळी, जर तक्रारदार यांच्या मार्फत त्या बियाण्यांच्या पेरणीचा कालावधी अवेळी असेल, हवामान योग्य नसेल, किंवा खताच्या मात्रा कमी जास्त प्रमाणत झालेल्या असतील, तर अशा परिस्थितीचा पिकावर परिणाम होऊ शकतो आणि पिकाच्या उत्पन्नावर व प्रमाणावर परिणाम होऊ शकतो. परंतु पिकास फलधारणाच होणार नाही, असे संभवत नाही. सदर प्रकरणी तक्रारदाराने लागवड केलेल्या बियाण्यापासून आलेल्या पिकास एकही गाजर आलेले नाही, व काहीच उत्पन्न मिळालेले नाही. यावरुन गाजर पिकास फलधारणा झाली नसल्याने सदर बियाणे वांझपणात आहे हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या परिस्थितीस बियाणे उत्पादक कंपनी जबाबदार आहे. सदर सदोष बियाणे सामनेवाले क्र.२ यानी विक्री केली असल्याने, सामनेवालेंच्या सेवेत त्रृटी स्पष्ट होते, असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(१०) मुद्दा क्र. ‘‘क’’ – या कामी तक्रारदारांना, सदोष बियाणे सामनेवाले क्र.२ यांनी विक्री केल्याने तक्रारदार यांना नुकसान सहन करावे लागले व सदर नुकसान भरपाई वेळेत न मिळाल्याने तक्रारदारांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. तसेच सदरचा तक्रार अर्ज या मंचात दाखल करावा लागला आहे. याकामी सामनेवाले क्र.२ हे जबाबदार आहेत.
तसेच गाजर बियाणे लागवड केलेल्या वर्षाचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा गाजरास असलेला बाजारभाव दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदारांनी सदोष बियाणे नुकसान भरपाई रक्कम रु.६५,०००/- ची मागणी केली आहे. परंतु त्याकामी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्याप्रमाणे सामनेवाले यांनीही गाजराचे बाजार भावाविषयी काहीही विवेचन केलेले नाही. तक्रारदाराने त्यांचे शेतजमीनेचे क्षेत्रापैकी ०.२७ आर एवढया क्षेत्रात सदर गाजर बियाण्याची लागवड केलेली आहे. तथापि सदर प्रकरणी गाजर पिकाचे बाजार भावाचा कोणताही तपशील उभयपक्षांनी उपलब्ध केलेला नसल्याने, सर्वसाधारण बाजारभाव पाहता तक्रारदारास एकूण रु.२५,०००/- एवढे उत्पन्न गाजर पिकापासून मिळणे अपेक्षीत होते, असे या मंचाचे मत आहे.
तसेच उत्पन्न न मिळाल्यामुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासास सामनेवाले क्र.२ हे जबाबदार असल्याने, त्याकामी रक्कम रु.२,०००/- व अर्जाचा खर्च रु.१,०००/- देण्यास सामनेवाले क्र.२ जबाबदार आहेत असे आमचे मत आहे. या कामी सामनेवाले यांनी मा.उच्च न्यायालय यांचेकडील काही न्यायनिवाडे दाखल केले आहेत. त्यातील मार्गदर्शक तत्व पाहता, ते सदर प्रकरणी मिळते जुळते नसल्याने या कामी सदर न्यायनिवाडयांचा आधार घेण्यात आलेला नाही. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(११) याकामी सामनेवाले क्र.१ यांनी असा बचाव घेतला की, त्यांनी बियाणे कायद्यानुसार पॅकबंद अवस्थेत केवळ एजंट म्हणून बियाण्यांची विक्री केलेली आहे. त्यामुळे त्यांना जबाबदार धरले जावू नये. या बाबत आमचे असे मत आहे की, सामनेवाले क्र.१ हे केवळ बियाणे विक्रेते आहेत. त्यांनी सामनेवाले क्र.२ यांनी उत्पादीत केलेले बियाणे केवळ विक्री केलेले आहे. तक्रारदार यांची, सदर बियाण्यामध्ये भेसळ आहे किंवा सदर पाकीटे फुटलेल्या अवस्थेत असून विक्री केली आहे अशी कोणतीही तक्रार नाही. सदर बियाण्यांमध्ये उत्पादीत दोष असल्याने त्यास सामनेवाले क्र.२ ही उत्पादक कंपनी जबाबदार होऊ शकते. त्यास सामनेवाले क्र.१ हे जबाबदार होऊ शकणार नाहीत असे आमचे मत आहे.
(१२) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – वरील सर्व कारणांचा, दाखल कागदपत्रांचा विचार करता तक्रारदार यांचा तक्रार अर्ज योग्य व रास्त आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले क्र.१ यांचे विरुध्दचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(क) सामनेवाले क्र.२ यांनी, या आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदार यांना सदोष गाजर बियाण्याच्या विक्रीमुळे, झालेल्या नुकसानीपोटी रक्कम २५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार मात्र) द्यावेत.
(२) तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम २,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) द्यावेत.
(ड) उपरोक्त आदेश कलम “क” मधील नमूद रक्कम मुदतीत परत न केल्यास, संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे. ६ टक्के प्रमाणे व्याजासह रक्कम देण्यास सामनेवाले क्र.२ जबाबदार राहतील.
धुळे.
दिनांकः १८/११/२०१३
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.एस.एस.जैन) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य)