निकालपत्र
(दि. 19.08.2015)
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार विजयकुमार रामनाथ कोडगीरे हा मुखेड,तालुका मुखेड,जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून तो गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. अर्जदाराने दिनांक 10.01.2007 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांचेमार्फत गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे पेंशन प्लस रेग्युलर पॉलिसी काढली. ज्याचा पॉलिसी क्रमांक आरपीजी 1438769 असा असून कालावधी दिनांक 10.01.2007 ते दिनांक 09.01.2011 असा असून पॉलिसीचा मॅच्युरीटी दिनांक 18.01.2012 रोजी होती. पॉलिसीचा हप्ता रक्कम रु.25,000/- वार्षिक ठरलेला होता व मॅच्युरीटी व्हॅल्यु रक्कम रु.1,60,000/- आहे. अर्जदाराने दिनांक 10.01.2007 रोजी रक्कम रु.25,000/-, दिनांक 15.01.2008 रोजी रक्कम रु.26,250/-, दिनांक 17.01.2009 रोजी रक्कम रु.26,259/- व दिनांक 20.01.2010 रोजी रक्कम रु.27,563/- गैरअर्जदार यांचेकडे भरले. अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराची चालू असलेली मुळ पॉलिसी बॉंड गहाळ झाली. त्याबद्दल अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना कळविले. गैरअर्जदार यांनी अर्जदारास हमीपत्र (Deed of Indemnity) भरुन देण्यास सांगितले व पॉलिसीची दुय्यम प्रत घेण्यास सांगितले. दिनांक 02.01.2012 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे Indemnity Bond व इतर कागदपत्रे दिली व दुय्यम पॉलिसी प्रतची मागणी केली. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदारास पॉलिसीची दुय्यम प्रत जाणूनबुजून दिली नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांना विनंती केली असता गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांना दिनांक 11.07.2012 रोजी पत्र देऊन डुप्लीकेट पॉलिसी देण्याची विनंती केली. तरीपण गैरअर्जदार यांनी सदरील डुप्लीकेट पॉलिसी दिली नाही व उलट गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास दिनांक 26.12.2013 रोजी एक पत्र देऊन पुन्हा मुळ पॉलिसी व इतर कागदपत्रे देण्याची मागणी केली. गैरअर्जदार यांना मुळ पॉलिसी हरविल्याचे कळवून देखील गैरअर्जदार यांनी डुप्लीकेट पॉलिसी दिली तर नाहीच व मॅच्युरीटी अमाऊंट रक्कम रु.1,60,000/- सुद्धा दिलेली नाही. अर्जदाराने दिनांक 07.02.2014 रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून मॅच्युरीटी रक्कम रु.1,60,000/- व डुप्लीकेट पॉलिसीची मागणी केली पण आजपर्यंत मॅच्युरीटीची रक्कम अर्जदारास गैरअर्जदार यांनी दिलेली नाही. म्हणून अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी पॉलिसीची रक्कम रु.1,60,000/- दिनांक 18.01.2012 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा अशी विनंती केली आहे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व दावा खर्च रु.10,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस तामील झाल्यानंतर तक्रारीत हजर झाले व त्यांनी आपला लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे मागणीप्रमाणे वेळोवेळी पाठविली. गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांना दिनांक 11.07.2012 रोजी पत्र दिले हे अर्जदाराचे म्हणणे बरोबर आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार व गैरअर्जदार क्र. 2 यांचेमध्ये मध्यस्थी म्हणून सर्व कारवाई पार पाडलेली आहे व सेवेमध्ये कोणतीही कमतरता दिलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 यांना या तक्रारीतून मुक्त करावे अशी गैरअर्जदार क्र. 1 यांनी मंचास विनंती केलेली आहे.
5. गैरअर्जदार क्र. 2 यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर ते मंचात हजर राहून देखील त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला नाही.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
7. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पॉलिसी शेडयुलच्या प्रतीवरुन स्पष्ट आहे. सदर पॉलिसीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदर पॉलिसीचा सुरुवातीचा दिनांक 18.01.2007 असून मॅच्युरीटीचा दिनांक 18.01.2012 अशी आहे. सदर पॉलिसीचा हप्ता रक्कम रु.2500/- असून 5 वार्षिक हप्ते भरावयाचे आहेत. अर्जदार यांनी 4 हप्ते भरल्याच्या पावत्या मंचासमक्ष दाखल केलेल्या आहेत. अर्जदार यांनी सदर पॉलिसीची मुळ प्रत हरवल्याचे म्हटलेले असून डुप्लीकेट पॉलिसी मिळणेसाठी त्यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे औपचारीकता पुर्ण करुन मागणी केल्याचे दिनांक 11.07.2012 चे गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांना लिहिलेल्या पत्रावरुन स्पष्ट आहे. तरीपण गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास पॉलिसीची डुप्लीकेट प्रत न देता दिनांक 16.12.2013 व दिनांक 26.12.2013 रोजी अर्जदारास इंटीमेशन लेटर पाठवून दिले. सदर मॅच्युरीटी इंटीमेशन लेटरमध्ये मॅच्युरीटीची प्रोसेस सुरुवात करणेसाठी परत मुळ पॉलिसीची मागणी केली, जेकी चुकीचे आहे. अर्जदारास गैरअर्जदार क्र. 2 यांनी पाठविलेल्या दिनांक 16.12.2013 व दिनांक 26.12.2013 च्या मॅच्युरीटी इंटीमेशन लेटर प्रमाणे अर्जदार मॅच्युरीटी अमाऊंट(व्हॅल्यु) रक्कम रु.1,07,588/- मिळणेस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास सदरची रक्कम न देऊन व हरविलेल्या पॉलिसीची मुळ प्रतीची मागणी करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली दिसून येते.
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास विम्याची रक्कम रु.1,07,588/- दिनांक 18.01.2012 (मॅच्युरीटी डेट) पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासहीत आदेश तारखेपासून तीस दिवसाच्या आत द्यावेत.
3. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1500/- आदेश तारखेपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
5. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
6. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.