श्री. अविनाश प्रभुणे, मा. सदस्य यांचे आदेशांन्वये.
1. वि.प. बँकींग व्यवसाय करणारे असून तक्रारकर्तीचे त्यांचेकडे संयुक्त खाते आहे. सदर खात्यातील आणि मुदत ठेवीची रक्कम वि.प.ने परत केली नाही, म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्ती क्र. 1 ही ज्येष्ठ नागरीक असून तिची मृतक मुलगी राजेश कुमारी यांचे संयुक्त खाते क्र.870910100013571 वि.प.क्र. 1 चे शाखेत होते. तसेच संयुक्त मुदत ठेवी खाते क्र. 870943710000033 आणि 87095110005797 हे मृतक राजेश कुमारी शास्त्री हिचे नावाने होते. राजेश कुमारी टंडन आणि राजेश कुमारी शास्त्री ही एकच व्यक्ती आहे. तक्रारकर्ती क्र. 1 ची मुलगी राजेश कुमारी ही दि.14.04.2017 रोजी मरण पावली. मृतक राजेश कुमारी हिचे आणखीन दोन मुदत ठेवी खाते क्र. 870943710000781 व 87095770006024 वि.प.क्र. 1 च्या बँकेत होते. यापैकी मुदत ठेव क्र. 870943710000781करीता तक्रारकर्ती क्र. 1 ही नामनिर्देशित व्यक्ती होती आणि मुदत ठेवी खाते क्र. 87095770006024 करीता तक्रारकर्ती क्र. 2 रचना बिशन स्वरुप टंडन (मृतक राजेश कुमारीची लहान बहीण) ही बँकेच्या अभिलेखानुसार नामनिर्देशित व्यक्ती होती. तक्रारकर्ती क्र. 1 ची मृतक मुलगी राजेश कुमारी हिचे चतुर्वेदुला प्रभाकर शास्त्री यांचेसोबत लग्न झाल्याने तिचे नाव राजेशकुमारी टंडन वरुन राजेशकुमारी शास्त्री असे बदलविण्यात आले. तसेच शपथपत्र तिने दि.20.04.1998 ला वि.प.क्र. 1 बँकेला दिले. त्यानंतर राजेशकुमारी शास्त्री हिने चतुर्वेदुला प्रभाकर शास्त्री यांचेसोबत घटस्फोट घेऊन दि.02.04.2007 रोजी श्री सतीशकुमार सोलोमोन यांचेसोबत लग्न केले. दि.14.04.2017 रोजी राजेश कुमारी हिचे निधन झाले. तिने तिचे पासबुक आणि खात्याशी संबंधित दस्तऐवज कुठे ठेवले हे कुणालाच माहित नाही आणि ते सापडले नाही. मृतक राजेश कुमारी हिचे तिच्या आई व बहीणीसोबत (त.क्र. 1 व 2) संयुक्त बचत खाते, मुदत ठेव आणि त्या नामनिर्देशित व्यक्ती असल्याने त्यांनी सदर खात्यातील गुंतविलेल्या रकमा मिळण्याबाबत वि.प.क्र. 1 व 2 कडे मागणी केली, तसेच इंडेम्नीटी बॉण्डसुध्दा भरुन दिला. परंतू वि.प.ने त्यांना मृतक राजेशकुमारी हिचे नाव मृत्यु प्रमाणपत्रप्रमाणे राजेशकुमारी टंडन वरुन राजेशकुमारी शास्त्री बदलल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. तक्रारकर्तींच्या म्हणण्यानुसार राजेशकुमारी टंडन आणि राजेशकुमारी शास्त्री ही एकच व्यक्ती असून लग्नानंतर तिचे आडनाव बदलले आहे. परंतू वि.प.ने त्यांना मृतकाच्या खात्यातील आणि मुदत ठेवीची रक्कम दिली नाही. तक्रारकर्तींनी वि.प.क्र. 1 ते 4 ला कायदेशीर नोटीसची बजावणी केली असता वि.प.क्र. 1 ते 4 ने नोटीस स्विकारली. परंतू नोटीसची दखल घेतली नाही. म्हणून तक्रारकर्तींनी सदर तक्रार दाखल करुन, तिला संयुक्त बचत खात्यातील रक्कम रु.6,00,000/- आणि मुदत ठेवींची रक्कम त्यांना मिळावी, मानसिक आणि शारिरीक त्रासाबाबत भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
3. सदर तक्रारीची नोटीस वि.प.क्र. 1 ते 4 यांचे यांचेवर बजावण्यात आली असता त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. वि.प.च्या मते तक्रारकर्तींनी ज्या राजेश कुमारी शास्त्री नावाच्या खात्याबाबत वाद उत्पन्न केला आहे, त्या नावाचे एकही खाते त्यांच्याकडे नाही. वि.प.ने बचत खाते आणि मुदत ठेवींचा तपशिल दिलेला आहे, त्यामध्ये श्रीमती राजकुमारी शास्त्री आणि राजकुमारी बीशन स्वरुप टंडन यांचे संयुक्त बचत खाते क्र.870910100013571 (रु.1,75,000/-, परीपक्वता दि.04.01.2020), श्रीमती राजकुमारी बीशन स्वरुप टंडन आणि श्रीमती राजकुमारी शास्त्री यांचे संयुक्त मुदत ठेव खाते क्र. 87095110005797, राजकुमारी शास्त्री हिचे मुदत ठेव क्र. 870943710000781 (नामनिर्देशित व्यक्ती श्रीमती राजकुमारी बीशन स्वरुप टंडन, रु.50,000/-, परिपक्वता दि.26.02.2018), राजकुमारी शास्त्री हिचे मुदत ठेव क्र. 870945110006024 (नामनिर्देशित व्यक्ती रचना कुमारी स्वरुप रु.2,40,000/-, परिपक्वता दि.26.03.2020), श्रीमती राजकुमारी बीशन स्वरुप टंडन यांची मुदत ठेव क्र. 870943710000033 (रु.3,00,000/-, परिपक्वता दि.23.07.2027) अशा गुंतवणुकीचा समावेश आहे. आपल्या परिच्छेदनिहाय लेखी उत्तरामध्ये वि.प.ने तक्रारकर्ती क्र. 1 चे संयुक्त बचत खाते आहे आणि त्यातील रक्कम तिने काढलेली आहे. सदर खाते हे चालू असून नियमानुसार either or survivor असल्याने ती खाते वापरु शकते. मृतक व्यक्तीने तिचे नाव बदलल्याबाबत शपथपत्र दाखल केल्याची बाब वि.प.ने मान्य केली आहे. सन 1998 मध्ये कु.राजेशकुमारी बीशन स्वरुप टंडन हिचे नाव श्रीमती राजकुमारी शास्त्री बदल झाल्याबाबत के वाय सी चे दस्तऐवज दाखल केले होते. तसेच मृतक राजकुमारी शास्त्री हिने दुसरे लग्न केल्याबाबत दस्तऐवजाअभावी त्यांना माहिती नाही असेही वि.प.ने नमूद केले आहे. वि.प.ला राजकुमारी शास्त्री हिचे निधन झाल्याची बाब माहिती नाही कारण तक्रारकर्तीने राजेशकुमारी सोलोमन यांचे मृत्यु प्रमाणपत्र सादर केले आहे. तसेच त्यांनी पासबुक आणि मुदत ठेवी हरविल्याबाबत पोलिसांना तक्रार दिली आहे, त्याची प्रत आणि माहिती तक्रारकर्तीने वि.प.ला दिली नाही. तक्रारकर्तींनी कधीही मृत्यु दाव्याकरीता अर्ज सादर केला नाही आणि मृतकाच्या खात्याबाबत कुठलाही पाठपुरावा केला नाही. तक्रारकर्तींनी इंडेम्नीटी बॉण्ड भरुन दिल्याची बाब आयोगासमोर नमूद केली आहे, तो बॉण्ड वि.प.कडे दाखल नाही आणि तो व्यवस्थितरीत्या भरलेला नसून अनेक ठिकाणी तो कोरा आहे. तक्रारकर्तींना वि.प.ने त्यांचेकडे आल्यावर योग्यरीत्या अर्ज करुन आवश्यक दस्तऐवजासह मृत्यु दावा दाखल करण्यास सांगितले होते, परंतू त्यानंतर तक्रारकर्तीने कायदेशीर औपरीचारिकता पूर्ण करुन कधीही त्यचेकडे मृत्यु दावा दाखल केला नाही. तक्रारकर्तीने कायदेशीर नोटीसची बजावणी करणे म्हणजे दावा निकाली काढण्याकरीता योग्य बाब नाही. वि.प.ने दावा देण्यास नकार दिलेला नाही, तक्रारकर्तीने कायदेशीररीत्या दावा दाखल केलेला नाही असेही वि.प.चे म्हणणे आहे. आपल्या विशेष कथनामध्ये वि.प.ने तक्रारकर्तीने जर श्री सोलोमन यांचेसोबत लग्न केल्याचे, राजकुमारी शस्त्री हिचे मृत्यु प्रमाणपत्र, मुळ बचत प्रमाणपत्रे सह विहित पध्दतीने अर्ज केला असता तर बँकेने आर बी आय च्या मार्गदर्शक तत्वानुसार सदर अर्ज निकाली काढण्याची हमी दिली आहे. तसेच सदर तक्रार ही खर्चासह खारिज करण्याची मागणी केली आहे.
4. सदर प्रकरण आयोगासमोर न्यायप्रविष्ट असतांना तक्रारकर्ती क्र. 1 यांचा मृत्यु झाल्याने त्यांचे नाव वगळण्यात आले.
5. सदर प्रकरण तोंडी युक्तीवादाकरीता आल्यावर आयोगाने तक्रारकर्त्याचा युक्तीवाद त्यांचे वकीलांमार्फत ऐकला. वि.प. आणि त्यांचे वकील गैरहजर. तसेच दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता आयोगाचे निदर्शनास खालील बाबी आल्या. आयोगाने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता आयोगाचे विचारार्थ उपस्थित झालेले मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय.
2. तक्रारकर्तीची तक्रार विहित कालमर्यादेत आहे काय ? होय.
3. वि.प.च्या सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब आहे काय? होय.
4. तक्रारकर्ती काय आदेश मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे.
6. मुद्दा क्र. 1 – तक्रारकर्तीच्या मृतक आई राजकुमारी बीशन स्वरुप टंडन आणि मृतक बहीण कु.राजेशकुमारी बीशन स्वरुप टंडन/श्रीमती राजकुमारी शास्त्री यांचे संयुक्त बचत खाते, मुदत ठेवी वि.प.च्या बँकेत होत्या आणि वि.प.लाही ती बाब मान्य आहे. त्यांची कायदेशीर वारस तक्रारकर्ती/रचना बिशन स्वरुप टंडन ही नामनिर्देशीत व्यक्ती म्हणून आणि लाभार्थी म्हणून वि.प.ची ग्राहक ठरते असे आयोगाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 चे निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
7. मुद्दा क्र. 2 – दि.14.04.2017 रोजी राजेश कुमारी हिचे निधन झाल्यावर तिची आई राजकुमारी बीशन स्वरुप टंडन/तक्रारकर्ती क्र. 1 हिने सदर मुदत ठेवी हरविल्याबाबत दि.09.08.2017 ला शपथपत्रावर नमूद केले आहे. तक्रारकर्तीच्या बहीणीच्या मृत्युनंतर विहित कालावधीत तक्रारकर्ती/राजकुमारी टंडन (तक्रारकर्ती क्र. 1) ने वि.प.ला संयुक्त बचत खात्यातील रक्कम आणि मुदत ठेवीची रक्कम परत मिळण्याकरीता दि.10.08.2017 रोजी अर्ज केल्याचे दाखल दस्तऐवज क्र. 1, प.क्र. 107 वरील दस्तऐवजावरुन दिसून येते. तिला वि.प.ने रक्कम दिली नसल्याने शेवटी आयोगासमोर तिने दि.03.02.2018 रोजी तक्रार केल्याचे दिसून येते. त्यामुळे वादाचे कारण घडल्यानंतर दोन वर्षाच्या आत तिने सदर तक्रार आयोगासमोर दाखल केलेली असल्याने सदर तक्रार ही आयोगाचे कालमर्यादेत असल्याचे आयोगाचे मत आहे.
8. मुद्दा क्र. 3 – मृतक राजकुमारी टंडन/राजकुमारी शास्त्री हिचे वि.प.कडे बचत खाते आणि मुदत ठेवी असल्याने के वाय सी अंतर्गत आवश्यक सर्व दस्तऐवज उपलब्ध असल्याचे स्पष्ट होते कारण वि.प.ने लेखी उत्तरात तसे नमूद केले नाही अथवा मागणी केल्याचे देखील दिसत नाही. वि.प.च्या म्हणण्यानुसार त्याला तक्रारकर्तीच्या बहिणीने जे दुसरे लग्न केले आणि त्यानंतर तिचे नाव राजकुमारी शास्त्रीवरुन राजेशकुमारी सोलोमन असे बदलविण्यात आले याची माहिती त्याला नव्हती. तसा दस्तऐवज मृतक राजकुमारी शास्त्रीने वि.प.कडे सादर केला नव्हता. असे जरी असले तरी राजकुमारी शास्त्रीचा मृत्यु झाल्यानंतर तिच्या कायदेशीर वारसांनी/नामनिर्देशित व्यक्तीने deceased claim केल्यावर त्यांना सदर मृत्यु दावा करतांना त्यासोबत काय-काय कागदपत्रे देणे आवश्यक आहे याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये इतर दस्तऐवज उपलब्ध नसतील त्याकरीता पर्यायी कुठले दस्तऐवज सादर करावे याची माहिती देणे आवश्यक होते. परंतू वि.प.च्या लेखी उत्तरामध्ये तक्रारकर्तीला दस्तऐवज दाखल करण्याबाबत मार्गदर्शन केल्याचे दिसून येत नाही उलट तक्रारकर्तीने नोटिस पाठविल्यानंतर देखील त्याचे उत्तर दिले नसल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्तीने तिच्याकडे बँकेचे पासबुक आणि मुदत ठेव प्रमाणपत्र आढळून न आल्याने तिने पो.स्टे. त्याची तक्रार केलेली आहे. सदर सर्व दस्तऐवज हे वि.प.ने पुरविले असल्याने त्याच्याकडे त्याच्या हार्ड कॉपी नसली तरी सॉफ्ट कॉपी असते कारण हा त्यांचा अभिलेख आहे. केवळ वि.प.ने तक्रार नाकारण्याकरीता मृत्यु प्रमाणपत्रावर नाव वेगळे आहे, पासबुक मुदत ठेवीचे प्रमाणपत्र दाखल केले नाही, म्हणून तक्रारकर्तीचा deceased claim नाकारला आहे. वास्तविक, तक्रारकर्ती क्र. 1 हयात असताना तिचे सयुक्त नाव असल्याने वि.प.ने तिचा दावा ताबडतोब निकाली काढणे आवश्यक होते पण तसे झाल्याचे दिसत नाही. वि.प.ने तेव्हा दावा निकाली काढलं असता तर कुठल्याही पुढील अडचणी उद्भवल्या नसत्या. प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना तक्रारकर्ती क्र. 1 चे निधन झाल्यामुळे सदर प्रकरणात तक्रारकर्ती क्र. 2 ही एकटीच कायदेशीर वारस ठरते व रु 2,40,000/- (मुदत ठेव नंबर 870945110006024) तिचे नामनिर्देशन असल्याचे देखील दिसते. वि.प.तिच्याकडून Succession Certificate मागू शकले असते, जेणेकरुन, कुठलीही न्यायिक वाद उत्पन्न झाल्यास कायदेशीर पुरावा उपलब्ध राहिला असता. परंतू वि.प.ने असा कुठलाही दस्तऐवज तक्रारकर्ती क्र. 2 ने दाखल केला नाही असा आक्षेप घेतला नाही अथवा त्याची मागणी देखील केली नाही. श्रीमती राजकुमारी टंडन आणि राजेशकुमारी टंडन/सोलोमन यांच्या बँकेतील इतर वारसांनी हक्क दाखलविल्याचा सुध्दा वि.प.चा आक्षेप नाही. तसेच ज्या व्यक्ती श्रीमती राजकुमारी टंडन आणि राजेशकुमारी टंडन/सोलोमन यांच्या कायदेशीर वारस आहे तिचे बचत खाते वि.प.च्या बँकेत असल्याने नामनिर्देशित व्यक्ती म्हणून तिच्या खात्यात deceased claim ची रक्कम वळती करण्यास त्यांना कुठलीही हरकत नव्हती. त्यामुळे तक्रारकर्ती क्र. 2 ही एकटीच वारस असल्याने सदर रक्कम वळती करण्यास वि.प.ने जी दिरंगाई दाखविली, त्यावरुन वि.प. व्यवस्थितपणे ग्राहकांना मार्गदर्शन करीत नसल्याने ग्राहकांची दिशाभूल होऊन ते आवश्यक दस्तऐवज न पुरविता इतर अन्य दस्तऐवज पुरवून रकमेची मागणी करीत असल्याचे दिसून येते. वि.प.ने जर तक्रारकर्ती क्र. 1 व 2 यांना वेळीच मार्गदर्शन करुन आवश्यक दस्तऐवजांची मागणी केली असती तर तक्रारकर्तीला deceased claim मिळण्याकरीता वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली नसती. प्रस्तुत प्रकरणी वि.प.चा ग्राहक सेवेबद्दल उदासीन असल्याचे दिसून येते.
9. ज्या बचत खात्यांमध्ये किंवा मुदत ठेवींमध्ये खातेधारकांचे मृत्युपरांत नामनिर्देशित व्यक्ती नमूद केलेल्या नसतात, अशावेळी deceased claim मध्ये शपथपत्र आणि आवश्यक असल्यास Succession Certificate ची मागणी करुन रक्कम कायदेशीर वारसांना दिली जाते. परंतू वि.प.ने अशी कुठलीही कृती केली नाही. वि.प.ने मृतकांच्या खात्यामध्ये गुंतविलेली रक्कम नमूद करतांना तिचा परिपक्वता दिनांक नमूद केला असला तरी त्यावर किती टक्के व्याज देय होते किंवा परिपक्वता रक्कम किती होती याचा उल्लेख संपूर्ण लेखी उत्तरामध्ये कुठेही केलेला नाही. जेव्हा की वि.प.ला माहित आहे की, तक्रारकर्तीकडे पासबुक, मुदत ठेव प्रमाणपत्रे नाही. ती हरविली आहे किंवा मृतक राजेशकुमारी हिने कुठे ठेवली याची माहिती त्यांच्याकडे नाही, त्यामुळे त्यांना ती दिसून आली नाही. वि.प.ची सदर कृती ही वि.प.क्र. 1 व 2 सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी आहे. वि.प.ने तक्रारकर्तीला रक्कम देण्यास दिरंगाई केलेली आहे. वि.प.क्र. 1 व 2 ची सदर कृती ही ग्राहकांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी दर्शविते. प्रस्तुत प्रकरणी वि.प.क्र. 3 व 4 चा थेट सहभाग दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्दची तक्रार खारिज करण्यात येते. म्हणून मुद्दा क्र. 3 वरील आक्षेप होकारार्थी नोंदविण्यात येतात.
10. मुद्दा क्र. 4 – प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना तक्रारकर्ती क्र. 1 यांचे निधन झाले, त्यामुळे त्यांची वारस तक्रारकर्ती क्र. 2 ही तक्रारकर्ती क्र. 1 ज्या खात्यावर नामनिर्देशित व्यक्ती असेल त्याची रक्कमसुध्दा मिळण्यास पात्र आहे. श्रीमती राजकुमारी टंडन आणि राजेशकुमारी टंडन/शास्त्री/सोलोमन यांचे इतर कायदेशीर वारस असल्याबाबत वि.प.ने नमूद केलेले नाही किंवा तसा कुणी आक्षेप नोंदविल्याचेही त्यांचे म्हणणे नाही. तक्रारकर्त्याने त्याचे प्रतिउत्तरामध्ये राजकुमारी सोलोमन ही विधवा होती असे नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारकर्ती क्र. 2 ही मृतक श्रीमती राजकुमारी टंडन आणि राजेशकुमारी टंडन/सोलोमन यांची बचत खात्यातील रक्कम आणि मुदत ठेवींची रक्कम ज्याची माहिती वि.प.ने त्याचे लेखी उत्तरामध्ये तपशिलवार सादर केलेली आहे, त्या-त्या रकमा परिपक्वता दिनांकापासून व्याजासह परत मिळण्यास पात्र असल्याचे आयोगाचे मत आहे. मुदत ठेव प्रमाणपत्र क्र. 870943710000033 मधील रक्कम रु.3,00,000/- ही दि.23.07.2027 रोजी परिपक्व होणार असल्याचे वि.प.ने नमूद केले आहे. तक्रारकर्ती क्र. 2 ला जर परीपक्वता आधी सदर रक्कम पाहिजे असेल तर वि.प.ने सदर रक्कम वि.प. बँकेच्या नियमांनुसार लागू असलेल्या व्याज दरासह तिला रक्कम परत करावी. सदर रकमेच्या तपशिलामध्ये संयुक्त बचत खात्यामध्ये रक्कम आहे किंवा नाही याबाबत वि.प.ने नमूद केले नाही. केवळ सदर खाते सुरु ठेवल्याचे नमूद केले आहे, त्यावरुन तक्रारकर्ती क्र. 1 ने तिचे हयातीत त्यातील रक्कम काढून घेतली असावी असा मतितार्थ त्यातून निघतो. कारण तक्रारकर्ती क्र. 1 हीने either or survivor असल्याने त्या खात्यातून रक्कम काढल्याचे वि.प.ने नमूद केले आहे. असे जरी असले तरी तक्रारकर्ती क्र. 2 ला आई आणि बहीणीच्या मृत्युपरांत वेळेवर रक्कम न मिळाल्याने जो मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान सोसावे लागले त्याची भरपाई मिळण्यास सुध्दा ती पात्र आहे. तक्रारकर्तीने कायदेशीर नोटीस वि.प.वर बजावल्यानंतर आणि त्यांचे वाद निवारण अधिका-यांकडे तक्रार केल्यावरही त्याचे निरसन त्यांनी केले नाही. त्यामुळे तिला आयोगासमोर तक्रार दाखल करावी लागली. सदर न्यायिक कार्यवाहीचा खर्च मिळण्याससुध्दा तक्रारकर्ती पात्र असल्याचे आयोगाचे मत आहे.
11. उपरोक्त निष्कर्षावरुन आणि दाखल दस्तऐवजांवरुन आयोग सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आ दे श –
- , त्याने तक्रारकर्ती क्र. 2 रचना टंडन हिला मुदत ठेव प्रमाणपत्र क्र. 870945110005797 मधील रक्कम रु.1,75,000/- ही दि.04.01.2020 पासून तर प्रत्यक्ष रकमेच्या अदाएगीपर्यंत द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह परत करावी.
- . वि.प.क्र. 1 व 2 ने तक्रारकर्ती क्र.2 रचना टंडन हिला मुदत ठेव प्रमाणपत्र क्र. 870943710000781 मधील रक्कम रु.50,000/- ही दि.26.02.2018 पासून तर प्रत्यक्ष रकमेच्या अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह परत करावी.
- वि.प.क्र.1 व 2 ने तक्रारकर्ती क्र.2 रचना टंडन हिला मुदत ठेव प्रमाणपत्र क्र. 870945110006024 मधील रक्कम रु.2,40,000/- ही दि.26.03.2020 पासून तर प्रत्यक्ष रकमेच्या अदाएगीपर्यंत द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह परत करावी.
4. वि.प.क्र.1 व 2 ने तक्रारकर्ती क्र.2 रचना टंडन हिला मुदत ठेव प्रमाणपत्र क्र. 870943710000033 मधील रक्कम रु.3,00,000/- वि.प. बँकेच्या मुदत ठेवीबाबत असलेल्या नियमांनुसार लागू असलेल्या व्याज दरासह तिला रक्कम परत करावी.
5. वि.प.क्र. 1 व 2 ने तक्रारकर्तीला आर्थिक, शारिरीक, मानसिक, त्रासाच्या नुकसान भरपाईबाबत रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.15,000/- द्यावे.
6. वि.प.क्र. 3 व 4 विरुध्दची तक्रार खारिज करण्यात येते.
7. सदर आदेशाची अंमलबजावणी वि.प.क्र.1 व 2 ने संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 45 दिवसात करावी.
8. भविष्यात वरील मुदत ठेव प्रमाणपत्र रकमेबाबत वाद उद्भवल्यास व वि.प.क्र.1 व 2 ला नुकसान झाल्यास तक्रारकर्ती क्र. 2 रचना टंडन त्याची भरपाई करेल याबाबत तिने तसे बंधपत्र (Indemnity Bond) वि.प.क्र.1 व 2 कडे सादर करावे.
9. आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.