::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 16.03.2017 )
आदरणीय अध्यक्षा श्रीमती एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार
1. सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली. सदर तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे ग्राहक असून तक्रारकर्ते यांचे खाते क्र. 13096, चेक सुविधेसह विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे बँकेत आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून टू-व्हीलर गाडी कर्जावर घेतली आहे व त्याचा लोन अकाउंट नं. 29999761 असा आहे. सदरहु गाडीचा क्र. एम.एच.30 ए.एम.8606 असा आहे.तक्रारकर्त्याने कर्ज फेडीकरिता विरुध्दपक्ष क्र. 2 यांना तक्रारकर्त्याचे खाते असलेले विरुध्दपक्ष क्र. 1 शाखेचे धनादेश प्रत्येकी रु. 2170/- चे दिले होते. मार्च 2016 मध्ये विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी कर्जाच्या परतफेडीसाठी विरुध्दपक्ष क्र. 1 चा दि. 5/3/2016 चा धनादेश क्र. 070892 रक्कम रु. 2170/- चा वटविण्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 2 यांना दिला. सदरहु धनादेश विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी वटविण्यासाठी दि.5/3/2016 रोजी लावला असता दि. 6/3/2016 रोजी सदर धनादेश न वटविता विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्याकडून परत आला, म्हणून विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याकडून पेनॉल्टी म्हणून रु. 630/- दंड आकारुन वसुल केले. यावेळी तक्रारकर्त्याचे खात्यामध्ये दि. 10/3/2016 पर्यंत रु. 46,319/- शिल्लक दाखवत असून सुध्दा तक्रारकर्त्याचा रु. 2170/- चा धनादेश न वटविता अपु-या निधी अभावी परत करण्यात आला. याबाबतचे कारण विरुध्दपक्ष क्र. 1 यांना विचारले असता विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास उडवा-उडवीची उत्तरे दिली. म्हणून तक्रारकर्त्याने लेखी अर्ज देऊन खुलासा मागीतला. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. सदर धनादेश, तक्रारकर्त्याला न विचारता परत दि.23/3/2016 रोजी खात्यामध्ये लावण्यात आला व रु. 2170/- काढण्यात आले. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व सेवा देण्यास न्युनता दर्शविली, त्यामुळे तक्रारकर्त्यास रु. 630/- चा दंड विनाकारण लावण्यात आला. त्यानंतर तक्रारकर्त्याने दि. 19/5/2016 व दि. 8/6/2016 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली, परंतु त्याची दखल विरुध्दपक्षांनी घेतली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर व्हावी व तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु. 100,000/- व्याजासह देण्यात यावे. विरुध्दपक्ष क्र. 1 कडून रु. 630/- चेक बाऊन्स चार्जेस घेतलेले पैसे परत करावे. तक्रारकर्त्याचे नाव धनादेश न वटविण्याच्या यादीमधुन काढण्यात यावे. सदर तक्रारीच्या खर्चापोटी रु. 10,000/- व नोटीस खर्चापोटी रु. 2000/- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 कडून मिळावे.
तक्रारकर्त्याने सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून त्यासोबत एकूण 09 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष 1 यांचा लेखी जबाब :-
2. विरुध्दपक्ष 1 यांनी सदर प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील आरोप अमान्य केले व असे नमुद केले की, सदर तक्रार ही पुर्णपणे गैरकायदेशिर आहे. तक्रारीस कुठलेही कारण नसतांना दाखल करण्यात आलेली आहे. सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत चालु शकत नाही. सदर प्रकरणात क्लिष्ट स्वरुपाचे तांत्रिक मुद्दे उपस्थित झालेले आहेत. धनादेश न वटलेला दिसणे ही संगणकीय त्रुट असल्यामुळे संगणकामध्ये न वटल्याचे दिसले. तक्रारकर्त्याने नमुद केलेला चेक वटविलेला आहे व सदरहु चेकची रक्कमही प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार दंडासह फेटाळण्यात यावी.
विरुध्दपक्ष 2 यांचा लेखी जबाब :-
विरुध्दपक्ष 2 यांनी सदर प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील आरोप अमान्य केले व असे नमुद केले की,तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून कर्ज घेवून दुचाकी वाहन घेतले व त्याचे मासिक हप्त्याने परतफेडीकरिता विरुध्दपक्ष क्र. 1 कडे असलेल्या खात्यातील धनादेश रु. 2170/- प्रत्येकी असे दिले, तसेच तक्रारकर्त्याने दिलेला धनादेश न वटता परत आला, हे मान्य केले आहे. सदर धनादेश हा दुस-या वेळेस वटविल्या गेला. सदर धनादेश न वटता परत आल्यामुळे कर्ज करारनाम्यातील शर्ती व अटींना अनुसरुन तक्रारकर्ता हा दंडास पात्र ठरला, म्हणून तक्रारकर्त्याला रु. 630/- द्यावे लागले. त्यामुळे यात विरुध्दपक्ष क्र. 2 ची कोणतीही चुक नाही. म्हणून तक्रार खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4 तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष 1 व 2 यांचा स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षांनी दाखल केलेले सर्व दस्तएवेज व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला.
उभय पक्षात या बद्दल वाद नाही की, तक्रारकर्ते हे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक आहेत, कारण तक्रारकर्ते यांचे विरुध्दपक्ष क्र. 1 कडे खाते असून, ते चेक सुविधेसह आहे. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 / बँकेकडून टु-व्हीलर गाडी खरेदी साठी करारनाम्याद्वारे कर्ज रक्कम प्राप्त करुन, वाहन विकत घेतले आहे.
उभय पक्षात हा वाद नाही की, तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 यांना सदर गाडीच्या कर्ज फेडीसाठी, विरुध्दपक्ष क्र. 1 च्या शाखेचे, तक्रारकर्त्याच्या खात्यातील धनादेश दिले होते व ते प्रत्येकी रु. 2170/- चे होते.
उभय पक्षात हा वाद नाही की, दि. 5/3/2016 रोजी कर्ज हप्त्याचा धनादेश वटविण्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी लावला असता, तो न वटता विरुध्दपक्ष क्र. 1 कडून परत आला होता, म्हणून विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याकडून चेक बाऊन्स पेनॉल्टी म्हणून रु. 630/- चा दंड आकारुन, वसुल करुन घेतला. विरुध्दपक्ष क्र. 2 यांना ही बाब कबुल आहे की, वरील धनादेश हा त्यानंतर परत वटविण्यास लावला असता, तो वटविला गेला व सदर रक्कम विरुध्दपक्ष क्र. 2 ला मिळाली.
तक्रारकर्ते यांचा असा युक्तीवाद आहे की, त्यांचा दि. 5/3/2016 चा धनादेश न वटता विरुध्दपक्ष क्र. 1 कडून परत गेला, परंतु त्यांच्या खात्यात तेंव्हा पुरेशी रक्कम होती, परंतु या बद्दल विरुध्दपक्ष क्र. 1 यांना विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. शिवाय विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याला न विचारता वरील धनादेश पुनः खात्यात लावला व विरुध्दपक्ष क्र. 2 यांना कर्ज हप्ता रु. 2170/- रक्कम दिली. परंतु विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी, चेक बाऊन्स पेनॉल्टी म्हणून रु. 630/- दंड आकारुन, तक्रारकर्त्याचे नाव धनादेश न वटविणा-या यादीमध्ये समाविष्ट केले. अशा प्रकारे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ची सेवा न्युनता दिसून येते, म्हणून तक्रार प्रार्थनेनुसार मंजुर करावी.
यावर, विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे असे म्हणणे आहे की, संगणकीय त्रुटीमुळे धनादेश न वटल्याचे दिसले आहे, त्यात तक्रारकर्त्यास कुठल्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक त्रास देण्याचा उद्देश नव्हता व त्यामुळे तक्रारकर्त्यास कुठलेही आर्थिक नुकसान झाले नाही, म्हणून सेवा न्युनता म्हणता येणार नाही.
विरुध्दपक्ष क्र. 2 च्या मते, कर्ज हप्त्याच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटता परत आल्यामुळे कर्ज करारनामा अटीनुसार दंड लावला आहे, यात विरुध्दपक्ष क्र. 2 ची चुक नाही. अशा प्रकारे उभय पक्षात कबुल असलेल्या बाबींवरुन व त्याबद्दलचा उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाचे असे मत झाले आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी ही चुक संगणकीय आहे, हे सिध्द केले नाही, कारण तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांवरुन असे दिसते की, त्यांच्या खात्यात रक्कम शिल्लक असतांनाही, विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडून चेक न वटल्याचे दर्शविल्या गेले, ज्यामुळे तक्रारकर्त्याला कर्ज रकमेत चेक बाऊन्स पेनॉल्टी म्हणून रु. 630/- चा दंड विरुध्दपक्ष क्र. 2 कडून आकारला गेला, शिवाय त्यांचे नाव धनादेश न वटविणा-या यादीमध्ये गेले. तसेच तक्रारकर्त्याची संमती न घेता, पुन्हा न वटला गेलेला कर्जापोटीचा सदर धनादेश वटविण्यासाठी लावून, त्याची रक्कम रु. 2170/- काढण्यात येवून ती विरुध्दपक्ष क्र. 2 ला मिळाली, अशी कबुली विरुध्दपक्ष क्र. 2 ची आहे. त्यामुळे यात विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 या दोघांचीही सेवा न्युनता दिसून येते. म्हणून तक्रारकर्ते यांची तक्रार त्यांच्या प्रार्थनेनुसार अंशतः विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 विरुध्द खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करुन मंजुर केली.
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास रक्कम रु. 630/- ( रुपये सहाशे तिस फक्त ) द.सा.द.शे. 10 टक्के व्याज दराने, दि. 5/3/2016 पासून प्रत्यक्ष रक्कम अदाईपर्यंत व्याजासहीत द्यावे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळेपणे तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी, प्रकरणाच्या न्यायिक खर्चासह रु. 5000/-(रुपये पाच हजार फक्त ) द्यावे.
- विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्ते यांचे नाव, या प्रकरणाबाबतच धनादेश न वटविणा-या यादीतुन काढून टाकावे.
- सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावे.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.