जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –18/2011 तक्रार दाखल तारीख –31/01/2011
श्रीमंत पि.लक्ष्मणराव वाघमारे
वय 49 वर्षे,धंदा वकिली .तक्रारदार
रा.आदर्श नगर ता.जि.बीड
विरुध्द
तेजसिंग पि.हरीसिंग सरदारजी
वय 35 वर्षे, धंदा व्यापार
रा. श्री कोळी यांचा वाडा.
श्री.श्री रविशंकर बाल मंदिराच्या शेजारी,
आदर्श नगर, बीड ता.जि.बीड ..सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- स्वतः
सामनेवाले तर्फे :- स्वतः
निकालपत्र
(घोषित द्वारा श्री.अजय भोसरेकर,सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हे बीड येथील रहिवासी असून, तक्रारदार हे व्यवसायाने वकील आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे 10 इंच उंचीची अक्षरे व अशोक चक्र बनवण्याची ऑर्डर देण्यात आली. सदर अक्षरे हे तक्रारदाराने नवीन घर बांधले आहे व त्यावर बसवण्यासाठी ऑर्डर दिली होती. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये सदर अक्षरे दि.15.12.2010 रोजी पर्यत बसवण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदाराने दि.02.05.2010 रोजी सामनेवाला यांना ऑर्डर दिली होती. ऑर्डर पावती नंबर 926 याप्रमाणे तक्रारदाराने सामनेवाला यांना रु.500/- अँडव्हान्स दिले होते. तक्रारदाराने दि.01.01.2011 रोजी घराची वास्तू प्रवेश करावयाचे निश्चित केले होते. त्यानुसार तक्रारदाराने सामनेवाला यांना वारंवार अक्षरे बसवण्यासाठी पाठपुरावा केला परंतु सामनेवाला यांनी अक्षरे बसविण्यास टाळाटाळ केली असे म्हटले आहे. तक्रारदाराने अक्षरे बसविण्यासाठी 20 फुट उंचीची शिडी लागते असे सामनेवाला यांनी सांगितल्यामुळे तक्रारदाराने 20 फुट उंचीची शिडी 12 दिवस दररोज रु.50/- भाडे तत्वावर आणून ठेवली व ती शिडी आणणे व नेणे यांचा खर्च रु.100/- करावा लागला असे एकूण तक्रारदारास खर्च रु.600/- आला. तक्रारदार व सामनेवाला हे एकाच गल्लीत राहत असल्यामुळे शिडी नाही हे पाहून सामनेवाला यांनी अक्षरे बसविण्यास येतो असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने दि.19.01.2011 रोजी रोज भाडे रु.50/-प्रमाणे दि.28.01.2011 रोजी पर्यत रु.500/- भाडे व रु.100/- रिक्षाची ने-आण मंजूरी असे एकूण रु.600/- खर्च केला. तक्रारदाराने सामनेवाला यांना रोज किमान 10 फोन करावे लागले असे जवळपास 50 दिवस रोज 10 फोन या हिशोबाने 500 फोन करावे लागले व एका फोनचा खर्च रु.1/-प्रमाणे रु.500/- खर्च करावा लागला असे म्हटले आहे. म्हणून तक्रारदाराने सदर तक्रार ही रु.25,000/- नूकसान भरपाई व खर्चापोटी मिळण्याची मागणी करुन अक्षरे व अशोकचक्र तक्रारदाराचे घरावर विनामुल्य बसवून देण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने त्यांचे म्हणण्याचे पूष्टयर्थ एकूण दोन कागदपत्र दाखल केली.
सामनेवाला यांनी दि.13.05.2011 रोजी आपले म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे अक्षरे तयार करण्याचे ऑर्डर दिली हे त्यांना मान्य आहे. परंतु सामनेवाला हा दिल्ली येथील गूरुगोविंदसिंग प्रोडक्टस या स्टिल अक्षरे व पितळी अक्षरे बनविणा-या कंपनीचा एजंन्ट आहे असे म्हटले आहे. तक्रारदाराने दि.02.05.2010 रोजी रु.500/- अँडव्हान्स घेऊन राजगृह हे 10 इंचाचे स्टिल अक्षर बनविण्याची ऑर्डर घेतली होती व त्यानंतर रु.1400/- घेऊन तक्रारदारास स्टिल अक्षरे घरी नेऊन दिली असे म्हटले आहे. सामनेवाला हा फक्त अक्षरे विक्री करण्याचा व्यवसाय करतो. त्यामुळे अक्षरे बसवून देण्याची माझी जबाबदारी नाही म्हणून मी तक्रारदारास देऊ करावयाचे सेवेत कोणत्याही प्रकारची त्रुटी केलेली नाही. सबब सामनेवाले याचे विरुध्दचा अर्ज खारीज करावा अशी मागणी केली आहे.
तक्रारदार व सामनेवाले यांचे लेखी म्हणणे व तक्रारदाराचा तोंडी यूक्तीवाद व दाखल कागदपत्रे यांचे बारकाईने अवलोकन केले. त्यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदाराचे घरावर अक्षरे बसवणेसाठी आणलेली व नेलेली शिडी बाबतची बीले किंवा योग्य पुरावा व सामनेवाला यांना केलेले 500 फोन असे पुरावे जिल्हा मंचा समोर न सादर केल्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास देऊ करावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही हे सिध्द होते.
सबब, हे जिल्हा मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चासाठी कोणताही आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड