नि.19 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 173/2010 नोंदणी तारीख – 22/1/2010 निकाल तारीख – 12/10/2010 निकाल कालावधी - 260 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री वसंत शिवदास खाडे रा.पळशी ता.माण जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री एस.एम.गंबरे) विरुध्द 1. तेज मोटर्स, गाळा नं.51/52, श्रीराम बझार, कारखाना गेटसमोर, मार्केट यार्ड, फलटण ता.फलटण जि. सातारा 2. श्री राजकुमार शर्मा (ग्राहक सहायक) फलॅट नं.101, बिल्डींग नं.86, प्लॉट नं.85/86, हील व्हीव्यू अपार्टमेंट, लुलानगर, पुणे-411040 3. टाफे मॅसी फर्ग्युसन प्रा.लि.कं. मॅनेजर, ट्रॅक्टर एण्ड फार्म इक्वीपमेंट लि., 35, नानगाबंकंम हाय रोड, चेन्नई – 600 034 ----- जाबदार (अभियोक्ता श्री मिलिंद ओक) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे मौजे पळशी ता.माण येथील कायमचे रहिवासी आहेत. अर्जदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडून टाफे कंपनीचा ट्रॅक्टर दि.22/2/2010 रोजी खरेदी केला. सदरचे ट्रॅक्टरचा वापर त्यांनी दि.6/3/2010 रोजी करणेस सुरुवात केली. परंतु सदरचा ट्रॅक्टर 20 ते 22 तास चालविला असता इंजिनमधील ऑईल कमी होत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यामध्ये जाबदार यांचे सूचनेनुसार पुन्हा ऑईल भरले असता पुन्हा ते कमी होत असल्याचे अर्जदारचे लक्षात आले. त्यानंतर जाबदार क्र.1 यांनी सदरचे वाहनाची शेतामध्ये चाचणी घेतली असता सदरचा ट्रॅक्टर हा डिझेल व ऑईल कमी करत असल्याचे जाबदार यांचे लक्षात आले. त्यानंतर जाबदार क्र.2 यांचे अधिका-यांनीही वाहनाची चाचणी घेतली असता त्यांनाही तसेच आढळून आले. त्यानंतर जाबदार यांनी वाहनाचे इंजिन बदलून दिले. परंतु पुन्हा तीच अडचण निर्माण झाली. म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांचेकडून सदरचे वाहन दुरुस्त करुन घेतले. परंतु तरीही डिझेलचा वापर पूर्वीपेक्षाही जास्त होत असल्याचे अर्जदारचे लक्षात आले. त्यानंतर जाबदार यांनी सदरचे वाहन परत कंपनीत घेवून जावे लागेल असे सांगून वाहनाची चावी घेवून गेले तेव्प्हापासून सदरचे वाहन हे जागेवरच उभे आहे. अशाप्रकारे सदरचे ट्रॅक्टरमुळे अर्जदरर यांचा खूपच आर्थिक तोटा झालेला असून मानसिक व शारिरिक त्रासही झालेला आहे. तसेच जाबदार यांनी अर्जदार यांना एक्सेसरीजमधील रोटाव्हेटर अद्यापही दिलेला नाही. सबब सदरचे वाहन बदलून मिळावे, किंवा वैकल्पिकरित्या वाहनाची एकूण रक्कम रु.7,86,800/- व्याजासह परत मिळावी, शारिरिक व मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार क्र.1 यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 10 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार यांनी वादातील ट्रॅक्टर हा उद्योगधंद्यासाठी म्हणजे नफा मिळविण्यासाठी घेतलेला असल्याने तो ग्राहक होत नाही. जाबदार यांनी अर्जदारचे ट्रॅक्टरला डोझर बसवून दिला त्याची किंमत रु.65,000/- अद्यापही अर्जदारने जाबदार यांना दिलेली नाही. सदरची रक्कम बुडविणेसाठी अर्जदार यांनी सदरचा अर्ज दाखल केला आहे. अर्जदार यांनी सदरचा ट्रॅक्टर निष्काळजीपणे वापरला. अर्जदारने केलेल्या तक्रारीनंतर ट्रॅक्टरची चाचणी घेतली व ट्रॅक्टरचे इंजिन जाबदार यांनी बदलून दिलेले आहे. नवीन इंजिनमधूनही ऑईल व डिझेल जास्त खर्च होवू लागले हे कथन खोटे आहे. मला नवीन ट्रॅक्टर बदलून द्या असा तगादा अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे लावला होता. जाबदार यांनी अर्जदार यांना विनामोबदला विक्रीपश्चात सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. ट्रॅक्टरमध्ये कोणता बिघाड आहे याबाबत कोणताही तपशील अर्जदार यांनी दिलेला नाही तसेच कोणाही तज्ञ व्यक्तीचा अहवाल दिलेला नाही, सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. जाबदार क्र.3 यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 14 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. जाबदार क्र.1 यांची दिलेली कैफियत हीच जाबदार क्र.3 यांची कैफियत समजण्यात यावी. अर्जदारने केलेल्या तक्रारीनंतर सदर ट्रॅक्टरची पाहणी तज्ञांमार्फत करण्यात आली तथापि ऑईल कमी होत असल्याचे दिसून आले नाही तथापि डिझेल जादा खर्च झाले. अर्जदार यांनी वापरलेल्या नवीन इंजिनला शीट न आल्याने अर्जदार यांनी ट्रॅक्टर 250 तास चालवावा असे जाबदार यांनी अर्जदार यांना सांगितले परंतु अर्जदार यांनी तो चालविला नाही. ट्रॅक्टरमध्ये कोणता बिघाड आहे याबाबत कोणाही तज्ञ व्यक्तीचा अहवाल दिलेला नाही, सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.3 यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 4. जाबदार क्र.2 यांना प्रस्तुत तक्रार अर्जाचे नोटीसची बजावणी होवूनही ते या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 5. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि. 16 ला पाहिला. जाबदार क्र.1 व 3 तर्फे वकील श्री ओक यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 6. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 7. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात असे कथन केले आहे की, त्यांनी जाबदार यांचेकडून खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचा वापर सुरु केल्यानंतर त्याचे इंजिनमधील ऑईल कमी होत असल्याचे निदर्शनास आले. तदनंतर सदरचे वाहनाची जाबदार यांनी चाचणी घेतली व ट्रॅक्टरचे इंजिन बदलून दिले परंतु तरीही ऑईल व डीझेलचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला त्यामुळे अर्जदार यांना सदरचे वाहन चालवणे अशक्यच झाले. सबब वाहन बदलून मिळावे अशी अर्जदार यांनी मागणी आहे. परंतु सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ अर्जदार यांनी कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. सदरचे वाहनामध्ये उत्पादित दोष आहे हे दर्शविणारा वाहन क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचा अहवाल याकामी अर्जदार यांनी दाखल करणे जरुरीचे होते परंतु तसा कोणताही अहवाल अर्जदार यांनी याकामी दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी जी कागदपत्रे तक्रारअर्जासोबत दाखल केली आहेत त्यावरुन सदरचे ट्रॅक्टरमध्ये उत्पादित दोष आहे ही बाब कोठेही सिध्द होत नाही. सबब अर्जदार यांनी खरेदी केलेल्या वाहनामध्ये दोष आहे ही बाब अर्जदार याकामी शाबीत करु शकलेले नाहीत. वरील सर्व कारणांचा विचार करता अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. 8. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जासोबत जे कागद दाखल केले आहेत, ते कागद मूळ कागद नसून झेरॉक्स प्रती आहेत. प्रस्तुत तक्रारअर्जाचा न्यायनिर्णय करण्यासाठी अर्जदार यांनी मूळ कागद दाखल करणे आवश्यक होते. परंतु अर्जदार यांनी मूळ कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. सबब सदरचे झेरॉक्सप्रतींवर विश्वास ठेवता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. 9. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 12/10/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |