न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला असून त्यातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे कणसे अॅटोलाईन्स या नावाने सातारा येथे बजाज दुचाकी विक्रीचा व्यवसाय करतात तर जाबदार तेज कुरियर्स नावाने कुरियर्स सर्व्हीस देणेचे काम करतात. तक्रारदाराने जाबदारामार्फत दि.3-5-2013 रोजी कन्साईन्मेंट नं. 7431608 मे.बजाज अॅटो लि.पुणेसाठी पार्सल कुरियरमार्फत पाठवले होते. प्रस्तुत बुक केलेल्या पार्सलमध्ये अंदाजे रक्कम रु.38,000/- (रु.अडतीस हजार मात्र) ची सर्व्हीस कुपन्स होती. तक्रारदारने बुक केलेले पार्सल जाबदारानी वेळेत सुस्थितीत पोहोचवणेची सर्वस्वी जबाबदारी जाबदारांची होती व आहे. परंतु जाबदारानी तक्रारदाराचे कुरियर पार्सल दिलेल्या पत्त्यावर सुस्थितीत पोहोच केले नाही तर उलट तक्रारदारास जाबदाराने प्रस्तुत पार्सल गहाळ झालेची माहिती दिली त्यामुळे जाबदाराना तक्रारदाराने दि.16-5-2013 रोजी पत्र पाठवून झालेल्या नुकसानीची भरपाई करुन देणेबाबत मागणी केली. सदर पत्रास जाबदाराने कोणतेही उत्तर दिलेले नाही तसेच झालेल्या नुकसानीची रक्कमही तक्रारदारास जाबदाराने अदा केली नाही, उलट तक्रारदाराची झालेली नुकसानभरपाई देणेस जाबदार टाळाटाळ करीत आहेत. तसेच जाबदार त्यांचे जबाबदारीतून परावृत्त होणेचा प्रयत्न करीत आहोत. तक्रारदाराने कुरियर्सची सर्व्हीस जाबदाराने योग्य देणेसाठी योग्य तो मोबदला जाबदारास अदा केला आहे. म्हणजेच तक्रारदार व जाबदारांचे ग्राहक व सेवा देणार असे नाते आहे. जाबदाराने तक्रारदारास ग्राहक या नात्याने सेवा देणेत हलगर्जीपणा केला आहे. जाबदाराने तक्रारदाराचे पार्सल गहाळ करुन तक्रारदाराचे फार मोठे आर्थिक, मानसिक, शारिरीक नुकसान केलेले आहे. तसेच जाबदाराने तक्रारदाराचे पार्सल योग्य त्या पत्त्यावर व्यवस्थित पोहोच न केल्याने तक्रारदाराचे फार मोठे नुकसान केलेले आहे व तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे, त्यामुळे तक्रारदारानी सदरचा तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केलेला आहे.
2. तक्रारदाराने सदर कामी जाबदारांकडून पाठवलेले पार्सल कन्साईन्मेंट नं.7131608 जाबदाराकडून होते त्या परिस्थितीत परत मिळावे, तक्रारदारास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी जाबदाराकडून रक्कम रु.1,00,000/- 18 टक्के व्याजाने मिळावेत अशी विनंती केलेली आहे.
3. तक्रारदाराने सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/3 कडे अनुक्रमे तेज कुरियर्स पावतीची झेरॉक्स, तक्रारदाराने जाबदारास वकीलांतर्फे पाठवलेली नोटीस, जाबदाराना पाठवलेल्या रजि.नोटीसची पोहोचपावती, नि.12 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.13 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि.15 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे मे.मंचात दाखल केलेली आहेत.
4. सदर कामी जाबदारानी नि.11 कडे म्हणणे, नि.11/1 कडे प्रतिज्ञापत्र, नि.14 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र, नि.16 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे मे.मंचात दाखल केली आहेत.
जाबदारानी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रारीतील कथने फेटाळलेली आहेत, मात्र तक्रारदाराने पाठवलेले पार्सल कुरियर पुणे येथून हरवलेचे, गहाळ झालेचे कबूल केले आहे. तसेच त्याबाबत पिंपरी पोलिस स्टेशन पिंपरी येथे तक्रार नोंदवलेली आहे हे कथन केले आहे, तसेच जाबदाराने पुढीलप्रमाणे आक्षेप तक्रारअर्जावर घेतले आहेत-
अ) तक्रारअर्ज खोटा व लबाडीचा असून मान्य नाही.
ब) तक्रारदार व जाबदारांचे दरम्यान ग्राहक व विक्रेता असे नाते निर्माण झालेले नाही.
क) जाबदाराने म्हटले आहे की, तक्रारदाराने दि.3-5-2013 रोजी जाबदाराकडे पार्सल बुक केले होते, ते पार्सल सातारा येथून पुणे येथे पाठवणेचे होते परंतु सदर पार्सल पुणे येथून गहाळ झाले आहे. याबाबत जाबदारानी पिंपरी पोलिस स्टेशन पिंपरी यांचेकडे तक्रार नोंद केली आहे व त्याबाबतची माहिती जाबदाराने तक्रारदारास ताबडतोब कळविली होती. सदर पार्सलमध्ये रक्कम रु.38,000/-ची सर्व्हीस कुपन्स नव्हती परंतु जाबदाराकडून पार्सल गहाळ झालेचा गैरुायदा घेऊन तक्रारदार हे जाबदाराकडून अवास्तव व भरपूर रक्कम उकळणेचे हेतूने तक्रारदार हे पार्सलमध्ये रक्कम रु.38,000/-चे सर्व्हीस कुपन असलेचे सांगत आहेत, तरीही तक्रारदाराचे पार्सल जाबदाराकडून गहाळ झालेने तक्रारदारास नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.30,000/- एवढी रक्कम देणेस तयार होते व आहेत. जाबदाराने रक्कम रु.30,000/-चा आय.डी.बी.आय.बँकेचा चेक तक्रारदारास देऊ करत होते परंतु सदर चेक तक्रारदाराने स्विकारला नाही.
ड) तक्रारदाराने जाबदाराकडे कन्साइन्मेंट बुक करतेवेळी मान्य केलेल्या अटीप्रमाणे जाबदाराकडे सोपवलेल्या मालास नुकसान झालेस त्याबाबत नुकसानभरपाई केवळ रु.100/- एवढीच आहे, त्याप्रमाणे जाबदार हे नुकसानभरपाई देणेस तयार होते व आहेत, तसेच वर नमूद रक्कम रु.30,000/- देणेस तयार होते व आहेत. मात्र ही बाब तक्रारदाराने मे.कोर्टापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली आहे व जाबदाराकडून अवाजवी व जादाची रक्कम उकळणेसाठी सदरचा खोटा तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे, तो खर्चासह नामंजूर करणेत यावा अशा स्वरुपाचे म्हणणे जाबदाराने दाखल केले आहे.
5. वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदार व जाबदारानी दाखल केलेल्या कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे.मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदारांमध्ये ग्राहक व सेवा देणार असे नाते आहे काय? होय.
2. जाबदाराने तक्रारदारास दुषित सेवा पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? शेवटी नमूद आदेशाप्रमाणे
विवेचन मुद्दा क्र.1 व 2-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो कारण तक्रारदाराने जाबदारांचे कुरियरमार्फत दि.3-5-2013 रोजी कन्साईन्मेंट क्र.7431608 मे.बजाज अॅटो लि.पुणे साठी पार्सल बुक करुन पाठवले होते. त्यासाठी लागणारे चार्जेस तक्रारदारानी जाबदाराला अदा केले आहेत. ती पावती तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे दाखल केली आहे. तसेच तक्रारदाराने पार्सल बुक केले होते ही बाब जाबदाराने मान्य केली आहे. म्हणजेच तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत हे निर्विवाद सत्य आहे. तसेच सदरचे पाठवलेले पार्सल कन्साईन्मेंट नं.7431608 हे जाबदाराने दिलेल्या पत्त्यावर व्यवस्थित पाठवलेले नाही तर ते गहाळ केले आहे. ही बाब जाबदाराने मान्य केली आहे की, पुणे येथून पार्सल गहाळ झाले आहे. तसेच तक्रारदाराने सदर पार्सलमध्ये रक्कम रु.38,000/- चे सर्व्हीस कुपन असल्याने सदर पार्सल गहाळ झालेने सदरील नुकसानभरपाई जाबदाराने दयावी म्हणून तक्रारदाराने जाबदारास वकीलामार्फत नोटीस पाठवली होती, सदर नोटीस जाबदारास मिळूनही त्यानी रक्कम अदा केली नाही तसेच तक्रारदाराने पाठवलेले पार्सल व्यवस्थितपणे बजाज अँटो लि.पुणे यांचेकडे पोहोच केले नाही, तर सदर पार्सल गहाळ झालेचे तक्रारदारास कळवले आहे म्हणजेच तक्रारदाराना जाबदाराने दुषित सेवा पुरवली आहे हे निर्विवादरित्या सिध्द होते आहे. सबब आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. वरील विवेचन, कागदपत्रे लेखी, तोंडी युक्तीवाद, पुराव्याची प्रतिज्ञापत्रे, या सर्वांचा विचार करुन जाबदारानी तक्रारदाराना सदोष सेवा पुरविली आहे व जाबदाराने तक्रारदाराना नुकसानभरपाई देणे किंवा जाबदाराने तक्रारदाराचे नमूद पार्सल कन्साईन्मेंट क्र.7431608 हे तक्रारदारास आहे त्या परिस्थितीत परत करणे न्यायोचित होणार आहे.
सबब जाबदारानी तक्रारदाराचे गहाळ झालेले वर नमूद पार्सल होते त्या स्थितीत तक्रारदारास परत करावे किंवा सदर कारणामुळे तक्रारदाराचे झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु.38,000/- तक्रारदारास व्याजासह अदा करणे तसेच तक्रारदारास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- अदा करणे न्यायोचित होणार आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.
8. सबब सदर कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
-ः आदेश ः-
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदाराने तक्रारदाराने बुक केलेले पार्सल कन्साईन्मेंट क्र.7431608 होते त्या स्थितीत तक्रारदारास परत करावे. हे शक्य न झालेस तक्रारदारास जाबदाराने रक्कम रु.38,000/-(रु.अडतीस हजार मात्र)अदा करावेत. सदर रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज अदा करावे.
3. तक्रारदारास शारिरीक, मानसिक त्रासापोटी जाबदाराने रु.15,000/- अदा करावेत.
4. वरील आदेशांचे पालन जाबदाराने आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.
5. वरील आदेशाचे पालन जाबदाराने विहीत मुदतीत न केलेस तक्रारदाराना ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 नुसार कारवाई करणेची मुभा राहील.
6. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.18-4-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.