Exh.No.11
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.23/2012
तक्रार दाखल झाल्याचा दि.23/02/2013
तक्रार निकाल झाल्याचा दि.15/07/2013
प्रमिला जगन्नाथ पेडणेकर
वय 34 वर्षे, धंदा- घरकाम
रा.खडपेश्वर बंदर रोड जवळ,
ता.वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) तेज कुरीअर तर्फे
व्यवस्थापक श्री प्रदिप गिजरे
वय - सज्ञान, धंदा – मॅनेजर,
अ डिव्हीजन ऑफ घाटगे पाटील कन्सल्टन्सी प्रा.लि.
रजिस्टर्ड ऑफिस जीपीटी कॉम्प्लेक्स,
517, ई, पुणे बेंगलोर रोड, कोल्हापूर- 416 008
2) तेज कुरीयर तर्फे व्यवस्थापक,
माणिक चौक, स्टेट बँक ए.टी.एम.च्या समोर,
वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्या
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री आकाश रेडकर.
विरुद्धपक्षातर्फे- एकतर्फा गैरहजर.
निकालपत्र
(दि.15/07/2013)
सौ. वफा जमशीद खान, सदस्या - विरुध्द पक्षाचे तेज कुरीयर सर्व्हिसने पाठविलेल्या दोन पार्सलपैकी एक पार्सल संबंधीतास पोहोच झाले नसल्याने झालेल्या नुकसानीच्या भरपाईकरिता व खर्च मिळणेकरिता तक्रारदार हिने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे तेज कुरियर या नावाने व्यवसाय करीत असून तक्रारदार हिने दि.19/06/2012 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 च्या वेंगुर्ला शाखेमार्फत Ms. Esperance Pinto, 695 Taboot Street Camp, Pune 411 001 या पत्त्यावर 1 किलो 700 ग्रॅम वजनाचे एकूण दोन पार्सल पाठविले. सदर पार्सलची देय रक्कम अदा करुन तक्रारदारने त्याची रितसर पावती घेतली आहे. असे असता सदर पार्सलपैकी एक लहान पार्सल श्री पिंटो यांना दि.20/06/2012 रोजी सायंकाळी प्राप्त झाले. परंतु मोठे पार्सल विरुध्द पक्ष यांनी श्री पिंटो यांना अदा केलेले नाही. मोठया पार्सलमध्ये कपडे, सेलिब्रेशनची चॉकलेटस् व टॉमेटो चकलीचे एक पाकीट होते. त्या पार्सलमध्ये सुमारे रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) किंमतीच्या चिजवस्तू होत्या. सदरचे मोठे पार्सल श्री पिंटो यांना मिळाले नसल्याने तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांच्या वेंगुर्ला शाखेतील कर्मचा-यांकडे तसेच पूणे शाखेतील कर्मचा-यांकडे चौकशी केली असता त्यांनी आज कळवू, उदया कळवू अशी उत्तरे दिली. विरुध्द पक्ष यांच्या पूणे शाखेतील कर्मचा-यांनी ‘सदर पार्सलमधील चॉकलेटस् आम्ही खाल्ली; तू काय ते करुन घे ’ अशी उत्तरे दिली.
3) तक्रारदार यांना त्यांनी पाठविलेल्या मोठया पार्सलबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती म्हणून त्यांनी दि.04/07/2012 रोजी विरुध्द पक्षास पत्र पाठवून तक्रार दिली त्याला दि.18/07/2012 रोजी खोडसाळ उत्तर मिळाले व दुस-या व्यक्तीचे कपडे पाठवून चॉकलेटस खराब झाल्याने नष्ट केल्याचे तक्रारदारास कळविले. सदर कपडे तक्रारदार हिने पार्सलसोबत पाठविलेले कपडे नसल्याने ते परत घेऊन त्यांनी पाठविलेले कपडे परत करण्याचे विरुध्द पक्षाचे कर्मचा-यांना विनंती केली. विरुध्द पक्षाने तक्रारदाराच्या विनंतीप्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही. तसेच तक्रारदार हिचे एकाच वेळी एकाच पत्त्यावर देणेसाठी पाठविलेली दोन पार्सल्स् दिली नाही व त्यामुळे तक्रारदार हिस विरुध्द पक्ष यांचे सेवेतील त्रुटीमुळे मानसिक त्रास व नुकसान सहन करावे लागले. तक्रारदार हिने विरुध्द पक्ष यांना याबाबत दि.19/07/2012 रोजी नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली; त्याला विरुध्द पक्षाने दि.07/08/2012 रोजी खोडसाळ उत्तर देऊन तक्रारदार हे केवळ रु.100/- एवढया नुकसानीस पात्र असल्याचे कळविले. म्हणून तक्रारदार हिने विरुध्द पक्षाने दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे झालेली नुकसान भरपाई व खर्च मिळणेसाठी तक्रार अर्ज दाखल केला आहे. तसेच त्यासोबत तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ शपथपत्र, विरुध्द पक्षास पाठविलेले पत्र , नोटीस, विरुध्द पक्षाने दिलेली उत्तरे, पोष्टाच्या पावत्या इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4) तक्रारदार हिची तक्रार दाखल करुन घेऊन तक्रारीची नोटीस विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांस पाठविणेत आली. सदरच्या नोटीशीची मुदतीत बजावणी झाली आहे; तथापि विरुध्द पक्ष क्र.1 व 2 गैरहजर असल्याने दि.30/05/2013 रोजी त्यांचेविरुध्द एकतर्फा गैरहजर असल्याचे आदेश पारीत करण्यात आले व प्रकरण चौकशीसाठी घेण्यात आले. दरम्यान मंचाचे कामकाज प्रत्येक महात एकच आठवडा होत असे. त्यामुळे प्रकरणी चौकशी करुन प्रकरण आज रोजी अंतिम निर्णयासाठी घेणेत आले. तक्रारदाराची तक्रार, त्यापुष्टयर्थ केलेले शपथपत्र, दाखल केलेली पुराव्याची कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच तक्रारदारतर्फे वकीलांनी केलेला तोंडी युक्तीवाद घेता खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | विरुध्द पक्षाने तक्रारदार यांना दिलेल्या ग्राहक सेवेमध्ये त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहेत ? | खाली नमूद केले प्रमाणे |
3 | आदेश काय ? |
मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदार हिने विरुध्द पक्षाचे वेंगुर्ला शाखेमधून म्हणजेच विरुध्द पक्ष क्र.2 मार्फत कुरीयर सेवा घेवून एकाच दिवशी एकाच पत्त्यावर दोन पार्सल्स् पाठविली होती. सदर सेवेची रक्कम तक्रारदारने विरुध्द पक्षाकडे जमा केली असून त्याची विरुध्द पक्षाने दिलेली पावती तक्रारदारने नि.4/1 वर दाखल केली आहे. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक ठरत आहेत. सदर पार्सलपैकी एक पार्सल विरुध्द पक्षाने ज्या व्यक्तीकडे पोहोच करावयाचे होते त्यांना पोहोच केलेले नाही, ही बाब विरुध्द पक्षाने दि.16/07/2012 रोजी तक्रारदारास पाठविलेल्या पत्रामध्ये मान्य केली असून ते पत्र तक्रारदार हिने नि.4/3 वर दाखल केले आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारदार यांस ग्राहक म्हणून दयावयाच्या सेवेमध्ये त्रुटी ठेवली असल्याची बाब सिध्द होत असल्याने आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्रमांक 2 - i) तक्रारदार हिने दि.19/06/2012 रोजी विरुध्द पक्षाचे तेज कुरीयर मार्फत पार्सल्स पाठविली होती. त्यापैकी एक पार्सल संबंधीत व्यक्तीला पोहोचले असून दुसरे पार्सल पोहोच झाले नव्हते म्हणून तक्रारदार हिने विरुध्द पक्षाकडे पत्रव्यवहार केला असता विरुध्द पक्षाने दि.16/07/2012 चे पत्राद्वारे ‘दुसरे पार्सल काही ऑपरेशन प्रॉब्लेममुळे मिसरुट झालेले होते ते 5-6 दिवसानंतर सापडल्यानंतर आपल्या सांगण्यानुसार दि. 20/06/2012 रोजी आपणाकडे क. नोट नं.5488793 दि.30/06/2012ला परत पाठविणेत आले ते आपणांस पोहोचले आहे. आपण आपल्या पत्रात लिहिल्याप्रमाणे यामध्ये असलेला फ्रॉक आपणाकडे पोहोच केलेला आहे. मध्यंतरीच्या काळात चॉकलेट वितळल्यामुळे खराब झालेले आहे’ तक्रारदार हिस कळविले आहे. तक्रारदार हिने विरुध्द पक्षाकडून सेवा घेतलेली होती. त्या सेवेचा मोबदला म्हणून रक्कम रु.50/- विरुध्द पक्षाकडे जमा केली आहे. असे असता तक्रारदार यांनी एकाचवेळी एकाच ठिकाणी देणेसाठी विरुध्द पक्षाकडे दिलेली पार्सल्स् विरुध्द पक्षाने संबंधिताकडे पोहोच करणे गरजेचे होते; परंतु विरुध्द पक्षाने तसे केले नाही. त्यामुळे तक्रारदारने पाठविलेल्या वस्तुंची किंमत रुपये पाच हजारचे तिला नुकसान झाले. विरुध्द पक्षाचे शाखा कार्यालयाकडे फे-या माराव्या लागल्या; विरुध्द पक्षाचे कार्यालय व शाखा कार्यालये यांचेकडे फोन करावे लागले; तसेच पत्रव्यवहार करावे लागले. विरुध्द पक्षाने जो फ्रॉक पाठविला तो देखील तक्रारदारने पार्सलमधील पाठविलेला फ्रॉक नसल्यामुळे सर्वच प्रकारे आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले व तक्रारदारला या मंचामध्ये तक्रार अर्ज दाखल करावा लागला. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदाराला मानसिक त्रास व आर्थिक नुकसान झाले हे कागदपत्रांचे अवलोकन करता सिध्द होते.
ii) सदर तक्रार प्रकरणातील विरुध्द पक्ष क्र.2 हे विरुध्द पक्ष क्र.1 चे शाखा कार्यालय असून विरुध्द पक्ष क्र.1 हे कुरीयर व्यवसाय करतात. तक्रारदार हिने विरुध्द पक्ष क्र.2 मार्फत कुरीयर सेवा घेतलेली आहे यासंबंधाने तक्रारदार हिने नि.4 चे यादीलगत पुराव्याची कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ शपथपत्र देखील दाखल केले आहे. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना तक्रार अर्जाची नोटीस पोहोचून देखील त्यांनी मंचात हजर होऊन त्यांचे लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. विरुध्द पक्षाने मंचामध्ये हजर होऊन तक्रारदाराच्या कोणत्याही मागण्यांना छेद दिलेला नाही किंवा त्या अमान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारतर्फे दाखल कागदपत्र, तक्रार अर्ज आणि शपथपत्र यामधील बाबी साकल्याने विचारात घेता तक्रारदाराची तक्रार आम्ही अंशतः मान्य करीत असून तक्रारदार हे विरुध्द पक्षाकडे पाठविलेल्या पार्सलमधील चिजवस्तुंची किंमत रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) ; तसेच तक्रारदार हिस झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल रु.2,000/-(रुपये दोन हजार मात्र) व तक्रार खर्चापोटी रक्कम रु.1,000/- (रुपये एक हजार मात्र) मिळणेस पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
मुद्दा क्रमांक 3- उपरोक्त केलेल्या विस्तृत विवेचनावरुन आम्ही तक्रारदाराची तक्रार अंशतः मान्य करीत असून खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार अंशतः मान्य करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तपणे गहाळ केलेल्या पार्सलमधील चिजवस्तुंची किंमत रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) तक्रारदार हिस या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांच्या आत अदा करावी. सदर रक्कम वरील मुदतीत न दिल्यास सदर रक्कमेवर दि.15/08/2013 पासून रक्कमेची पूर्णफेड होईपर्यंत 9% सरळव्याजदराने रक्कम अदा करावी.
3) तसेच विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तपणे तक्रारदार हिस झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार मात्र) व तक्रार खर्चापोटी रु.1,000/- (रुपये एक हजार मात्र) या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांच्या आत अदा करावी.
4) विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची पूर्तता केल्यानंतर तक्रारदार हिने विरुध्द पक्षाकडून आलेला फ्रॉक विरुध्द पक्ष क्र.2 चे कार्यालयात जमा करावा व त्याची पावती घ्यावी.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 15/07/2013
Sd/- Sd/- Sd/-
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर),
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.