न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. रुपाली डी. घाटगे, सदस्या)
1) तक्रारदार यांनी वि.प. कुरिअर कंपनीने तक्रारदाराना नुकसान भरपाई नाकारली म्हणून तक्रारदारानी प्रस्तुतचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अन्वये या मंचात दाखल केला आहे.
2) प्रस्तुत कामी तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. यांनी मंचात उपस्थित राहून म्हणणे दाखल केले.
3) तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी –
तक्रारदारांनी दिवाळीचे फराळाचे डबे(पार्सल्स) त्यांचे मुलांना वि.प. यांचे कुरिअर्स सर्व्हिस मार्फत (1) 7 किलो वजनाचे लॉस एंजेल्स यु. एस. ए. व (2) 6 किलो वजनाचे सॅनफ्रॅन्सिस्को यु. एस. ए. येथे पाठविणेसाठी दोन पार्सल वि.प. यांचेकडे दि. 5-11-2015 रोजी दिले त्याचे सेवा शुल्क रु. 575/- प्रति किलो प्रमाणे रु. 4,590/- व रु. 3,935/- असे एकूण रक्कम रु. 8,525/- दिले. वि.प. यांनी दोन्ही पार्सल्स सात ते आठ दिवसांत पोहाचतील असे आश्वासन दिले होते. सदरची दोन्ही पार्सल्स दि. 21-11-2015 व 22-11-2015 रोजी मिळाले. सदरचे दोन्ही पार्सल्स सतरा ते अठरा दिवसांचे विलंबाने मिळालेने पार्सलमधील सर्व फराळास बुरशी आली. त्यामुळे सर्व फराळाचे साहित्य फेकून दयावे लागले. तक्रारदारांचे कष्ट व रुपये वाया जाऊन माझे मुलांची व नातवांची नाराजी पाहून तक्रारदारांना वाईट वाटले. तक्रारदारांनी स्वीटची पार्सल्स स्पिड पोस्ट पोस्टल सर्व्हीस भारत सरकारमार्फत पाठविली ती आठ दिवसात मिळाली होती. वि.प. यांनी महाराष्ट्र टाईम्स मध्ये दिवाळीचे फराळ कुरीअर्स मार्फत सर्व्हिस अशी जाहिरात प्रसिध्द झाली होती. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. तक्रारदारांनी वि. प. कडून सेवा शुल्क रु.8,525/-, फराळाची किंमत रु.5,200/- नुकसान भरपाई व मानसिक त्रासासाठी रु. 10,000/- अशी एकूण रक्कम रु. 23,725/- मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल करुन विनंती केली आहे.
4) तक्रारदारांनी तक्रारीसोबत कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेले पत्र, वि.प. यांचे नावाची कन्साईमेंट नोट, तेज कुरीअर्स यांची दि. 23-12-2015 रोजीची महाराष्ट्र टाईम्स वर्तमानपत्रातील जाहिरात/बातमी इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
5) वि.प. यांनी दि. 5-05-2017 रोजी म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार अर्ज परिच्छेदनिहाय नाकारलेला आहे. तक्रारदाराचा तक्रार अर्ज खोटा, चुकीचा असून मान्य व कबूल नाही. तक्रारदारांनी तक्रारीसोबत कोणतीही कागदपत्रे जोडलेली नाहीत. तक्रारदारांनी दाखल कलेली तक्रारीसोबत कागदपत्रामधील रिसीट ही अर्धवट स्वरुपात हजर केली आहे. रिसीट सोबत असलेल्या अटी व शर्ती दाखल केलेल्या नाहीत. तक्रारदार हे कोणतीही दाद मिळणेस पात्र नाहीत. कुरीअरमध्ये कोणती कागदपत्रे व कोणती माहिती आहे याची माहिती कुरीयर कंपनीकडे दिलेली नाही. वि.प.यांनी कुरिअरमध्ये पाठविलेल्या वस्तु किती दिवसांत पोहावायच्या याबाबत कोणताही वेळ दिलेला नव्हता. वि.प.यांनी दि. 21-11-2015 रोजी पार्सल पोहोच केलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराचे नुकसानीस वि.प. हे जबाबदार नाहीत. वि.प. यांनी तक्रारदारांना पार्सल 7 ते 8 दिवसांत पोहच होती असे सांगितले नव्हते व नाही. युएसए मध्ये फराळाचे पाठविण्याचे पार्सल हे किती तारखेला तयार केले व त्यानंतर वि.प. कडे आणून दिले याचा तक्रारीत उल्लेख नाही. तक्रारदारांनी वि.प. कडून रक्कम मागणेसाठी चुकीचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा असे म्हणणे दाखल केले आहे. वि.प. यांचे दि. 24-04-2017 रोजीचे पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6) तक्रारदाराचा तक्रार अर्ज, वि.प. यांचे म्हणणे, दाखल कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, उभय वकिलांचे युक्तीवादाचा विचार करता खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1. | वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय |
2. | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
3. | तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
4. | अंतिम आदेश काय ? | अंशत: मंजूर. |
कारणमिंमासा -
7) मुद्दा क्र. 1 –
प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी दिवाळीचे फराळाचे पार्सल वि.प. यांचे कुरिअर सर्व्हिसमार्फत पाठविलेले होते. सदरचा फराळ वेळेवर मिळावा म्हणून वि.प. यांची सेवा घेऊन 7 कि.ग्रॅ. वजनाचे लॉस एजेंल्स,यु.एस.ए.व 6 कि.ग्रॅ.वजनाचे सॅनफ्रॅन्सिस्को येथे पोहाच करण्यासाठी दोन पार्सल वि.प. यांचेमार्फत दि. 5-11-2015 रोजी एकूण रक्कम रु. 8,525/- भरुन पाठविली असता, सदरची पार्सल दि. 21-11-2015 व दि. 22-11-2015 रोजी तक्रारदाराचे मुलांना मिळाली. सतरा व अठरा दिवसांचा विलंब यामुळे पार्सलमधील सर्व फराळास बुरशी आली. तक्रारदारांनी रक्कम रु. 8,525/- इतके सेवा शुल्क वि.प.यांना अदा करुन देखील, तक्रारदारांचे फराळ वाया गेला. सबब, प्रस्तुत कामी सदरची सदोष सेवा देवून वि.प. यांनी अनुचित प्रथेचा अवलंब केला का ?हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्या अनुषंगाने तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदारांनी दि. 9-12-2015 रो वि.प.यांना सदरचे सदोष सेवा दिलेचे अनुषंगाने पत्र दाखल केलेले आहे. सदरचे पत्राअन्वये तक्रारदारांनी वि.प. यांचेविरुध्द लेखी तक्रार नोंदवीत आहे असे कथन केले आहे. तसेच दिवाळीचे पार्सल दि. 1-12-2015 रोजी भारतीय टपाल खातेव्दारे स्पीड पोस्टाने पाठविले असता, दि.8-12-2015 रोजी तक्रारदाराचे मुलांना पोहच झालेचे नमुद आहे. अ.क्र. 2 ला Consignment Note No. 2018406 व No. 2011835 दाखल आहे. सदर रिसीटवर Date 5-11-2015,Destination U. S. A. , Weight in Kg अनुक्रमे 6 Kg, 7Kg Total Charges Rs. 3,935/- व Rs. 4,590/- नमुद आहे. तसेच महाराष्ट्र टाईम्स कनेक्ट या वर्तमान पत्रातील तेज कुरियर्स मार्फत नवीन सेवा याची प्रत दाखल केलेली आहे. वरील सर्व कागदपत्रावरुन तकारदार यांनी वि.प. यांचे कुरियर सेवेमार्फत यु.एस.ए. येथे दि. 5-11-2015 रोजी 13 कि.ग्रॅ. वजनाचे फराळ सेवा शुल्क रक्कम रु. 8,525/-घेवून पाठविलेले होते. वि.प. यांनी सदरचे सेवा शुल्क तक्रारदार यांचेकडून स्विकारलेले असलेने त्याअनुषंगाने योग्य ती सेवा देणे वि.प. यांचेवर बंधनकारक होते.
वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये कुरियरमध्ये कोणती कागदपत्रे आहेत याची कोणतीही माहिती तक्रारदार यांनी कुरिअर कंपनीला दिली नव्हती. वि.प.यांनी सदरचे पार्सल 7 ते 8 दिवसांत पोहचतील असे सांगिेतलेले नव्हते व नाही. फराळ पाठविण्याचे दृष्टीने त्यामधील वापराचे घटक हे किमान महिनाभर व्यवस्थित रहावे ही जबाबदारी तक्रारदारांची होती. तक्रारदारांनी फराळ किती तारखेला तयार केला व किती दिवसांनी पार्सल म्हणून वि.प. यांचेकडे दिला याचा उल्लेख तक्रार अर्जामध्ये नाही.
वरील सर्व कागदपत्रावरुन, वि. प. यांनी तक्रारदार यांचेकडून सेवा शुल्क स्विकारलेले होते. वि.प. यांनी तक्रारदार यांचे साहित्य निश्चित स्वरुपाने तातडीचे दिलेल्या पत्यावर पोहोच होती याची हमी दिलेली होती. तक्रारदाराने दिवाळीचे फराळाचे पार्स दि. 1-12-2015 रोजी भारतीय टपाल खातेव्दारे स्पीड पोस्टाने पाठविले असता ते दि. 8-12-2015 रोजीची तक्रारदरांचे मुलाला पोहच झालेचे नमूद आहे. सदरची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. म्हणजेच सदरचे फराळाचे पार्सल योग्य मुदतीत तक्रारदारांचे मुलाला पोहच करणे ही वि.प. यांची जबाबदारी होती. तथापि सदरचा फराळ हा सतरा व अठरा दिवसाचे विलंबाने पोहचला. फराळ हा विलंबाने पोहचल्याची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. सदर विलंबामुळे तक्रारदाराचा फराळाचे साहित्य फेकून दयावे लागले. तक्रारदाराचे कष्ट व पैसे वाया गेले. सबब, या सर्व बाबींचा विचार करता, वि.प.यांनी तक्रारदाराचेकडून सेवा शुल्क स्विकारुन देखील फराळाचे साहित्य तक्रारदारांचे मुलांना योग्य वेळेत/मुदतीत न देवून तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
8) मुद्दा क्र. 2 व 3 –
उपरोक्त मुद्दा क्र. 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्तुत कामी दाखल कागदपत्रांवरुन वि. प. यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु. 8,525/- इतके सेवा शुल्क स्विकारलेले होते. तसेच सदरचे फराळाची किंमत रक्कम रु. 5,200/- सदरची रक्कम वि.प. नाकारलेली नाही. सबब, या सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून एकूण नुकसान भरपाई रक्कम रु. 13,725/- (रक्कम रुपये तेरा हजार सातशे पंचवीस फक्त) मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर बाबीमुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
9) मुद्दा क्र. 4 –
सबब, प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रु. 13,725/- (रक्कम रुपये तेरा हजार सातशे पंचवीस फक्त) अदा करावेत.
3) तक्रारदार यांना वि.प. यांनी मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/-(रक्कम रुपये तीन हजार फक्त) अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.