मा. सदस्या सौ. जयश्री येंडे यांचे कथनांन्वये.
-आदेश-
(पारित दिनांक : 28.09.2011)
1. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांनी अंदाजे रु.86,250/- किमतीची एकूण 115 बियाण्यांची पाकीटे म्हणजेच पाच पेटया मोसंटो होल्डींग प्रायव्हेट लिमिटेड द्वारा श्री. पारेख इंटिग्रीटी सर्व्हिसेस प्राय. लिमि., वळूज, औरंगाबाद यांना पाठविण्याकरीता गैरअर्जदार यांचेमार्फत त्यांच्या गांधीबाग कार्यालयात बूक केले. त्याचा डिलीव्हरी नोट क्र. 151 हा होता व सदर माल पाठविण्याचा मोबदल्यापोटी रु.776/- तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांना अदा केले. माल पाठविण्याची बुकींग तारीख ही 29.07.2010 ही होती. तसेच सदर माल बुक केल्याच्या तारखेपासून एका आठवडयाच्या आत निर्दिष्ट ठिकाणी पोहोचविण्याचे आश्वासन गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यास दिले होते.
सदर पाठविण्यात आलेला माल हा मोसांटो होल्डींग प्रायव्हेट लिमिटेड व तक्रारकर्ता यांच्यामध्ये झालेला विक्री कराराचा भाग होता. मालाची वापरण्याबाबत अंतिम मुदत ही 02.01.2011 व 26.10.2010 अशी होती जी की डिलीव्हरी नोटवर नोंदविण्यात आलेली होती. त्यामुळे सदर माल अंतिम मुदत संपण्याच्या आत विहित स्थळी पोहोचवीणे गरजेचे होते ही बाब गैरअर्जदार यांना माहिती होती. तक्रारकर्त्याने सदर माल पोहोचला अथवा नाही याकरीता तक्रारकर्त्याने तोंडी व प्रत्यक्ष भेटून चौकशी केली असता त्यांनी त्याबाबत भ्रमात ठेवले, म्हणून तक्रारकर्त्याने सदर माल पोहोचला असेल असे गृहित धरुन मोसांटो होल्डींग प्रायव्हेट लिमि.च्या दि.25.01.2011 रोजीच्या पत्राद्वारे सदर मालाच्या हीशोबाची मागणी केली, ती आजपावेतो पूर्ण झाली नाही. सदर मालाच्या डिलिव्हरी संबंधातील गोंधळ संपावा म्हणून तक्रारकर्त्याने दि.03.02.2011 रोजीच्या नोटीसद्वारे नुकसान भरपाईची मागणी केली. कारण मालचा वापर करण्याची अंतिम मुदत निघून गेल्यामुळे त्याची किंमत शुन्य झाली होती. गैरअर्जदार यांना नोटीस प्राप्त झाल्यावर त्यांनी त्यांचे प्रतिनीधी श्री. कुलदिप पुनियानी यांना तक्रारकर्त्याची भेट घेऊन संबंधीत बाबीमध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
मोसांटो होल्डींग प्रायव्हेट लिमि. यांनी तक्रारकर्त्याने पाठविलेल्या सदर पत्रास दि.04.03.2011 रोजीच्या पत्राच्या उत्तरात माल वापरण्याची अंतिम मुदत संपुष्टात आल्यानंतर सदर बुक केलेला माल संबंधित प्रतिष्ठानास पोहोचविण्यात आला, म्हणून ते प्रतिष्ठान तो माल सोडवित नाही असे कळविले. यावरुन गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याने बुक केलेला माल उशिरा पोहोचविल्यामुळे तक्रारकर्त्याच्या सदर मालाचा परतावा/किंमत मिळू शकली नाही. एवढेच नव्हे तर, गैरअर्जदारांनी सदर मालासंबंधिची परिस्थिती आजपावेतो तक्रारकर्त्यास कळविली नाही. ते गैरअर्जदार यांचे कर्तव्य होते. गैरअर्जदारांच्या सदर कृतीमुळे तक्रारकर्त्याचे नुकसान झाले व त्याकरीता मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन विविध शिर्षकांतर्गत एकूण रु.1,57,000/- ची मागणी केलेली आहे.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता, त्यांना नोटीस प्राप्त होऊनही, ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा लेखी उत्तरही दाखल केले नाही, म्हणून मंचाने दि.22.07.2011 रोजी गैरअर्जदाराविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
3. मंचाने प्रकरण युक्तीवादाकरीता आले असता तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरण तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज यांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. सदर प्रकरणातील एकंदर वस्तुस्थिती तसेच दस्तऐवज क्र. 1 व 2 वरील पावत्या पाहता या मंचाच्या असे निदर्शनास येते की, निर्विवादपणे तक्रारकर्त्याने दि.28.07.2010 रोजी बियाण्यांची एकूण 115 पॉकिटे (5 पेट्या) मोसांटो होल्डींग प्रायव्हेट लिमि., वळूज, औरंगाबाद यांना गैरअर्जदाराद्वारे पाठविण्याकरीता गैरअर्जदार यांच्या गांधीबाग कार्यालयात बुक केले, ज्याचा डिलीव्हरी नोट 151 (दस्तऐवज क्र. 1) होता व सदर सेवेसाठी तक्रारकर्त्याने मोबदल्यापोटी रु.773/- एवढी रक्कम गैरअर्जदार यांना अदा केलेली होती. बुकींग तारीख दि.29.07.2010 ही होती. तक्रारकर्त्याच्या शपथेवरील कथनावरुन सदर माल निर्दीष्ट ठिकाणी बुकींग तारखेपासून एक आठवडयाच्या आत पोहोचविण्याची हमी गैरअर्जदार यांनी घेतलेली होती असे दिसून येते.
5. सदर शपथपत्राात, कुरीयर बुकच्या डिलेव्हरी नोटमध्ये, तसेच डिलीव्हरी चलनावर सदर मालाच्या Expiry Date ही दि. 02.01.2011 व 26.12.2010 अशी अनुक्रमे नोंद केल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याच्या मते गैरअर्जदारांनी सदर मालाची निर्दिष्ट ठिकाणी आजपावेतो पोहोच केलेली नाही अथवा त्याबाबतीत माहीतीसुध्दा वारंवार विचारता करुनही तक्रारकर्त्यास कळविली नाही.
6. दस्तऐवज क्र. 11 वर दाखल दि.25.01.2011 च्या तक्रारकर्त्याने मोसांटो होल्डींग प्रायव्हेट लिमि.ला पाठविलेल्या पत्रावरुन तक्रारकर्त्याच्या सदर म्हणण्यास पुष्टी मिळते. तसेच सदर कंपनीने सदर पत्रास पाठविलेल्या दि.04.03.2011 च्या उत्तरावरुन (दस्तऐवज क्र. 8) असे निदर्शनास येते की, गैरअर्जदार कंपनीने, सदर माल खुप उशिरा व त्यातील काही माल 50 पॉकेट ती वापरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर दि.08.02.2011 रोजी पोहोचविल्यामुळे कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे सदर माल सोडविला नाही असे दिसून यते. तसेच दस्तऐवज 18 वरील पोस्ट ऑफिसच्या पत्रावरुन सदर मालाची डिलिव्हरी दि.07.02.2011 रोजी पत्यावर देण्यात आलेली होती असे दिसून येते. म्हणजेच विहित कालावधीपेक्षा ब-याच उशिरा काही मालाची एक्सपायरी डेट संपल्यावर डिलीव्हरी देण्यात आल्याचे निदर्शनास येते. तसेच सदर मालासंबंधी माहितीसुध्दा गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याला दिलेली नसल्याचे दिसून येते.
7. वरील वस्तुस्थिती पाहता हे मंच या निष्कर्षाप्रत येते की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांचा माल हा विहित ठिकाणी दिलेल्या मुदतीत न पोहोचविता खुप उशिरा पोहोचविला आहे. तसेच तक्रारकर्त्यांनी वारंवार संपर्क करुनही गैरअर्जदारांनी या संदर्भातील माहिती तक्रारकर्त्यास दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान झाले. ही गैरअर्जदार यांची कृती निश्चितच सेवेतील कमतरता आहे व त्यामुळे गैरअर्जदार तक्रारकर्त्यांच्या नुकसान भरपाईस जबाबदार आहेत. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या महाराष्ट्र राज्य आयोगाचा 2011 (1) सीपीआर 176 स्कायपॅक कुरीयर्स लिमि. वि. वर्टसिला डिझेल इंडिया लिमि. या निवाडयाचा आशय प्रस्तुत तक्रारीस लागू होतो.
8. दस्तऐवज क्र. 10 वरील गैरअर्जदार यांच्या पावतीवरुन तक्रारकर्त्याने 115 पॅकेटचे मुल्य रु.50,000/- घोषीत केलेले आहे. दस्तऐवज क्र. 8 वरुन मोसँटो कंपनीने सदर मालापैकी 50 पॅकेट स्विकारलेला नाही असे दिसून येते. घोषीत मुल्य व न स्विकारलेला पॅकेटचा विचार करता रु.21,739/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र राहील असे या मंचाचे मत आहे. तसेच तक्रारकर्त्याचा कुरीयरबाबत खर्च रु.773/- ग्राह्य धरण्यात येतो. तक्रारकर्त्याच्या इतर खर्चाच्या मागण्या पुराव्याअभावी मान्य करता येणार नाही. उपरोक्त निष्कर्षावरुन व दाखल दस्तऐवजावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला न स्विकारलेल्या मालाचे मुल्य रु.21,739/- द्यावे , तसेच कुरीयरचा खर्च रु.773/- द्यावा.
3) तक्रारीच्या खर्चाबाबत रु.3,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.