::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या )
(पारीत दिनांक–20 मे, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार उपरोक्त नमुद खाजगी फर्म तर्फे संचालक या नात्याने विरुध्दपक्ष क्रं-1) टाटा टेली सर्व्हीसेस, कार्यालय मुंबई आणि विरुध्दपक्ष क्रं-2) टाटा टेली सर्व्हीसेस कार्यालय नागपूर यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम 12 खाली दोषपूर्ण सेवा दिल्याचे आरोपा वरुन ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याची संक्षीप्त तक्रार खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा थ्रमेक्स इंडस्ट्रीयल ईक्विपमेंट लिमिटेड या फर्मचा संचालक आहे आणि सदर फर्म ही उद्दोगासाठी लागणारे सयंत्र आणि स्टील फ्रेब्रीकेशनचा व्यवसाय करते. तक्रारकर्त्याने सदर फर्म ही स्वतःचे उपजिविकेसाठी स्थापन केली आहे. विरुध्दपक्ष क्रं-2) तर्फे टाटा सेल्युलर सर्व्हीस संबधाने तक्रारकर्त्याला आश्वासित करण्यात आले की, ते चांगली सेवा ग्राहकांना प्रदान करतात. त्या नुसार तक्रारकर्त्याने मे-2012 मध्ये टाटा टेलीकॉम सर्व्हीस मिळण्यासाठी अर्ज केला. विरुध्दपक्ष क्रं 1) तर्फे तक्रारकर्त्याला कळविण्यात आले होते की, 1 लाईन व्दारे सेवा देणे शक्य होणार नाही त्याएवेजी 8 लाईन घेण्यात यावे, त्यानुसार तक्रारकर्त्याने 8 लाईनस घेण्यासाठी अर्ज केला व त्यासाठी जास्त भाडे देण्यास भाग पाडले. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 2 ने 8 वायरलेस लॅन्ड लाईन्स रॅक विथ एनईओएस डिजीटल इपीएबीएक्स सिस्टीम दिनांक-21.05.2012 रोजी तक्रारकर्त्याचे कार्यालयात स्थापीत केले. सदर
कनेक्शनचे अकाऊंट क्रमांक-982889314 असे असून त्याचे टेलीफोन क्रमांक-07104-646340 ते 47 असे आहेत. तक्रारकर्त्याने दिनांक-25/07/2012 ते 24/08/2012 कालावधीचे बिल भरले. परंतु ऑगस्ट, 2012 च्या शेवटच्या हप्त्या मध्ये मेन लाईन कनेक्शन क्रं-646340 चे काम करणे बंद पडले. तक्रारकर्त्याने त्वरीत दुरध्वनीव्दारे विरुध्दपक्ष क्रं 1 कडे तक्रार केली व त्याला तक्रार क्रमांक देण्यात आला. परंतु विरुध्दपक्ष क्रं 2 ने सदर दुरुस्तीसाठी येणा-या खर्चाची मागणी केली तेंव्हा तक्रारकर्त्याने वॉरन्टी कालावधीत बिघाड आल्याने तो खर्च देण्यास जबाबदार नाही असे सांगितले, त्यामुळे कनेक्शन दुरुस्तीसाठी 03 महिन्याचा अवधी लागला. विरुध्दपक्ष क्रं 1 तर्फे सदरचे कालावधीत दिलेली बिले तक्रारकर्त्याने स्विकारली नाहीत व तसे दुरध्वनी व ईमेल व्दारे कळविले. तक्रारकर्त्याचा मुख्य मेन लाईन कनेक्शन क्रं-646340 नादुरुस्त होता, तक्रारकर्त्याचे व्यवसायाचे सर्वच दस्तऐवजांवर मुख्य मेन लाईन् कनेक्शन नमुद असल्यामुळे त्याचे बहुतांश ग्राहक त्याचेशी संपर्क साधू शकले नाहीत, त्यामुळे त्याला व्यवसायाशी संबधीत ऑर्डरस न मिळाल्यामुळे त्याचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाशी दिनांक-27.09.2012 आणि दिनांक-18.10.2012 रोजी ईमेल व्दारे त्याचा मुख्य लाईन क्रमांक टर्मीनल प्रॉब्लम मुळे बंद असल्याचे कळवून तो बदलवून द्दावा अशी विनंती केली अथवा मुख्य लाईन वरचे सर्व कॉल्स हे दुस-या क्रमांकांवर (07104-646341-42-43) वर स्थानांतरीत करण्यात यावेत. परंतु विरुध्दपक्षा तर्फे प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारकर्त्याने दिनांक-18/10/2012 रोजीच्या ईमेल व्दारे विरुध्दपक्ष क्रं 2 ला कळविले की, त्याचे व्यवसायाचे सर्व दस्तऐवजांवर संपर्क साधण्यासाठी जो मुख्य क्रमांक दिलेला आहे, तो मागील दोन महिन्यां पासून बंद आहे. परंतु विरुध्दपक्षाने मुख्य लाईन वरुन ग्राहकांचे आलेले दुरध्वनी कॉल्स हे दुस-या लाईनवर ट्रान्सफर विनंती करुनही करुन दिले नाही, त्यामुळे ग्राहकांना तक्रारकर्त्याशी संपर्क साधता येत नव्हता परंतु विरुध्दपक्षा तर्फे कॉल फॉरवर्ड
फॅसेलिटी ही सक्रीय (Not activated) नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतरही तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 ला ई मेल व्दारे त्याची मुख्य लाईन बंद असल्याचे कळविले परंतु विरुध्दपक्षाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. मुख्य लाईनचा टर्मीनल हा योग्य काम करीत नव्हता, त्यामुळे तो दुरुस्त करुन द्दावा अशी अनेकदा विनंती करुनही प्रतिसाद मिळाला नाही उलट विरुध्दपक्षाने बंद असलेला कालावधी दिनांक-25.08.2012 ते दिनांक-24.09.2012 या कालावधीचे बिल पाठविले, जे चुकीचे व गैरकायदेशीर आहे कारण तक्रारकर्त्या कडील दुरध्वनी सदरचे कालावधीत एकही दिवसा करीता चालू नव्हता. परंतु त्यानंतरही विरुध्दपक्षा तर्फे दिनांक-25.09.2012 ते 24.10.2012 आणि दिनांक-25.10.2012 ते 24.11.2012 या कालावधीचे बंद असलेल्या कनेक्शनचे बिल देणे चालूच ठेवण्यात आले आणि त्यानंतर बिले भरली नाहीत असे कारण पुढे करुन विरुध्दपक्षाने डिसेंबर-20121 मध्ये सदर दुरध्वनीची सेवा बंद केली. कोणतीही सेवा न देता दुरध्वनी बंद असलेल्या कालावधी करीता बिल आकारुन त्याची मागणी करणे ही बाब न्यायसंगत नसून अन्याय करणारी आहे. तक्रारकर्त्याची मुख्य दुरध्वनीची सेवा बंद असल्या बाबतची तक्रार विरुध्दपक्षा तर्फे नोंदवूनही व त्यांना दुरध्वनी बंद असल्याची संपूर्ण कल्पना असयूनही त्यांनी फेब्रुवारी-2013 या कालावधीचे रुपये-16,909/- एवढया रकमेचे बिल तक्रारकर्त्याला पाठविले. तक्रारकर्त्याचा दुरध्वनी ब-याच प्रदिर्घ कालावधी करीता बंद असताना बंद कालावधीचे देयक विरुध्दपक्षानीं पाठविणे जे त्यांचे गैरकायदेशीर कृत्यू आहे. वस्तुतः विरुध्दपक्षाने तो दुरध्वनी दुरुस्त करणे आवश्यक होते. तक्रारकर्त्याने त्याचे अधिवक्ता श्री बांगडे यांचे मार्फतीने विरुध्दपक्षाना नोटीस पाठवून त्याला पाठविलेली चुकीची दुरध्वनी देयके रद्द करण्याची मागणी केली परंतु नोटीस मिळूनही कोणताही प्रतिसाद दिला नाही तसेच नादुरुस्त दुरध्वनी सेवा दुरुस्त करुन दिली नाही. विरुध्दपक्षांचे दोषपूर्ण सेवे मुळे तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून तक्रारी करुनही त्याला प्रतिसाद न
देणे, बंद असलेल्या कालावधी करीता बिले पाठवून रकमेची मागणी करणे हा सर्व प्रकार विरुध्दपक्षा तर्फे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या मध्ये मोडतो, म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्षां विरुध्द खालील मागण्या केल्यात-
(1) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे मुख्य दुरध्वनीची बंद सेवा वॉरन्टी कालावधी असताना सुध्दा दुरुस्त करुन दिली नाही, इतकेच नव्हे तर मुख्य दुरध्वनीवरील टेलीफोन कॉल्स दुस-या लाईन्सवर ट्रान्सफर सुध्दा करुन दिले नाही आणि बंद असलेल्या कालावधी करीता बिले पाठवून दुरध्वनी सेवा खंडीत केली विरुध्दपक्षाचा हा सर्व प्रकार गैरकायदेशीर आणि दिलेली दोषपूर्ण सेवा म्हणून घोषीत करण्यात यावा.
(2) दुरध्वनी सेवा बंद असलेल्या कालावधीत पाठविलेली बिले, त्यावर आकारलेला दंड आणि व्याज हे सर्व गैरकायदेशीर असल्याने ती बिले रद्द करण्यात यावीत.
(3) तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासा बद्दल विरुध्दपक्षां कडून रुपये-2,00,000/- नुकसान भरपाई मिळावी.
03. विरुध्दपक्षां तर्फे लेखी उत्तर मंचा समक्ष सादर करण्यात आले. त्यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक होऊ शकत नाही. तक्रारकर्ता हा फर्मचा संचालक असून फर्मचे नावे एकूण 08 लॅन्ड लाईन कनेक्शनस देण्यात आले आणि तक्रारकर्ता हा त्या कनेक्शनचा उपयोग व्यवसायासाठी करत असल्याने तो व्यवसायिक हेतू या मध्ये मोडतो आणि त्यामुळे तक्रार ग्राहक संरक्षण कायद्दा अंतर्गत व्यवसायिक हेतू असल्याने मंचा समक्ष चालू शकत नसल्याने ती खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने खोटी तक्रार केलेली असून त्याने दिलेली बिले न भरल्याने त्याचे दुरध्वनी कनेक्शन खंडीत करण्यात आले होते. ऑगस्ट 2012 मध्ये कनेक्शन बंद पडले होते असे जे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे ते चुकीचे व खोटे आहे तक्रारकर्त्याने दिनांक-24 नोव्हेंबर, 2012 पर्यंत बिल भरले नव्हते. सर्व कनेक्शन हे एकाच लेखा क्रमांका वरुन देण्यात येतात आणि एका कनेक्शनचे बिल जरी भरले नाही तर सर्व कनेक्शनची सेवा खंडीत होते. तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार नामंजूर असून त्याने योग्य तो पुरावा दाखल करावा. तक्रारकर्त्याला एकूण 08 कनेक्शनस देण्यात आले होते ज्यांचे क्रमांक-07104-646340 ते 47 असे असून या सर्व कनेक्शन साठी एकच लेखा क्रमांक देण्यात आला असून त्याचा लेखा क्रमांक-982889314 असा आहे. तक्रारकर्ता हा सदर कनेक्शनचा उपयोग स्वतःचे उदरनिर्वाहा करीता करतो हे म्हणणे अमान्य करण्यात येते. तक्रारकर्त्याचे लेटर हेड वर सर्व दुरध्वनी कनेक्शनचे क्रमांक नमुद आहेत. तक्रारकर्त्याने दिनांक-24/08/2012 पर्यंत बिल भरले. परंतु ऑगस्ट, 2012 मध्ये त्याचे मुख्य लाईनचा क्रमांक-646340 काम करणे बंद केले हे विधान अमान्य करण्यात येते. तक्रारकर्त्याने त्यांचे कडे बंद असलेल्या लाईन बाबत तक्रार केलेली नाही. तीन महिन्या नंतर बंद कनेक्शनची दुरुस्ती करण्यात आली हे विधान अमान्य केले. तक्रारकर्त्याने दुरध्वनीचे बिल न दिल्यामुळे त्याची सेवा खंडीत करण्यात आली. तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार नामंजूर करुन ती खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षा तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर आणि प्रकरणातील दाखल दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. तसेच दोन्ही पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
::निष्कर्ष::
05. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून दुरध्वनी सेवा घेतलेली असून दिनांक- 21.05.2012 रोजी तक्रारकर्त्याचे कार्यालयात एकूण 08 कनेक्शन्स विरुध्दपक्षा तर्फे स्थापीत केले. सदर कनेक्शनस जरी एका पेक्षा जास्त असले तरी त्यांचा अकाऊंट क्रमांक-982889314 एकच आहे, त्या टेलीफोनचे
क्रमांक-07104-646340 ते 47 असे आहेत. तक्रारकर्त्याने दिनांक-25/07/2012 ते 24/08/2012 कालावधीचे बिल भरले ही वस्तुस्थिती उभय पक्षांना मान्य आहे.
06. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याचे मुख्य लाईन कनेक्शन क्रं-646340 ऑगस्ट, 2012 च्या शेवटच्या हप्त्या मध्ये काम करणे बंद पडले, या बाबत त्याने दुरध्वनी वरुन तसेच ईमेल व्दारे विरुध्दपक्षांकडे सतत तक्रारी केल्यात, परंतु प्रतिसाद मिळाला नाही, त्याच्या मुख्य लाईन वरील कॉल्स त्याच्या अन्य लाईनवर ट्रान्सफर करण्याची त्याने विनंती करुनही त्याकडे विरुध्दपक्षाने कोणतेही लक्ष दिले नाही, त्याच्या व्यवसायाचे दस्तऐवजांवर त्याचेशी संपर्क करण्यासाठी मुख्य दुरध्वनी क्रमांक नमुद केला असल्याने जवळपास 03 महिने सदर कनेक्शन बंद पडल्याने त्याचे ग्राहकांना त्याचेशी संपर्क साधता न आल्याने त्याला मालाच्या ऑर्डर न मिळाल्याने त्याचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले, तसेच बंद असलेल्या कालावधीत न वापरलेल्या दुरध्वनी सेवांची देयके विरुध्दपक्षां तर्फे त्याला पाठविण्यात आलीत विरुध्दपक्षाचा हा सर्व प्रकार दोषपूर्ण सेवेमध्ये आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या मध्ये मोडतो. विरुध्दपक्षाने बिल न भरल्याचे कारणा वरुन पुढे त्याची दुरध्वनी सेवा खंडीत केली.
07. तक्रारकर्त्याने आपल्या उपरोक्त म्हणण्याचे पुराव्यार्थ त्याने विरुध्दपक्षा कडे दिनांक-18/10/2012 रोजी केलेल्या ईमेलची प्रत, विरुध्दपक्षाने दिनांक-27/09/2013 रोजी दिलेले उत्तर, विरुध्दपक्षा तर्फे तक्रारकर्त्याला माहे सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर 2012 आणि दिनांक-09/03/2013 या बंद कालावधीत पाठविलेल्या देयकांच्या प्रती, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षानां पाठविलेली कायदेशीर नोटीस अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात यावरुन तक्रारकर्त्याचे तक्रारीतील मजकूराला पुष्टी मिळते.
08. या उलट विरुध्दपक्षा तर्फे तक्रारकर्त्याचे आरोप नामंजूर करण्यात आलेले आहेत परंतु सदर आरोप का नामंजूर आहेत या संबधाने कोणताही पुरावा दाखल केला नाही. विरुध्दपक्षाने लेखी उत्तरात तक्रारकर्त्याने एकूण 08 लॅन्ड लाईन कनेक्शन त्यांचे कडून घेतले असून तो त्या कनेक्शनचा उपयोग स्वतःचे व्यवसायी वापरत असल्याने त्याचा उपयोग व्यवसायिक सेवे मध्ये मोडत असल्याने त्याची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्दा अंतर्गत चालू शकत नसल्याचा मुख्य आक्षेप घेतलेला आहे तसेच तक्रारकर्ता हा उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करतो हे विधान नाकारलेले आहे.
09. या संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून काही वस्तु वा सेवा घेतली असेल आणि त्याचे पुर्नविक्रीतून तो जर नफा कमावित असेल तर अशी घेतलेली वस्तु व सेवा ही व्यवसायिक उपयोगा अंतर्गत येत असते. परंतु या प्रकरणात तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून घेतलेल्या 08 लॅन्ड लाईनचा उपयोग तो त्याच्या फर्मच्या व्यवहारा करीता करीत असल्याने त्याची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्दा अंतर्गत चालू शकते तसेच तक्रारकर्त्याने तो व्यवसाय उदरनिर्वाहा करीता करीत असल्याचे नमुद केलेले आहे त्यामुळे विरुध्दपक्षाचे उपरोक्त आक्षेपात मंचाला कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
10. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याचे मुख्य दुरध्वनी कनेक्शन ऑगस्ट, 2012 चे शेवटचे हप्त्या मध्ये बंद पडले परंतु त्यानंतर अनेदा ई मेल वर संपर्क साधूनही जवळपास ते 03 महिने नादुरुस्त होते, तक्रारकर्त्याचे हे विधान विरुध्दपक्षा तर्फे फक्त नाकारण्यात आलेले आहे परंतु तक्रारकर्त्याचे तक्रारी नंतर त्यांनी काय कारवाई केली या संबधी कोणतेही स्पष्टीकरण व पुरावा दिलेला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याचे मुख्य कनेक्शन ऑगस्ट, 2012 पासून बंद होते हे विधान सिध्द होते आणि त्यानंतर बंद असलेल्या कालावधीची देयके पाठविणे ही विरुध्दपक्षा तर्फे दिलेली दोषपूर्ण सेवा आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या प्रकारात मोडते, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्षां विरुध्द मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे, त्यावरुन मंच प्रस्तुत तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(1) तक्रारकर्ता थ्रेम-एक्स इंडस्ट्रीयल ईक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक श्री जोसेफ थॉक्स यांची विरुध्दपक्ष क्रं-1) टाटा टेली सर्व्हीसेस महाराष्ट्र लिमिटेड कार्यालय मुंबई आणि विरुध्दपक्ष क्रं-2) टाटा टेली सर्व्हीसेस महाराष्ट्र लिमिटेड, नागपूर यांचे विरुध्दची तक्रार “वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या” अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्षानां आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला दिलेले लॅन्ड लाईन टेलीफोन क्रमांक-07104-646340 ते 47 ज्याची सेवा ऑगस्ट, 2012 मध्ये बंद पडली असल्याने बंद पडलेल्या कालावधी नंतर तक्रारकर्त्याला दिलेली सर्व देयके या आदेशान्वये रद्द करण्यात येतात. विरुध्दपक्षांना असेही आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्त्या कडील लॅन्ड लाईन कनेक्शन नादुरुस्त असल्यास ते त्वरीत दुरुस्त करुन देऊन भविष्यात योग्य ती सेवा द्दावी व लॅन्ड लाईनची सेवा योग्य असल्या बाबत तक्रारकर्त्या कडून लेखी घ्यावे.
(3) विरुध्दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रार खर्च व नोटीस खर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास द्दावेत.
(4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांनी “वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या” निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांक पासून 30 दिवसांच्या आत करावे.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.