तक्रारदार :स्वतः हजर.
सामनेवाले क्र.1 : वकील श्री.जोशी मार्फत हजर.
सामनेवाले क्र.2 : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1.सा.वाले क्र.1 हे भ्रमणध्वनी संचाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविणारी कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 यांचे अधिकारी आहेत. यापुढे दोन्ही सा.वाले यांना एकत्रितपणे केवळ सा.वाले असे संबोधिले जाईल.
2. तक्रारदार हे सा.वाले यांनी पुरविलेल्या भ्रमणध्वनी संच यामध्ये 9222163678 या क्रमांकाचे सिमकार्ड हे त्या भ्रमणध्वनी संचामध्ये वापरत होते. तक्रारदार हे प्रिपेड पध्दतीने पैसे जमा करण्याची सुविधा स्विकारत होते.
3. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून तक्रारदारांच्या भ्रमणध्वनी संचावर दिनांक 30.1.2009 रोजी 8.54 मिनिटांनी एक एस.एम.एस. प्राप्त झाला ज्यामध्ये पुढील संदेश होता.
“ Jyada hai to behtar hai AB 175/- ke E-Recharge par
payiya Rs. 275/- ka talktime, jaldi kijiye, Yeh avsar
sirf aaj ke din tak simit hai. Turanth Recharge Karein
Message from: Tata Indicom.”
या संदेशाप्रमाणे तक्रारदारांनी त्या योजनेचा फायदा घेण्याचे ठरविले व तक्रारदार यांनी त्याच दिवशी म्हणजे दिनांक 30.1.2009 रोजी दुपारी 4.30 वाजता 175/- सा.वाले यांच्या सुविधा केंद्रामध्ये जमा केले. जेणेकरुन तक्रारदारांना रु.175/- च्या किंमतीमध्ये 275/- चा टॉक टाईम प्राप्त होईल. तक्रारदारांना त्याच दिवशी 4.46 मिनिटांनी सा.वाले यांचेकडून एस.एम.एस. पाठवून दिला व रु.175/- चे रिचार्ज यशस्वीपणे स्विकारे आहे व तक्रारदारांचा शिल्लक टॉक टाईम रु.48.07 असा आहे अशी सूचना मिळाली.
4. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदारांचा शिल्लक टॉक टाईम रु.48.07 होता व त्यामध्ये रु.175/- चा टॉक टाईम जमा झाल्यानंतर तो रु.223.07 असे दाखविणे जरुरी होते. तथापी तक्रारदारांकडे प्राप्त झालेल्या संदेशानुसार त्यांचा शिल्लक टॉक टाईम 48.07 असा होता.
5. तक्रारदारांचे पुढे असे कथन आहे की, वरील त्रृटी दूर करण्याचे दृष्टीने तक्रारदार सा.वाले यांचे सुविधा केंद्रामध्ये गेले व त्यांनी सा.वाले यांचे अधिका-यांना ही बाब सांगीतली. व सा.वाले यांचे अधिका-यांनी तक्रारदारांना एका अन्य सुविधा केंद्राला भेट देण्यास सल्ला दिला. त्या प्रमाणे तक्रारदार लोखंडावाला येथील सुविधा केंद्र/दुकान तिथे देखील त्यांनी आपली तक्रार सांगीतली. त्यानंतर सा.वाले यांच्या अधिका-यांच्या सूचनेवरुन तक्रारदार यांना तुर्भे येथे जाण्यास सांगण्यात आले. दरम्यान सा.वाले यांचेकडून तक्रारदारांना मागील तारखेमध्ये म्हणजे दिनांक 31.1.2009 चे तारखेमध्ये एक संदेश प्राप्त झाला व त्यामध्ये टॉक टाईमच्या वापराकरीता एक महीना मुदत राहील असे नमुद करण्यात आलेले होते. तक्रारदार यांनी तुर्भे येथे भेट देऊन देखील काही उपयोग झाला नाही. अंतीमतः तक्रारदारांनी दिनांक 11.2.2009 रोजी सा.वाले यांना पत्र दिले व तक्रारदारांची भ्रमणध्वनीची सुविधा बंद करण्यात यावी असे सूचविले. त्याप्रमाणे दिनांक 16.2.2009 पासून सा.वाले यांनी भ्रमणध्वनी सूविधा बंद केली.
6. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.175/- मध्ये रु.275/- चा टॉक टाईम उपलब्ध होईल असे भासविले या वरुन तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे रु175/- जमा केले. परंतु त्यांना रु.275/- चा टॉक टाईम देण्यात आलेला नाही. व त्यानंतर एक महिन्याची मुदत असणारा मागील तारखेचा संदेश तक्रारदारांना सा.वाले यांनी पाठविला व तक्रारदारांची फसवणूक केली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. वरील प्रकारचा आरोप करुन तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाईची मागणी केली.
7. सा.वाले यांनी हजर होऊन आपले कैफीयतीचे शपथपत्र दाखल केले. व त्यामध्ये तक्रारदारांनी दिनांक 30.1.2009 रोजी रु.175/- जमा केल्यानंतर रु.275/- टॉक टाईम मिळेल असा संदेश पाठविण्यात आलेला होता ही बाब मान्य केली. सा.वाले यांच्या कथना प्रमाणे पहिल्या संदेशामध्ये नजर चूकीने वरील जादा टॉक टाईम वापरण्याची मुदत एक महिन्याची राहील ही बाब नमुद करण्याचे राहून गेल्याने दुरुस्त संदेश
दुस-या दिवशी म्हणजे दिनांक 31.1.2009 रोजी पाठविण्यात आला. व त्यामध्ये एका महिन्याची मुदत नमुद करण्यात आली होती. सा.वाले यांच्या कथना प्रमाणे सा.वाले यांनी जाणीवपूर्वक तक्रारदारांकडे खोटा संदेश पाठविला नाही अथवा त्यांना फसविण्याचे प्रयत्न देखील केलेले नाही.
8. सा.वाले यांनी पुढे असे कथन केले की, तक्रारदारांना देऊ केलेला जादा रु275/- चा टॉक टाईम तक्रारदारांच्या खात्यामध्ये प्रमोशनल 6 या योजनेअंतर्गत जमा करण्यात आला. व तक्रारदारांनी त्या टॉक टाईमचा
ब-याचपैकी वापर केला. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांची फसवणूक केली नाही व अनुचित प्रथेचा अवलंब केलेला नाही या स्वरुपाचे कथन सा.वाले यांनी केले.
9. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तसेच कागदपत्रे दाखल केली. दोन्ही बाजुचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
10. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, व कागदपत्रे यांचे वाचन केले. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. |
मुद्दे |
उत्तर |
1 |
सा.वाले यांनी तक्रारदारांना भ्रमणध्वनी संचाचे संदर्भात अनुचित प्रथेचा अवलंब करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? |
होय. |
2 |
तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? |
होय.रु.15,000/- |
3. |
अंतीम आदेश ? |
तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
11. तक्रारदार हे सा.वाले यांनी पुरविलेला भ्रमणध्वनी संच व सिमकार्ड वापरत होते. व प्रिपेड पध्दतीने पैसे जमा करुन उपलब्ध टॉक टाईमचा वापर करीत होते. तक्रारदारांना दिनांक 30.1.2009 रोजी न्याय निर्णयाचे वरील भागात उधृत करण्यात आलेला हिंदी भाषेमधील एस.एम.एस. प्राप्त झाला या बद्दल वाद नाही. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये तो एस.एम.एस. पाठविण्यात आलेला होता ही बाब मान्य केलेली आहे. तक्रारदारांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र.4 मध्ये नमुद केलेल्या एस.एम.एस.चे काळजीपूर्वक वाचन केले असताना असे दिसून येते की, ग्राहकांनी रु.175/- जमा केल्यानंतर त्यांना रु.275/- चा टॉक टाईम उपलब्ध होईल अशा स्वरुपाची ती जाहीरात होती. व तसा एस.एम.एस.पाठविण्यात आलेला होता.
12. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, त्या प्रमाणे तक्रारदारांनी त्याच दिवशी दुपारी 4.30 वाजता अंधेरी ( पश्चिम ) जाऊन सा.वाले यांच्या एजंटकडे जमा केले व त्याच दिवशी काही मिनिटानंतर म्हणजे 4.46 मिनिटांनी एक एस.एम.एस. प्राप्त झाला. त्यामध्ये रु.175/- चे रिचार्ज यशस्वी झाले ही बाब नमुद होती. तथापी तो संदेश जो 4.46 मिनिटांनी प्राप्त झालेला होता त्यामध्ये शिल्लक टॉक टाईम रु.48.07 आहे असे नमुद होते. वास्तविक पहाता रु.175/- हे तक्रारदारांनी सा.वाले यांचे एजंटकडे दिनांक 30.1.2009 च्या एस.एम.एस. प्रमाणे जमा केल्यानंतर त्यांचा शिल्लक टॉकटाईम रु.275/- वाढऊन मिळणे आवश्यक होते. परंतु दिनांक 30.1.2009 रोजीच्या 4.46 मिनिटांनी प्राप्त झालेलया एस.एम.एस. वरुन असे दिसते की, शिल्लक टॉक टाईम केवळ रु. 48.07 असा दाखविण्यात आलेला होता. तक्रारदारांची फसवणूक झालेली आहे ही बाब तक्रारदारांच्या लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांच्या सुविधा केंद्रामध्ये धाव घेतली व आपली तक्रार सांगीतली. तक्रारदारांना त्यानंतर सा.वाले यांच्या लोखंडवाला येथील दुकानामध्ये जाण्यास सांगण्यात आले. तक्रारदारांनी लोखंडवाला येथील दुकानामध्ये भेट दिल्यानंतर त्यांना कुठलीही दाद मिळाली नाही. त्यानंतर तक्रारदारांना तुर्भे येथील सुविधा केंद्रात
भेट देण्यास सांगण्यात आले. अंधेरी ते तुर्भे हा प्रवास 20 किलोमिटरचा असा आहे. तक्रारदारांनी तुर्भे येथील सुविधा केंद्रात भेट देऊनसुध्दा त्यांना निच्छित आश्वासन मिळाले नाही. तक्रारदारांनी वेगवेगळया सुविधा केंद्रात हेलपाटे मारल्या बद्दल व आपले गा-हाणे सा.वाले यांचे अधिका-यांकडे सांगीतल्या बद्दलचे जे तक्रारीत कथन आहे, तसेच पोलीसांकडे दिलेली तक्रार दिनांक 3.2.2009 तसेच सा.वाले यांना पाठविलेले पत्र दिनांक 11.2.2009 व कायदेशीर नोटीस दिनांक 12.3.2009 यातील मजकूरावरुन पुष्टी मिळते. तक्रारदारांनी नाइलाजाने दिनांक 11.2.2009 च्या पत्राप्रमाणे भ्रमणध्वनीची सुविधा बंद करण्यात यावी असे सा.वाले यांना सूचविले व सा.वाले यांनी दिनांक 16.2.2009 पासून त्यांची सुविधा बंद केली असे तक्रारदारांचे कथन आहे.
13. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे कथन केलेले आहे की, तक्रारदारांनी रु.175/- जमा केल्यानंतर त्यांनी रु.275/- चा टॉक टाईम दिनांक 30.1.2009 च्या एस.एम.एस.प्रमाणे देण्यात आलेला होता व तो तक्रारदारांच्या प्रमोशनल 6 या खात्यात जमा करण्यात आलेला होता. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत निशाणी-1 येथे तक्रारदारांचा भ्रमणध्वनीसंच क्रमांक 9222163678 या क्रमाकांचे भ्रमणध्वनी संचामध्ये दिनांक 30.1.2009 रोजी दुपारी 4.46 मिनिटांनी प्रमोशनल 6 या खात्यामध्ये रु.275/- जमा केल्याबद्दलची नोंद आहे. त्या खात्यातील नोंदी असे दर्शवितात की, तक्रारदारांनी रु.275/- पैकी काही रक्कमेच्या टॉक टाईमचा उपयोग केला व दिनांक 2.3.2009 रोजी रु.275/-पैकी रु.216/- शिल्लक होते. या प्रमाणे रु.275/- चा टॉक टाईम सा.वाले यांनी दिलेला नाही या तक्रारदारांच्या कथनात तथ्य आहे असे दिसून येत नाही व तो टॉक टाईम सा.वाले यांनी तक्रारदारांच्या खात्यामध्ये जमा केला होता असे दिसून येते.
14. तक्रारदारांची मुख्य तक्रार अशी आहे की, दिनांक 30.1.2009 च्या एस.एम.एस.मध्ये रु.175/- जमा रक्कमेवर उपलब्ध होणारा रु.275/- चा टॉक टाईम वापरण्याकरीता एक महीन्याची मुदत राहील अशी अट नव्हती. किंबहुना तशी अट नसल्यामुळे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे रु.175/- जमा केले व ते रु.275/- टॉक टाईमची प्रतिक्षा करीत होते. सा.वाले यांनी तक्रारदारांना जर पहीला एस.एम.एस. मध्ये उपलब्ध होणारा ज्यादा टॉक टाईम वापरणेकामी मुदत केवळ एका महीन्याची राहील असे नमुद केले असते तर तक्रारदारांची कदाचित त्या जाहीरातीप्रमाणे सा.वाले यांचेकडे रु.175/- जमा देखील केले नसते. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, ते भ्रमणध्वनीचा वापर अतिशय कमी करत असत व त्यांचा मासीक वापर रु.100/- पेक्षा कमी होता. सा.वाले यांनी तक्रारदारांच्या भ्रमणध्वनी खात्याचा उतारा कैफीयतीसोबत दाखल केलेला आहे. त्यातील नोंदी असे दर्शवितात की, तक्रारदार हे आपल्या भ्रमणध्वनी संचाचा वापर अतिशय कमी कालावधीकरीता करत व अतिशय जपुन करीत होते. सा.वाले यांनी आपल्या बचावाकरीता कैफीयतीमध्ये असे कथन केलेले आहे की, ज्यादा टॉक टाईम वापरण्याची एका महीन्याची मुदत नजर चुकीने दिनांक 30.1.2009 म्हणजे पहील्या एस.एम.एस.मध्ये देण्याचे राहून गेले व ती चूक मागाऊन पाठविलेल्या एस.एम.एस.मध्ये दुरुस्त करण्यात आलेली आहे. या उलट तक्रारदारांचे असे कथन आहे की, दुरुस्त एस.एम.एस. लगेचच प्राप्त झाला नाही तर तो मागाऊन उशिराने परंतु अलीकडेचे तारखेमध्ये पाठविण्यात आलेला आहे. सा.वाले यांना पहिल्या एस.एम.एस.मध्ये लगेचच चुक लक्षात आली असती तर त्यांनी तक्रारदारांना तसा माफी वजा एस.एम.एस. पाठविणे आवश्यक होते. येवढेच नव्हेतर जमा रक्कम रु.175/- परत करण्याची तंयारी दर्शविणे आवश्यक होते. परंतु सा.वाले यांनी त्या प्रकारची कुठलीही कृती केल्याचे दिसून येत नाही. दरम्यानच्या काळामध्ये तक्रारदार सा.वाले यांचे सुविधा केंद्र लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी , तुर्भे येथील सुविधा केंद्राला भेटी देऊन आले. परंतु तक्रारदारांना निच्छित असे आश्वासन देण्यात आलेले नाही व तक्रारदारांचे समाधान झाले नाही. दरम्यान तक्रारदारांनी पोलीसांकडे तक्रार दाखल केली. अंतीमतः तक्रारदारांनी नाईलाजाने दिनांक 9.2.2009 रोजी सा.वाले यांना पत्र दिले र्भमणध्वनीची सुविधा बंद करण्याची सूचना केली.
15. वरील सर्व घटनाक्रम असे दर्शवितो की, सा.वाले यांनी तक्रारदारांना चुकीचा एस.एम.एस. दिनांक 30.1.2009 रोजी पाठविला जेणेकरुन तक्रारदार रु.175/- चा टॉक टाईम खरेदी करण्यास आकृष्ट होतील व त्यानंतर तक्रारदारांनी पैसे जमा केल्यानंतर एक महिन्याची मुदत दिलेला दुसरा एस.एम.एस. सा.वाले यांनी तक्रारदारांना पाठविला. या प्रकारे तक्रारदारांची फसवणूक केली. सा.वाले यांची वरील वर्तणूक ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1) (r) मधील II व VI प्रमाणे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणे असे दर्शविते. प्रमाणे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणे असे दर्शविते. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये मानसिक त्रास, गैरसोय, व खर्च याची एकत्रित मागणी केलेली आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई बद्दल रु.15,000/- विशिष्ट मुदतीत अदा करावेत असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
16. मा.सर्वोच्च न्यायालयाने जनरल मॅनेजर, टेलीकॉप विरुध्द एम.कृष्णन आणि इतर CIVIL APPEAL NO. 7987/2004 न्याय निर्णय निकाल दिनांक 1.9.2009 प्रमाणे बिला बद्दल वाद असेल तर टेलीग्राफ कायद्याच्या कलम 7 ब प्रमाणे लवादाकडे प्रकरणे सोपविणे आवश्यक असते. परंतु प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये अथवा लेखी युक्तीवादामध्ये तसा आक्षेप घेतलेला नाही. व त्या मुद्यावर प्रस्तुत मंचाच्या कार्यक्षेत्रास आव्हान दिलेले नाही. सबब तो मुद्दा प्रस्तुत मंचाने विचारात घेतलेला नाही.
16. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 54/2011 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना भ्रमणध्वनी संचाचे संदर्भात अनुचित प्रथेचा अवलंब करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई बद्दल रु.15,000/- असा करावेत आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
4. सामनेवाले यांनी वरील आदेशाची पुर्तता आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून 8 आठवडयाचे आत करावी. अन्यथा मुदत संपल्यापासून सदरहू रक्कमेवर 9 टक्के दराने व्याज अदा करावे असाही आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 01/04/2013