::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 16/03/2016 )
आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .
तक्रारकर्त्याला त्याच्या लग्नामध्ये 32 इंची सॅन्सूई कंपनीचा एलसीडी टीव्ही भेट मिळाला होता व सदर टीवी तक्रारकर्त्याने स्वत:च्या राहत्या घरी भिंतीवर लावला होता. तक्रारकर्त्याने दि. 19/10/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 3 कडे रु. 2140/- चा भरणा करुन टाटास्कायची डीटीएच सेवा घेतली. त्यानंतर दि. 20/10/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याच्या घरी दोन व्यक्ती, डीटीएच ची डिश घरावर बसविण्यासाठी व सदर यंत्रणा टीव्हीला जोडून देण्यासाठी पाठविले. त्यापैकी एका व्यक्तीने घराच्या भिंतीवर चढून डीशचे फिटींग केले व दुसऱ्या व्यक्तीने घरात टीव्ही असलेल्या खोलीत सेटटॉप बॉक्सचे कनेक्शन टीव्हीला जोडण्यासाठी तीन फुट उंचीवर भिंतीवर लावलेला सदर टीव्ही खाली उतरविला व सेटटॉप बॉक्सची जोडणी टीव्हीला झाल्यानंतर सदरहू टीव्ही पहीले होता त्याच ठिकाणी माउंट केला. त्यानंतर सदर डीटीएचचे ॲक्टीवेशन बाबत डेमो चालू केला. परंतु ॲक्टीवेशन झाले नव्हते. सदर दोन्ही व्यक्तींनी तुम्ही टीवी पाहत राहा त्याचे ॲक्टीवेशन थोड्याच वेळात होईल, असे सांगीतले व अत्यंत घाईने व निष्काळजीपणे आपले काम अर्धवट ठेवून निघून गेले. सदरहु दोन्ही व्यक्ती गेल्यानंतर पाच मिनीटामध्येच सदरहू टीवी भिंतीवरुन खाली आदळला व पुर्णपणे फुटला. विरुध्दपक्ष क्र. 2 ने पाठविलेल्या व्यक्ती ह्या पुर्णपणे अप्रशिक्षीत व निष्काळजीपणा करणाऱ्या होत्या व त्यांनी हलगर्जीपणे जोडणी करुन घाईगडबळीने टीवी भिंतीवर व्यवस्थीत न लावता निघुन गेले. या बाबत विरुध्दपक्षाला सुचना दिली असता त्यांनी फोनवर नुकसान भरपाईची हमी दिली. परंतु बराच अवधी जावून देखील विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी नुकसान भरपाई देण्याची कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर घटनेची माहीती पोलिस स्टेशनला दि. 7/11/2014 ला दिली. तसेच दि. 7/11/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांना रजिस्टर पोष्टाने नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी नोटीसला उत्तर देऊन नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षांचा ग्राहक असून विरुध्दपक्षाच्या निष्काळजीपणामुळे तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्यास वर नमुद टीवीची किंमत रु. 30,000/- व डीटीएच खर्च रु.2140/- द्यावे. तसेच शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु. 50,000/- देण्याचा आदेश व्हावा. न्यायिक खर्चासाठी विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास रु. 5000/- द्यावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 06 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 यांना प्रकरणाची नोटीस बजाविल्यानंतर देखील विरुध्दपक्ष क्र. 1 गैरहजर राहीले. त्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-
3. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष 2 यांनी आपला लेखीजवाब, शपथेवर दाखल केला त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन असे नमुद केले आहे की,…
विरुध्दपक्ष क्र. 2 तर्फे तज्ञ टेक्नीशनद्वारे सेटटॉप बॉक्सची फिटींग करण्यात आली. तक्रारकर्त्याने स्वत: आपला टी.व्ही खाली उतरवून दिला, व त्यानंतर विरुध्दपक्षाचे तज्ञांनी केबल कनेक्शन जोडून दिले व तक्रारकर्ता व त्याच्या भावाने मिळून सदर टी.व्ही पुर्नस्थापीत केला. टी.व्ही इन्स्टॉलेशन बद्दल विरुध्दपक्ष किंवा त्यांच्या अधीकाऱ्यांची जबाबदारी नव्हती व नाही. डेमो सुरु झाल्यानंतर विरुध्दपक्षाचे टेक्नीशनने सदर डीटीएच चे रिमोटची उपयोगीता सांगीतली व 10 ते 15 मिनीटात टेक्नीशन तेथून निघुन गेले व त्यांनी कोणतीही घाईगडबड केली नाही व कोणताही निष्काळजीपणा केला नाही. विरुध्दपक्षाची या विषयी कोणतीही जबाबदारी नव्हती व नाही. त्यांनी किंवा त्यांच्या टेक्नीशननी कोणताही हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केलेला नाही. टीव्ही हाताळण्याची कोणतीही जबाबदारी विरुध्दपक्ष व त्यांचे टेक्निशन यांची कधीही नसते व नव्हती. विरुध्दपक्षाला पाठविलेल्या नोटीसमधून तक्रारकर्त्याने स्वत: मान्य केले आहे की, कथीत टीव्ही पडल्याची घटना विरुध्दपक्षाचे तज्ञ गेल्यानंतर झालेली आहे व या घटनेची माहीती तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षला फोनवरुन 40 मिनीटानंतर दिलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने केलेले आक्षेप खोटे व चुकीचे आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 3 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे. त्यानुसार त्यांनी असे नमुद केले की, सदर प्रकरणाशी विरुध्दपक्ष क्र. 3 चा काहीही संबंध नाही. विरुध्दपक्ष क्र. 3 यांना टाटास्काय कनेक्शन विकण्यासाठी कंपनीकडून स्क्रॅच कुपन दिले जाते व स्क्रॅच कुपनवरील पि.नं. स्क्रॅच करुन तो पुणे येथे नोंदवितो. टाटा स्काय छत्री, सेटटॉप बॉक्स व केबल वायरींग पुर्ण फिटींग व रिसीवर ॲक्टीव्ह करण्याचे काम हे पुर्णपणे कंपनीचे आहे. तक्रारकर्त्याच्या नुकसानीस विरुध्दपक्ष क्र. 3 जबाबदार नाही.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिशपथपत्र दाखल केले व उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणातील तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज, विरुध्दपक्ष यांचा लेखी जबाब, तक्रारकर्ता यांचे प्रतिउत्तर, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलेाकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला तो येणे प्रमाणे
तक्रारकर्ता यांनी टीडीएच सेवा घेण्यासाठी दि. 19/10/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 3 कडे रु. 2140/- चा भरणा केलेला आहे. त्या बाबतची पावती विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी तक्रारकर्त्याला दिलेली आहे, हे दस्त क्र. 10 वरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचा “ग्राहक” आहे, असे मंचाचे मत आहे.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार दि. 20/10/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी दोन व्यक्तींना डीटीएच ची डीश घरावर बसविण्यासाठी व सदर यंत्रणा टीव्हीला जोडून देण्यासाठी पाठविले होते. त्यापैकी एका व्यक्तीने घराच्या भिंतीवर चढून टाटास्कायच्या डिशचे फिटींग केले व दुसऱ्या व्यक्तीने घरात टी.व्ही असलेल्या खोलीत सेटटॉप बॉक्सचे कनेक्शन टीव्हीला जोडण्यासाठी तिन फुट उंचीवर लावलेला टीवी खाली उतरविला व सेटटॉप बॉक्सची जोडणी टीव्हीला लावल्यानंतर सदरहू टीव्ही पहीले होता त्याच ठिकाणी माऊंट केला. डीटीएच चे ॲक्टीवेशन डेमो चालू केला व थोडयाच वेळात ॲक्टीवेशन पुर्ण होईल व विरुध्दपक्ष क्र. 2 यांचेकडे येवून सही करुन द्यावी, असे सांगुन ते निघून गेले. काही वेळानंतर सदर टीव्ही खाली पडून फुटला व त्याचा आवाज झाला. ही माहीती विरुध्दपक्ष क्र. 2 ला तक्रारकर्त्याने फोनवरुन दिली व विरुध्दपक्ष क्र. 1 ला सुध्दा फोन करुन माहीती दिली. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी नुकसान भरपाई देण्याची कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे झालेल्या घटनेची माहीती दि. 7/11/2014 ला पोलीस स्टेशनला दिली. तसेच दि. 10/11/2014 ला जिल्हा पोलिस अधिक्षक यांना सुध्दा माहीती दिली. यावर कोणतीही कारवाई न झाल्याने दि.. 7/11/2014 ला तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना नोटीस पाठविली व त्या नोटीसला विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी उत्तर देऊन नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्यामुळे सदर तक्रार तक्रारकर्त्याला न्यायमंचात दाखल करावी लागली.
विरुध्दपक्ष क्र. 2 च्या म्हणण्यानुसार, तक्रारकर्ता याने डीटीएच सेवेसाठी रु. 2140/- भरुन कनेक्शन घेतले आहे व तक्रारकर्त्याला योग्य सेवा देण्याची हमी विरुध्दपक्षाने घेतलेली आहे. त्यानुसार तज्ञ टेक्नीशनद्वारे सेटटॉप बॉक्सची फिटींग करण्यात आली आहे. तक्रारकर्त्याने स्वत: टीव्ही भिंतीवरुन उतरवून दिल्यानंतरच केबल कनेक्शन जोडून दिले. कारण टीव्ही हाताळण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्षाची नाही. टेक्नीशनने रिमोटची माहीती दिल्यानंतर 10 ते 15 मिनीटात ते निघून गेले. त्यानंतर सदर टीव्ही हा जमीनीवर पडून फुटला आहे. याची माहीती विरुध्दपक्षाला 40 मिनीटानंतर फोनवरुन मिळाली आहे. सदर घटना घडली त्यावेळेस विरुध्दपक्षाचे टेक्निशन तेथे हजर नव्हते. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या झालेल्या नुकसानीला विरुध्दपक्ष हे जबाबदार नाही.
तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाने असा निष्कर्ष काढला आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून डीटीएच ची सेवा घेण्यासाठी रु. 2140/- चा भरणा केलेला आहे. त्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याच्या घरी दोन टेक्नीशन पाठवून डीटीएच ची फिटींग केलेली आहे. डीटीएच ची फिटींग केल्यानंतर 10 ते 15 मिनीटात विरुध्दपक्षाचे टेक्नीशन निघुन गेल्यानंतर त्यांच्या गैरहजेरीत सदर टीव्ही जमीनीवर पडला व फुटला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या झालेल्या नुकसानीस विरुध्दपक्षाला जबाबदार धरता येणार नाही. टीव्ही हाताळण्याचे काम हे विरुध्दपक्षाचे नाही. विरुध्दपक्षाची जबाबदारी डीटीएच ची फिटींग करुन देण्याची आहे व ते त्यांनी योग्यरित्या केलेली आहे. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्यामध्ये टीव्हीच्या संदर्भात कोणताही व्यवहार झालेला नाही. तसेच विरुध्दपक्ष क्र. 3 हे कंपनीकडून आलेले स्क्रॅच कुपन आलेल्या व्यक्तीला देतो व स्क्रॅच कुपनावरील पि.न. स्क्रॅच करतो. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 3 ला तकारकर्त्याच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार धरता येणार नाही. तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसानीची भरपाई विरुध्दपक्षांकडून वसुल करता येणार नाही, असे मंचाचे मत आहे. सबब तक्रार खारीज करण्यात येत आहे.
म्हणून अंतीम आदेश पारीत करण्यात येतो तो खालील प्रमाणे
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.