तक्रार क्र. 149/2014.
तक्रार दाखल दि.12-09-2014.
तक्रार निकाली दि.29-02-2016.
श्री. सुजीत सुरेश मुंगळे,
रा. 263, मंगळवार पेठ,
सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
1. मे. टाटा मोटार्स लि.,
विभागीय कार्यालय, मुंबई,
तर्फे जनरल मॅनेजर,
बी-14, 3 रा मजला, लक्ष्मी टॉवर्स,
सी-25, जी. ब्लॉक, आय.सी.आय.सी.आय.
बँकेचे मागे, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स,
बांद्रा (ईस्ट) मुंबई नंबर – 51.
2. मे. हेम मोटार्स डिव्ही. प्रा.लि.,
टाटा मोटासेचे अधिकृत वितरक,
तर्फे व्यवस्थापक,
ए-2/ए, जुनी एम.आय.डी.सी.,
पुणे बेंगलोर हायवे,
सातारा 415 001. .... जाबदार.
.....तक्रारदारतर्फे- अँड.व्ही.आय.शेट्टी.
.....जाबदार क्र. 1 – एकतर्फा.
.....जाबदार क्र. 2 तर्फे- अँड.व्ही.डि.निकम.
न्यायनिर्णय
(मा.सौ.सविता भोसले,अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे. प्रस्तुत तक्रार अर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे सातारा येथील रहिवाशी आहेत. त्यांनी स्वतःच्या वापरासाठी जाबदार क्र. 1 कंपनीची ‘अरिया प्राईड’ रजि. नं.एम.एच.-11-बी.एच.585 ही चार चाकी गाडी दि.12/11/2012 रोजी जाबदार क्र.2 यांचेकडून रक्कम रु.16,28,464/- (रुपये सोळा लाख अठ्ठावीस हजार चारशे चौसष्ट मात्र) या किंमतीस खरेदी केली आहे. प्रस्तुत गाडी ही जाबदार क्र. 2 ने, डिसप्लेसाठी ठेवलेली होती. परंतू तक्रारदाराला ‘वॉलनट गोल्ड’ या रंगाचीच गाडी हवी होती व या कलरची गाडी जाबदार क्र. 1 चे पुणे येथील शोरुममध्ये उपलब्ध नव्हती त्यामुळे प्रस्तुत कलरची गाडी जाबदार क्र. 2 यांचेकडे डिसप्लेसाठी ठेवलेली होती व ते विक्री करणेस तयार होते म्हणून प्रस्तुत जाबदार क्र. 2 कडून सदरची अरिया प्राईड वॉलनट गोल्ड कलरची गाडी तक्रारदाराने जाबदार क्र. 2 यांचेकडून खरेदी करणेचे ठरविले. परंतू तत्पूर्वी तक्रारदाराने जाबदार क्र. 1 यांचे पुणे येथील विभागीय कार्यालयातील असिस्टंट जनरल मॅनेजर यांना संपर्क करुन प्रस्तुत वाहन खरेदी करावे की कसे याबाबत विचारणा केली त्यावेळी प्रस्तुत वाहनामध्ये गेल्या वर्षभरात काही नव्याने बदल केले आहेत का असा ई-मेल दि.5-11-2012 रोजी दिला. त्यावर श्री. कुलकर्णी यांनी दि.6/11/2012 चा ई-मेल देवून कळविले की, प्रस्तुत गाडीचे सुखसुविधांमध्ये कोणतेही बदल गेल्या वर्षभरात केलेले नाहीत. मात्र डिसप्लेसाठी ठेवलेले वाहन विकत घेणेपूर्वी त्याची बॅटरी क्लच गेटस् बदलून घेणे आवश्यक आहेत तर टायर कंडिशन पाहून ब्रिजस्टोन कंपनी व्यतिरिक्तचे टायर असलेस ते बदलून घ्यावेत असे कळविले. तक्रारदाराने याबाबत जाबदार क्र. 2 कडे चौकशी केली त्यावेळी जाबदार क्र. 2 यांनी वादातीत वाहनाचे उत्पादन माहे एप्रिल,2012 मधील असलेचे सांगीतले व बॅटरी, क्लच, गेटस बदलून देणेची तयारी दर्शविली. सोबत कंपनीच्या नियमाप्रमाणे वॉरंटी राहणार आहे असेही सांगितले. तक्रारदाराने जाबदार क्र. 2 वर विश्वास ठेऊन वादातीत ‘अरिया प्राईड’ हे वर नमूद वर्णनाचे वाहन जाबदार क्र. 2 कडून खरेदी घेतले. जाबदार क्र.2 ने दि.11/11/2012 च्या डिलीव्हरी चलन क्र.2172 अन्वये प्रस्तुत वाहनाचा ताबा तक्रारदाराला दिला. तर दि. 12/11/2012 रोजी वाहनाची किंमत रक्कम रु.16,28,464/- चे इनव्हाईस दिले. तक्रारदाराने वादातीत वाहन खरेदीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया,सातारा यांचेकडून रक्कम रु.15,00,000/- चे कर्ज घेतले आहे.
प्रस्तुत तक्रारदाराने खरेदी केले ‘अरिया प्राईड’ या वाहनामध्ये खरेदी केल्यानंतर पहिल्या महिन्यातच तांत्रिक बिघाड उदभवून समोर आले. दि.18/12/2013 रोजी वादातीत वाहन अशाच काही बिघाडामुळे जाबदार क्र. 2 कडे जमा केले. त्यावेळी वादातीत वाहनाचे रनिंग 5476 कि.मी. झालेले होते. त्यावेळी जाबदार क्र. 2 चे इनव्हाईस क्र. एस.ए.1213-07092 अन्वये वाहनाच्या डाव्या हेड लॅम्प असेंब्लीमध्ये पाणी व धुके जमा झाले होते. त्यावेळी जाबदार क्र. 2 ने दुस-या एका वाहनाची हेड लॅम्प असेंब्ली काढून तक्रारदाराचे वाहनास बसवली. परंतू त्याचा प्रकाशझोत तुटक पडत होता व त्या असेंब्लीच्या मागील एक फिटींग तुटली होती. त्यामुळे प्रकाशाचा अँगल योग्य प्रकारे येत नव्हता. वाहनातील रियर ए.सी. ब्लोअर मधून मोठा आवाज येत होता. ए.सी. चालू असूनही चालकाच्या बाजूकडे पायाकडील भागात जळक्या वासासह गरम हवा येत होती. जाबदार क्र. 2 यांनी दुस-या एका वाहनाचा ए.सी.ब्लोअर काढून तक्रारदाराचे वाहनास बसविला व सांगितले की ए.सी. संदर्भातील एक फ्लॅप उघडा होता तो आता बंद करणेत आला आहे. याखेरीज वाहनातील इंटिरियर फिटींग्ज पैकी दारावरील फिटींग्ज, रियर व्हयू, मिटर हे व्हायब्रेट होत होते व आवाज करत होते. रियर व्हयू केबीन मिटर हा त्याच्या बेसमधून काढता येण्याची सुविधा आहे. जाबदार क्र. 2 यांनी दुस-या एका वाहनाचा आरसा/मिटर काढून तक्रारदाराचे वाहनास बसविला व बसवताना तो फेवीक्वीकने फिक्स केला. यामुळे जी सुविधा होती ती कायमची निरुपयोगी झाली. तसेच साईड रियर व्हयू इलेक्ट्रीकल मिटरमधून मागील दृष्य स्पष्टपणे दिसत नव्हते. जाबदार क्र. 2 यांनी हा पार्टसुध्दा दुस-या वाहनाचा काढून तक्रारदाराचे वाहनास बसविला. अशाप्रकारे जाबदार क्र. 2 ने तक्रारदाराचे वाहनाची सर्व्हीस दुरुस्तीची कामे पूर्णतः चुकीच्या पध्दतीने केली आहेत. प्रस्तुतची बाब तक्रारदाराने जाबदार क्र. 1 यांचे कस्टमर केअर विभाग प्रमुख श्री. रुफ यांना दि.6/6/2013 रोजी ई-मेल करुन दिली. असे पुणे येथील विभागीय कार्यालयाचे असिस्टंट जनरल मॅनेजर, श्री. अव्दैत कुलकर्णी यांनाही दि.20/3/2013 रोजी ई-मेलने दिली. त्यामुळे तक्रारदाराला पुणे रिजनल मॅनेजर यांनी वाहनाची कामे व्यवस्थीतपणे करुन देण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे वादातीत वाहन तक्रारदाराने पुणे येथे जमा केले. त्यावेळचा इनव्हाईस क्र.एस.एन.1314-00118 असा आहे. जाबदार यांचे अधिकारी श्री. रुफ यांनी तक्रारदाराला दि. 28/3/2013 चे ई-मेल ने वाहनाच्या सर्व तक्रारी दूर करण्यात आल्याचे कळविले व केवळ ए.सी.मधून येणा-या गरम हवेबाबत वाहन वापरल्यानंतर येणारा अनुभव कळवा असे सांगीतले. पुढे ता. 15/6/2013 रोजी वादातीत वाहनाचे रनिंग 11787 कि.मी. असताना पुन्हा एकदा वाहनात बिघाड झाला. त्यावेळी सदर वाहन पुणे येथील पंडीत ऑटोमोटीव्ह यांचेकडे जमा केले. त्यावेळचा इन्व्हाईस क्र.एस.एम.-1314-03462 असा आहे. यावेळी वादातीत वाहनाचे शॉक ऑब्जरवर मधून ऑईल लिक होत होते. व ट्रेनिंगमधील टाईमींग बेल्ट व्हायब्रेट होत होता. इंजिन चालू अवस्थेत वाहन उभे केले असता इंजिनमध्ये मोठया प्रमाणात व्हायब्रेशन होत होते. तसेच वाहनाचा ए.सी. काम देत नव्हता, चालक बाजूकडील फ्लायव्हील मध्ये व्हायब्रेशन होत होते. क्लच वापरामध्ये आवाज येत होता, वाहनाच्या दारावर आतल्या बाजूने असलेले फिटींग्ज मधून आवाज येत होता. वाहनाचे 4X4 स्वीच काम करीत नव्हते. तसेच स्टेअरींगवरील इलेक्ट्रीकल स्वीचेस काम देत नव्हते. तक्रारदाराने जाबदारांचे अधिकारीश्री. रुफ यांना ता.13/6/2013 व दि.18/6/2013 रोजी ई-मेलने तक्रार केली व कंपनीच्या जाहीरातीप्रमाणे 1 लाख कि.मी. रनिंग पर्यंत टाईमिंग बेल्ट बदलण्याची गरज नसताना केवळ 11 हजार कि.मी. रनिंगला हा बेल्ट का बदलावा लागतो? याची विचारणा केली त्यावेळी वादातीत वाहन 10 दिवसानंतर तक्रारदाराला मिळाले म्हणजेच दि.21/6/2013 रोजी वाहनाचा ताबा मिळाला परंतू दि.22/6/2016 रोजी वाहनाचे क्लच पेडलमध्ये मोठया प्रमाणात व्हायब्रेशन होऊ लागले. म्हणून जाबदार क्र. 2 कडे वाहन नेऊन दाखवले असता, जाबदार क्र. 2 ने गिअर बॉक्स खोलावा लागेल असे सांगितले त्यावेळी तक्रारदाराने प्रस्तुत वाहन पुणे येथील वर्कशॉपमध्ये नेण्याचे ठरविले. दरम्यान तक्रारदाराने पुणे येथील जाबदार क्र.1 यांचे एरिया सर्व्हीस मॅनेजर यांना ई-मेलवरुन सर्व माहीती कळविली. त्यावेळी जाबदार क्र. 1 चे प्रस्तुत एरिया सर्व्हीस मॅनेजर यांना ई-मेलवरुन सर्व माहिती कळविली त्यावेळी जाबदार क्र. 1 चे प्रस्तुत एरिया सर्व्हिस मॅनेजर महेंद्र पाटील यांनी तक्रारदाराला दि.25/6/2013 चा ई-मेल देऊन जाबदार क्र. 1 हे तक्रारदाराचे वादातीत वाहनाच्या तपासणी कामी टेक्नीकल टिमला सामील करत असलेचे कळविले त्यावेळी तक्रारदाराने प्रस्तुत एरिया सर्व्हीस मॅनेजर यांना दि.28/6/2013 चा ई-मेलने प्रस्तुत वाहनामध्ये आतापर्यंत आलेल्या सर्व बिघाडांची कल्पना दिली. त्यावेळी जाबदाराने टेक्निकल टिममार्फत तपासणी करुन गाडीतील बिघाड दुरुस्त केलेचे सांगितले. परंतू पुन्हा दि.8/7/2013 रोजी वाहनात बिघाड निर्माण झाला. त्यावेळी वाहनाचे रनिंग 11600 कि.मी. झालेले होते. त्यावेळचा इनव्हाईस नंबर एस.एन.1314-03483 असा आहे. तक्रारदाराचे सदर वाहनाची दुरुस्ती करुन देणेचा जाबदार क्र. 1 ने प्रयत्न केला. मात्र वाहन पूर्ण दोषमुक्त झाले नाही. त्यानंतर तक्रारदार हे काही पदाधिका-यांना गाडीतून घेऊन जात असता वाहनाच्या चॅसिजपैकी सपोर्ट प्लेट लुज होऊन चालु प्रवासातच रस्त्यात गळून पडली. तक्रारदाराने ताबडतोब वाहन पुणे येथील जाबदार क्र. 1 चे अधिकृत वर्कशॉप मे. कॉनकॉर्ड मोटर्स, पुणे येथे वाहन दाखवले त्यांनी चॅसीज फिटींगचे काम केले. तक्रारदाराने प्रस्तुत बाब श्री. महेंद्र पाटील यांना दि.20/9/2013 ई-मेलने कळविली. तसेच वादातीत वाहन दि.23/9/2013 रोजी विविध बिघाडांसाठी वर्कशॉपमध्ये जमा करत असलेचे सांगीतले. तसेच प्रस्तुत वाहनात वारंवार बिघाड येत असलेने त्याबदली नवीन वाहन देणेबाबत जाबदाराला विनंती केली होती. परंतू जाबदारतर्फे एरिया सर्व्हीस मॅनेजर, श्री. पाटील यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर दि.24/5/2014 रोजी तक्रारादार त्याचे कुटूंबियांसमवेत सदर वाहनातून प्रवास करताना अचानक वाहनाचा एक टायर फुटला व अपघात होता होता वाचला. त्यावेळी वाहनासाठी दिलेल्या जॅकचा वापर करुन स्टेफनी टायर चढविणेचा प्रयास करु लागता प्रस्तुत जाबदार क्र. 1 यांनी पुरविलेल्या जॅकव्दारे वाहनाचा बोजा उचलला जाईना शिवाय पुरविलेला स्पॅनरदेखील चाकांच्या नटाला बसेना अखेर जाणा-या दुस-या वाहनाला थांबवून टायर बदलण्यासाठी मेकॅनिकला बोलावून त्याचेजवळील जॅक व स्पॅनर घेऊन येणेस सांगीतले. तसेच दि.25/5/2014 रोजी रक्कम रु.14,500/- चा नवीन टायर तक्रारदाराने खरेदी केला. टायर लवकर फुटण्याचे कारण शोधता वादातीत वाहनाचे सर्व टायर्सची अनपेक्षीतपणे आतील बाजूने झीज होत असलेचे समजून आले. दि. 11/6/20014 रोजी वाहनाचे रनिंग 37900 कि.मी. झाले असताना वाहन पुणे येथील मे कॉनकॉर्ड मोटर्सकडे जमा करावे लागले. यावेळी वाहनाच्या सस्पेंन्शन मध्ये बिघाड झाला होता. तसेच ए.सी. मधून गरम हवा येणे, केबीन रियर व्हयू मीटर व्हायब्रेट होणे, वाहनाचा टायर आतील बाजूस झिजणे चालूच होते. याबाबत जाबदार क्र. 1 चे मुंबई येथील मॅनेजर श्री. दास यांना ता. 29/5/2014 रोजी ई-मेलने कळविले. याबाबत जाबदाराचे इंजिनियरने प्रस्तुत वाहनाच्या बाबतीत ही सातत्याने टायर झिजण्याची तक्रार आढळून येते ही गंभीर बाब आहे. तपासणीनंतर जाबदाराने सदर गाडीचे शॉक ऑबझारवर मध्ये दोष असलेचे सांगीतले. अशाप्रकारे प्रस्तुत तक्रारदाराचे अरिया प्राईड या वादातीत वाहनात आलेले बिघाड लक्षात घेता प्रस्तुत चे वाहन हे पूर्णपणे सदोष उत्पादित वाहन (Manufacturing defect) असलेले, (उत्पादन दोष) असलेले वाहन आहे हे स्पष्ट होते. सातत्याने वाहन बिघाड झालेनंतर तक्रारदार जाबदाराचे दुरुस्तीसाठी जमा करतो व पुन्हा पुन्हा नवीननवीन दोष तसेच पूर्वीचे दोष ही पूर्णपणे दुरुस्त होत नाहीत, व वाहनात सातत्याने बिघाड होऊन तक्रारदाराला वाहन खरेदी करुनही त्याचा पुरेपूर उपभाग घेता येत नाही. वादातीत गाडीचे बिघाड झालेले बरेचसे पार्टस् बदलून नवीन बसवूनदेखील गाडी पूर्णपणे दोषमुक्त झालेली नाही. तसेच प्रस्तुत वाहन हे सन 2011 मधील इत्पादित असताना जाबदाराने 2012 मधील उत्पादित असलेचे सांगीतले. परंतू प्रस्तुत वाहन हे एप्रील 2011 मध्ये उत्पादित झालेचे लक्षात येते. म्हणजेच तक्रारदाराची जाबदाराने फसवणूक केली आहे. तक्रारदाराला प्रस्तुत वाहन खरेदी करताना सूट द्यायचे कबूल करुनही जाबदाराने सूट दिली नाही. तर वाहनाची किंमत कमी दाखवून विमा हप्ता कमी रकमेचा भरला व रोडटॅक्सही कमी दिला अशाप्रकारे 2011 मध्ये उत्पादित झालेले वाहन 2012 मधील उत्पादित नवीन वाहन म्हणून तक्रारदाराला खरेदी करणेस भाग पाडले व दोषपूर्ण वाहन तक्रारदाराला विक्री केले. म्हणजेच जाबदाराने तक्रारदाराची शुध्द फसवणूक करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. सबब जाबदार यांचेकडून नुकसानभरपाई मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज जाबदाराने मे मंचात दाखल केले आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांनी दिलेली सेवेतील कमतरता दूर करुन द्यावी. तक्रारदार विरुध्द जाबदाराने अवलंबिलेली अयोग्य व्यापार पध्दती थांबवून द्यावी. अनुषंगीक दाद म्हणून वादातीत वाहनामध्ये तांत्रिक दोष असलेने वादातीत वाहन हे सदोषयुक्त उत्पादित वाहन असलेने ते परत घेऊन तक्रारदाराला नवीन वाहन त्याच किंमतीचे बदलून द्यावे, तक्रारदाराला मानसीक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावे. तसेच अर्जाचा खर्च म्हणून जाबदारांकडून रक्कम रु.30,000/- वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.5/63 कडे अनुक्रमे तक्रारदाराने जाबदाराला व जाबदाराने तक्रारदाराला पाठवलेले सर्व ई-मेल, टॅक्स इनव्हाईस, टायरचे बील, कॉनकॉर्ड यांचेकडील इनव्हाईस व पंडीत ऑटोमोटीव्हचे इनव्हाईस, नि. 17 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.17 अ कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि.19 चे कागदयादीसोबत पुन्हा तक्रारदाराने जाबदाराला दिलेले ई-मेलच्या प्रती, जाबदाराचा खुलासा, टॅक्स इनव्हाईस, नि.25 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद व केस लॉज वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 यांना नोटीस लागू होऊनही जाबदार क्र. 1 हे मे. मंचात हजर राहीले नाहीत व त्यांनी त्यांचे म्हणणे/कैफीयत दाखल केली नाही. प्रस्तुत जाबदार क्र. 1 विरुध्द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारीत झालेला आहे. म्हणजेच जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही तर जाबदार क्र. 2 यांनी याकामी हजर होऊन नि.13 कडे म्हणणे/कैफीयत, नि.14 कडे अँफीडेव्हीट नि.20 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.26 कडे जाबदाराचा लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदार क्र. 2 ने याकामी दाखल केली आहेत. जाबदार क्र. 2 ने तक्रार अर्जातील तक्रारदाराची सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.
i तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाहीत. तक्रारदाराने जाबदारांकडून दि.12/11/2012 रोजी वादातीत वाहन खरेदी केले. प्रस्तुत वाहनाचा रजि. नं.एम.एच.11-बी.एच.585 आहे. एवढाच मजकूर बरोबर आहे. इतर सर्व मजकूर काल्पनिक व चूकीचा आहे. वादातीत वाहनाची त्यावेळची किंमत आर.टी.ओ.टॅक्स, इन्श्यूरन्स व एक्सटेंडेड वॉरंटीसह रक्कम रु.18,96,379/- (रुपये अठरा लाख शहानऊ हजार तीनशे एकोणऐंशी मात्र) होती. तसेच प्रस्तुत वादातीत वाहन हे जाबदाराने विक्रीसाठी ठेवलेले नव्हते. तर ते डेमो डिसप्लेसाठी ठेवलेले होते. मात्र तक्रारदाराला पाहिजे तसे मॉडेल त्यावेळी उपलब्ध नसल्यामुळे तक्रारदारानेच जाबदारकडील प्रस्तुत डेमो डिस्प्लेसाठी ठेवलेले वाहन खरेदी घेण्याचा प्रस्ताव जाबदारांकडे मांडला व जाबदारने सदरचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यावेळी सदर अर्जदाराने प्रस्तुत वाहन जुने असलेमुळे सदर वाहनाचे मूळ किंमतीत मोठी सुट मिळण्याची मागणी केली. त्यावेळी या जाबदारानी वाहनाची विक्री होत असलेने रक्कम रु.2,85,379/- (रुपये दोन लाख पंच्याऐंशी हजार तीनशे एकोणऐंशी मात्र) इतक्या रकमेची सूट तक्रारदाराला देऊन प्रस्तुत वाहन तक्रारदाराला रक्कम रु.16,28,464/- (रुपये सोळा लाख अठ्ठावीस हजार, चरशे चौसष्ट मात्र) या किंमतीस तक्रारदाराला विक्री केले आहे. यामध्ये जाबदाराने तक्रारदाराचे कोणतेही नुकसान केलेले नाही व कोणतीही तक्रारदाराची फसवणूक जाबदाराने केलेली नाही. प्रस्तुत वाहन डेमो डिसप्लेसाठी वापरलेले जुने होते ही बाब जाबदाराला माहिती होते त्यामुळे तक्रारदाराची कोणतीही फसवणूक जाबदाराने केलेली नाही.
ii प्रस्तुत जाबदाराने तक्रारदाराला त्याचे वाहन सर्व्हीसींगला आलेवर व्यवस्थीत सर्व्हीसींग करुन/दुरुस्ती करुन योग्यरित्या सर्व सेवा तक्रारादाराला पुरविली आहे. त्यात कोणतीही कमतरता जाबदाराने ठेवलेली नाही. प्रस्तुत कामी जाबदाराने चूकीचे व रद्दबादल असे प्रस्तुत वाहनाचे काम केलेबाबत तक्रारदाराने कोणत्याही तज्ञ व्यक्तीचा पुरावा याकामी दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराला प्रस्तुत जाबदाराने योग्य सेवा दिली आहे. सबब तक्रार अर्ज फेटाळणेत यावा. प्रस्तुत तक्रारदाराने वाहनाचा टायर फ्रटलेचे कथन केले आहे परंतू त्याबाबत या जाबदाराला कोणतीही माहिती नव्हती व नाही. तसेच नवीन टायर घेऊन प्रस्तुत वाहनासच बसविला हे दाखवायला कोणताही पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. प्रस्तुत वाहन खरेदी करताना जाबदार क्र. 1 यांनी दिले सुचनांचे तक्रारदाराने पालन केलेले नाही. त्यामुळे वाहनात दोष निर्माण झाले आहेत. त्यामुळे तक्रारदाराचे अर्जास Res ispa Locutor या तत्वाची बाधा येते. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा.
iii तक्रारदाराने प्रस्तुत कामी तथाकथीत वाहनाचे पार्टस् बदललेली यादी दाखल केली आहे. यावरुन सदर वाहनात उत्पादन दोष आहे असे म्हणता येणार नाही. तसेच प्रस्तुत वाहनात उत्पादन दोष आहे हे दाखवायला तक्रारदाराने तज्ञ व्यक्तीचा अहवाल याकामी दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रार अर्ज फेटाळणेस पात्र आहे. यदाकदाचित प्रस्तुत वाहनात उत्पादन दोष आहे असे शाबीत झालेस त्यास सर्वस्वी जाबदार क्र. 1 कंपनी जबाबदार असतील. जाबदार क्र. 2 हे जबाबदार असणार नाहीत. कर्मचा-यांच्या चूकीमुळे प्रस्तुत वाहनाच्या स्मार्ट कार्डला वाहनाचे उत्पादित वर्षाची चूकीची नोंद झालेली आहे. तक्रारदाराने जाबदारकडून फुकटात वाहन मिळणेसाठी सदरची तक्रार विनाकारण मे. मंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने अर्ज दाखल करेपर्यंत प्रस्तुत वाहन 44000 कि.मी. चालविले आहे हे नमूद केले आहे. त्यावरुन तक्रारदाराचे प्रस्तुत वाहन सुस्थितीत आहे हे शाबीत होते. तसेच सदर वाहनाचे किलोमीटर विचारात घेता तक्रार मुदतबाहय झालेली आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदार क्र. 2 ने याकामी दिलेले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रे, पुराव्याची शपथपत्रे, लेखी व तोंडी युक्तीवाद वगैरेचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे. मंचाने प्रस्तुत कामी पुढील मुद्दयांचा विचार केला.
मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय?- होय.
2. जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय?- होय.
3. तक्रारदार मागणीप्रमाणे विमाक्लेम मिळणेस पात्र आहेत काय?- होय.
4. अंतिम आदेश काय?- खाली नमूद केले
आदेशाप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- सबब तक्रारदाराने जाबदार क्र. 1 कंपनीने उत्पादित केलेले ‘अरिया प्राईड’ हे चारचाकी वाहन वॉलनट गोल्ड कलरचे जाबदार क्र. 2 यांचेकडून दि.11/11/2012 च्या डिलीव्हरी चलनाने चलन क्र. 2172 अन्वये वाहनाचा ताबा घेतला व तक्रारदाराने दि.12/11/2012 रोजी वाहनाची खरेदीपोटी रक्कम रु.16,28,464/- (रुपये सोळा लाख अठ्ठावीस हजार चारशे चौसष्ट मात्र) या ईनव्हाईसने सदर रकमेस जाबदारकडून खरेदी केले आहे. ही बाब जाबदार क्र. 2 ने मान्य केली आहे. तर जाबदार क्र.1 हे नोटीस लागू होऊनही मे मंचात हजर न झालेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. तसेच तक्रारदाराने प्रस्तुत गाडीचे डिलीव्हरी चलन व इनव्हाईस नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/6 व नि.5/7 कडे दाखल केले आहे. सबब तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते आहे हे स्पष्ट व सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण- तक्रारदाराने जाबदार यांचेकडून खरेदी केलेल्या ‘अरिया प्राईड’ या चारचाकी वाहन रजि.नं. एम.एच.-11-बी.एच.-585 यामध्ये खरेदीनंतर पहिल्या महिन्याभरातच तांत्रिक दोष बिघाड उदभवून समोर आले. दि.18/12/2013 रोजी वादातीत वाहन जाबदार क्र. 2 यांचेकडे दुरुस्तीसाठी जमा करावे लागले त्यावेळी प्रस्तुत वाहनाचे रनिंग 5476 कि.मी. झालेले होते. त्यावेळच्या जाबदार क्र. 2 यांचे इनव्हाईसवरुन (नि.5/8) ईनव्हाईस क्र. एस.ए.-1213-07092 अन्वये वाहनाच्या डाव्या हेड लॅम्प असेंब्लीमध्ये पाणी व धुके जमा झालेले होते. जाबदार क्र. 2 ने दुस-या वाहनाची हेड लॅम्प असेंब्ली काढून तक्रारदाराचे वाहनास बसविली. परंतू त्याचा प्रकाशझोत तुटक पडत होता व त्या असेंब्लीच्या मागील एक फिटींग क्लॅप तुटली होती. त्यामुळे प्रकाश योग्य अँगलमध्ये पडत नव्हता, वाहनातील रियर ए.सी.ब्लोअर मधून मोठा आवाज येत होता व ए.सी.चालू असूनही चालकाच्या पायाकडील भागात जळक्या वासासह गरम हवा येत होती. जाबदार क्र. 2 ने दुस-या एका वाहनाचा ए.सी. ब्लोअर काढून तक्रारदाराचे वाहनास बसविला व ए.सी. संदर्भातील एक फ्लॅप उघडा होता तो बंद केला आहे. याखेरीज प्रस्तुत वाहनातील इंटिरियर फिटींग्ज पैकी दारावरील फिटींग्ज, रियर व्हयू मिटर हे व्हायब्रेट होत होते. रियर व्हयू मिटर हा त्याच्या बेसपासून काढणेची सुविधा असतानाही जाबदार क्र.2 ने दुस-या वाहनाचा मिटर काढून तक्रारदाराचे गाडीस बसवला व फेवीक्वीकने पॅक केला. तसेच साईड रियर व्हयू इलेक्ट्रीकल मीटर मधून मागील दृश्य स्पष्ट दिसत नव्हते, जाबदार क्र. 2 ची दुरुस्तीची कामे ही चूकीची असून नैतिकतेला धरुन नाहीत. याबाबत तक्रारदाराने जाबदार क्र. 1 चे विभागप्रमुख ‘श्री.रुफ’ यांना दि.6/3/2013 रोजी नि.5/9, व नि.5/10 कडे ई मेलने कळविले. तसेच पुणे येथील विभागीय कार्यालयाचे असीस्टंट जनरल मॅनेजर श्री. अव्दैत कुलकर्णी यानाही तक्रारदाराने दि.20/3/2013 चे ई-मेल (नि.5/11) ने कळविले आहे. त्यावेळी जाबदारांनी तक्रारदाराला जाबदाराचे पुणे येथील वर्कशॉपमधून वाहनाची कामे व्यवस्थीत करुन देणेचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तक्रारदाराने वाहन पुणे येथील जाबदाराचे वर्कशॉप मध्ये जमा केले. इनव्हाईस नं. एस.एन.1314-00118 (नि.5/12) यानंतर वाहन दुरुस्तीनंतर तक्रारदाराने ताब्यात घेतलेवर पुन्हा दि.15/6/2013 रोजी वाहनाचे रनिंग 11787 कि.मी. असताना पुन्हा वाहनात बिघाड होऊन वाहन पुणे येथील पंडीत ऑटोमोटीव्ह यांचेकडे जमा केले. इनव्हाईस नं. एस.एन.1314-03462 (नि.5/15, नि.5/16) यावरुन प्रस्तुत वाहनाचे शॉक ऑब्झर्व्हर मधून ऑईल लिक होत होते, इंजिनमधील टाइमींग बेल्ट व्हायब्रेट होत होता, इंजिन चालू अवस्थेत वाहन उभे केलेस इंजिनमध्ये मोठया प्रमाणात व्हायब्रेशन होत होते. वाहनाचा ए.सी. काम देत नव्हता, चालक बाजूकडील फ्लायव्हील मध्ये व्हायब्रेशन होत होते, क्लच वापरामध्ये आवाज येत होता, वाहनाच्या दारावरील फिटींगमधून आवाज येत होता, वाहनाचे 4x4 स्वीच काम देत नव्हते, तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारी जाबदाराचे अधिकारी रुफ यांना दि.13/6/2013 व दि.18/6/2013 रोजीचे ई-मेल वरुन केल्या. (नि.5/17) कंपनीचे जाहीरातीप्रमाणे 1 लाख कि.मी. रनिंगपर्यंत टाईमिंग बेल्ट बदलणेची गरज नसताना केवळ 11 हजार कि.मी. रनिंगपर्यंत टाईमिंग बेल्ट का बदलावा लागतो याची विचारणा केली. यावेळी गाडीचा ताबा 10 दिवसानंतर ता.21/6/2013 रोजी मिळाला. परंतू दि.22/8/2013 रोजी वाहनाच्या क्लच पेडलमध्ये व्हायब्रेशन होऊ लागले त्यामुळे जाबदार क्र. 2 यांनी वाहनाचा गिअर बॉक्स खोलावा लागेल असे कळविले. दि.23/6/2013 रोजी जाबदार क्र. 1 चे एरिया मॅनेजर यांना ई-मेल वरुन कल्पना दिली. त्यावेळी जाबदारांतर्फे टेक्नीकल टिममार्फत वाहनाची दुरुस्ती व तपासणी होऊनही पुन्हा दि.8/7/2013 रोजी वाहनात मोठा बिघाड निर्माण झाला. त्यावेळी वाहनाचे रनिंग 11600 कि.मी. झाले होते. त्यावेळचा इनव्हाईस नं. 1314-03483 नि.5/26 कडे दाखल आहे. त्यावेळी वाहन पिक अप घेत नाही 60 ते 70 कि.मी. पेक्षा जास्त स्पीड घेत नाही. ‘इंजिन सिस्टीम फॉल्ट’ आहे असे स्क्रीनवर मॅसेज येतो. जाबदाराचे पुणे येथील मॅनेजरना तक्रारदाराने ईमेल वरुन कळविले. तसेच ‘रिस्ट्रीक्टेड परफॉरमन्स’ असा एरर मेसेज स्क्रीनवर येवून इंजिन बंद पडते. वगैर वगैरे प्रस्तुत तक्रारदाराचे वाहनात सर्व दोष व बिघाड गाडी खरेदी केलेनंतर पहिल्या महिन्यांपासून ते आजतागायत चालूच आहेत. प्रस्तुत तक्रारदाराचे वादातीत वाहन हे सातत्याने नादुरुस्त होत असून ते वारंवार जाबदार यांचेकडून दुरुस्त करुन घेवून ही पुन्हा पुन्हा प्रस्तुत वाहनात दोष व बिघाड उत्पन्न होत आहेत ही बाब तक्रारदाराने नि.5/1 ते नि.5/74 कडे दाखल केलेली कागदपत्रे, नि.23 चे कागदयादीसोबत दाखल नि.23/1 ते नि.23/7 कडील कागदपत्रे, नि.24 कडील अद्याप वाहनामध्ये दोष व बिघाड निर्माण होत असलेची तक्रारदाराची पुरसीस यावरुन स्पष्ट व सिध्द होत आहे. तसेच तक्रारदार यांना जाबदाराने सन 2011 मध्ये उत्पादित झालेले वादातीत वाहन हे एप्रिल,2012 मधील उत्पादित असलेचे सांगीतले होते. तसेच जाबदाराने प्रस्तुत वाहनाचे सातारा आर.टी.ओ. यांचेकडे पासींग करुन देणेसाठी कागद दिले. त्यावेळी त्यावर वाहनाचे उत्पादनाची ता.4/2012 अशी नमूद आहे. मात्र तांत्रिक दोषामुळे तक्रारदाराला प्रस्तुत उत्पादनाबाबत शंका आलेने इंटरनेटव्दारे माहिती घेतली असता प्रस्तुत वाहन हे एप्रील 2011 मध्ये उत्पादित झालेले स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जाबदाराने व्यापारी हेतूने स्वार्थापोटी प्रस्तुत वाहन हे सन 2011 मध्ये उत्पादित झालेले असूनही सन 2012 चे उत्पादन आहे असे तक्रारदाराला सांगितले व तशी आर.सी.टी.सी. ला नोंद आहे. ही अनुचित व्यापारी प्रथा आहे. तसेच तक्रारदाराने जाबदाराला सदरचे वाहन घेणेस भाग पाडलेने जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली असून प्रस्तुत वाहनात उत्पादित दोष असलेचे (Manufacturing defect) असलेचे स्पष्ट व सिध्द होत आहे. कारण वाहन खरेदी पासून एक महिन्यापासूनच वॉरंटी कालावधीतच प्रस्तुत वाहनात सातत्याने दोष व बिघाड निर्माण झाले आहेत व अजूनही प्रस्तुत गाडीत बिघाड व दोष कायमपणे चालूच आहेत. सदरचे वादातीत वाहन हे पूर्ण दोषमुक्त झालेले नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदाराचे ‘अरिया प्राईड’ या वादातीत वाहनात उत्पादन दोष (Manufacturing Defect) आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. याकामी जाबदार क्र. 2 ने म्हटले आहे की, तक्रारदाराने कोणत्याही तज्ञांचा रिपोर्ट याकामी दाखल केलेला नाही, जरी असे असले तरीही प्रस्तुत कामी तक्रारदाराचे वाहनामध्ये सातत्याने आलेले बिघाड व दोष पाहता सदरचे वाहनात उत्पादन दोष आहे हे कागदोपत्री सिध्द करणेत तक्रारदाराला यश आलेले आहे. याकामी वेगळा तज्ञांचा रिपोर्ट दाखल करणेची आवश्यकता नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. सदर कामी आम्ही मे. वरिष्ठ न्यायालयांच्या पुढील न्यायनिवाडे व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
1. 2014 (1) CLT 340 (NC)
Hind Motor (1) Ltd & others V/s. Lakhbir Singh & others,
Head Note :- Consumer Protection Act, 1986 Sec. 2 (1) (r) & 13 (1) Defective Vehicle- Manufacturing defects-Held:-
i. Act of the petitioners in selling the vehicle which was manufactured in the year 2005, in the year 2006 without disclosing the date of manufacture to the complainant certainly amounts to an unfair trade practice.
ii . With in eight months of selling of the vehicle, as per petitioners own case, it required substantial repairs worth- Rs. 2.25 Lakhs - This itself goes on the show that there were interest defects in the vehicle that is, why it required substantial repairs.
iii. No expert opinion is required as the facts of the case ifself speaks that major repairs were required just after short span of eight months from the date of the sale of the vehicle (para 19)
iv. Petitioners were deficient in rendering service- finding of fact cannot be interfered with in exercise of the revisional jurisdiction u/s 21 of the Act.
2. 2014 (1) CPJ page 595 (NC)
Escorts Ltd. V/s. k.v. Jyarajan & Anr.
-Motor Vehicle-defects-break down and repeated repairs- replacement of vehicle sought- complaint allowed- directed to refund of cost with 9% interest-appeal helf liability fixed on manufacturer.
3. 2013 (4) CPJ Pg. 612 (NC)
Tata Motors Ltd. V/s. Sunanda Sangawan & Anothers
Motor Vehicle-defects – replacement or refund of amount sought – Forum allowed complaint – state commission dismissed- hence revision – in order to provide justice to customers manufacturer and dealer should either replace the vehicle or refund the cost.
4. 2013 (1) CPJ Pg. 201 (N.C)
Ashok Leyland Ltd. V/s. Gopal Khan & ors.
Motor vehicle – defects- block cylinder brust – refund of charges- Forum allowed complaint – state commission dismissed- hence revision- Held there was a manufacturing defect in the vehicle during Warranty period – it is not necessary to obtain expert report - 3 Pistons had ceased and block of cylinder had bursted itself proves manufacturing defects.
5. 2010 (1) CPJ 169 Delhi
Sunil Bhasin V/s. Tata Engg. & Locomotive Ltd.,
Motor Vehicle- manufacturing defect–burden of proof- allegations of complainant in respect of defects in vehicle – supported by job cards sufficient to put onus upon manufacturer to disprove manufacturing defect.
वरील सर्व कागदपत्रे व न्यायनिवाडयांचा विचार करता प्रस्तुत तक्रारदाराने तज्ञांचा अहवाल दाखल करणेची आवश्यकता नाही. तसेच वाहनामध्ये उत्पादित दोष (Manufacturing defects) नाही. ही बाब जाबदाराने सिध्द करायला पाहीजे होती पण जाबदार क्र. 2 ने वाहनात उत्पादन दोष नसलेचे सिध्द केले नाही. जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथनावर कोणतेही आक्षेप नोंदवले नाहीत अथवा तक्रारदाराचे कथन खोडून काढलेले नाही. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदाराचे वादातीत वाहनात उत्पादन दोष Manufacturing defects असलेचे स्पष्ट व सिध्द आले आहे. तसेच जाबदार यांनी तक्रारदाराला अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सदोष सेवा पुरविली आहे हे निर्विवाद स्पष्ट व सिध्द होते. त्यामुळे तक्रारदार हे याकामी जाबदार यांचेकडून वादातीत वाहनाच्या बदल्यात प्रस्तुत वाहनाच्या किंमतीचेच नवीन वाहन बदलून मिळणेस व नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र.1 कंपनीने तक्रारदार यांचे वादातीत ‘अरिया प्राईड’ एम.एच.-11-बी.एच.585 हे तक्रारदाराचे ताब्यात असलेले वाहन परत घेऊन प्रस्तुत वाहनाच्या बदल्यात तक्रारदाराकडून घेतले किंमतीचेच दुसरे नवीन वाहन (त्याच प्रकारचे व मॉडेलचे) तक्रारदार यांना अदा करावे.
3. तक्रारदाराला झाले मानसीक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार मात्र) जाबदार क्र. 1 व 2 यानी तक्रारदाराला अदा करावेत.
4. जाबदार क्र. 1 व 2 यांनी तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/-(रुपये पाच हजार मात्र) तक्रारदाराला अदा करावेत.
5. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदार यांनी आदेश प्राप्त झाले तारखेपासून 60 दिवसात करावे.
6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन करणेत जाबदारांनी कसूर केलेस अर्जदार यांना ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा राहील.
7. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
8. प्रस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 29-02-2016.
सौ.सुरेखा हजारे श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.