Maharashtra

Additional DCF, Mumbai(Suburban)

CC/11/212

RAJENDRAPRASAD HARIGULAM SINGH - Complainant(s)

Versus

TATA MOTORS - Opp.Party(s)

B PATHAK

11 Mar 2015

ORDER

Addl. Consumer Disputes Redressal Forum, Mumbai Suburban District
Admin Bldg., 3rd floor, Nr. Chetana College, Bandra-East, Mumbai-51
 
Complaint Case No. CC/11/212
 
1. RAJENDRAPRASAD HARIGULAM SINGH
A/803, SHIVAM PARADISE, BEHIND DENA BANK, LBS MARG, BHANDUP (W), MUMBAI 400078
...........Complainant(s)
Versus
1. TATA MOTORS
4 TH FLOOR, FORBS, DR. GANDHI MARG, MUMBAI 400001
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. S S VYAVAHARE PRESIDENT
 HON'BLE MR. S.V.KALAL MEMBER
 
For the Complainant:
तक्रारदार गैरहजर.
 
For the Opp. Party:
सा.वाले करीता प्रतिनिधी वकील श्री. आलोक भट्ट हजर.
 
ORDER

 तक्रारदार                :  तक्रारदार व त्‍यांचे वकील गैर हजर.

 सा.वाले 1  करीता         :  वकील श्रीमती अनिता मराठे हजर.

 सा.वाले क्र. 2 करता        :  वकील श्री. डी.एस.हाटले हजर.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- 

 निकालपत्रः- श्री.एस.एस.व्‍यवहारे, अध्‍यक्ष.    ठिकाणः बांद्रा

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-

न्‍यायनिर्णय

1.    सा.वाले क्र. 1 हे टाटा मोटर्स या नांवाने चारचाकी वाहनांचे उत्‍पादक असून त्‍यांचे कार्यालय तक्रारीत नमुद केलेल्‍या ठिकाणी आहे. सा.वाले क्र. 2 हे सदर चारचाकी वाहनाचे वितरक असून आपला व्‍यवसाय फॉरच्‍युन कार प्रा.लि. या नांवाने पवई, मुंबई येथे करतात. तक्रारदार हे भांडूप येथील राहणारे असून दिनांक 29.3.2008 रोजी सा.वाले क्र. 2 यांचे कडून टाटा सुमो ग्रॅन्‍ड एफई जीएक्‍स हे 8 आसनांचे चारचाकी वाहन तक्रारदार यांनी रु.6,00,000/- येवढया किंमतीस विकत घेतले. सदर वाहनाच्‍या कार्यक्षमतेबाबत व वाहनात पुरविलेल्‍या सुविधांबद्दल सा.वाले क्र. 2 यांनी केलेल्‍या वर्णनावरुन, सा.वाले क्र. 2 यांचेवर विश्‍वास ठेवून तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांचे कडून सदर वाहन विकत घेतले. सदर वाहनाच्‍या खरेदीसाठी सा.वाले क्र. 1 यांनी तक्रारदार यांना कर्जाचा पुरवठा केला होता. तक्रारदार यांचे असे म्‍हणणे आहे की, सदर वाहन विकत घेतल्‍यापासून एक महिन्‍याचे आतच सदर वाहनात दुरुस्‍तीचे काम करावे लागले. तसेच वाहनामध्‍ये अनेक प्रकारच्‍या तक्रारी आढळून आल्‍या. सदर तक्रारी बाबत व नादुरुस्‍ती बाबत सा.वाले क्र. 1 व 2 यांचेकडे तक्रार केल्‍यानंतर सा.वाले क्र. 2 यांनी वाहनात दुरुस्‍ती तर करुन दिली, परंतु वाहन विकत घेतल्‍यापासून ते दिनांक 1.8.2009 पर्यत 20 ते 22 वेळा सदर वाहन सा.वाले क्र. 2 यांचेकडे वारंवार होणा-या बिघाडामुळे दुरुस्‍तीसाठी न्‍यावे लागले. सदर वाहनात दुरुस्‍ती करुन देखील वारंवार निर्माण होणारे बिघाड हे वाहनातील मुलभूत स्‍वरुपाचा अथवा उत्‍पादित दोष दाखवितात.

2.    तक्रारदार यांचे असे देखील कथन आहे की, दिनांक 25.5.2009 रोजी ते सदर वाहनाने आपले मुळ गावी फरीदाबाद येथे जात असताना सदर वाहनाच्‍या मागील भागातील अॅसीलिफ स्‍प्रींग हा भाग तुटून पडला. सदर भागाच्‍या दुरुस्‍तीसाठी टाटा कंपनीच्‍या वाराणसी येथील वितरकाने सदर दुरुस्‍ती करुन देण्‍यास नकार दिल्‍याने सदर भागास वेल्‍डींग करुन तक्रारदारांना वरील सुटा भाग दुरुस्‍त करुन घ्‍यावा लागला. परंतु दिनांक 1.7.2009 रोजी वाहनातील सदरचा भाग पुन्‍हा तुटून पडला. त्‍यामुळे वाहनात सतत निर्माण होणा-या बिघाडामुळे तक्रारदार यांनी सा.वाले यांना वकीलामार्फत नोटीस देऊन सदर वाहनाची बदली करुन मिळणेसाठी अथवा नुकसान भरपाई मिळणेसाठी विनंती केली. सदर वाहनास सा.वाले यांनी थातुर माथुर उत्‍तर देऊन तक्रारदारांची विनंती फेटाळून लावली. त्‍यामुळे सा.वाले यांची वरील कृती सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर या कृतीत येत असल्‍यामुळे तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल करुन सदर वाहनाची किंमत व्‍याजासह मिळून रु.8,84,834/- तसेच त्‍यावर होणारे 24 टक्‍के प्रमाणे व्‍याज, तसेच वाहनाचे दुरुस्‍तीसाठी लागलेला खर्च, त्‍यावर होणारे व्‍याज, मानसिक त्रासाबद्दल होणारी नुकसान भरपाई रु.6,00,000/- मिळणेसाठी सदरची तक्रार दाखल केलेली आहे.

3.    सा.वाले क्र. 1 व 2 यांनी आपली कैफीयत दाखल करुन तक्रारदारांचे म्‍हणणे व मागणे नाकारले. सा.वाले यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने, म्‍हणणे व मागणे खोटे व लबाडपणाचे असून सा.वाले यांचे कडून पैसे मिळविण्‍यासाठी खोटी विधाने केलेली आहेत. सा.वाले क्र. 1 यांचेतर्फे असे कथन करण्‍यात आले की, तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल करताना ते मंचासमोर स्‍वच्‍छ हाताने आलेले नाहीत. तसेच तक्रारदारांनी सदरचे वाहन विकत घेण्‍यासाठी सा.वाले क्र. 1 यांचेकडून कर्जाची रक्‍कम घेतली असल्‍यामुळे व कर्जाची रक्‍कम फीटेपावेतो आपले वाहन सा.वाले क्र. 1 यांचेकडे गहाण ठेवलेले असल्‍यामुळे तक्रारदार हे वादातीत वाहनाचे मालक होऊ शकत नाहीत.

4.    तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांचे कडून विकत घेतलेले वाहन हे सा.वाले क्र. 1 यांनी उत्‍पादित केले होते ही बाब सा.वाले क्र. 1 नाकारत नाहीत. परंतु सा.वाले क्र. 1 व 2 यांच्‍यातील नाते उत्‍पादक व भागधारक असे नसून दोघांमधील नाते प्रिन्‍सीपल ते प्रिन्‍सीपल असे असल्‍यामुळे सा.वाले क्र.2 यांनी विकलेल्‍या वाहना बाबत सा.वाले क्र. 1 यांची प्रत्‍यक्ष जबाबदारी येऊ शकत नाही. तसेच वादातीत वाहनाबाबत हमीचा कालावधी संपलेला नसल्‍यामुळे तक्रारदार यांना सदरचे वाहन दुरुस्‍त करुन घेण्‍यापलीकडे दुसरा कोणताही हक्‍क प्राप्‍त होत नाही. तसेच सदरच्‍या वाहनात कायम स्‍वरुपी दोष असल्‍याबाबत मंचासमोर तक्रार दाखल करण्‍याअगोदर अथवा तक्रार दाखल केल्‍यानंतर तक्रारदारांनी वादातीत वाहन प्रयोग शाळेत पाठवून अथवा मंचाकडे पाठवून संबंधितांचा अहवाल दाखल करणे आवश्‍यक होते. तसा अहवाल न दाखल केल्‍यामुळे तक्रारदार हे सा.वाले यांचे विरुध्‍द सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर ही बाब सिध्‍द करु शकत नाहीत. सा.वाले क्र. 1 यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदारांनी विकत घेतलेल्‍या वाहना बाबत निर्माण झालेले दोष या बाबत वेळोवेळी तक्रारदारांनी वाहनाची दुरुस्‍ती करुन दिलेली आहे. तसेच सदरच्‍या दुरुस्‍त्‍या हया किरकोळ स्‍वरुपाच्‍या असल्‍यामुळे त्‍यास मुलभुत स्‍वरुपाचा दोष असे म्‍हणता येणार नाही. उलटपक्षी तक्रारदारांनी वाहन घेण्‍या अगोदर वाहनाची सविस्‍तर तपासणी करुन घेतली असल्‍याने सदर वाहनाचे दुरुस्‍ती बाबत सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर ठरु शकत नाही.

5.    सा.वाले क्र. 2 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांच्‍या चारचाकी वाहनात आढळून आलेल्‍या दोषा बाबत सा.वाले क्र. 2 यांनी जातीने लक्ष घालून वाहनाची दुरुस्‍ती केलेली आहे. तसेच वाहनात आढळून आलेले दोष हे किरकोळ स्‍वरुपाचे दोष होते त्‍यामुळे त्‍यास मुलभूत स्‍वरुपाचे दोष म्‍हणता येणार नाही.  वाहनात आढळून आलेल्‍या दुरुस्‍ती कामा बाबत सदरच्‍या दुरुस्‍त्‍या हया रस्‍त्‍यावरील पडलेल्‍या खंडयांमुळे तक्रारदारांना आपल्‍या वाहनात कराव्‍या लागल्‍या. तसेच वाहनातील वायर बाबतची नुकसानी ही ऊंदरांनी वायर कुडतरल्‍यामुळे केली. त्‍या बाबत तक्रारदारांनी वेळोवेळी योग्‍य ती पावले उचलून दुरुस्‍ती करुन दिलेली आहे. वाहनाच्‍या दरवाज्‍यातील कुलुपांची दुरुस्‍ती वेळोवेळी केलेली आहे.

6.    तक्रारदार हे वाराणसी येथे गेले असता त्‍यांच्‍या चारचाकी वाहनातील अॅसीलिफ स्‍प्रींग ही रस्‍त्‍यावर पडलेल्‍या खंडयामुळे तुटण्‍याची शक्‍यता असते. परंतु त्‍या बाबत कोणत्‍याही प्रकारे वाहनामध्‍ये कायम स्‍वरुपी दोष म्‍हणता येणार नाही. त्‍यामुळे सा.वाले क्र. 2 हे वाहनातील दुरुस्‍ती बाबत जबाबदार ठरु शकत नाहीत.

7.    तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीसोबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद, तसेच चारचाकी वाहन विकत घेतल्‍या बाबतची पावती, वाहन विकत घेण्‍यासाठी घेतलेल्‍या कर्जाचा करार, वाहनाच्‍या नोंदणी करणाबाब असलेले कागदपत्र, सा.वाले यांनी दिलेल्‍या नोटीसची प्रत, वाहन दुरुस्‍तीला टाकल्‍या बाबतच्‍या जॉबसिटच्‍या प्रती, सा.वाले यांनी चारचाकी वाहनाचा हमीचा कालावधी वाढवून दिल्‍या बाबतचे पत्र  दाखल केले आहे. 

8.    या उलट सा.वाले क्र. 1 व 2 यांनी आपल्‍या कैफीयतीसोबत पुरावा शपथपत्र, व लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे. तसेच विविध न्‍यायालयांच्‍या न्‍यायनिर्णयाच्‍या प्रती दाखल केल्‍या आहेत. 

9.    प्रस्‍तुत मंचाने तक्रार, कैफीयत, कागदपत्रे, शपथपत्र व लेखी युक्‍तीवाद यांचे वाचन केले. सा.वाले क्र. 1 व 2  यांच्‍यातर्फे तोंडी युक्‍तवाद एैकण्‍यात आला. तक्रारदार हे आपला तोंडी युक्‍तीवाद करण्‍यास मंचासमोर हजर राहू शकले नाहीत. त्‍या नुसार तक्रारीचे निकालाकामी खालील मुद्दे कायम करण्‍यात येतात. 

क्र.

मुद्दे

उत्‍तर

1

तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांचेकडून विकत घेतलेल्‍या टाटा सुमो या चारचाकी वाहनाच्‍या व्‍यवहाराबाबत सा.वाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिंध्‍द करतात काय ?

नाही  

2

तक्रारदार तक्रारीत मागीतलेल्‍या मागण्‍या मिळण्‍यास पात्र आहेत काय

.नाही.   

3

अंतीम आदेश ?

तक्रार रद्द  करण्‍यात येते.  

 

कारण मिमांसा

मान्‍य मुद्देः- तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांचे कडून दिनांक 29.5.2008 रोजी टाटा सुमो ग्रॅन्‍ट हे चारचाकी वाहन रु.6,00,000/- येवढया किंमतीस विकत घेतले होते व सदर वाहनाचे उत्‍पादन सा.वाले क्र. 1 यांनी केले होते ही बाब उभय पक्षकार नाकारत नाहीत. तक्रारदार यांनी विकत घेतलेले वाहन दिनांक 10.4.2008 ते 1.8.2009 या कालावधीत 21 वेळा सा.वाले क्र. 2 यांचेकडे दुरुस्‍तीसाठी आणावे लागले ही बाब उभय पक्षकार नाकारत नाहीत. तक्रारदार यांनी सदर वादातीत वाहन तज्ञांकडून तपासून त्‍यातील उत्‍पादित दोष मंचासमोर आणले नाहीत ही बाब तक्रारदार नाकारत नाहीत. तक्रारदार यांनी सदर वाहन विकत घेण्‍यासाठी सा.वाले क्र. 1 यांचे कडून कर्ज घेतले होते ही बाब उभय पक्षकार नाकारत नाहीत.

10.   तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांचे कडून विकत घेतलेले वरील वर्णनाचे चारचाकी वाहन हे सदोष होते व त्‍यात मुलभूत स्‍वरुपाचे दोष होते व त्‍यामुळे सदरचे वाहन तक्रारदार यांना विकण्‍याची कृती सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर या कृतीत मोडते हे सिध्‍द करण्‍यासाठी तक्रारदार यांनी आपला पुरावा शपथपत्र व लेखी युक्‍तीवादी याव्‍दारे मुख्‍यत्‍वे असे दाखवून देण्‍याचा प्रयत्‍न केला की, तक्रारदार यांनी विकत घेतलेले चारचाकी वाहन सुमारे वर्षेभराचे कालावधीत 21 वेळा सा.वाले क्र. 2 यांचेकडे वारंवार दुरुस्‍तीसाठी आणावे लागले व सदर दुरुस्‍तीसाठी तक्रारदार यांना सुमारे दोन ते अडीज लाख रुपये खर्च करावा लागला. तक्रारदार यांचे वतीने युक्‍तीवाद करताना असे देखील दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला की, वाहनात निर्माण झालेले दोष हे किरकोळ स्‍वरुपाचे दोष होते असे दाखविण्‍याचा प्रयत्‍न जरी सा.वाले क्र. 1 व 2 यांनी केला असला तरी त्‍यांची विधाने ही मंचाची दिशाभूल करण्‍यासाठी केलेली आहे. तसेच वादातीत वाहनाची वेळोवेळी करावी लागणारी दुरुस्‍ती ही हमीच्‍या कालावधीत तक्रारदार यांचे कडून मोबदला न घेता करुन देण्‍यात आलेली आहे असे जरी सा.वाले यांनी दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला असला तरी त्‍यामुळे वाहनातील मुलभूत स्‍वरुपाचा दोष हा लपू शकत नाही. उलटपक्षी वादातीत वाहनात वेळोवेळी निर्माण होणारे दोष हे तक्रारदार यांच्‍या मानसिक परिस्थितीवर परीणाम करतात व नविन वाहन वापरण्‍याचा आनंद तक्रारदार त्‍यामुळे घेऊ शकत नाही. तसेच वाहनामध्‍ये वारंवार निर्माण होणारे दोष यामुळे वाहन चालक तसेच वाहनातील बसणारी इतर माणसे यांच्‍या जीवितास धोका निर्माण करणारे आहे. तक्रारदार यांचे वतीने असा देखील युक्‍तीवाद करण्‍यात आला की, सा.वाले यांचे म्‍हणणे म्‍हणजे वाहनात निर्माण झालेले दोष हे रस्‍त्‍यांवर असलेल्‍या खंडयांमुळे निर्माण झाले. हे विधान हास्‍यास्‍पद आहे. वास्‍तविक तक्रारदार हे वाराणसी येथे गेले असता तेथे जाण्‍यासाठी उपलब्‍ध असलेले रस्‍ते हे राष्‍ट्रीय महामार्ग असल्‍यामुळे ते उत्‍तम स्‍वरुपाचे आहेत. असे असुनसुध्‍दा वाहनाचे मागील चाकाजवळील लीफ स्प्रिंग दोन वेळा तुटली. या वरुन वाहनाचे उत्‍पादन निकृष्‍ट स्‍वरुपाचे होते हे सिध्‍द होते. तक्रारदार यांचे असे म्‍हणणे आहे की, किंबहुना वाहनात वारंवार होणारी बिघाड यामुळे सा.वाले क्र. 1 यांनी सदर वाहनाचे पुढील उत्‍पादन स्‍थगित केले. ही बाब वाहनातील मुलभूत दोष स्‍पष्‍टपणे दाखविते. सा.वाले यांचे म्‍हणजे वाहनात दिसून येणारे दोष हे किरकोळ स्‍वरुपाचे होते हे क्षणभर मान्‍य केल्‍यास त्‍यामुळे सा.वाले यांना निकृष्‍ट वाहनांचे उत्‍पादन करण्‍याचे जणू लायसन्‍ससच मिळेल. तक्रारदारांचे वतीने असा देखील युक्‍तीवाद करण्‍यात आला की, सदर वाहन घेण्‍यासाठी तक्रारदार यांनी सा.वाले यांचे कडून कर्ज जरी घेतले असले तरी त्‍यामुळे सदर वाहनाचे मालक सा.वाले क्र. 1 हे होऊ शकत नाहीत व मालकी ही तक्रारदारांकडे राहते. त्‍यामुळे वरील युक्‍तीवादाच्‍या सहाय्याने तक्रारदार यांनी त्‍यांना विकण्‍यात आलेले सदोष वाहनाच्‍या बाबत सा.वाले यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी प्रार्थना केली.

11.   उलटपक्षी सा.वाले यांनी आपल्‍या युक्‍तीवादात प्रामुख्‍याने असे सिध्‍द करण्‍याचा प्रयत्‍न केला की, तक्रारदार यांनी विकत घेतलेले वाहन त्‍यांनी वर्षेभराच्‍या कालावधीत प्रती दिन 80 किलोमिटर या सरासरीने वापरले. वास्‍तविक सा.वाले हे हॉटेल व्‍यवसायात पवई येथे नोकरी करतात व त्‍यांचे राहणे भांडूप आहे. पवई ते भांडूप हे अंतर 7 किलोमिटरपेक्षा जास्‍त नाही. असे असतानासुध्‍दा तक्रारदार यांनी केलेला वाहनाचा वापर हा वैयक्तिक वापरा व्‍यतिरिक्‍त इतर कारणासाठी केलेला दिसतो. सदर बाब ही तक्रारदारांनी दाखल केलेले जॉबसिट हे असे दर्शविते की, वाहनाच्‍या दुरुस्‍ती नंतर 7 ते 8 वेळा सदरचे वाहन वेग वेगळया व्‍यक्‍तींनी ताब्‍यात घेतलेले आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी सदर वाहनाचा वापर हा व्‍यवसायिक तत्‍वासाठी केलेला दिसून येतो. म्‍हणून तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येऊ शकत नाहीत. वाहनातील दुरुस्‍ती बाबत सा.वाले यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदार यांच्‍या चारचाकी वाहनातील दुरुस्‍ती ही किरकोळ स्‍वरुपाची व वाहनाच्‍या अती वापरामुळे करावी लागणारी दिसून येते. वास्‍तविक वाहनातील मुलभूत दोष दाखविण्‍यासाठी तक्रारदार यांनी प्रयोगशाळा अथवा तज्ञांकडून सदर वाहनाची तपासणी करुन त्‍यांचा अहवाल दाखल करणे आवश्‍यक होते. तो तसा न केल्‍यामुळे तक्रारदार हे वाहनातील दोश हे मुलभूत स्‍वरुपाचे होते असे सिध्‍द करु शकत नाहीत. वरील युक्‍तीवादाचे समर्थनार्थ सा.वाले यांनी मा.राष्‍ट्रीय आयोगाच्‍या इंजिनीयरिंग लोकोमोटीव्‍ह विरुध्‍द मच्‍चीराम धनगवाल 2009 VPJ Pagr 506 NCFRC तसेच मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या टेल्‍को विरुध्‍द हरदिपसिंग II (2011) CPJ Page 236 NC या राष्‍ट्रीय आयोगाच्‍या न्‍यायनिर्णयांच्‍या प्रतीवर भर दिला. तसेच सदर वाहनाचा प्रवास 68000 किलोमिटर येवढा झाला या बाबीकडे लक्ष वेधून मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या III (2013) CPJ 273 राजीव गुलाटी विरुध्‍द टाटा इंजिनियरिंग लोकोमोटीव्‍ह या न्‍यायनिर्णयावर भर देऊन असा युक्‍तीवाद केला की, वादातीत वाहनाचा एक वर्षाच्‍या कालावधीत 68000 किलोमिटर पर्यत करण्‍यात आलेला वापर असे दर्शवितो की, सदर वाहन विकल्‍यास वाहनातील घसा-यामुळे वाहनाच्‍या किंमती इतकी किंमत देखील तक्रारदाराला मिळू शकणार नाही. अशा परिस्थितीमध्‍ये वाहनामध्‍ये मुलभूत स्‍वरुपाचा असे म्‍हणता येणार नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांनी विकत घेतलेल्‍या वाहनात मुलभूत स्‍वरुपाचा दोष होता हे म्‍हणणे स्विकारता येणार नाही.

12.   वरील उभय पक्षकारांचा युक्‍तीवाद व अभिलेखातील कागदपत्रांचे अवलोकन केले असता एक गोष्‍ट प्रामुख्‍याने दिसून येते की, तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांचे कडून विकत घेतलेले चारचाकी वाहन विकत घेतल्‍याचे तारखेपासून म्‍हणजे दिनांक 29.3.2008 पासून दिनांक 1.8.2009 या कालावधीत 22 वेळा सा.वाले क्र. 2 यांचेकडे दुरुस्‍तीसाठी पाठविण्‍यात आले व 5 ते 6 वेळा सदर वाहन 6 ते 16 दिवसापर्यत सा.वाले क्र. 2 यांचेकडे दुरुस्‍तीसाठी ठेवण्‍यात आले. तसेच असे देखील दिसून येईल की, दिनांक 15.10.2008, दिनांक 8.5.2009, 1.7.2009, 1.8.2009, यावेळी वाहन दुरुस्‍त करताना तक्रारदारांना अनुक्रमे रु.2025/- , रु.5515/- व रु.1459/- येवढा खर्च करावा लागला. तसेच दिनांक 21.7.2008 रोजी तक्रारदारांना रु.449/- येवढा खर्च करावा लागला. सदर खर्च करतेवेळी पुढील चाकाचा समतोलपणा बिघडला होता. तर दिनांक 1.7.2009 रोजी लिफ स्प्रिंग ही तुटल्‍यामुळे नविन टाकावी लागली. इतर वेळेला वाहनामध्‍ये किरकोळ स्‍वरुपाची दुरुस्‍ती, तसेच दरवाज्‍याच्‍या कुलुपामध्‍ये बिघाड, वातानुकुलीत यंत्रणेत बिघाड, वगैरे स्‍वरुपाचे दोष आढळून येत होते. वरील दोष दुरुस्‍त करुनसुध्‍दा वारंवार का आढळून येत होते या बाबत सा.वाले यांनी समाधानकारक खुलासा दिलेला नाही. सा.वाले जरी असा युक्‍तीवाद करीत असले की, वाहनातील मुलभूत स्‍वरुपाचा दोष सिध्‍द करण्‍यासाठी वाहन प्रयोग शाळेतुन अथवा तज्ञ व्‍यक्‍तीकडून तपासून त्‍यांचा अहवाल घेणे आवश्‍यक आहे. हा युक्‍तीवाद मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या टाटा इंजिनियरींग अॅन्‍ड लोकोमोटीव्‍ह विरुध्‍द सुभाष आहुजा या प्रकरणातील न्‍यायनिर्णयाने खोडून काढला आहे. उलटपक्षी मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या हुंडाई मोटर्स विरुध्‍द अॅफीलेटेड इस्‍ट वेस्‍ट प्रेस I (2008) CPJ Page 19 या प्रकरणातील न्‍यायनिर्णयात वाहनात सतत दिसून येणारे बिघाड हे वाहनातील मुलभूत स्‍वरुपाचे दोष दर्शवितात व त्‍यासाठी रेस्‍ट इप्‍सा लोक्‍युटर ( Res ipsa loquitur ) ही कायदेशीर संज्ञा वाहनातील कायम स्‍वरुपी दोष दाखविते व अशा परिस्थितीत तज्ञांच्‍या पुराव्‍याची आवश्‍यकता नाही असे मत मा.राष्‍ट्रीय आयोगाने सास मोटर्स विरुध्‍द अनंत हरीदास III (2013) CPJ Page 520 असा निष्‍कर्ष काढून आपले मत नोंदविले आहे. त्‍यामुळे सा.वाले यांचा युक्‍तीवाद म्‍हणजे सदर वादातीत वाहन तज्ञांकडे न पाठविता व तज्ञांचा अहवाल न घेतल्‍यामुळे वाहनातील मुलभूत दोष सिध्‍द करता येत नाही हा युक्‍तीवाद स्विकारण्‍यासारखा नाही.               

13.   प्रस्‍तुतच्‍या तक्रारीत वादातीत वाहन सुमारे दिड वर्षाच्‍या कालावधीत 68000 किलोमिटर इतके चालले. वाहनात दिसून येणारे दोष हे रस्‍त्‍यांवर पडलेल्‍या खंडयांमुळे व वाहन योग्‍यरित्‍या न हाताळल्‍यामुळे आढळून आले हे दाखविण्‍यासाठी सा.वाले यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. परंतु दिड वर्षाच्‍या काळात वाहनाचा 68000 किलोमिटर झालेला प्रवास हा वाहनाचा अती वापर दाखवतो. त्‍यामुळे वाहन विकल्‍यास वाहनाच्‍या मुळ किंमती इतकी किंमती तक्रारदारास मिळू शकत नाही. दिड वर्षाच्‍या कालावधीत वाहनाचा झालेला 68000 किलोमिटर इतका प्रवास हा वाहनाचा अतिवापर दर्शवितो. त्‍यामुळे वाहनात वारंवार दुरुस्‍ती करावी लागली हे क्षणभर मान्‍य केले तरी केवळ त्‍यामुळे वाहनात मुलभूत स्‍वरुपाचा दोष सिध्‍द होऊ शकणार नाही असा निष्‍कर्ष मा. राष्‍ट्रीय आयोगाने नुकत्‍याच दिलेल्‍या III (2013) CPJ Page 273 NC  राजीव गुलाटी विरुध्‍द टाटा इंजिनियरिंग लोकोमोटीव्‍ह या प्रकरणात काढलेला आहे. या न्‍यायनिर्णयावर जास्‍त भर देऊन वादातीत वाहनात मुलभूत स्‍वरुपाचा दोष आढळून येणार नाही असा निष्‍कर्ष काढल्‍यास अतिशयोक्‍ती होणार नाही असे मंचाचे मत झाले आहे. त्‍यामुळे सदर प्रकरणात ( Res ipsa loquitur ) ही कायदेशीर बाब वाहनातील मुलभूत दोष दाखविण्‍यास समर्थ ठरु शकत नाही व वाहनाचा दिड वर्षात 68000 किलोमिटर इतका झालेला प्रवास यामुळे वाहनातील मुलभूत स्‍वरुपाचे दोष सिध्‍द होऊ शकत नाहीत असे मंचाचे मत झाले आहे. त्‍यामुळे मुद्दा क्र. 1 व 2 नकारार्थी ठरवून मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.    

                             आदेश

1.    तक्रार क्रमांक 212/2011  रद्द करण्‍यात येते.

2.    आदेशाच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात

     याव्‍यात.

ठिकाणः  मुंबई.

दिनांकः  11/03/2015

 
 
[HON'BLE MR. S S VYAVAHARE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.V.KALAL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.