निकालपत्र (दि.21.07.2014) व्दाराः- मा. सदस्या - सौ.रुपाली डी.घाटगे
प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे सामनेवाले यांनी दोषयुक्त ट्रक देऊन सेवेत त्रुटी ठेवलेमुळे नुकसानभरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
1 प्रस्तुत प्रकरणी सामनेवाले क्र.1 ते 3 यांना नोटीसीचा आदेश करण्यात आला.तथापि प्रस्तुत प्रकरणी नोटीसांची बजावणी होऊनदेखील सामनेवाले क्र.1 ते 3 हजर राहिले नाहीत अथवा त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केलेले नाही. त्याकारणाने त्यांचेविरुध्द दि.06.03.2013 रोजी एकतर्फा आदेश पारीत करणेत आलेला आहे. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदारांचे अॅफीडेव्हीट, तक्रारदार तर्फे साक्षीदारांचे अॅफीडेव्हीट यावरुन गुणदोषावर खालीलप्रमाणे निर्णय देत आहे.
2 तक्रारदाराची तक्रार थोडक्यात तक्रार-
सामनेवाले क्र.1 यांचा ट्रक उत्पादित करण्याचा व्यवसाय आहे. सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 यांचे अधिकृत वितरक असून सामनेवाले क्र.3 हे अधिकृत सर्व्हिस पुरवणारी अॅटोमोबाईल कंपनी आहे. तक्रारदारांनी ट्रक क्र.LPT 2515/48/ COWL E-II CUMMINS हा ट्रक दि.27.03.2010 रोजी सामनेवाले क्र.2 यांचेकडून रक्कम रु.13,18,410/- इतक्या कंपनीस आण्णासाहेब चौगुले अर्बन को-ऑप.बँक येथून रक्कम रु.11,20,000/- इतके कर्ज उचल करुन खरेदी केला असून ट्रकचा रजिस्टर क्र.एम.एच.09 बी.सी.8889 असा आहे. तक्रारदारांचा ट्रक चावीने बंद होत नसल्याचे आढळून आले. त्याकरिता, दि.28.10.2010 रोजी सामनेवाले क्र.3 यांचेकडे दुरुस्तीसाठी पाठविला. सामनेवाले क्र.3 यांनी ट्रकचे इंजिन, डिझेल टँक, फ्युएल इंन्जेक्शन पंप, इत्यादी तपासणी व दुरुस्ती करुन बॉशपंप काढून सामनेवाले क्र.2 यांचेकडे पाठविला. त्यावेळी, वाहनाचे रनींग 45131 कि.मी.इतके झालेले होते. वाहन दुरुस्तीची घटना वॉरंटी काळात घडलेली होती. दि.06.07.2011 रोजी लो पिक-अपच्या प्रॉब्लेममुळे रक्कम रु.576/- इतके सामनेवाले यांना देऊन सदरच्या इंजिनची बदली करुन घेतली. सदरच्या दुरुस्तीमुळे थोडया कालावधीकरीता सदरच्या ट्रकमधील दोष निघाले तथापि एक महिन्याने सदरचा त्रास होऊ लागल्याने व बॉशपंपमध्ये उत्पादित दोष असल्याने तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी तक्रार करुन देखील सामनेवाले क्र.2 यांनी सदरचा बॉशपंप वॉरंटी कालावधीत असताना बदलून देण्यास नकार दिला. त्या कारणाने तक्रारदारांना वाहतूक ट्रिपला रु.3,400/- चे जादा डिझेल 32 वेळा वाहतूक ट्रिप केल्यामुळे एकूण रु.1,08,800/- इतके नुकसान सामनेवाले यांचे उत्पादित दोषामुळे सोसावे लागले. सदरचा बॉशपंप बदलून न देता सामनेवाले यांनी किेरकोळ दुरुस्ती करुन सदरच्या दुरुस्तीकरीता तक्रारदारांना रक्कम रु.5,664/- इतके खर्च करावे लागले. गाडी नादुरुस्त असल्याने वाहतुकीकरीता पाठविता येत नसलेने तक्रारदारांचे रक्कम रु.57,500/- इतके नुकसान झाले. तसेच मालाची डिलेव्हरी वेळेत न पोहचल्याने भाडेच्या रक्कमातून रक्कम रु.25,000/- दंड म्हणून कमी केलेली आहे. दि.14.09.2011 रोजी ट्रकमध्ये बिघाड निर्माण झालेने सामनेवाले यांचे सांगण्यावरुन स्पार्क अॅन्ड स्पिड यांचेकडे दि.18.09.2011 रोजी बॉशपंप दुरुस्तीस दिले असताना दुरुस्तीकरीता रक्कम रु.3,000/- इतके खर्च होऊनदेखील वाहनातील दोषाचे निवारण झाले नाही. बॉशपंपमधील वारंवार बिघाड हा इंजिनचे टाईमींग व्यवस्थित सेटअप झालेले नसलेकारणाने व सदरच्या वाहनातील उत्पादित दोष वाहन खरेदी केलेपासून असलेचे आढळून आले. सदरच्या दोषाचे निवारण करण्याकरीता तक्रारदारांना रक्कम रु.40,000/- खर्च केलेला आहे. तसेच सदरच्या बिघाडाची कल्पना सामनेवाले यांना सुरुवातीपासून तोंडी व ई-मेलव्दारे कळवून सामनेवाले यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. तक्रारदारांचे रक्कम रु.2,500/- प्रमाणे 35 दिवसांचे सामनेवाले यांचे बेजबाबदारपणामुळे एकूण रक्कम रु.1,00,000/- नुकसान सोसावे लागले आहे. वाहनातील दोष वॉरंटी कालावधीमध्ये असतानादेखील सदरची दुरुस्ती विनामोबदला न करता, रक्कम रु.1,00,000/- इतके दुरुस्ती चार्जेस सामनेवाले यांनी घेतलेले आहे. तक्रारदारांचे कर्ज खाते सामनेवाले यांचे कृतीमुळे थकीत गेलेले असून दि.25.10.2011 रोजी अखेर रक्कम रु.1,10,000/- इतकी थकबाकी थकीत आहे. सामनेवाले क्र.1 यांनी उत्पादित केलेल्या वाहनातील उत्पादित दोषामुळे तक्रारदारांना सदरची नुकसान ही सोसावी लागली आहे. त्याकारणाने सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना सदरची वाहन बदलून नविन दोषविरहीत वाहन दयावे व सदर वाहनातील दोषामुळे झालेल्या नुकसानीपोटी तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी एकूण रक्कम रु.6,53,800/- एकूण नुकसानीची रक्कम तक्रारदरास सामनेवाला यांचेकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
3 तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत अ.क्र.1 ला सामनेवाले क्र.1 कडून दि.27.03.2010 रोजी वाहन खरेदी केलेबाबतची पावती, अ.क्र.2 ते 6 ला दि.18.05.2010, दि.01.07.2010, दि.10.07.2011, दि.30.07.2011 व दि.01.08.2011 रोजी सामनेवाले क्र.2 यांचे गाडी सर्व्हिंसिंग केलेबाबतची पावती, अ.क्र.7 ते 13 ला दि.28.08.2010, दि.27.09.2010, दि.25.05.2010, दि.30.10.2010, दि.27.02.2011, दि.23.04.2011 रोजी सामनेवाले क्र.3 यांचेकडे गाडी सर्व्हिंसींग केलेबाबतची पावती, अ.क्र.15 व 16 ला दि.24.04.2011, दि.08.06.2011 रोजी सामनेवाले क्र.3 यांचेकडे सर्व्हिसिंग केलेबाबतची पावती, अ.क्र.17 ला दि.31.05.2010 रोजी अंबिका अॅटो सेल्स अॅन्ड सर्व्हिसेस, अ.क्र.18 ला वेलडन अॅटोमोबाईल यांचेकडे गाडी सर्व्हीसींग केलेबाबतची पावती, अ.क्र.19 ला अरविंद मोटार प्रा.लि. यांचेकडे दि.06.07.2011 रोजी सर्व्हिसींग केलेची पावती, अ.क्र.20 ला पावती क्र.77206 चे वॉरंटी जॉब कार्ड, अ.क्र.21 ला पावती क्र.77207 चे वॉरंटी कार्ड, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4 तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदारांचे अॅफीडेव्हीट, तक्रारदार तर्फे साक्षीदारांचे अॅफीडेव्हीट, तक्रारदारांचे वकीलांचे तोंडी व लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता, न्यायनिर्णय कामी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | सामनेवाले-विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. |
3 | आदेश काय ? | अंतिम निर्णयाप्रमाणे. |
कारणमिमांसाः-
मुद्दा क्र.1- यातील सामनेवाले क्र.1 यांचा ट्रक उत्पादित करण्याचा व्यवसाय असून सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 चे अधिकृत वितरक असून सामनेवाले क्र.3 ह सर्व्हिस पुरविणारी अॅटोमोबाईल कंपनी आहे. तक्रारदारांनी दि.27.03.2010 रोजी यातील सामनेवाले क्र.1 यांनी उत्पादित केलेला ट्रक क्र.एम.एच.-09 बी.सी.-8889 सामनेवाले क्र.2 यांचेकडून रक्कम रु.13,18,710/- इतक्या किंमतीस खरेदी केला. सदरचा ट्रक दि.28.10.2010 रोजी व दि.06.07.2011 रोजी दुरुस्तीस सामनेवाले क्र.3 यांचेकडे पाठविला असता, ट्रक दुरुस्त करुन दिला. तथापि, दि.06.07.2011 ते दि.13.07.2011 पर्यंत ट्रक पुन्हा बंद राहिला असता, सामनेवाले क्र.2 व 3 यांनी तक्रारदारांचा ट्रकमधील बिघाड वॉरंटी कालावधीमध्ये असताना देखील वॉशपंप वारंवार बदलून देणेस नकार दिला. दि.18.09.2011 व दि.10.10.2011 रोजी अर्जदारांनी सामनेवाले यांचेकडे सामनेवाले वॉशपंप दुरुस्तीस दिला असता, सामनेवाले क्र.1 यांचेकडून उत्पादित वाहनाचे इंजिनचे टायमिंगमध्ये वाहन खरेदी केलेपासून दोष असलेचे सांगितले. त्याकारणाने सदरचे वाहनातील उत्पादित दोषाचे निराकरण न करुन व सदर वाहनातील बॉशपंप वॉरंटी कालावधीमध्ये असताना देखील नविन बॉशपंप न देऊन सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयांचे अनुषंगाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अ.क्र.1 ला तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून वाहन खरेदी केलेबाबतची पावती दाखल केलेली असून सदर पावतीवर रक्कम रु.13,18,710/- नमुद आहे. सदरचे वाहन दि.27.03.2010 रोजी खरेदी केलेले असून Chassis No.MAT 42603A7C13465 असे नमुद आहे. अ.क्र.2 ते 6 ला सामनेवाले क्र.2 यांचेकडे सदरचे वाहन वेळोवेळी सर्व्हिसींग केलेची पावती दाखल असुन अ.क्र.7 ते 13 ला सामनेवाले क्र.3 यांचे सदरचे वाहन सर्व्हिंसींग केलेबाबतचे पावती दाखल आहेत. सदरचे पावत्यांवर ट्रक क्र.एम.एच.-09 बी.सी.-8889, Chassis No.MAT 42603A7C13465 service request type- paid services असे नमुद आहे. अ.क्र.10 कडील पावतीचे अवलोकन केले असता, सदर पावतीवर जॉब कार्ड दि.28.10.2010 नमुद असून Particulars – Fuel Injunction Pump [including setting the timing, Injector set, Fuel Filters, Type- warranty नमुद आहे. अ.क्र.20 ला Warranty Job Card, Weldone Automobiles, Bosch Authorised यांचे दाखल केलेले असून Chassis No.MAT 42603A7C13465, Customer Complaint-Starting Trouble, Description of Defect-Piston Jammed, complete roller pitted, Verdict-Rejected, Reason for rejection-Negative Pressure Built-up or adulterate Fuel [poor] असे नमुद आहे. अ.क्र.21 ला सदर कंपनीचे वॉरंटी जॉबकार्ड दाखल असून Customer Complaint-Starting Trouble, Description of Defect-No Spray hole Blocks in two nozzle, Verdict-accepted असे नमुद आहे. वरील सर्व कागदपत्रांवरून सदरच्या वाहनांमध्ये वेळोवेळी बिघाड निर्माण झाल्याने सदरचे वाहन सामनेवाले क्र.2 व 3 यांचेकडे सर्व्हिंसींगला दिलेले होते. तथापि सर्व्हिंसींग करुनसुध्दा सदरच्या वाहनातील उत्पादित दोषाचे निराकरण न झालेने सदरचे वाहन पूर्णपणे दुरुस्त झालेले नव्हते हे प्रथमदर्शनी दिसून येते.
तक्रारदारांनी दि.09.02.2012 रोजी विनंती अर्जात प्रस्तुतचा तक्रार अर्ज, मे.कोर्टात प्रलंबित असताना सामनेवाले यांनी वादातील वाहनाला पर्यायी बॉशपंप बसवूनही वाहनामधील दोषाचे निराकरण होत नाही, त्यामुळे सामनेवाले यांनी पर्यायी बॉशपंप परत घेऊन मुळ बॉशपंप तक्रारदारांना दिला आहे असे नमुद आहे. तसेच तक्रारदारांनी दि.26.03.2013 रोजी साक्षीदाराचे अॅफीडेव्हीट दाखल केले असून सदर अॅफीडेव्हीटमध्ये सदरच्या ट्रकच्या बॉशपंपमधील दोष हा उत्पादित दोष असल्याने ट्रकचे अव्हरेज कमी होते व गाडीला जास्त डिझेल लागत होते, सदरच्या ट्रकच्या बॉशपंपमधील दोष हा उत्पादित दोष आहे असे नमुद आहे. वरील सर्व कागदपत्रांचे या मंचाने बारकाईने अवलोकन केले असता, सदरचे वाहन हे सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी सर्व्हिसींगला देऊनदेखील वाहनामधील बॉशपंपमधील उत्पादित दोषामुळे सदरचे वाहन चालविणे तक्रारदारांना धोकादायक होते हे सिध्द होते.
तक्रारदारांनी तक्रार अर्जात, सामनेवाले क्र.1 यांनी सदरचे वाहन बदलून नवीन दोषविरहीत वाहन देणेबाबत विनंती केली आहे. तथापि सदरच्या मुद्दयाच्या अनुषंगाने तक्रारदारांनी सदरचे वाहन पूर्णपणे सदोष होते या अनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा अथवा Technician Expert / तज्ञांचे मत या मंचात दाखल केलेले नाही. तसेच तक्रारदारांनी तक्रार अर्जात बँकेकडील थकबाकी रक्कम, ट्रिपला सोसावे लागणारे जादा डिझेल, इत्यादी नुकसान भरपाईची रक्कमेची मागणी केलेली आहे. तथापि त्या अनुषंगाने तक्रारदारांनी सदर बँकेचा खातेउतारा व इतर नुकसानीदाखल कोणताही कागदोपत्री पुरावा या मंचात दाखल केला नसल्याने परिस्थितीजन्य पुराव्याअभावी तक्रारदारांची सदरची विनंती हे मंच विचारात घेत नाही.
वरील सर्व कागदपत्रांचा व बाबींचा विचार करता, तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे सदरचे वाहन वेळोवेळी दुरुस्तीला दिले असताना देखील व र्इ-मेलव्दारे सामनेवाले यांचेकडे तक्रारी केले असताना देखील, सामनेवाले यांनी वाहनामधील दोषांचे निराकरण केले नाही. सदरचे वाहन पूर्णपणे दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी सामनेवाले यांची होती. तथापि सामनेवाले यांनी सदरची जबाबदारी पार पाडलेली नाही. उत्पादित कंपनीने कोणत्याही उत्पादनाची विक्री करीत असताना विक्री पश्चात असणारी सेवा देणेची जबाबदारी प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट (Privity of Contract) या तत्वानुसार उत्पादित कंपनी व त्यांचे विक्रेत्याची असते. तसेच सदरची जबाबदारी ही केवळ उत्पादन विक्री करण्यापुरती मर्यादित नसून विक्रीपश्चात सेवा देण्याची असते.या सर्व बाबींचा विचार करता सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास दयावयाच्या सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 – वर मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांचेकडून नविन दोषविरहीत बॉशपंप मिळणेस पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांनी सदोष वाहन दिलेने तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला व सदरची तक्रार दाखल करावी लागली. त्याकारणाने तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 - सबब, हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
2. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारास सदर वाहनात नविन दोषविरहीत बॉशपंप दयावा.
3 सामनेवाले क्र 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.5,000/- अदा करावेत.
4 आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.