View 3916 Cases Against Tata Motors
View 3916 Cases Against Tata Motors
Sou. Surekha Vikas Nalavade filed a consumer case on 31 Oct 2015 against Tata motors Manager in the Satara Consumer Court. The case no is CC/11/93 and the judgment uploaded on 15 Jan 2016.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 93/2011.
तक्रार दाखल ता.29-6-2011.
तक्रार निकाली ता.31-10-2015.
1. सौ.सुरेखा विकास नलावडे,
रा.मु.पो.वाढे, ता.जि.सातारा.
2. श्री.प्रशांत पोपटराव खामकर,
रा.शाहुनगर, गोडोली, जि.सातारा. ....तक्रारदार.
विरुध्द
1. मे.टाटा मोटर्स,
मार्केटिंग अँड कस्टमर सपोर्ट
पॅसेंजर कार बिझनेस युनिटतर्फे-
शाखा प्रबंधक.
8वा मजला, सेंटर नं.1, वर्ल्ड ट्रेड सेंटर,
कफ परेड, मुंबई 400 005.
2. मे.हेम मोर्टस डिव्हीजन प्रा.लि.
अधिकृत डिलरतर्फे व्यवस्थापक-
ए-2 जुनी एम.आय.डी.सी.
पुणे बेंगलोर हायवे, सातारा 415 001. ..... जाबदार.
तक्रारदारतर्फे – अँड.व्ही.आय.शेट्टी.
जाबदार क्र.1 तर्फे- अँड.ए.जे.झाड.
जाबदार क्र.2 तर्फे- अँड.व्ही.डी.निकम.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य यांनी पारित केला.
1. यातील अर्जदारानी त्यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे यातील जाबदारांनी केलेल्या सेवेतील त्रुटीबाबत दाखल केली आहे.
2. अर्जदाराच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे-
प्रस्तुत अर्जदार ही रा.मु.पो.वाढे, ता.जि.सातारा येथील रहिवासी असून त्यांनी यातील जाबदार क्र.1 यांनी टाटा मोटर्स या नावाने उत्पादित केलेले वाहन टाटा इंडिगो एलएक्स डीकोर मॉडेलची कार क्र.MH-11-Y8975 ही रक्कम रु.5,69,540/- इतक्या किंमतीस दि.29-4-2007 रोजी जाबदार क्र.1 यांचे अधिकृत वाहन विक्रेते यांचेकडून खरेदी केली. विषयांकित वाहन खरेदी घेतलेपासून त्यामध्ये एकाच प्रकारचा उत्पादित दोष दिसून येत होता की कारचे इंजिन बंद पडते व त्याचे दुरुस्तीसाठी प्रत्येक 20 ते 25 दिवसानंतर मोठा खर्च करावा लागतो. यातील जाबदारांनी विषयांकित वाहनाबाबत वॉरंटी कालावधीमधील सेवा देऊन ते विषयांकित वाहन दुरुस्त करुन देत आले आहेत परंतु विषयांकित वाहनामध्ये नमूद केलेला वाहन बद पडणेचा दोष मात्र यातील जाबदार दूर करुन देऊ शकलेले नाहीत व जाबदारानी ज्या ज्या वेळी विषयांकित वाहनाची दुरुस्ती केली त्या त्या वेळी जाबदार कंपनीच्या संगणकावर वाहन हिस्ट्री म्हणून त्या नोंदी केल्या आहेत. त्यावरुनही विषयांकित वाहनामध्ये वर नमूद उत्पादित दोष हा कोणत्याही दुरुस्तीमध्ये निघालेला नाही.
अर्जदाराने विषयांकित वाहन खरेदी केलेनंतर पहिल्या तारखेस म्हणजे दि.2-7-2008 रोजी वाहनाचे रनिंग 30514 कि.मी.इतके असताना सदर वाहनाचा टाईम बेल्ट तुटला त्यामुळे इंजिनवर आघात होऊन त्याचे नुकसान झाले व विषयांकित वाहनाच्या वॉरंटी मुदतीत जाबदाराकडे दुरुस्तीसाठी दाखल केली, त्यावेळी जाबदार क्र.2 यांनी जॉबकार्ड नं.JC-Hem Age-SA-0809-000955 ने दि.5-7-2008 रोजी विषयांकित वाहनाचा टायमिंग बेल्ट बदलणेत आला. त्याबरोबरीने इंजिन काम करुन संपूर्ण अँसेंब्ली सिलेंडर हेड नावाचा भाग बदलून देणेत आला. यानंतर पुन्हा दि.29-10-2008 रोजी अर्जदार व त्यांचे पती कोल्हापूर शहरी केले असता कोल्हापूर टोल नाक्याजवळ वादातीत वाहनाचे मशीन बंद पडले. तेव्हा वादातीत वाहन टोचण करुन सातारा येथे आणणेत आले. त्याकरिता अर्जदारास रु.5,000/- चा खर्च करावा लागला आहे. याही वेळी वादातीत वाहनाच्या इंजिनमधील टायमिंग बेल्ट तुटला होता. परिणामी पुन्हा एकदा इंजिनचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते. जाबदार क्र.2 यांचेकडील जॉब कार्ड क्र. JC-Hem Age- SA-0809-002235 तारीख 27-11-2008 अन्वये वादातील वाहनास नवीन टायमिंग बेल्ट बसवणेत आला व पुन्हा एकदा इंजिन खोलून अँसेंब्ली सिलेंडर हेड नामक भाग बदलून देणेत आला.
वादातीत वाहनाचे रनिंग 42659 कि.मी.इतके झाले असता वादातीत वाहनामध्ये पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच दोष प्रकट झाला. यानंतर वादातीत वाहनाचे रनिंग 49409 कि.मी.इतके झाले असता वादातीत वाहन पुन्हा एकदा ब्रेकडाऊन झाले. वादातीत वाहनाचे इंजिन बंद पडले. यावेळी जाबदार क्र.2 यांनी अर्जदारांच्या वाहनांची दुरुस्ती टाटा मोटार्स कंपनीचे कोल्हापूर विभागाचे अधिकृत डिलर मे.मार्व्हलस मोटार्स प्रा.लि. यांचेकडून करुन घेतले. मे.मार्व्हलस मोटार्स यांचेकडील जॉब कार्ड क्र. JC-MarMop-KL-0910-000271 तारीख 12-4-2009 अन्वये वादातीत वाहनाचे निम्मे इंजिन बदलणेस भाग पडले. इंजिनचा टायमिंग बेल्ट तुटल्याने या खेपेला इंजिनचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. टायमिंग बेल्ट नवीन बसवणेत आला. या कामासाठी रक्कम रु.1,04,435.62 इतका खर्च झाला. त्यावेळी अर्जदाराकडून वॉरंटी काळातील सेवा म्हणून केवळ फरकाची रक्कम रु.3,445/- इतकी घेणेत आली. यानंतर वादातीत वाहनाचे रनिंग 76,000 कि.मी.इतके झाले असता पुन्हा पूर्वीसारखाच दोष निर्माण होऊन वादातीत वाहनाचे इंजिन बंद पडले. त्यावेळी वादातीत वाहनाची वॉरंटी काळातील दुरुस्ती सातारा येथील मे.पंडित ऑटोमोटिव्ह लि.यांचेकडून करुन घेणेत आली. त्यांचेकडील जॉब कार्ड क्र.JC-Pandit Ltd.-ST-1011-000602 तारीख 2-5-2010 अन्वये इंजिनचा तुटलेला टायमिंग बेल्ट बदलणेत आला. इंजिन खोलून त्याचे पुन्हा काम करणे भाग पडले. इंजिनला नवीन अँसेंब्ली सिलेंडर हेड वगैरे बसवणेत आले. यावेळी रक्कम रु.59,469/- इतका खर्च आला. अर्जदारांकडून याही वेळी केवळ फरकाची रक्कम घेणेत आली. यानंतरवादातीत वाहनाचे रनिंग 81990 कि.मी.इतके झाले तेव्हा पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच वादातीत वाहनाचे इंजिन बंद पडले. पुन्हा एकदा त्याच कारणासाठी व त्याच प्रकारच्या दुरुस्तीसाठी वादातीत वाहन मे.पंडित ऑटोमोटिव्ह यांचेकडे जमा करणेत आले. यावेळी वादातीत वाहनाच्या इंजिनमधील टायमिंग बेल्ट तुटल्याकारणाने इंजिनचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. अर्जदारांचे या वादातीत वाहनास वॉरंटी सेवेतहत तुटलेला टायमिंग बेल्ट बदलून देणेत आला, तसेच पुन्हा एकदा निम्मे इंजिन बदलून देणे भाग पडले. यानंतर वादातीत वाहनाचे रनिंग 85832 कि.मी.इतके झाले तेव्हा पुन्हा पूर्वीसारखीच खराबी होऊन वादातीत वाहनाचे इंजिन बंद पडले. यावेळी वाहनाची वॉरंटी तहतची दुरुस्ती मे.पंडीत ऑटोमोटिव्ह या जाबदार क्र.1 यांचे अधिकृत डिलरकडे करणेत आली. त्यांचेकडील जॉब कार्ड क्र.0006846, दि.24-11-2010 अन्वये तुटलेला टायमिंग बेल्ट, इंजिनचे अँसेंब्ली सिलेंडर हेड वगैरे भाग बदलून देणेत आले. रक्कम रु.27,629/- इतका खर्च आला. अर्जदारांकडून वॉरंटची तहतची सेवा म्हणून फरकाची रक्कम रु.1,577.35 इतकी भरुन घेणेत आली. यानंतर आता गेले काही दिवसापूर्वी वादातीत वाहनाचे रनिंग 92553 कि.मी.इतके झाले असता वादातीत वाहनामध्ये पुन्हा एकदा पूर्वीसारखीच खराबी झाली आहे. वादातीत वाहन मे.पंडित ऑटोमोटिव्ह यांचेकडे दुरुस्तीसाठी जमा केले होते ते आजही तेथेच आहे. अशा प्रकारे वादातीत वाहनामध्ये दि.2-7-2008 ते आजअखेर एकूण 92553 कि.मी.रनिंगच्या कालावधीत 8 वेळा एकाच प्रकारचा दोष निर्माण झाला आहे. प्रत्येक खेपेस इंजिनचा टायमिंग बेल्ट तुटतो आहे. परिणामी इंजिनचे मोठया प्रमाणात नुकसान होत आले आहे. प्रत्येक वेळी वादातीत वाहन 20-25 दिवसांसाठी दुरुस्तीसाठी सोडावे लागत आले आहे. दोन वेळा तर इंजिनचा निम्मा भाग नवीन बदलून देणे भाग पडले आहे. तथापि वादातीत वाहनामध्ये वारंवार निर्माण होणारी एकाच प्रकारची खराबी व तक्रारीचा विचार करता वादातीत वाहनाच्या उत्पादनावेळीच अंगभूत असा दोष राहिलेला आहे की ज्यामुळे इंजिनमधील व्हॉल्व्हस हे इंजिनमधील पिस्टनच्या बरोबरीने नेमक्या वेळेला उघडणे व बंद होणे हे कार्य नेमकेपणाने होत नाही व या सर्व कार्यास गती देणेचे काम इंजिनमधील टायमिंग बेल्टद्वारा होत असते. तथापि वर नमूद प्रमाणे इंजिनचे काम योग्य प्रकारे व योग्य वेळी होत नाही म्हणून अशा प्रत्येक वेळी टायमिंग बेल्टवर दबाव येतो व तो तुटतो, परिणामी इंजिनमधील अनेक पार्टसना नुकसान होते व इंजिनच बंद पडते आहे. वादातीत वाहनात अशा प्रकारचा उत्पादित दोष अंगीभूत स्वरुपाचा आहे ही बाब वादातीत वाहनाच्या आजअखेर पर्यंतच्या वारंवार येत राहिलेल्या एकाच प्रकारच्या तक्रारीवरुन व त्याच त्याच प्रकारच्या दुरुस्तीवरुन स्पष्ट होत आहे. वस्तुस्थितीजन्य पुरावे व रेकॉर्डवरुन वादातीत वाहनातला उत्पादित दोष स्पष्ट झालेला आहे. सबब अर्जदारांना वादातीत वाहनाच्या उत्पादित दोषाचे कारणाने वाहनापोटी नवीन वाहन अथवा अर्जदारानी विषयांकित वाहनाचे किंमतीपोटी अदा केलेली सर्व मूळ रक्कम परत मागणेसाठी प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल केला आहे. अर्जदारानी अर्जासोबत सर्व जॉब कार्ड, इन्व्हॉईस, वादातीत वाहनाची सर्व्हीस हिस्ट्रीची एक प्रत, ओनर्स मॅन्युअलमधील पान क्र.133ची सत्यांकित प्रत तसेच टायमिंग बेल्टबाबतचे शास्त्रीय महत्व विषद करणारा इंटरनेटवरील दस्तऐवजाची प्रत वाढीव वॉरंटी कार्ड इ.कागद दाखल केले आहेत.
प्रस्तुत अर्जदाराने यातील जाबदाराकडे विषयांकित सदोष वाहन बदलून नव्याने मागितले किंवा त्याची किंमत परत मिळावी अशी मागणी करुनही वा विषयांकित वाहनातील दोष कायमस्वरुपी काढून न दिलेने प्रस्तुत जाबदारानी अर्जदाराला सदोष सेवा दिली आहे. त्यांच्या सदोष सेवेबाबतअर्जदाराने जाबदाराविरुध्द मंचात तक्रारअर्ज दाखल करुन जाबदाराकडून विषयांकित सदोष वाहन क्र.MH-11 Y 8975 परत घेऊन जाबदारानी त्याऐवजी नवीन वाहन द्यावे किंवा त्याची किंमत सव्याज परत द्यावी, मानसिक, शारिरीक, त्रासापोटी रु.1,00,000/-(रु.एक लाख मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रु.20,000/- मिळणेची विनंती मागणी अर्जदाराने मंचाकडे केली आहे.
3. प्रस्तुत अर्जदाराने प्रकरणी नि.1 कडे तक्रारअर्ज, त्याचे पृष्टयर्थ नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.3 कडे अँड.शेट्टी यांचे वकीलपत्र दाखल करणेसाठी परवानगीचा अर्ज व नि.4 कडे अँड.शेट्टी यांचे वकीलपत्र, नि.6 कडे अर्जदारांची पत्तापुरसीस, नि.5 कडे अर्जदारांनी कागदयादीसोबत एकूण 13 पुराव्याची कागदपत्रे दाखल केली असून नि.5/1 कडे वाहनखरेदीची मूळ पावती, नि.5/2 व 5/3 कडे जाबदार क्र.2 चे मूळ प्रोफॉर्मा इन्व्हॉईस, नि.5/4 व 5/5 कडे जाबदार 1 चे डिलर यांचे मूळ इन्व्हॉईस, नि.5/6 कडे वादातीत वाहन टोचण करुन नेणेस आलेल्या खर्चाचे बिल, नि.5/7 व नि.5/8 कडे मे.पंडित ऑटोमोटिव्ह यांचेकडील मूळ इन्व्हॉईस, नि.5/9 कडे मे.पंडित ऑटोमोटिव्ह यांनी सध्याच्या दुरुस्तीचे इन्व्हॉईसची दिलेली प्रत, नि.5/10 कडे वादातीत वाहनाची जाबदाराकडील संगणकावर नोद असलेली सर्व्हीस हिस्ट्रीची प्रत वगैरे कागदपत्रे, नि.5/11 कडे ओनर्स मॅन्युअलमधील मूळ वाढीव वॉरंटी पुस्तकाची प्रत, नि.5/13 कडे दि.8-1-11 चे मे.पंडीत ऑटोमोबॉईल यांचे टॅक्स इन्व्हॉईस, नि.5/17 कडे विषयांकित वाहनाची सर्व्हीस हिस्ट्री, नि.5/18 ते नि.5/22 कडे विषयांकित वाहनाची सर्व्हीस हिस्ट्री, नि.5/23 कडे मार्व्हलस मोटर्स यांची विषयांकित वाहनाची सर्व्हीस हिस्ट्री, नि.5/24 ते 5/30 कडे पंडित ऑटो.कडील सर्व्हीस हिस्ट्री, नि.5/31 कडे ओनर्स मॅन्युअल अँड सर्व्हीस बुकमधील पानाची फोटोकॉपी इ.कागद दाखल केले आहेत. नि.23 व 24 कडे जाबदाराना नोटीस बजावली असल्याने ते मंचात नोटीस मिळूनही हजर नाहीत त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारित करावा असे दिलेले अर्ज, याकामी जाबदार क्र.1 यानी ग्रा.सं.कायदा 13 (1)(सी)प्रमाणे दिले अर्जावर नि.25 कडे अर्जदारानी म्हणणे दिले आहे. प्रशांत पोपटराव खामकर यानी प्रकरणामध्ये त्रयस्थ व्यक्ती म्हणून अर्जदारातर्फे सामील करणेत यावे असा दिलेला अर्ज, यातील त्रयस्थ व्यक्तीने नि.39 कडे त्यांना सामील करुन घेणेचा अर्ज नि.39/अ कडे अर्जापृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र, नि.41 सोबत पुराव्याचे कागदपत्रे, इ.दाखल करुन नि.42 कडे तक्रारअर्जाची दुरुस्त प्रत दाखल केली आहे. येणेप्रमाणे तक्रारदारानी त्यांच्या तक्रारीपृष्टयर्थ पुरावे, कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. यातील जाबदाराना मंचातर्फे रजि.पोस्टाने नोटीसा काढणेत आल्या. सदर नोटीसा जाबदाराना मिळाल्या. परंतु दि.14-12-2011 रोजी यातील जाबदार क्र.1 विरुध्द त्यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर असलेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारित केलेला आहे. परंतु यातील जाबदार क्र.1 तर्फे अँड.एस.जे.झाड प्रकरणी नि.8 कडे वकीलपत्राने हजर झाले. त्यांनी नि.15 कडे दि.18-11-2011 रोजी अर्ज देऊन म्हणणे देणेस मुदत मागितली त्यावर मंचाने रु.500/-ची कॉस्ट लिगल एड फंडात जमा करणेचे अटीवर शेवटची संधी देऊन अर्ज मंजूर केला त्यानंतर जाबदार क्र.1 यानी नि.18 कडे प्रकरणी अर्ज दाखल करुन दि.14-12-2011 रोजी नि. वर जाबदार क्र.1 विरुध्द नो से चा झालेला आदेश रद्द करावा व म्हणणे दाखल करुन घेणेचा अर्ज दिला. त्याप्रमाणे मे.मंचाने जाबदारांचे अर्जावर रक्कम रु.500/-ची कॉस्ट तक्रारदाराना देणेचे अटीवर अर्ज मंजूर करुन म्हणणे दाखल करुन घेतले ते नि.22 कडे दाखल केले असून कलम 13(1)(8) प्रमाणे विषयांकित वाहन योग्य त्या लॅबोरेटरीकडे नेमक्या उत्पादित दोषांच्या कारणाच्या शोधासाठी पाठवणेबाबत व तसा अहवाल प्रकरणी दाखल करणेबाबत तक्रारदाराना आदेश द्यावेत असा अर्ज दिला असून मे.मंचाने त्यास तक्रारदारानी म्हणणे देणेचा आदेश केला. त्यास यातील तक्रारदारानी नि.25 कडे म्हणणे दाखल करुन जाबदार व उत्पादित विषयांकित वाहनाचा वापर, त्यामध्ये वारंवार उद्भवणारी एकाच प्रकारची दुरुस्ती व या दोषांची जाबदार क्र.1 च्या अधिकृत सर्व्हीसिंग सेंटर (जाबदार क्र.2) यांचेकडील विषयांकित वाहनाचे दुरुस्तीचे रेकॉर्ड हा पुरावाच स्पष्ट करतो की, विषयांकित वाहनात उत्पादित दोष आहे, त्यासाठी वेगळया तज्ञांच्या लॅबोरेटरी तपासणीची गरज नाही, त्यामुळे जाबदार क्र.1 चा नि.20 चा अर्ज फेटाळणेत यावा असे आक्षेप नोंदले आहेत व तक्रारदाराचे तक्रारीस विषयांकित वाहन निर्दोष असून तक्रारदारांची तक्रार निराधार आहे, विषयांकित वाहनाची तज्ञ प्रयोगशाळेत तपासणी होऊन तसा अहवाल आलेशिवाय सदर वाहनातील उत्पादित दोष शाबित होणार नाहीत व असा दोष आहे असे मानता येणार नाही व प्रस्तुत तक्रारदाराने असा तज्ञांचा अहवाल प्रकरणी दाखल न केलेने तक्रारदारांचे वाहनातील दोष शाबित झालेले नाहीत. सबब तक्रार फेटाळणेत यावी असे आक्षेप प्रकरणी नोंदलेले आहेत.
5. यातील जाबदार क्र.2 तर्फे अँड.व्ही.डी.निकम यांनी जाबदार क्र.2 तर्फे नि.12 कडे वकीलपत्र दाखल करुन हजर झाले. त्यांनी त्यांचे म्हणणे नि.16 कडे व त्याचे पृष्टयर्थ नि.17 कडे प्रतिज्ञापत्र प्रकरणी दाखल केले असून त्यानी तक्रारदाराचे तक्रारीप्रती एवढेच आक्षेप नोंदलेले आहेत की जाबदार क्र.2 हे वाहनाचे उत्पादक नाहीत ते जाबदार क्र. 1 यानी उत्पादित केलेले वाहनाचे जाबदार क्र.1 चे अधिकृत विक्रेते असून गॅरंटी कालावधीमध्ये होणा-या वाहनाच्या बिघाडाची वाहनाचे मॅन्युअलमधील गॅरंटी करारातील नमूद बाबीप्रमाणे विषयांकित वाहन दुरुस्त करुन देणे, निर्दोष करुन देणे हे जाबदारांचे काम असून त्यानी वेळोवेळी 10 ते 12 वेळा तक्रारदारांचे वाहन दुरुस्त करुन दिलेले आहे, त्यामुळे तक्रारदारांचे सदोष वाहनाची ते बदलून देणे किंवा त्याची किंमत परत करणे ही जबाबदारी जाबदार क्र.1 यांची असून त्याची सर्व जबाबदारी जाबदार क्र.2 यांचेवर ठेवावी असे आक्षेप नोंदलेले आहेत.
6. प्रस्तुत प्रकरणी यातील जाबदारांनी वाहनाच्या वारंवारच्या दुरुस्तीस कंटाळून सदरचे वाहन त्रयस्थ व्यक्तीला विकले. या त्रयस्थ व्यक्तीला तक्रारदाराप्रमाणेच विषयांकित वाहनाचा टायमिंग बेल्ट खराब होणे व त्या अनुषंगाने पूर्वीप्रमाणेच त्यानंतर उद्भवणा-या दुरुस्तीस तोंड द्यावे लागले आहे, त्यामुळे ते या कामी जाबदारांचे ग्राहक होत असलेने त्यांन त्रयस्थ व्यक्ती म्हणून प्रकरणी तक्रारदार क्र.2 म्हणून सामील पक्षकार करावे असा अर्ज प्रकरणी दाखल केला. त्यास मूळ तक्रारदाराचे वकीलांनी ना हरकत दिली, त्याप्रमाणे मंचाने त्रयस्थ व्यक्तीचा नि.38 व 39 चा अर्ज मंजूर केला व त्याची नि.1 वर दुरुस्ती करुन दुरुस्तप्रत दाखल करणेस सांगितले. प्रस्तुत प्रकरणी मे.मंचाचे आदेशाप्रमाणे त्याप्रमाणे त्रयस्थ इसम जाबदार क्र.2 यानी दुरुस्ती प्रत नि.42 कडे दाखल केली आहे. परंतु त्रयस्थ व्यक्तीच्या प्रकरणी तक्रारदार क्र.2 यांच्या सामीलीकरणाच्या अनुषंगाने आम्ही नि.1 वरील सरनाम्यातील नोंदीची पडताळणी केली असता आमचे असे निदर्शनास आले की, मे.मंचाने त्रयस्थ व्यक्तीच्या नि.42 चे दावादुरुस्ती सादरीकरणाप्रमाणे तक्रारदार क्र.2 म्हणून मूळ तक्रार नि.1 वर रितसर दुरुस्ती केलेचे आम्हांस आढळले नाही. या बाबत मे.मंचाने तथाकथित त्रयस्थ व्यक्तीला वारंवार सूचित केले परंतु त्यानी शेवटपर्यंत नि.1 वर दुरुस्ती करुन मंचाचे सहीने ती कायम झालेवरच पुढील स्टेप्स घेणे, उदा.दावा दुरुस्ती प्रत सादर करणे वगैरे आवश्यक होते. परंतु या त्रयस्थ व्यक्तीने तशी तक्रारदुरुस्तीची प्रक्रीया कायदेशीररित्या पार न पाडल्याने आम्हांस त्रयस्थ व्यक्तीने नि.38,39, 39 अ, व नि. 40, नि.42 ची प्रक्रीया वैध ठरवता येत नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. तरीही संशयास जागा राहू नये म्हणून प्रस्तुत त्रयस्थ इसम हा जाबदार क्र.1,2 चा ग्राहक होऊ शकत नाही. हा त्रयस्थ इसम म्हणतो की, मूळ तक्रारदाराकडून त्यानी वाहन खरेदी केल्याने ते सदोष वाहनाचे खरेदीनंतरचे लाभार्थी (beneficiary)ठरतात त्यामुळे ते यातील जाबदारांचे लाभार्थी ठरतात परंतु आमचे म्हणणे असे की, मूळ तक्रारदाराचे कायदेशीर वारसच विषयांकित वाहनाचे लाभार्थी होऊ शकतात. त्रयस्थ व्यक्ती नव्हे. प्रस्तुत कामातील जाबदार व त्रयस्थ व्यक्ती यांचेत कोणतेही विषयांकित वाहनाचे बाबतीत विक्री व्यवहार झालेले नाहीत. सदोष वाहन मूळ तक्रारदाराकडून विकत घेणे हा त्रयस्थ व्यक्तीने समजून उमजून मूळ तक्रारदराशी केलेला व्यवहार होता त्यामुळे त्यांना याबाबत मूळ तक्रारदाराविरुध्द किंवा यातील जाबदाराविरुध्द ते त्यांचे ग्राहक होत नसलेने तक्रारदार क्र.2 म्हणून सामील होऊन दाद मागणेचा कोणताही अधिकार नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे एकटया मूळ तक्रारदाराविरुध्द मंचाने तक्रार निर्णयासाठी घेतली.
7. तक्रारदारांचा मूळ तक्रारअर्ज, त्यातील कथने, त्यांचा दाखल पुरावा, त्यातील आशय, जाबदारांचे म्हणणे, त्यातील आशय यांचा विाचर करता सदर प्रकरणाचे निराकरणार्थ मे.मंचासमोर पुढील मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. प्रस्तुत तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक आहे काय? होय.
2. जाबदारांनी तक्रारदाराना उत्पादन दोष असलेचे सदोष वाहन
विक्री करुन त्यातील वारंवार उत्पादित होणारा दोष कायमस्वरुपी
निर्गत करुन न देऊन किंवा तक्रारदाराचे मागणीप्रमाणे विषयांकित
सदोष वाहनापोटी नवीन दुसरे वाहन किंवा मूळ वाहनाची खरेदी
किंमत परत न देऊन तक्रारदाराना सदोष सेवा दिली आहे का? होय.
3. तक्रारदारानी विषयांकित सदोष वाहनाच्या वारंवार होणा-या
बिघाडामुळे कंटाळून त्यांना वाहन सुख समाधानाने उपभोगता न
आल्याने त्यानी ते वाहन जसे आहे तसे त्रयस्थ व्यक्तीस विकलेमुळे
त्रयस्थ व्यक्ती तक्रारीत तक्रारदार क्र.2 म्हणून सामील होणेस पात्र
आहे काय व तो जाबदारांचा ग्राहक आहे काय? नाही.
4. प्रस्तुत तक्रारदार हा सदोष वाहनापोटी दुसरे वाहन किंवा मूळ
वाहनाची खरेदी किंमत जाबदाराकडून परत मिळणेस पात्र आहे काय? होय.
5. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 5
8. सदर प्रकरणातील जाबदार क्र.1 टाटा मोटर्स या नावाने विविध प्रकारच्या चार चाकाच्या वाहनांचे उत्पादन करणारी कंपनी असून जाबदार क्र.2 हे जाबदार क्र.1 यानी उत्पादित केलेल्या विविध मॉडेलच्या वाहनांचे अधिकृत विक्रेते- डिलर असून जाबदार क्र.2 यानी संबंधित ग्राहकास वाहन विक्री केलेनंतर उत्पादकाने वाहनाचे मॅन्युअलप्रमाणे व वाहनासाठी दिलेल्या गॅरंटीप्रमाणे विक्रीपश्चात सर्व प्रकारच्या सेवा देणे या प्रकारचा सेवा व्यवसाय प्रस्तुत जाबदार करतात. त्यास अनुसरुन प्रस्तुत तक्रारदार हिने जाबदार क्र.1 यानी उत्पादित केलेली Tata Indigo Lx Dicor या मॉडेलची चारचाकी गाडी क्र. MH-11-Y-8975 ही रक्कम रु.5,69,540/- (रु.पाच लाख एकोणसत्तर हजार पाचशे चाळीस मात्र) इतक्या रकमेस जाबदार क्र.1 यांचेकडून त्यांचे सर्व देय विक्रीपश्चात सेवासुविधांसह दि.29-4-2007 रोजी खरेदी घेतली होती. वरील व्यवहारावरुन यातील जाबदार व तक्रारदारांमध्ये सेवापुरवठादार व ग्राहक असे नाते असलेचे स्पष्ट दिसते. त्यामुळे तक्रारदार ही या जाबदाराची ग्राहक असल्याचे निर्विवादरित्या शाबित होते, त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
8.1- प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारानी विषयांकित वाहन खरेदी केलेनंतर सदर वाहनातील टायमिंग बेल्टबाबत पहिली तक्रार दि.2-7-2008 रोजी उद्भवली व त्यावेळी विषयांकित वाहनाच्या वाहनाचा टाईमबेल्ट तुटला त्यावेळी विषयांकित वाहनाचा प्रवास 30514 कि.मी.इतका झालेला होता. हा टायमिंग बेल्ट तुटल्यामुळे वाहनामध्ये त्यावर अवलंबून असलेले इतर पार्टस् नादुरुस्त झाले व इंजिनचा मोठा आवाज होऊन नुकसान झाले त्यामुळे विषयांकित वाहन जाबदाराकडे दुरुस्तीसाठी जमा करणेत आले, त्याप्रमाणे या प्रथम नुकसानीचे जॉबकार्ड JC Hem Age SA 0809-000955 दि.5-7-2008 रोजी बनवणेत आले व नुकसानग्रस्त वाहनाचा टाईम बेल्ट बदलून इंजिन काम करुन संपूर्ण अँसेंब्ली सिलेंडरहेड बदलून दुरुस्ती करुन दिली व या प्रकारची पुनरावृत्ती दि.29-10-2008 रोजी कोल्हापूर प्रवासादरम्यान झाली व विषयांकित वाहन टोचण करुन सातारा येथे आणून पुन्हा जाबदाराकडे दुरुस्तीसाठी जमा केले, त्यावेळीही विषयांकित वाहनाचा टायमिंग बेल्ट पुन्हा तुटल्याचे व इंजिनचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेचे आढळून आले, त्यामुळे जाबदारानी विषयांकित वाहनाचे जॉबकार्ड JC-Hem Age-SA-0809-002235 बनवून दि.27-11-2008 रोजी नवीन टायमिंग बेल्ट बसवून इंजिन खोलून अँसेंब्ली सिलेंडर हेड नामक भाग बदलून वाहन दुरुस्त करुन देणेत आले.
वरीलप्रमाणे दुरुस्ती झालेनंतर विषयांकित वाहनाचे रनिंग 42659 इतके झालेवर पुन्हा सदर वाहनात पूर्वीचाच दोष उत्पन्न होऊन वाहन ब्रेकडाऊन झाले. यावेळी विषयांकित वाहन जाबदारांनी पुणे येथील मे.यु.बी.भंडारी या मे.टाटा मोटर्सच्या अधिकृत डिलरकडे दुरुस्तीसाठी पाठविले. त्यांनी सदर वाहनाचे JC-BOBH-AU-ww-0809-008995 प्रमाणे 19-1-2009 रोजी जॉबकार्ड बदलून वाहन दुरुस्ती विषयांकित वाहनाचा बंद पडलेला अल्टरनेटर, अल्टरनेटर बेल्ट बदलून दुरुस्ती करुन दिली.
त्यानंतर सदर वाहनाचा प्रवास 49409 कि.मी.इतका झाला असता विषयांकित वाहन पुन्हा ब्रेकडाऊन झाले. यावेळी जाबदार क्र.2 यांनी विषयांकित वाहनाची दुरुस्ती जाबदार क्र.1 कोल्हापूरचे डिलर मे.मार्व्हलस मोटर्स प्रा.लि. यांचेकडून करुन घेतली. त्यांनी विषयांकित वाहनाचे जॉबकार्ड क्र.JC-MarMOP-KL-0910-000271 ने दि.12-4-2009 रोजी विषयांकित वाहनाचे निम्मे इंजिन बदलले, टाईमबेल्ट नवीन बसवणेत आला याचा खर्च रु.1,04,435.62 इतका झाला. वॉरंटी कालावधीत असलेने तक्रारदारानी रु.3,445/- कोल्हापूर डिलरकडे भरले.
त्यानंतर विषयांकित वाहनाचे रनिंग 76,000 कि.मी.इतके झाले असतान पूर्वीचाच दोष विषयांकित वाहनात उत्पन्न होऊन वाहन बंद पडले, त्यामुळे जाबदार क्र.2 यानी विषयांकित वाहनाची दुरुस्ती सातारा येथील मे.पंडित अँटोमोटिव्ह लि. यांचेकडे करणेसाठी जमा केली, त्यांनी विषयांकित वाहनाचे जॉबकार्ड क्र.JC-Pandit Ltd.-ST-1011-000602 बनवून दि.2-5-2010 रोजी विषयांकित वाहनाचा तुटलेला टायमिंग बेल्ट बदलला, इंजिन खोलून नवीन अँसेंब्ली सिलेंडर हेड बसवणेत आला, याचा खर्च रु.59,469/- इतका झाला. फरकाची रक्कम तक्रारदारानी जाबदारांना अदा केली.
त्यानंतर विषयांकित वाहनाचा 81,990 कि.मी.इतका प्रवास झालेवर पूर्वीप्रमाणेच दुरुस्ती झालेवर पुन्हा 85,832 कि.मी.वाहनाचा प्रवास झालेवर वाहनाची दुरुस्ती मे.पंडित अँटोमोटिव्ह लि. सातारा यांचेकडे जॉब कार्ड क्र.0006846 ने दि.24-11-2010 रोजी करणेत आली व वाहनाचा टायमिंग बेल्ट, इंजिन अँसेंब्ली, सिलेंडर हेड बदलणेत आले. यावेळी तक्रारदारांनी फरकाची रक्कम रु.1,577.35 पंडित अँटोमोटिव्ह कडे भरली. पुन्हा सदरील वाहनाचा 92,553 कि.मी.चा प्रवास झालेवर पूर्वीचाच दोष उत्पन्न होऊन दि.19-3-2011 रोजी जॉब कार्ड क्र.0005356 मे.पंडित अँटोमोटिव्ह लि.सातारा यानी दुरुस्ती करुन दिली असे एकूण दि.2-7-2008 ते दि.19-3-2011 अखेर 8 ते 9 वेळा वाहनाचा एकाच प्रकारचा दोष म्हणजे वाहनाचा टायमिंग बेल्ट तुटणे व इंजिनची त्यातील पार्टसची नुकसानी होणे या प्रकारचा दोष उत्पन्न झाला. या वाहनाचे दुरुस्तीसाठी प्रस्तुत तक्रारदार हिला वाहन महिना ते दिड महिना दुरुस्तीसाठी सोडावे लागले. यावरुन विषयांकित वाहनामध्ये निर्मिती दोष असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते त्यासाठी कोणत्याही लॅबोरेटरीमध्ये वाहन तपासणेची व तज्ञ अहवालाची कोणतीच आवश्यकता नाही हे स्पष्टपणे शाबित होते. वरील वाहनाच्या दोषामुळे तक्रारदाराना कराव्या लागलेल्या कामाचे पुरावे तक्रारदारानी नि.5/2 ते नि.5/30 अखेर प्रकरणी दाखल केले आहेत. यावरुन या बाबी सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट होतात. विषयांकित वाहनातील टाईमिंग बेल्टचे महत्व काय आहे हे सांगणारा जाबदार क्र.1 यांनी त्यांच्या वाहनाच्या पार्टसबाबत व त्यांच्या योग्यतेबाबत व दर्जाबाबत माहितीपत्रिका प्रसिध्द केली असून ती जाबदारांचे http:/www.familycar.com/carcare/timingbelt.htm वरुन घेतली असून तो पुरावा तक्रारदारानी नि.5/33 कडे दाखल केला आहे-
The job of the timing belt is to turn the camshaft at exactly ½ the speed of the crankshaft while maintaining a precise alignment. This means that the crankshaft will make two revolution for every revolution of the camshaft. Engines will have at least one camshaft. The camshaft causes the intake and exhaust valves to open and close in time with the pistons which move up and down in the cylinders. The valves must open and close at exactly the right time in relationship to the piston movement in order for the engine to run properly.
वरील विवेचनावरुन विषयांकित वाहनामधील टाईमिंग बेल्टचे महत्व अधोरेखित होते. यावरुन व प्रकरणी दाखल असलेल्या विषयांकित वाहनाच्या 8 ते 9 वेळा वॉरंटी कालावधीत झालेल्या दुरुस्त्या पाहिल्या व दुरुस्त्यावेळची प्रकरणी दाखल जॉबकार्डस् पाहिली असता विषयांकित वाहनामध्ये निर्माण होणारा दोष हा एकाच प्रकारचा आहे व तोच त्याच्या अंगभूत उत्पादनातील दोष असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. प्रकरणी उपलब्ध पुरावा व विषयांकित वाहनाचे जॉबकार्डस् व दुरुस्त्यांचा तपशील पाहिल्यास टाईमिंग बेल्ट हा वाहनाच्या अंतर्गत रतचेनतील जोडणीच्या फरकामुळे किंवा सदोष रचनेमुळे होत असून वाहनातील अंगभूत दोषामुळे इंजिनमधील व्हॉल्व्हज् हे इंजिनमधील पिस्टनच्या बरोबरीने नेमक्या वेळेला उघडणे व बंद होणे या कार्यात अडथळा उत्पन्न होतो व ते कार्य नेमकेपणे होत नाही व या सर्व कार्यास गती देणेचे काम इंजिनमधील टाईमिंग बेल्टद्वारा होते, तथापि वर नमूदप्रमाणे इंजिनचे काम योग्य प्रकारे व योग्य वेळी होत नाही म्हणून अशा प्रत्येक वेळी टाईमिंग बेल्टवरती दबाव येतो व तो तुटतो. परिणामी वाहनाची इंजिनमधील इतर पार्टसना धक्का बसून त्यांचे नुकसान होते व इंजिन बंद पडते. विषयांकित वाहनाच्या आजवरच्या दुरुस्त्या अभ्यासल्या असता सदर वाहनामध्ये वरील प्रकारचा दोष वाहन निर्मितीवेळीच असलेचा सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट दिसते. जाबदारानी तक्रारदाराना पुरवलेल्या उत्पादित वाहनाच्या मॅन्युअल पान 133 वर अ.क्र.8 वर स्पष्टपणे नमूद केले आहे की, विषयांकित वाहनाचा टाईमिंग बेल्ट 1 लाख कि.मी.पर्यंत प्रवास होईतो बदलणेची गरज नाही. येथे एकूण विषयांकित वाहनाचे रनिंग 92,553 होईपर्यंत 9 ते 10 वेळी टाईमिंग बेल्ट बदलणेत आला आहे व विषयांकित वाहनाचे इंजिनची दुरुस्ती झाली आहे यामुळे विषयांकित वाहनामध्ये वाहन निर्मितीचेवेळी दोष होता हे निर्विवादरित्या शाबित होते व यातील जाबदार क्र.2 यानी जाबदार क्र.1 यांच्या सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर या अधिकृत सर्व्हीसिंग सेंटरमध्ये वाहनाच्या दुरुस्त्या करुन त्यातील दोष काढणेचा प्रयत्न केला, परंतु तो असफल ठरला. वास्तविक विषयांकित वाहनाची वरील परिस्थिती जाबदार क्र.2 यांनी जाबदार क्र.1 यांना कळवून स्वतःहून प्रस्तुत तक्रारदाराना विषयांकित सदोष वाहनापोटी तसेच दुसरे वाहन देणे किंवा त्याची किंमत परत करणे आवश्यक होते, परंतु प्रस्तुत जाबदारानी तसे केले नाही, त्यामुळे विषयांकित वाहनातील निर्मितीदोष सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट होऊनही प्रस्तुत जाबदारानी तत्परतेने त्याना वाहनाबदली दुसरे वाहन बदलून न देऊन किंवा त्याची किंमत परत न करुन तक्रारदार हिस गंभीर स्वरुपाची विक्रीपश्चात सदोष सेवा दिली असल्याचे निर्विवादरित्या शाबित होते. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
8.2- प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारानी विषयांकित वाहनाचा योग्य लॅबोरेटरीकडून तपासणी अहवाल सादर करणेबाबत तक्रारदाराना आदेश करावेत असा अर्ज नि.20 कडे प्रकरणी दिला आहे व जाबदार क्र.2 हे पण विषयांकित वाहनात उत्पादित दोष असलेबाबत तज्ञांचा अहवाल आवश्यक असलेचे म्हणतात परंतु आम्ही जाबदारांच्या या मताशी सहमत नाही. सदर प्रकरणी वाहन दुरुस्त्याच शाबित करतात की, विषयांकित वाहनात निर्मिती दोष आहे. या सिध्दतेसाठी कोणत्याही तज्ञ अहवालाची गरज नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. जाबदारानी स्वतः जाबदार क्र.1च्या वेगवेगळया जिल्हयातील अधिकृत सर्व्हीसिंग सेंटरमध्ये एकाच प्रकारे दुरुस्ती निघणारे नुकसानग्रस्त विषयांकित वाहनाची दुरुस्ती करुन घेतली आहे परंतु टाईमिंग बेल्ट तुटल्याचा दोष तसाच कायम आहे त्यामुळे जादबारांचा तज्ञ अहवालाबाबतचा मुद्दा आम्ही फेटाळून लावीत आहोत.
8.3- प्रस्तुत प्रकरणी यातील जाबदारांनी वाहनाच्या वारंवारच्या दुरुस्तीस कंटाळून सदरचे वाहन त्रयस्थ व्यक्तीला विकले. या त्रयस्थ व्यक्तीला तक्रारदाराप्रमाणेच विषयांकित वाहनाचा टायमिंग बेल्ट खराब होणे व त्यानंतर उद्भवणा-या दुरुस्तीस तोंड द्यावे लागले आहे, त्यामुळे ते या कामी जाबदारांचे ग्राहक होत असलेने त्यांना त्रयस्थ व्यक्ती म्हणून प्रकरणी तक्रारदार क्र.2 म्हणून सामील पक्षकार करावे असा अर्ज प्रकरणी दाखल केला. त्यास मूळ तक्रारदाराचे वकीलांनी ना हरकत दिली, त्याप्रमाणे मंचाने त्रयस्थ व्यक्तीचा नि.38 व 39 चा अर्ज मंजूर केला व त्याची नि.1 वर दुरुस्ती करुन दुरुस्तप्रत दाखल करणेस सांगितले. प्रस्तुत प्रकरणी त्याप्रमाणे त्रयस्थ इसम जाबदार क्र.2 यानी दुरुस्ती प्रत नि.42 कडे दाखल केली आहे. प्रस्तुत त्रयस्थ व्यक्तीच्या प्रकरणी तक्रारदार क्र.2 यांच्या सामीलीकरणाच्या अनुषंगाने आम्ही नि.1 वरील सरनाम्यातील नोंदीची पडताळणी केली असता आमचे असे निदर्शनास आले की, मे.मंचाने त्रयस्थ व्यक्तीच्या नि.42 चे दावादुरुस्ती सादरीकरणाप्रमाणे तक्रारदार क्र.2 म्हणून मूळ तक्रार नि.1 वर रितसर दुरुस्ती केलेचे आम्हांस आढळले नाही. या बाबत मे.मंचाने तथाकथित त्रयस्थ व्यक्तीला सूचित केले परंतु त्यानी शेवटपर्यंत नि.1 वर दुरुस्ती करुन मंचाचे सहीने ती कायम झालेवरच पुढील स्टेप्स घेणे, उदा.दावा दुरुस्ती प्रत सादर करणे वगैरे आवश्यक होते. परंतु या त्रयस्थ व्यक्तीने तशी तक्रारदुरुस्तीची प्रक्रीया कायदेशीररित्या पार न पाडल्याने आम्हांस त्रयस्थ व्यक्तीने नि.38,39, 39 अ, व नि. 40, नि.42 ची प्रक्रीया वैध ठरवता येत नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. तरीही संशयास जागा राहू नये म्हणून प्रस्तुत त्रयस्थ इसम हा जाबदार क्र.1,2 चा ग्राहक होऊ शकत नाही. हा त्रयस्थ इसम म्हणतो की, मूळ तक्रारदाराकडून त्यानी वाहन खरेदी केल्याने ते सदोष वाहनाचे खरेदीनंतरचे लाभार्थी (beneficiary)ठरतात त्यामुळे ते यातील जाबदारांचे लाभार्थी ठरतात परंतु आमचे म्हणणे असे की, मूळ तक्रारदाराचे वारसच विषयांकित वाहनाचे लाभार्थी होऊ शकतात. त्रयस्थ व्यक्ती नव्हे. प्रस्तुत कामातील जाबदार व त्रयस्थ व्यक्ती यांचेत कोणतेही विषयांकित वाहनाचे व्यवहार झालेले नाहीत. सदोष वाहन मूळ तक्रारदाराकडून घेणे हा त्रयस्थ व्यक्तीने समजून उमजून मूळ तक्रारदराशी केलेला व्यवहार होता त्यामुळे त्यांना याबाबत मूळ तक्रारदाराविरुध्द किंवा यातील जाबदाराविरुध्द ते त्यांचे ग्राहक होत नसलेने तक्रारदार क्र.2 म्हणून सामील होऊन दाद मागणेचा कोणताही अधिकार नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
8.4- वरील प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती पहाता तक्रारदारांनी जाबदार क्र.1 यानी उत्पादित केलेले वाहन क्र.MH-11-Y-8975 हे जाबदार क्र.2 कडून खरेदी केलेल्या विषयांकित वाहनाची वाहनाचे वॉरंटी पिरीयडमध्ये जाबदार क्र.2 यांनी त्यांच्या अधिकाराखाली जाबदारांच्या सातारा, सांगली, कोल्हापूर पुणे व सातारा अशा सर्व अधिकृत सर्व्हीसिंग शोरुममधून टाईमिंग बेल्ट तुटणेचे कारणाने अनेक परीक्षणे, तपासण्या करुन दुरुस्त्या केलेल्या आहेत हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट दिसून येते, त्यामुळे विषयांकित वाहनातील दोष हा वाहन निर्मितीवेळीच झालेला होता हे निर्विवादरित्या शाबित होते. प्रस्तुत तक्रारदार हिने मोठया हौसेने घरगुती वापरासाठी वाहन जाबदाराकडून खरेदी केले परंतु जाबदार क्र.1 द्वारा उत्पादित विषयांकित वाहनात निर्मिती दोष असलेने प्रस्तुत तक्रारदाराना विषयांकित वाहनाचा उपभोग आनंदाने घेता आला नाही. वाहनाच्या टाईमिंग बेल्टच्या तुटण्याने वारंवार वेगवेगळया दुरुस्तीमध्ये त्याना जाबदाराकडे गाडी जमा करावी लागली त्यामध्ये प्रत्येक दुरुस्तीमध्ये 1 ते 2 महिने जात राहिले. दरम्यान त्याना वाहनसुखास मुकावे लागले व आवश्यक त्या गरजेवेळी त्याना उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी जाबदाराचे विषयांकित वाहन बदलून मागितले किंवा त्या वाहनाची किंमत मिळावी अशी विनंती केली परंतु जाबदारानी त्याप्रमाणे केले नाही, दुर्लक्ष केले, त्यामुळे विषयांकित वाहनास नुकसान होऊन वैतागाने, त्रासाने दुस-यास देणेचा निर्णय घेतला. ही प्रस्तुत ग्राहकाची अगतिकता होती व ती केवळ जाबदारानी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे, बेफिकीरीपणामुळे व सदोष वाहनाची जबाबदारी न स्विकारलेने घडले, म्हणजेच यातील जाबदारानी तक्रारदारास विक्रीपश्चात सेवा त्याना दिलेल्या वचनाप्रमाणे निभावली नाही हे तक्रारदार हिने ठोस पुराव्यानिशी शाबित केले आहे त्यामुळे या जाबदारानी तक्रारदाराना विकलेल्या टाटा इंडीगो एलएक्स डेकोर मॉडेलची कार क्र. MH-11-Y-8975 ही परत करुन त्या बदली तशाच मॉडेलची कार या जाबदारानी तक्रारदाराना देणे व ती मुळच्या खरेदी किंमतीच्या रकमेत रु.5,69,540/- इतकी किमत देणे किंवा विषयांकित वाहनाची किंमत रक्कम रु.5,69,540/- (रु.पाच लाख एकोणसत्तर हजार पाचशे चाळीस मात्र)परत मिळणेस, मानसिक, शारिरीक, त्रासापोटी रु.50,000/- (रु.पन्नास हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- जाबदाराकडून मिळणेस तक्रारदार पात्र असल्याचे निष्कर्षाप्रत मंच आला आहे त्यामुळे मुद्दा क्र.4 व 5 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
8.5- जाबदारानी त्यांचे आक्षेप पुराव्यानिशी मे.मंचात शाबित केलेले नाहीत, केवळ कथने व आक्षेप नोंदलेले आहेत, परंतु जाबदारांचे म्हणण्यातील आक्षेप वा कथने ही पुरावा होऊ शकत नाहीत, त्यामुळे जाबदारांची कथने/आक्षेप ही शाबित झालेली नाहीत असे आमचे स्पष्ट मत आहे. यातील जाबदार क्र.2 यानी हे लक्षात घेणे आवश्यक होते की विषयांकित वाहनाची दुरुस्ती ही जाबदारानी दिलेल्या वॉरंटी पिरीयडमध्ये झाली आहे. हा वॉरंटी पिरीयड परिस्थितीनुरुप दि.28-4-2011 अखेर तक्रारदारांना वाढवून दिला होता व त्यामध्ये विषयांकित वाहनाची दुरुस्ती एकाच विषयावर दोषावर झाली आहे व विषयांकित वाहनातील टाईमिंग बेल्ट या एकमेव दोषावरच या दुरुस्त्या आहेत. यावरुन जाबदारानी या दोषांचे गांभीर्य व प्रस्तुत ग्राहकास सोसावा लागणारा अत्यंतिक त्रास, त्याची वाहनाअभावी होणारी गैरसोय, वाहन नादुरुस्त झालेने व दुरुस्तीस जाबदाराकडे पोहोच करणेमधील त्रास व सदरचे वाहन कायमस्वरुपी दुरुस्त होऊन ते पूर्णपणे निर्दोष होत नाही हे लक्षात घेऊन जाबदार क्र.1 यानी स्वतः जाबदार क्र.2 याना सदर गाडीची वस्तुस्थिती कळवून ते बदलून देणेबाबत शिफारस करणे आवश्यक होते परंतु त्यानी या ग्राहकाप्रती निष्काळजीपणा केला व त्यांची जबाबदारी पार पाडली नाही असे आमचे निरीक्षणात स्पष्ट शाबित झालेले आहे. त्यामुळे जाबदार क्र.1 हे सदोष वाहन उत्पादक म्हणून व त्यांचा अधिकृत विक्रेता म्हणून जाबदार क्र.2 हे जबाबदार असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे.
9. वरील सर्व वस्तुस्थिती, कारणमीमांसा व विवेचनास अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात-
आदेश
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदारांनी तक्रारदाराना उत्पादन दोष असलेचे सदोष वाहन विक्री करुन त्यातील वारंवार उत्पादित होणारा दोष कायमस्वरुपी निर्गत करुन न देऊन किंवा तक्रारदाराचे मागणीप्रमाणे विषयांकित सदोष वाहनापोटी नवीन दुसरे वाहन किंवा मूळ वाहनाची खरेदी
किंमत परत न देऊन तक्रारदाराना सदोष सेवा दिली असल्याचे घोषित करणेत येते.
3. जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांचे विषयांकित सदोष वाहन टाटा इंडिको एल.एक्स.डिकोर मॉडेलची कार क्र. MH-11-Y-8975 पोटी याच मॉडेलची कार पूर्वी ज्या किंमतीमध्ये तक्रारदाराना विक्री केली म्हणजे रक्कम रु.5,69,540/- (रु.पाच लाख एकोणसत्तर हजार पाचशे चाळीस मात्र) त्याच किंमतीमध्ये दुसरी वरील मॉडेलची नवी निर्दोष कार तक्रारदाराना द्यावी किंवा वाहनाची मूळ किंमत रु.5,69,540/- सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
4. प्रस्तुत जाबदारानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- (रु.पन्नास हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
5. त्रयस्थ इसम प्रशांत पोपटराव खामकर प्रस्तुत प्रकरणी जाबदारांचे ग्राहक होत नाहीत व प्रस्तुत जाबदारानी त्यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. त्यांना सदर प्रकरणी दाद मागणेचा हक्क प्राप्त होत नाही असे घोषित करणेत येते.
6. तक्रारदारानी विषयांकित वाहन क्र. MH-11-Y-8975 हे वाहन जाबदाराकडून जुन्या वाहनापोटी नवीन वाहन किंवा त्याची किंमत मिळाल्यानंतर जाबदाराना परत करावे.
7. जाबदारानी वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 4 आठवडयाचे आत करणेचे आहे.
8. जाबदारानी वरील आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
9. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
10. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 31-10-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.