निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा न्यायनिर्णय तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदार हिने टाटा सफारी कार, MODEL–SAFARI-VX- DICOR ही सामनेवाले क्र.2 यांचेकडून दि.18.08.2007 रोजी विकत घेतली. तिचा नोंदणी क्र.MH-04-DB-9888 असा आहे. सामनेवाले क्र.1 हे त्या कारचे निर्माते आहेत. कारची वॉरंटी दिड वर्षाची होती. कार घेण्यासाठी तक्रारदाराने एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतले होते. तक्रारदार हिला तिच्या व्यवसायानिमित्त सीबीडी, बेलापूर येथे जावे लागे, यासाठी तिने सदरची कार घेतली होती. 2 तक्रारदार हिची तक्रार की, कार घेतल्यानंतर, लगेच सप्टेंबर, 2007 मध्ये तिच्यामध्ये समस्यां सुरु झाल्या. तिच्या लक्षात आले की, कारमध्ये Clutch चा दोष आहे व तिचे गिअर सहजपणे उठत नाही / बदलता येत नाही. त्यामुळे इंजीनमध्ये आवाज येतो. म्हणून तिने गाडी दुरुस्तीसाठी फॉर्च्युन कार सर्व्हिस सेंटरकडे पाठविली. त्यांनी कार वॉरंटी असल्यामुळे Clutch Drive Plate व आवश्यक भाग निःशुल्क बदलून दिले. दि.29.09.2007 रोजी ही कार तक्रारदाराला परत मिळाली. 3 तक्रारदार हिची तक्रार की, त्यानंतरही तिच्या कारमध्ये Clutch च्या समस्यां सुरु झाल्या. तसेच कारचे वातानुकुलीत यंत्रणा बरोबर काम करत नव्हती व इतरही समस्यां सुरु झाल्या. म्हणून तक्रारदार हिने सदरची कार सामनेवाले क्र.2 कडे दुरुस्तीला पाठविली. त्यांनी ब्रेक यंत्रणा तपासून Clutch Drive Plate बदलून दिली. जे काही भाग वॉंरंटीत होते ते सुध्दा सामनेवाले क्र.2 यांनी निःशुल्क बदलून दिले, कारण त्यावेळी गाडी वॉरंटीत होती. 4 तक्रारदार हिचे म्हणणे की, दोनवेळा दुरुस्तीला पाठवूनही गाडीतील समस्यां दूर झाल्या नाहीत. म्हणून तिने सदरची कार सामनेवाले क्र.2 यांचेकडे पाठविली. त्यावेळीही सामनेवाले क्र.2 यांनी Clutch Drive Plate बदलून दिले व आवश्यक ते बदल केले. 5 तक्रारदार हिचे म्हणणे की, तीनवेळा दुरुस्ती पाठवूनही गाडीतील Clutch च्या व त्याच्याशी संबंधीत हजर समस्यां दुर झाले नाही. म्हणून तिला कळून चुकले की, गाडीत निर्मिती दोष आहे. गाडी चालू व्हायला पुन्हा त्रास देऊ लागली. म्हणून तिची सामनेवाले क्र.2 यांचेकडून सर्व्हिसींग करुन घेतली. त्यावेळी नॉमीनल सर्व्हिंसींगची गरज होती. 6 तक्रारदार हिची तक्रार की, फेब्रुवारीमध्ये गाडीमध्ये पुन्हा वरील दोष उदभवले. म्हणून तीने गाडी सामनेवाले क्र.2 यांचेकडे सर्व्हिंगला पाठविले. यावेळी सुध्दा सामनेवाले यांनी Clutch Drive PlateDrive Plate बदलविले व इतर आवश्यक बदल केले. दि.21.02.2008 रोजी ती कार तिच्या ताब्यात दिले. 7 तक्रारदार हिचे म्हणणे की, त्यानंतर पुन्हा दि.15.05.2008, दि.25.08.2008 व दि.15.10.2008 रोजी गाडी सामनेवाले क्र.2 कडे दुरुस्तीला दिली. दि.15.05.2008 रोजी सामनेवाले यांनी Clutch Drive PlateDrive बदलून दिले. दि.25.08.2008 रोजी Break Module बदलून दिले. दि.15.10.2008 रोजी वातानुकुलित यंत्रणा दुरुस्त केली. 8 तक्रारदार हिचे म्हणणे आहे की, दि.21.09.2008 रोजी तीने वकीलामार्फत सामनेवाले यांना नोटीस पाठविली व त्याबरोबर त्यांना दुरुस्ती बिलाच्या प्रतीं पाठविल्या व कार बदलून द्यावी किंवा तिचे पैसे परत करावे अशी मागणी केली, त्याला सामनेवाले यांनी खोटे नाटे उत्तर दिले. तक्रारदाराने ज्या ज्यावेळी सामनेवाले यांचेकडे गाडी दुरुस्तीला पाठविली, त्यावेळी गाडीत कोणत्या समस्यां होत्या व काय दुरुस्ती केली, याबद्दलचा सविस्तर तक्ता, तक्रारीच्या परिच्छेद क्र.11 दिले आहे तो खालीलप्रमाणे Date | Nature of Problem / Fault | Nature of work carried by the O.P.No.1 | Name of the Service Centre | Kms. | Amount of spares replaced but not charged | 29/09/07 | Clutch & other problems related to it. | 1) clutch drive Plate Replaced 2) clutch cover replaced | Fortune Cars | 3110 | 599/- | 16/10/07 | A/c cooling Pr | Thermostat replaced | Wasan Motors | 4407 | 857.15/- | 03/11/07 | Clutch slip | 1)Clutch drive place replaced 2) Clutch cover replaced | Wasan Motors | 5778 | 103/- | 29/12/07 | Break System | | Wasan Motors | 10500 | 3943/- | 21/02/08 | Clutch Slip | 1) Clutch drive plate replaced 2) clutch cover replaced | Wasan Motors | 13131 | 748/- | 15/05/08 | Clutch slip | | Wasan Motors | 19646 | 3851/- | 25/08/08 | 1) Brake not working 2)Starter problem | 1) Break ABS Module replaced 2)Starter serviced | Wasan Motors | 25497 | 1561 | 15/10/08 | Air conditioner & other problems | Air conditioner repaired & Assy Fuel Filter Delphi | Wasan Motors | 30436 | 9461/- | एकूण रक्कम | 21123.15/- |
9 तक्रारदाराचे म्हणणे की, Clutch Drive Plate ची यंत्रणा बंद पडली तर इंजिन चालू होते मात्र त्यातील पॉवर गिअर बॉक्समध्ये येत नाही. अशा वेळी गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. तिने गाडी विकत घेतल्यापासूनच गाडीत Clutch चा दोष असल्यामुळे तो उत्पादन दोष आहे. तसेच गाडी कमी दर्जाची आहे. उत्पादन दोष असल्यामुळे तोच तोच दोष / समस्यां पुन्हा उदभवतात. सामनेवाले यांनी उत्पादन दोष असलेली गाडी दिली ही त्यांची सेवेत न्युनता आहे. सामनेवाले हे तक्रारदार हिला गाडीची रक्कम परत करण्यास किंवा त्या ऐवजी नविन गाडी देण्यास तसेच तीने गाडीच्या दुरुस्तीवर जो खर्च केला, त्याची प्रतिपूर्ती व्याजासहीत करण्यास तसेच मानसिक त्रासापोटी रु.5,00,000/- नुकसानभरपाई देण्यास जबाबदार आहेत. मागणी करुनही त्यांनी तक्रारदार हिच्या या मागण्यां पूर्ण केलेल्या नाहीत, म्हणून तीने सदरची तक्रार दाखल केली आहे. 10 सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारीला उत्तर देऊन तक्रारदार हिचे आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, कारची जी दुरुस्ती झाली ती नेहमीच्या देखभाल स्वरुपाची होती. सामनेवाले यांनी तक्रारदार हिला ताबडतोब सेवा दिली आहे आणि वॉरंटी कालावधीत कारच्या Clutch च्या संबंधीत सर्व समस्यां यशस्वीपणे दुरुस्त केलेल्या आहेत. तक्रारदार हिची गाडी बरेच मैल चाललेली आहे. तिच्यामध्ये उत्पादन दोष नाही. तक्रारदाराने योग्य त्या प्रयोगशाळेचे कारमध्ये उत्पादन दोष असल्याबद्दलचे प्रमाणपत्र दिलेले नाही. 11 सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 चे डिलर आहेत. सामनेवाले क्र.1 यांनी तयार केलेल्या गाडया व गाडयांचे सुटे भाग विकणे हा सामनेवाले क्र.2 चा व्यवसाय आहे. त्यांच्यातील संबंध principal to principal basis या तत्वावर आहे. सामनेवाले क्र.2 त्यांचे एजंट नाहीत. सदरची कार सामनेवाले क्र.2 यांना विकण्यापूर्वी तिची योग्य तपासणी करुन घेतली होती. ग्राहकाला गाडी विकण्यापूर्वी डिलर तिची पूर्ण तपासणी करुन घेतात. या गाडीची 18 महिन्यांची वॉरंटी होती वॉरंटीच्या शर्ती व अटी तक्रारदारांवर बंधनकारक होत्या. तक्रारदाराच्या गाडीमध्ये Clutch व Clutch च्या संबंधीत ज्या काही समस्या निर्माण झाल्या होत्या, त्या तक्रारदार हिने गाडी बरोबर हाताळली नाही, म्हणून निर्माण झाल्या होत्या. त्या वॉरंटी कालावधीत शुल्क न घेता दुर केलेल्या आहेत. तसेच वातानुकुलीत यंत्रणेची समस्याही दुर केलेली आहे. जून, 2008 मध्ये Clutch बदलून दिल्यानंतर त्याबद्दलची समस्यां पुन्हा उदभवली नाही. जून, 2008 पर्यंत गाडी 19671 कि.मी. चालविलेली होती. त्यानंतर Clutch ची समस्या उदभवली व त्यासाठी गाडी दुरुस्तीला आणली असे घडले नाही. 12 ज्या ज्या वेळी गाडी दुरुस्तीला आणली त्या त्या प्रत्येक वेळी तक्रारदाराने ज्या समस्यांबद्दल तक्रार केली. त्यावेळी गाडीत त्या समस्यां अस्तित्वात होत्या असे नाही. ज्या समस्यां अस्तित्वात होत्या, त्या समस्यां तक्रारदाराचे समाधान होईपावेतो दूरू केलेल्या आहेत. ऑक्टोबर, 2007 मध्ये कारचा Clutch Release Fort & Slave Cylinder बदलून दिले आहे, त्यावेळी गाडी 4407 कि.मी चालविलेली होती. गाडीत किरकोळ दोष होते. तक्रारदार हिला निःशुल्क व तात्काळ सेवा दिलेली आहे. तक्रारदाराने तक्रारीतील तीच्या आरोपापृष्ठर्थ प्रयोगशाळेचा अहवाल किंवा तज्ञांचे मत दाखल केलेला नाही. गाडीमध्ये उत्पादन दोष नसल्यामुळे गाडी बदलून नवी गाडी देण्याचा प्रश्न उदभवत नाही. तक्रारदाराने कार दुरुस्तीसाठी जो खर्च केला तो जे भाग वॉरंटीत बसत नव्हते त्यासाठी केला आहे. जे वॉंरंटीत बसत होते, त्याबाबतीत सामनेवाले यांनी निःशुल्क सेवा दिलेली आहे. सामनेवाले यांची सेवेत न्यूनता नाही. म्हणून ती रद्द करण्यात यावी. 13 तसेच या सामनेवाले यांचे म्हणणे की, तक्रारदार हिने सदरची कार सीबीडी येथे तिचे ऑफीसमध्ये जाण्यासाठी म्हणजे तिच्या व्यवसायासाठी घेतलेली होती. या कारणावरुनही तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. ती रद्द करण्यात यावी. 14 सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारीला उत्तर दिलेले नाही. मात्र त्यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. त्या लेखी युक्तीवादात त्यांनी तक्रारदार हिने केलेले आरोप नाकारले आहेत. त्यांचे म्हणणे की, ते सामनेवाले क्र.1 यांचे फक्त डिलर आहेत. तक्रारदाराला गाडीचा ताबा देताना वॉरंटीच्या अटींबाबतची पुस्तिका दिली होती, त्यातील शर्ती व अटींची तक्रारदाराला कल्पना होती. त्या शर्ती व अटींनुरुप तक्रारदार हिची गाडी दुरुस्त करुन दिलेली आहे. ज्या ज्या वेळी गाडी दुरुस्तीला आणली त्या त्या वेळी उत्तम सेवा देऊन गाडी दुरुस्त केलेली आहे. Clutch ची समस्यां तक्रारदाराने गाडी बरोबर हाताळली नाही म्हणून निर्माण झाली. तक्रारदार हिने गाडीत उत्पादन दोष असल्याबद्दल तज्ञांचे मत दाखल केले नाही. गाडीची वॉरंटी दिड वर्षाची होती व ती दि.27.02.2009 रोजी संपली होती. Clutch ची समस्यां वारंवार उदभवला व कारमध्ये उत्पादन दोष आहे हे तक्रारदाराने सिध्द केलेले नाही. त्यांची सेवेत न्यूनता नाही. तक्रारदार हि तिची गाडी व्यवसायासाठी वापरते, त्यामुळे ती ग्राहक होऊ शकत नाही. तक्रारदार हिला रु.13,02,098/- चे नुकसान झाले हे खरे नाही. सदरची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. 15 या कामी अर्जदार हिने पुरावा शपथपत्रं किंवा लेखी युक्तीवाद दाखल केलेला नाही. तोंडी युक्तीवादाच्या वेळीही ती व तिचे वकील हजर राहिले नाहीत. सामनेवाले क्र.1 तर्फे वकील –श्रीमती अनिता मराठे यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाले क्र.2 गैरहजर होते. आम्हीं तक्रारीमधील कागदपत्रं वाचली. 16 तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेली कार तिने सामनेवाले क्र.2 कडून घेतली होती व ती सामनेवाले क्र.1 यांनी तयार केलेली आहे, हे सामनेवाले यांना मान्य आहे. तसेच तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे गाडी सामनेवाले यांचेकडे दुरुस्तीसाठी नेली होती हे सामनेवाले योनी नकारलेले नाही. तक्रारदार हिने तक्रारीत परिच्छेद क्र.11 मध्ये नमूद केलेल्या दुरुस्तीच्या बिलांच्या प्रतीं (Tax Invoice) दाखल केलेल्या आहेत. त्यावरुन असे दिसून येते की, दि.29.09.2007 ते दि.15.10.2008 या कालावधीत एकूण आठ वेळा गाडी दुरुस्तीला नेली होती. पहिल्यांदा Fortune Cars या सर्व्हिस सेंटरला नेली होती. त्यानंतर प्रत्येक वेळी सामनेवाले क्र.2 कडे नेली. गाडीमध्ये Clutch ची समस्यां होती तसेच वातानुकुलीत यंत्रणेबाबतही समस्यां होती. प्रत्येक वेळी तक्रारदार हिला सामनेवाले यांनी सेवा दिलेली आहे. ClutchDrive Plate & Clutch Cover तीन वेळा बदलून दिलेले दिसतात. दि.21.02.2008 रोजी ClutchDrive Plate & Clutch Cover बदलून दिल्यानंतर Clutch च्या संबंधी काही दुरुस्ती करावी लागली असे दिसून येत नाही. दि.29.09.2007 ते दि.15.10.2008 च्या काळात म्हणजे जवळ जवळ 13 महिन्यात गाडी 30436 कि.मी. चालवलेली आहे. तक्रारदार हिने कारमधील Clutch बाबबीतील समस्यां हा उत्पादन दोष आहे. याबाबत तंत्रज्ञाचे प्रमाणपत्र दाखल केले नाही. तक्रारदार ही युक्तीवादाच्या वेळी गैरहजर राहिली. तिने लेखी युक्तीवादही दाखल केला नाही. त्यामुळे दि.21.02.2008 नंतर कारमध्ये Clutch मध्ये समस्या आहेत व कारमध्ये इतरही काही उत्पादन दोष आहेत असे तक्रारदाराचे म्हणणे नाही किंवा त्याबद्दल तज्ञांचा अहवाल नाही. कारच्या दुरुस्तीसाठी तक्रारदाराने जो काही खर्च केला तो वॉंरंटीच्या शर्तीप्रमाणे सामनेवाले यांनी करावयाचा होता असे तक्रारदार हिने सिध्द केलेले नाही. मंचाचे मते, सामनेवाले यांच्या सेवेत न्यूनता केलेली आहे हे तक्रारदाराने सिध्द केलेले नाही.सदरची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. 17 तक्रारदार हिने दि.12.11.2008 रोजी अंतरिम अर्ज दाखल केला आहे व तक्रार प्रलंबित असताना कारमध्ये काही दोष, समस्यां उदभवल्सास सामनेवाले यांना जबाबदार धरण्यात यावे व दोष वॉरंटी कालावधीत उदभवला असे समजून त्याचा खर्च सामनेवाले यांनी सोसावा, अशा आदेशासाठी विनंती केली आहे. मात्र, तक्रारदार हिने तक्रार प्रलंबित असताना गाडीत काय दोष निर्माण झाले. याबद्दल काही कथन केले नाही. त्यामुळे सदरचा अर्ज रद्द होण्यास पात्र आहे. वरील विवेचनावरुन, मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे. आदेश (1) तक्रार क्र.172/2011(641/2008) रद्दबातल करण्यात येते. (2) तक्रारदार हिचा दि.12.10.2008 रोजीचा अर्ज नामंजूर करण्यात येतो. (3) या प्रकरणी उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. (4) आदेशाच्या प्रमाणिंत प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |