जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 176/2010.
तक्रार दाखल दिनांक : 15/04/2010.
तक्रार आदेश दिनांक : 17/05/2012.
निकाल कालावधी : 02 वर्षे 01 महिने 02 दिवस.
श्री. महादेव जगन्नाथ माने, वय 39 वर्षे, व्यवसाय : ड्रायव्हर,
रा. वाघोलीवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
मॅनेजर, टाटा मोटार्स लिमिटेड, सांगली-मिरज रोड,
विश्रामबाग सांगली, सांगली. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला एस. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारयांचेतर्फेविधिज्ञ: महेश ठोंबरे
विरुध्दपक्षयांचेतर्फेविधिज्ञ: एच.आर. भोसले
आदेश
सौ. शशिकला एस. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे कर्ज प्रकरण सादर करुन टाटा टेम्पो 1109 मॉडेलची केसरी रंगाची गाडी रजि. क्र. एम.एच.10/झेड.529 विरुध्द पक्ष यांच्याकडून खरेदी केली आहे. वाहनाची किंमत रु.7,26,000/- असून त्याकरिता तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे Initial Hire पोटी रु.63,061/- चा भरणा केला असून पासिंग चार्जेस रु.5,000/- व विमा रु.18,000/- खर्च केला आहे. तसेच त्यांनी ताडपत्री व इतर किरकोळ कामाकरिता रु.5,500/- खर्च करुन दि.12/9/2005 रोजी वाहन पासिंग करुन घेतले आहे. टेम्पो वाहन गोवा येथून सोलापूर येथे आणत असताना कनकवली जवळ अपघात झाला आणि ते वाहन कोल्हापूर येथे आणले. तेथे दुरुस्तीकरिता सुटे भाग मिळत नसल्यामुळे तीन महिन्याचा विलंब झाला आणि वाहन दुरुस्तीकरिता श्रफ.1,55,000/- खर्च आला. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीमध्ये पुढे असे नमूद केले आहे की, विरुध्द पक्ष यांच्या सातारा शाखेने दि.8/3/2006 रोजी टेम्पो वाहन तक्रारदार यांच्या ताब्यातून ओढून नेले. त्याबाबत चौकशी केली असता, सहा महिन्याचे दरमहा चार्जेस रु.16,200/- प्रमाणे भरणा करुन टेम्पो नेण्यास सांगितले. तक्रारदार यांनी टेम्पो वाहन घेतल्यापासून एकही दिवस व्यवसाय केलेला नाही आणि त्यांना टेम्पोपासून उत्पन्न मिळालेले नाही. उलटपक्षी, अपघात होऊन टेम्पो दुरुस्तीकरिता त्यांना खर्च करावा लागला आहे. सदर बाब विरुध्द पक्ष यांच्या निदर्शनास आणून देऊनही दखल घेतली नाही. तसेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना पूर्वसूचना न देता टेम्पो वाहनाची परस्पर विल्हेवाट लावली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार मंचासमोर दाखल केली आहे आणि विरुध्द पक्ष यांच्याकडून नुकसानीपोटी रु.2,46,561/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.5,00,000/- व नोटीस खर्च रु.1,500/- असे एकूण रु.7,48,061/- व्याजासह मिळावेत आणि मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.5,00,000/- व तक्रार खर्च रु.10,000/- विरुध्द पक्ष यांच्याकडून वसूल होऊन मिळावा, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी दि.2/6/2011 रोजी लेखी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी तक्रारदार यांची तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी त्यांच्याकडून टाटा 1109 मॉडेलचे एम.एच.10/झेड.529 हे वाहन अर्थसहाय्य घेऊन खरेदी केले आहे आणि कर्ज घेताना त्यांचेमध्ये रितसर करारपत्र झालेले आहे. तक्रारदार यांनी वाहनाचे हप्ते वेळेवर न भरल्यामुळे कराराप्रमाणे त्यांनी वाहन दि.8/3/2006 रोजी ताब्यात घेतले आहे. घटना मार्च 2006 मध्ये घडलेली असून त्यानंतर 4 वर्षाने तक्रार दाखल केलेली असल्यामुळे तक्रार-अर्जास मुदतीची बाधा येते. तक्रार मुदतबाह्य असल्यामुळे फेटाळण्यास पात्र आहे. तसेच वाहनाचे आर.सी. व टॅक्स बूकवर उमदी, ता. जत हा पत्ता आहे. तसेच वाहन कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आल्यामुळे तक्रारीस घडलेले कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडले आहे. मंचाला सदर तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र प्राप्त होत नाही. मुदतीच्या व अधिकारक्षेत्राच्या मुद्यावर तक्रार चालू शकत नसल्याची विनंती त्यांनी केली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे, दोन्ही पक्षांनी मंचासमोर दाखल केलेली कागदपत्रे, लेखी युक्तिवाद इ. कागदपत्रांचे सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन करण्यात आले. त्या अनुषंगाने मंचासमोर खालील मुद्दे उपस्थित होऊन त्याची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे करण्यात येते.
3.1) अर्जात नमूद केल्याप्रमाणे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे आर्थिक सहाय्य टाटा टेम्पोवर घेतलेले होते. दि.12/9/2005 रोजी पासिंग करुन घेतलेनंतर गाडी सोलापूरला आणत असताना कणकवली येथे अपघात झाल्याने बरेच आर्थिक नुकसान झाले. गाडीचा योग्य त्या कारणाकरिता वापर करता न आलेले आर्थिक नुकसान होत गेलेने साहजिकच तक्रारदार यांना दरमहा ठरल्या कराराप्रमाणे हप्ते आर्थिक सहाय्याचे भरता आलेले नाहीत, हे उभय पक्षकार यांना मान्य व कबूल आहे. यावरुन तक्रारदार यांनी सहा महिन्यांचे हप्ते भरणा केलेले नव्हते, हे मंचानेही मान्य व गृहीत धरलेले आहे.
3.2) वरीलप्रमाणे घटना घडल्याने व हप्ते रक्कम तक्रारदार हे भरण्यास तयार न झालेने विरुध्द पक्ष यांनी दि.8/3/2006 रोजी गाडी ओढून नेऊन त्याची विल्हेवाट लावली आहे, असे तक्रारदार यांनी त्यांचे तक्रार-अर्जात नोटीस, प्रतिज्ञालेख, लेखी युक्तिवाद यामध्ये नमूद केलेले आहे. परंतु विरुध्द पक्ष यांनी गाडीचे काय केले, हे लेखी जबाबात स्पष्टपणे काहीही नमूद केलेले नाही. तथापि, दि.8/3/2006 पासून आजतागायत विरुध्द पक्ष हे गाडी जशीच्या तशी गॅरेजमध्ये ठेवून त्यांची त्यावरील होणारी कमाई वाया घालवणार नाहीत, हेही तितकेच सत्य आहे. विरुध्द पक्ष यांचेकडून गाडीचा ताबा घेण्यासाठी तक्रारदार यांनी काय प्रयत्न केले, हे मंचासमोर तक्रारदार यांनी सबळ पुराव्याने सिध्द केलेले नाही. तक्रारदार यांची गाडी बेकायदेशीररित्या दि.8/3/2006 रोजी जबरदस्तीने ओढून कोल्हापूर येथून घेऊन गेल्यानंतर तक्रारदार यांनी त्वरीत कोणतीही दखल घेतलेली नाही. दि.15/9/2010 रोजी मंचात तक्रार-अर्ज दाखल करताना नेमके 4 वर्षानंतर असे कोणते कारण घडले की, जेणेकरुन तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले. याबाबत कोणताही पुरावा व सविस्तर तपशील मंचासमोर दाखल केलेला नाही. फक्त दि.9/2/2010 रोजी विधिज्ञांमार्फत नुकसान भरपाई मिळणेसाठी नोटीस विरुध्द पक्ष यांना पाठविली; म्हणून ते अर्जास योग्य कारण होते व आहे, असे गृहीत धरता येणार नाही. दि.8/3/2006 नंतर केव्हा गाडीची कशी कोणत्या पध्दतीने विल्हेवाट लावली, हे मुद्दे पुराव्याने विरुध्द पक्ष यांनीही जाणूनबुजून स्पष्ट केलेले नाहीत व सिध्द केलेले नाहीत. तथापि, असे असले तरी आजमितीस विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे गाडीची विल्हेवाट गाडी विक्री अथवा अन्य कराराने तबदील केलेली आहे, हे मंचास गृहीत धरणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक आहे. म्हणजेच तक्रारदार यांची गाडी विरुध्द पक्ष यांनी जरी बेकायदेशीररित्या जप्त करुन विल्हेवाट दि.8/3/2006 रोजी अथवा त्यानंतर लावली असली तरी तक्रारदार यांनी गाडी जप्त केल्यानंतर त्वरीत मंचात दाद मागणी केलेली नाही. म्हणून ग्राहक संरक्षण कायदा, 1986 लिमिटेशेन अन्वये घटना घडलेनंतर दोन वर्षानंतर मंचात दाद मागणी केलेली आहे. म्हणून विरुध्द पक्ष यांचे दि.16/11/2011 रोजीचे लेखी जबाबाप्रमाणे दखल घेतली असता सदर तक्रार मुदतीत नाही. मुदतीची बाधा आलेली आहे. (Limitation)म्हणून या मुद्यावर तक्रार-अर्ज खारीत होणे/नामंजूर होणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक आहे.
3.3) विरुध्द पक्ष यांनी सदर तक्रार-अर्ज या मंचाचे स्थळसिमेत येत नाही; म्हणून ‘अधिकारक्षेत्रा’वरही (Jurisdiction)आक्षेप घेतलेले आहेत. त्या मुद्याची दखल घेतली असता, गाडीचे पासिंग उमदी, तालुका जत, जिल्हा सांगली येथे झाले आहे. तर कोल्हापूर येथे जप्त केली होती. म्हणून अधिकारक्षेत्र कोल्हापूर अथवा सांगली असणे आवश्यक होते. याची कोणतीही कारणे नमूद केलेली नाही. म्हणून सदर तक्रार-अर्ज या मंचास चालविण्याचा हक्क व अधिकार नाही. म्हणून ‘अधिकारक्षेत्रा’च्या मुद्यावरही तक्रार-अर्ज नामंजूर होण्यास पात्र आहे. म्हणून अन्य कोणत्याही मुद्यावर ऊहापोह मंचाने करणेचा प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणून आदेश.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात आली आहे.
2. उभय पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
3. आदेशाची प्रत दोन्ही पक्षांना नि:शुल्क देण्यात यावी.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला एस. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/पुलि/11512)