(मंचाचे निर्णयान्वये, श्री.सादिक मो.जव्हेरी, मा.सदस्य) (पारीत दिनांक : 31.10.2011) अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 नुसार दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदाराने, स्वयंरोजगाराकरीता टाटा मोटर्स कंपनीची गैरअर्जदार क्र.1 कडून, गैरअर्जदार क्र.3 चंद्रपूर व्दारा ‘’टाटा एल.वी.टी.3118 प्रकारचा डिझल ट्रक क्रमांक एम.एच.34/एबी-778 हा ट्रक एकूण रुपये 16,63,191/- विकत घेतला. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून ट्रक विकत घेतांना टाटा मोटर्स फायनान्स लि., कंपनीकडून रुपये 16,50,000/- चे व्याजासहीत मासिक हप्ता रुपये 45,050/- दरमाह प्रमाणे चार वर्षामध्ये 46 मासिक हप्त्यामध्ये भरण्याच्या करारावर, एकूण कर्ज रुपये 20,72,000/- चे परतफेड करणे आहे. 2. गैरअर्जदार क्र.3 हे अधिकृत वितरक व नंतर दुरुस्ती करणारे आहे. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.3 चद्रपूर येथे असल्याने ट्रकची आवश्यक ती दुरुस्ती वेळोवेळी त्यांचेकडे केलेली आहे. दिनांक 19.2.2010 पासून वाहनातील डिझलच्या निर्धारीत खपतीपेक्षा जास्त खपत होत आहे व तो निर्माणाधीन दोष काढून ट्रक निर्धारीत डिझल खपत येण्यासाठी दुरुस्तीला गैरअर्जदार क्र.3 कडे ट्रक दि.9.2.2011 ला ठेवला आहे. गैरअर्जदार क्र.3 ने, ट्रक मधील जुने इंजिन बदलून आवश्यक त्या दुरुस्त्या करुन दि.7.3.3011 रोजी अर्जदाराला ट्रकचा ताबा दिला. अर्जदाराने ट्रकचा ताबा आक्षेपासह आणि आवश्यक ती दाद मागण्याचा अधिकार सुरक्षीत ठेवून स्विकारला आहे. अर्जदाराने विकत घेतलेल्या ट्रक ची डिझल खपत प्रतिलिटर 3.5 कि.मी. येईल असे गैरअर्जदाराचे ट्रक घेतांना आश्वासन होते. परंतु, अर्जदाराचा ट्रकची डिझल खपत एव्हरेज प्रतिलिटर 3.5 कि.मी. एवढा कधीही आली नाही. 3. अर्जदाराला मालवाहतुकीकरीता ट्रक राज्यात व राज्याबाहेर ही पाठवावा लागतो व हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. परंतु, ट्रक देत असलेल्या निर्धारीत खपती पेक्षा 0.5 कि.मी.प्रतिलिटर डिझल जास्त खपतीचे मुळ कारण ट्रक मधील निर्माणाधीन दोष आहेत व त्यामुळे, अर्जदाराला हजारो रुपयाचे अधिकच्या डिझल खपतीकरीता हजारो रुपयाचे नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच, कर्जाच्या परतफेडीचा मासिक हप्ता रुपये 45,050/- प्रमाणे नियमित भरावा लागत आहे. ट्रक दुरुस्तीसाठी बंद असतांनाही लोनचे मासिक हप्ता नियमित भरलेले आहेत, तरीही दोन हप्ते प्रलंबित आहेत व पुढील वाहतुकीचे परमीट रिन्यु करण्याकरीता टाटा फायनान्स कंपनीने नकार दिला, म्हणून रक्कम उधार घेवून थकीत दोन हप्ते भरलेले आहेत. ट्रकच्या निधारीत डिझल खपतीपेक्ष जास्त डिझल खपत होत असल्याने, तो दोष दूर करण्याकरीता अर्जदाराला ट्रक गैरअर्जदार क्र.3 कडे वारंवार ठेवावा लागला. त्यात अर्जदाराचे रोजगारात व्यत्य निर्माण होवून नुकसान सहन करावे लागले. ट्रक चालविणारा चालक अनुभवी आहे. ट्रक सोबत निरिक्षणासाठी गेलेल्या गैरअर्जदाराचे प्रतिनिधीनीही वाहन चालकाच्या वाहन चालाविण्याबाबत कोणताही किंतू केलेला नाही आणि 0.5 कि.मी. प्रतिलिटर डिझल खपत जास्त असल्याचे प्रमाणपञ ट्रक मध्ये निर्माणाधीन दोष आहेत हे दाखविण्यास पुरेसे आहे, म्हणून गैरअर्जदार अर्जदाराला योग्य सेवा देत नाहीत व सेवेत न्युनता आहे. गैरअर्जदारांनी अनुचित व्यापार पध्दती अवलंबिली आहे. अर्जदाराला होत असलेल्या मानसिक, आर्थिक नुकसानीसाठी सर्व गैरअर्जदार प्रत्येकी व संयुक्तरित्या जबाबदार आहेत. त्यामुळे, ट्रकच्या एव्हरेजमध्ये निर्धारीत एव्हरेजपेक्षा 0.50 कि.मी. एव्हरेज कमी देण्यामुळे, आतापर्यंत ट्रक जवळपास 75000 कि.मी. करीता 3572 लिटर डिझल अधिक खर्च झाल्याने रुपये 1,60,740/- जास्त खर्च करावा लागला व नुकसान झाले आहे. वेळोवेळी ट्रक दुरुस्तीकरीता कार्यशाळेत ठेवल्यामुळे कामाचे नुकसान दर दिवशी साधारण रुपये 3100/- प्रमाणे 30 दिवसाचे रुपये 93,000/-, ञुटीपूर्ण सेवेमुळे झालेल्या शारिरीक, मानसिक ञासाची नुकसान भरपाई रुपये 50,000/-, डिझेलच्या अतिरिक्त खपतीच्या खर्चाला 18 टक्के द.सा.द.शे. व्याज दि.19.2.2010 पासून रुपये 38,578/-, तक्रारीचा खर्च रुपये 20,000/-, तसेच गैरअर्जदार क्र.3 कडे दुरुस्तीसाठी ट्रक दि.7.3.2011 रोजी इंजिन बदलून व दुरुस्ती करुन मिळाले त्या 27 दिवसाकरीता रुपये 3100/- प्र.दि.प्रमाणे रुपये 83,700/- असे एकूण रुपये 4,46,018/- अर्जदाराला द्यावे, अशी मागणी व प्रार्थना केली आहे. 4. अर्जदाराने तक्रारीसोबत नि.4 नुसार 31 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 व 2 हजर होऊन निशाणी क्र.14 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.3 ने हजर होऊन निशाणी क्र.12 नुसार लेखी बयान दाखल केले. 5. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने आपले लेखी उत्तरा प्राथमिक आक्षे घेऊन असे म्हटले आहे की, अर्जदाराने निर्माणधीन दोषाबाबत आरोप केले आहे. परंतु, कुठलेही त्याबाबत तज्ञाचे अहवाल सादर केलेले नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने, सदर तक्रार ही ग्राहक विवाद व अर्जदार हा ग्राहक होत नसल्यामुळे, सदर तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2ने हे ही म्हटले आहे की, अर्जदाराने आपले तक्रारीतील वाहन वेळेवर आमच्या अधिकृत वर्कशॉप मधून वेळोवेळी वाहन मॅन्युअल प्रमाणे सर्विसींग केली नसल्यामुळे, वॉरंटी मध्ये मोडत नाही, तरी सदर कारणाने ही तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने आपले लेखी उत्तरा अर्जदाराची तक्रार परिच्छेद निहाय् अमान्य केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने आपले लेखी युक्तीवादात नमूद केले की, अर्जदाराने सदरील ट्रक हा स्वयंरोजगाराकरीता विकत घेतलेला नसून व्यावसायीक हेतुकरीता विकत घेतलेला आहे. अर्जदार हा ‘’नुरी ट्रान्सपोर्ट’’ या नावाने व्यवसाय करतो. सदरील ट्रक विकत घेण्याअगोदरच अर्जदाराकडे अनेक व्यावसायीक वाहने आहेत व त्या वाहनाचा उपयोग अर्जदार निव्वळ नफा मिळविण्याकरीता व व्यवसायाकरीता करतो. ट्रक हे स्वयंरोजगाराकरीता वापरण्यांत येणारे वाहन नसून एक व्यावसायीक वाहन आहे. त्यामुळे, तो ग्राहकाच्या व्याख्येत मोडत नाही. अर्जदाराने ट्रक चालविण्याकरीता वेगळा चालक ठेवलेला आहे. अर्जदाराने ट्रक स्वयंरोजगाराकरीता विकत घेतला असता तर अर्जदाराने स्वतः ट्रक चालविणे व स्वतः ट्रकची हाताळणी करणे अपेक्षीत आहे. अर्जदार हा ग्राहक मंचासमोर दाद मागण्यास पाञ नाही. तसेच, विद्यमान, ग्राहक मंचाला अश्या व्यक्तीला दाद देण्याचा अधिकार नाही, जो व्यक्ती ग्राहक व्याख्येत मोडत नाही. त्यामुळे, अर्जदाराची तक्रार खर्चासहीत गै.अ.क्र.1 व 2 चे विरुध्द खारीज होण्यास पाञ आहे. गै.अ.ने वॉरंटी मधील अटी व शर्तीनुसार अर्जदाराच्या ट्रकचे वेळोवेळी दुरुस्ती करुन दिलेले आहे व इंजिनसुध्दा बदलवून दिलेले आहे. अर्जदार हा वॉरंटीचे अटी व शर्ती नुसार कोणतीही नुकसान भरपाई गै.अ.कडून मागण्यांस पाञ नाही. गै.अ.ने वेळोवेळी ट्रकमध्ये केलेली दुरुस्ती ही विनामुल्य करुन दिलेली आहे व वॉरंटीनुसार कुठल्याही शर्ती व अटींचे उल्लंघन केलेले नाही. गै.अ.ने, अर्जदारास पुरविलेल्या सेवामध्ये कुठेही ञुटी नाही. अर्जदाराने, यापूवी्र मंचात तक्रार क्र.38/2011 दाखल केली होती. ग्राहक तक्रार क्र.38/2011 व 88/2011 या दोन्ही केसमध्ये खुप फरक आहे, मागणी मध्ये फरक आहे. अर्जदार हा स्वच्छ हाता मंचासमोर आलेला नसून, फक्स पैस उकळविण्याच्या दृष्टीकोनातून आलेला आहे. त्यामुळे, गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्द अर्जदाराची तक्रार खर्चासहीत खारीज करण्यांत यावी. 6. गैरअर्जदार क्र.3 ने लेखी बयानात नमूद केले की, अर्जदार हा एक व्यावसायीक असून सदर ट्रकचा वापर हा नफा कमविन्यासाठी असल्याने अर्जदार हा ग्राहक या सज्ञेत मोडत नाहीत, म्हणून तक्रार ही विद्यमान मंचाच्या कार्यक्षेञात बसत नाही. अर्ज हा निव्वळ पैसे उकळण्यासाठी असून केलेली मागणी ही निरर्थक व तथ्यहीन असून गैरअर्जदार क्र.3 शी त्याचा काहीही संबंध नाही.
7. गैरअर्जदार क्र.3 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदार हा एक मालवाहतुकीचा व्यवसाय करणारा व्यावसायीक असून त्याचा सदर व्यवसाय हा नुरी ट्रान्सपोर्ट या नावाने चालत असतो. याशिवाय, अर्जदाराने ट्रक हा स्वयंरोजगारासाठी विकत घेतलेला नसून आपला व्यवसाय वाढविण्यासाठी व त्यातून निव्वळ नफा कमविण्याच्या उद्देशाने घेतलेला आहे. आजरोजी अर्जदाराकडे बरेचशे व्यावसायीक वाहन आहेत, त्यामुळे अर्जदार हा ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ग्राहक या सज्ञेत मोडत नाही. गैरअर्जदार क्र.3 हे टाटा मोटर्स लि. यांच्या वाहनाची निर्मिती कंपनी नसून, निव्वळ सदर वाहनांची विक्री, दुरुस्ती व पुर्जे विकण्याचा व्यवसाय करणारे अधिकृत डिलर आहेत. त्यामुळे, वाहनाच्या विक्रीनंतर उद्भवलेल्या दोषास गैरअर्जदार क्र.3 यांना दोषी ठरविले जावू शकत नाही. अर्जदाराच्या वाहनात असलेल्या दोषाची माहिती मिळविण्याकरीता गैरअर्जदारास वाहनाची वेगवेगळ्या पध्दतीने चाचणी घेणे अत्यावश्यक होते. त्याकरीता, गैरअर्जदाराने, अर्जदाराच्या पूर्व परवानगीने सदर वाहनाच्या आवश्यक सर्व चाचण्या घेतल्या व सर्व चाचण्या अर्जदाराच्या फायद्यासाठीच घेण्यात आल्या होत्या. सर्व चाचण्या निर्माता कंपनीच्या असलेल्या नियमानुसार व त्यांच्याच सांगण्यावरुन घेण्यात आलेल्या आहेत. सदर वाहनाबाबत एव्हरेज कमी असल्याची तक्रार सर्वप्रथम दि.26.4.2010 रोजी कळविली होती. त्यानंतर, गैरअर्जदार क्र.3 ने कसलाही वेळ न दवडता निर्माता कंपनीच्या नियमानुसार वाहनाच्या तक्रारीची माहिती निर्माता कंपनीस म्हणजे अन्य गैरअर्जदारास दिली. वाहनाबाबत योग्य निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त निर्माता कंपनीच करु शकत असल्याने त्यासाठी आवश्यक सर्व मदत गैरअर्जदार क्र.3 ने अर्जदारास व अन्य गैरअर्जदारास केलेली आहे. त्यामुळे, गैरअर्जदार क्र.3 ने अर्जदारास सेवा देण्यात कोणतीही न्युनता किंवा दिरंगाई केलेली नाही. याशिवाय, गैरअर्जदार क्र.3 ने अन्य गैरअर्जदारांसोबत वेळोवेळी केलेल्या संपर्कामुळेच अर्जदारास नविन इंजिन बदलवून देण्यात आलेले आहे. गैरअर्जदार क्र.3 हा वाहनाची दुरुस्ती करीता बांधील आहे, परंतु, गैरअर्जदार क्र.3 ने अर्जदाराच्या तक्रारीचे तुर्तास निवारण व्हावे महणून अन्य गैरअर्जदारास त्याबाबत कळविणे आवश्यक होते व त्यामुळे सदर प्रकरण हे निर्माता कंपनीच्या अधिकारात विलीन झाल्याने गैरअर्जदार क्र.3 आपला स्वतंञ निर्णय घेण्यास असमर्थ ठरलेला आहे. अर्जदार हा विद्यमान मंचासमोर स्वच्छ हाताने आलेला नाही. अर्जदाराने सदर तक्रार ही निव्वळ पैस उकळण्यासाठी दाखल केले आहे, कारण सदर तक्रारीच्या अगोदर याच आशयाची तक्रार दाखल केलेली होती व ती नंतर अर्जदाराने परत घेतली होती. गैरअर्जदार क्र.3 विरोधात असलेली 27 दिवसाची नुकसान भरपाईची मागणी संयुक्तीक नाही, सबब अर्जदाराची मागणी खारीज करण्यात यावी. अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यात यावा. 8. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठ्यर्थ निशाणी क्र.22 नुसार शपथपञ व निशाणी क्र.24 सोबत 1 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.3 ने निशाणी क्र.26 नुसार रिजॉईन्डर/शपथपञ व निशाणी क्र.27 नुसार 20 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने निशाणी क्र.29 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. गैरअर्जदार क्र.3 ने निशाणी क्र.31 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदारांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ, गैरअर्जदारांनी दाखल केलेले लेखी युक्तीवाद व उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 9. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 कडून, गैरअर्जदार क्र.3 व्दारे घेतलेले ट्रक टाटा एल.वी.टी.3118, ट्रक क्र.MH-34 AB 778 घेतला आहे. सदर ट्रक मध्ये डिझलची खपत जास्त होत आहे, अशी अर्जदाराची तक्रार वरुन, गैरअर्जदार क्र.3 ने दि.24.4.2010 ते 14.7.2010 व नंतर दि.3.8.2010, 17, 18, 19, 20 व 21 ऑगष्ट 2010 पर्यंत, गैरअर्जदार क्र.1 व 2 च्या निर्देशानुसार व नियमानुसार दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुरस्ती नंतर ही खपत जास्त होत असल्याने, सदर ट्रक पुन्हा अर्जदाराने दि.9.2.2011 पासून गैरअर्जदार क्र.3 कडे दुरुस्तीसाठी ठेवला, नंतर गैरअर्जदार क्र.3 ने सदर ट्रकमध्ये असलेले दोष हे इंजीन मध्ये निर्माणाधीन दोष असल्यामुळे, गैरअर्जदार क्र.1 व 2 चे निर्देशानुसार व नियमानुसार अर्जदारास सदर ट्रकचा इंजिन बदलून नविन इंजिन ट्रकमध्ये बसवून दि.7.3.2011 ला अर्जदारास दिला आहे.
10. गैरअर्जदार क्र.3 ने, अर्जदाराचे दोषयुक्त ट्रकचे इंजिन बदलण्यापूर्वी केलेली सर्व चाचणी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न व दुरुस्त न झाल्यावर गैरअर्जदार क्र.1 व 2 च्या निर्देशानुसार व नियमानुसार नविन इंजिन लावून अर्जदारास दिला असल्यामुळे, गैरअर्जदार क्र.3 ने अर्जदारास कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नसल्याचे गृहीत धरण्यास हरकत नाही, म्हणून गैरअर्जदार क्र.3 विरुध्द तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. 11. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने, अर्जदाराची तक्रार, गैरअर्जदार क्र.3 मार्फत मिळून सुध्दा व वारंवार अर्जदार तसेच गैरअर्जदार क्र.3 व्दारे सुचना देऊन सुध्दा, सदर इंजिन मधील निर्माणधीन दोष असलेले इंजिन बदलून देण्यास जो वेळ लावलेला आहे, त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 व 2 हे अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा देण्यासाठी जबाबदार आहे.
12. अर्जदाराने, सदर ट्रक कर्ज घेऊन घेतल्यामुळे व कर्जाचे हप्ते भरण्यासाठी अर्जदारास आपले ट्रक चालविणे व त्या ट्रकवरुन नफा कमवून कर्जाचे हप्ते भरण जरुरी होते. गैरअर्जदार क्र.1 व 2 च्या वेळ काढू धोरणामुळे, अर्जदारास झालेल्या नुकसानीसाठी गैरअर्जदार क्र.1 व 2 हे जबाबदार आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे. 13. गैरअर्जदार क्र.3 व्दारे दाखल दस्तऐवजावरुन सिध्द होते की, अर्जदाराची तक्रार दाखल झाल्यापासून, गैरअर्जदार क्र.3 ने, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना वांरवार पञ व ई-मेल व्दारे सदर इंजिन मधील निर्माणधीन दोषाबाबत कळविले आहे. गैरअर्जदार क्र.3 ने, सदर ट्रकच्या डिझेल खपत जास्त आहे, यासाठी संपूर्ण चाचण्या सुध्दा करुन व डिझेल खपत जास्त होत आहे हे गैरअर्जदार क्र.1 व 2 च्या निर्देशनास आणून दिल्यानंतर ही गैरअर्जदार क्र.1 व 2 ने वेळेवर अर्जदाराचे इंजिन बदलवून देण्यास टाळाटाळ केलेली आहे. 14. गैरअर्जदार क्र.1 व 2 चे हे म्हणणे संयुक्तीक नाही की, अर्जदार हा वाहनाचा उपयोग व्यवसाया करीता करीत होता. कारण, गैरअर्जदार क्र.1 व 2 ने याबाबत कुठलेही पुरावे दाखल केलेले नाही, फक्त आरोप केलेले आहे. काही पुरावा दाखल करुन सिध्द केलेले नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने, अर्जदाराकडे असलेले अनेक व्यावसायीक वाहनाबाबत पुरावा सादर केलेला नाही. कोणालाही व्यावसायीक ट्रक घेऊन आपल्या व आपल्या परिवारासाठी उदरनिर्वाह करीता ट्रकचा व्यवसाय करण्यासाठी ट्रान्सपोर्ट ऑफीस कोणत्याही नावाने सुरु करावी लागते, जेणे करुन त्या ट्रान्सपोर्टच्या नावाने त्याला व्यवहार करता यावे. तसेच, ट्रकचा व्यवसाय हा राञ न दिवस म्हणजे 24 तास चालणारा असल्यामुळे, आपल्यासोबत ड्रायव्हर ठेवल्यामुळे तो व्यवसायीक वापर आहे, असे म्हणणे न्यायोचीत नाही. कारण, ट्रक जर जास्त दुरीचे काम करीत असेल किंवा 24 तास काम करीत असेल तर दोन ड्रायव्हर असणे जरुरी आहे. 15. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने असे ही म्हटले आहे की, अर्जदाराने सदर ट्रकच्या इंजिन मध्ये निर्माणधीन दोष असल्याबाबतचा कुठलाही तज्ञांचा अहवाल सादर केलेला नाही. परंतु, अर्जदाराने स्वतःहून सदर ट्रक दुरुस्तीसाठी गैरअर्जदार क्र.3 कडे आणला, तो गैरअर्जदार क्र.1 व 2 च्या अधिकृत सर्विस देणारा वर्कशॉप आहे व तिथे गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 च्या वतीने स्वतः कंपनीच्या तज्ञ लोकांनी तपासणी करुन, इंजिन मध्ये निर्माणधीन दोष आहे, असा अहवाल सादर केलेला आहे. म्हणून गैरअर्जदार क्र.1 व 2 चे हे ही म्हणणे की, अर्जदाराने तज्ञांचा अहवाल दाखल केले नाही, हे गृहीत धरण्या सारखे नाही. 16. अर्जदाराने, इंजिन मधील असलेल्या निर्माणधीन दोषामुळे अर्जदारास झालेल्या नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. परंतु, अर्जदाराने हे कमी एव्हरेज मुळे येणार डिझेल खर्चाचा हिशोब कोणत्या आधारे काढलेले आहे व अर्जदाराची गाडी किती चालत होती, याचा पुरावा नसल्यामुळे, तसेच गैरअर्जदार क्र.3 कडे दुरुस्तीसाठी ठेवल्यामुळे दर दिवशी रुपये 3100/- प्रमाणे मागणी याचा ही खुलासा न केल्यामुळे, अर्जदाराचे मागणी प्रमाणे, अर्जदार नुकसान भरपाईसाठी पाञ नाही. परंतु, अर्जदाराचे इंजिन मधील निर्माणधीन दोषामुळे आर्थिक नुकसान झाले आहे, याच्यात वाद नाही व अर्जदार हा काही प्रमाणात नुकसान भरपाईसाठी पाञ आहे. 17. एकंदरीत, गैरअर्जदार क्र.1 व 2 ने, अर्जदारास इंजिन मधील निर्माणधीन दोष असल्यामुळे दोषयुक्त इंजिन बदलून देण्यास लावलेल्या वेळामुळे, अर्जदारास झालेल्या नुकसानीस जबाबदार आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन, या तक्रारीत खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने, इंजिन मधील निर्माणधीन दोषामुळे झालेल्या नुकसानपोटी अर्जदारास रुपये 50,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे, व 30 दिवसांत न दिल्यास त्यावर 9 % व्याजाने पदरी पडेपर्यंत द्यावे. (2) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने, मानसिक व शारीरीक ञासापोटी अर्जदारास रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे. (3) गैरअर्जदार क्र.3 च्या विरुध्द तक्रार खारीज. (4) उभय पक्षांना आदेशाची प्रत द्यावी. |