::: आ दे श :::
( पारित दिनांक : 27/04/2017 )
माननिय अध्यक्षा, सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 नुसार तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 विरुध्द नुकसान भरपाई मिळण्यासाठी सदर तक्रार मंचात दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 निर्मीत टाटा इंडिगो मांझा कार विरुध्द पक्ष क्र. 2 कडून दिनांक 16/11/2012 रोजी रक्कम रुपये 7,79,655/- मध्ये खरेदी केली. तक्रारकर्ते यांनी सदर वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते. विरुध्द पक्ष क्र. 1 यांची सदर वाहनाची हमी खरेदी केल्यापासून 24 महिन्यापर्यंत होती तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 तर्फे वरील 24 महिण्यांच्या हमी व्यतिरीक्त अधिक 24 महिण्यांकरिता किंवा गाडीचा प्रवास 1,50,000 कि.मी. होईपर्यंतची वाढीव हमी तक्रारकर्त्याने रुपये 5,800/- भरुन घेतली होती, ती कायम आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास असे सांगितले होते की, सदर गाडीमध्ये हया वाढीव हमी कालावधीत कुठलाही यांत्रिक, तांत्रिक आणि इमिशनमध्ये बिघाड झाल्यास विरुध्द पक्ष क्र. 1 च्या डिलर मार्फत कुठलाही मोबदला, किंमत, मजूरी व सेवाशुल्क न आकारता सदर पार्टस् दुरुस्त करुन देईल किंवा बदलून दिल्या जाईल. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 जे विरुध्द पक्ष क्र. 1 चे डिलर आहेत, त्यांच्याकडे पहिल्या चार फ्री सर्व्हिसींग केल्यात. दिनांक 04/12/2012 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 2 कडे पहिली फ्री सर्व्हिसींग केली परंतु दुस-या फ्री सर्व्हिसींगच्या पूर्वी तक्रारकर्त्यास कारमध्ये पुअर पीक अप फॉल्ट जाणवत होता, त्यानंतर दिनांक 18/04/2013 रोजी गाडीची दुसरी फ्री सर्व्हिसींग विरुध्द पक्ष क्र. 2 कडे केली व गाडीच्या पुअर पीक अप फॉल्ट बाबत तक्रार केली. परंतु विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी सदर फॉल्ट शोधून दुरुस्त करण्याची तसदी घेतली नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक 02/10/2013 रोजी तिसरी फ्री सर्व्हिसींग सुध्दा विरुध्द पक्ष क्र. 2 कडे केली होती परंतु त्याहीवेळेस त्यांनी हा फॉल्ट दुरुस्त केला नाही. म्हणून दिनांक 22/04/2014 रोजी तक्रारकर्त्याने कार विरुध्द पक्ष क्र. 3 च्या सेवा केंद्रात दाखविली, परंतु विरुध्द पक्ष क्र. 3 यांनीही सदर फॉल्ट दुरुस्त केला नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने कारची चौथी फ्री सर्व्हिसींग दिनांक 11/11/2014 रोजी विरुध्द पक्ष क्र. 3 च्या सेवा केंद्रात केली होती. दिनांक 11/02/2015 रोजी तक्रारकर्त्याने त्याची कार पेड सर्व्हिसिंग करिता विरुध्द पक्ष क्र. 3 च्या सेवा केंद्रात दाखल केली व परिक्षण चार्जेसचे देखील भूगतान केले होते. तेंव्हाही विरुध्द पक्ष क्र. 3 ने कारमधील फॉल्टची दुरुस्ती केली नव्हती, त्यावेळेस विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारकर्त्यास त्याच्या कारमध्ये असलेला पुअर पीक अप फॉल्ट हा टर्बो चार्जर अॅसे हा कारमधील पार्ट खराब झाल्यामुळे आहे व तो बदलण्याकरिता रुपये 45,247/- एवढा खर्च सांगीतला. वास्तविक हा दोष विरुध्द पक्ष क्र. 1 ने ऑफर केलेल्या हमी कालावधीतच निर्माण झाला होता व वेळोवेळी याबद्दल तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 कडे तक्रार देखील केली होती. त्यामुळे सदर पार्ट फ्री मध्ये बदलवून देण्याकरिता विरुध्द पक्ष क्र. 3 मार्फत तक्रारकर्त्याने दावा पॉलिसी विरुध्द पक्ष क्र. 1 कडे केला. परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी दिनांक 14/02/2015 च्या पत्राव्दारे विरुध्द पक्ष क्र. 3 यांना असे कळविले की, कारमधील कुलंट 24 महिण्यांच्या आत न बदलल्यामुळे खराब झाले म्हणून दावा नामंजूर करण्यात येत आहे. वास्तविक कारच्या मॅन्युअल पुस्तकानुसार, कारमधील कुलंट बदलण्याची मर्यादा 60,000 कि.मी. पर्यंत आहे व गाडीचे रिडींग विरुध्द पक्षाने वेळोवेळी जॉब कार्डवर नमूद केले आहे. गाडीची सर्व्हिसिंग करतांना गाडीच्या पार्टस् मध्ये बदल करणे, नादुरुस्त पार्टस् दुरुस्त करणे, ऑईल, कुलंट वेळोवेळी गरजेनुसार बदलणे ही जबाबदारी सेवा देणा-या अधिकृत डिलरची आहे. त्यामुळे त्यांनीही जबाबदारी पार पाडण्यात कसुर केल्यामुळे, सदर पार्ट निकामी झाला. सदर फॉल्ट हमी काळातच झाला होता व तक्रारकर्त्याने याबाबत तक्रार ही हमी काळातच केली होती. त्यामुळे ही सेवा न्युनता आहे, म्हणून तक्रारकर्त्याने वकिलामार्फत कायदेशीर नोटीस विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना पाठविली. विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांनी खोटा जबाब दिला. त्यामुळे नाईलाजास्तव तक्रारकर्त्याने गाडीचा सदर पार्ट हा दिनांक 20/06/2015 रोजी विरुध्द पक्ष क्र. 3 च्या सेवा केंद्रातून नविन बसवून घेतला व रुपये 41,742/- एवढी रक्कम विरुध्द पक्ष क्र. 3 ला अदा केली. म्हणून सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, प्रार्थनेनुसार ती मंजूर करावी, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केली आहे.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 च्या मते – सदर वाढीव हमी पॉलिसी ही युनायटेड इन्शुरन्स कंपनी लिमीटेड आणि ग्लोबल अॅडमिनीस्ट्रेशन सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमीटेड यांनी तक्रारकर्त्याला दिली होती व तसा करार उभय पक्षात झाला आहे. परंतु तक्रारकर्त्याने त्यांना या प्रकरणात पक्ष केले नाही, सदर करारात विरुध्द पक्ष क्र. 1 हे पक्ष नव्हते व विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी ही हमी पॉलिसी दिली नव्हती, म्हणून विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्याविरुध्द तक्रार खारिज करावी. तक्रारकर्ता याने पाहून व सर्व बाबी तपासून सदर कार विकत घेतली होती व ती वापरलीही आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी वाहन ताब्यात देणेपुर्वी सखोल तपासणी केलेली होती. सदर वाहन हे विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांच्याकडे सर्व्हिसिंग करता अगर दुरुस्तीकरिता आल्यास, त्याची नोंद जॉब कार्डवर होत असते व वाहनाची संपूर्ण तपासणी तेंव्हा होत असते. तक्रारकर्त्याने वाहन खरेदी केल्यापासुन ते सुरळीत चालले आहे व विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 कडे सर्व्हिसिंगच्या वेळेस ते पूर्ण तपासल्या गेले आहे. तसेच हमीच्या अटी, शर्तीनुसार विरुध्द पक्षाने तशा निःशुल्क सेवा तक्रारकर्त्यास दिल्या आहेत. विरुध्द पक्ष क्र. 1 ची दोन वर्षाची वॉरंटी संपलेली आहे व वाहन हे वाढीव हमी जी विमा कंपनी आणि ग्लोबल अॅडमिनीस्ट्रेशन सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमीटेड यांनी दिली होती, त्या कालावधीत आहे. त्यामुळे यात विरुध्द पक्ष क्र. 1 चा संबंध नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 हे विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांनी केलेल्या स्वतंत्र कृतीस जबाबदार नाही. वाहनात उत्पादकीय दोष नाही, तसेच तक्रारीत क्लिष्ट मुद्दे आहेत. त्यामुळे तक्रार दिवाणी न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात बसते. विरुध्द पक्ष क्र. 1 च्या वॉरंण्टी अटी, शर्तीनुसार वॉरंण्टीचा लाभ हा वाहन विकल्यापासून 24 महिन्यांकरिता किंवा गाडीचा प्रवास 75,000 किलोमिटर होईपर्यंत यापैकी जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत होता. तक्रारकर्त्याने स्वतः वाढीव हमी वरील विमा कंपनीकडून प्राप्त करुन घेतली होती व त्यामुळे युनायटेड इन्शुरन्स कंपनीने जबाबारी उचलली होती. दोन्ही प्रकारच्या हमी एकत्रीत होणार नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याच्या विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 कडील फ्री सर्व्हिसिंगच्या तारखा व जॉबकार्ड तसेच त्यामधील मजकूरावर भिस्त ठेवली आहे, त्यानुसार विरुध्द पक्ष क्र. 1 चे म्हणणे असे आहे की, तक्रारकर्त्याने सर्व फ्री सर्व्हिस झाल्यानंतर, प्रथम दिनांक 17/04/2014 रोजी जॉब कार्डमधील नमूद मजकूरानुसार पुअर पिक अप ची तक्रार प्रथम नोंदविली होती. परंतु त्यावर विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 ने सांगितल्यानुसार काम करुन घेण्यास तक्रारकर्त्याने नकार नोंदविला होता. दिनांक 11/02/2015 रोजी जेंव्हा गाडी 21210 किलोमीटर चालली होती, तेंव्हा सदर वाहन विरुध्द पक्ष क्र. 3 कडे पुअर पिक अप प्रॉब्लेम साठी आले होते, विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी पूर्ण तपासणी केल्यावर त्याचा टर्बो चार्जर हा बदली करणे भाग आहे, असे आढळले. विरुध्द पक्ष क्र. 1 ची वॉरंण्टी ही दिनांक 10/12/2014 रोजी लॅप्स झाली होती, तक्रारकर्त्याने वाढीव हमी अंतर्गत वरील विमा कंपनीकडून दुरुस्तीचा मार्ग अवलंबण्याची तयारी दर्शविली म्हणून विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारकर्ते यांची तक्रार युनायटेड इन्शुरन्स कंपनी आणि ग्लोबल अॅडमिनीस्ट्रेशन सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमीटेड कडे, अॅप्रुव्हलसाठी पाठवली व ही बाब सुध्दा तक्रारकर्त्याला कळविली होती की, त्यांनी तक्रारकर्त्याचा दावा असे कारण देवून नाकारला की, तक्रारकर्त्याने 24 महिन्याच्या आत कारमधील कुलंट न बदलविल्यामुळे दावा नामंजूर केला. वरील विमा कंपनीने ऑफर केलेल्या वाढीव हमी बाबत विरुध्द पक्ष क्र.1 व तक्रारकर्ते यांच्यात कोणताही करार झाला नाही, म्हणून तक्रार खारिज करावी.
3) विरुध्द पक्ष क्र. 2 च्या मते –
तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद तारखेला कारची फ्री सर्व्हिसींग विरुध्द पक्ष क्र. 2 कडून केली परंतु गाडी विकत घेतल्यापासून जवळपास दिड वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारची पुअर पिक अप बाबतची तक्रार नव्हती. दिनांक 17/04/2014 ला तक्रारकर्त्याने जेंव्हा गाडी दुरुस्तीकरिता आणली त्यावेळेस पहिल्यांदा पुअर पिक अप बाबत तक्रार नोंदविली होती. म्हणून विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी चेक अप करुन, क्लच प्लेट बदलण्याचा सल्ला दिला होता. परंतू तक्रारकर्त्याने त्यास नकार दिला. दाखल जॉब शिट प्रतीप्रमाणे त्यानंतर सुध्दा तक्रारकर्त्याने गाडी दुरुस्तीस आणली होती व त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याच्या गाडीचे काम करुन दिले होते. तक्रारकर्त्याच्या नोटीसचे ऊत्तर दिले होते. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्याचा गाडी दुरुस्ती हमीबद्दलचा दावा हा तक्रारकर्ता यांनी 24 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा गाडी 20,000 किलोमिटर चालल्यापर्यंत गाडीचे कुलंट न बदलल्यामुळे अटी, शर्तीनुसार हमीकाळात टर्बो चार्जर असेंब्ली बदलून देण्याचा दावा नामंजूर केला. विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी, जेंव्हा जेंव्हा तक्रारकर्त्याची गाडी त्यांच्याकडे आली होती व दिनांक 16/11/2014 रोजी गाडीला 24 महिने झाले होते व गाडी 18380 किलोमीटर चालली होती, त्यावेळेस कुलंट बदलावयास पाहिजे होते किंवा तसा सल्ला देणे भाग होते म्हणून यात विरुध्द पक्ष क्र. 2 चा दोष नाही. जेंव्हा जेंव्हा गाडी विरुध्द पक्ष क्र. 2 कडे आली तेंव्हा तेंव्हा जॉबशिट नुसार सर्व कामे व्यवस्थित करुन दिली. म्हणून विरुध्द पक्ष क्र. 2 विरुध्द केलेली तक्रार खारिज करावी.
4) विरुध्द पक्ष क्र. 3 च्या मते –
दाखल जॉबशिट कार्ड नुसार, विरुध्द पक्ष क्र. 3 कडे तक्रारकर्त्याचे वाहन पहिल्यांदा दिनांक 18/04/2013 रोजी आले होते. तेंव्हा तक्रारकर्त्याची तक्रार नव्हती. त्यानंतरही सदर वाहन तिस–या मोफत सर्व्हिसिंग करता आले होते पण ही तक्रार नव्हती. दिनांक 22/04/2014 रोजी विरुध्द पक्ष क्र. 3 कडे गाडी चाचणी करिता आली होती. त्यावेळेस गाडी चालू न होणे आणि पिकअप कमी असल्याची तक्रार होती. त्यानंतर सुध्दा गाडी चौथ्या मोफत सर्व्हिसिंग करिता आली होती, त्यावेळेस पण ही तक्रार नव्हती. दिनांक 11/02/2015 रोजी जेंव्हा गाडी आली तेंव्हा वरीलप्रमाणे तक्रार होती. म्हणून पाहणी केली असता, गाडीच्या टर्बो चार्जर मध्ये बिघाड दिसला. म्हणून विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी त्वरीत विरुध्द पक्ष क्र. 1 कडे नोंद केली व विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सर्व माहिती काढल्यावर असे लक्षात आले की, तक्रारकर्त्याने कुलंट न टाकल्याने टर्बो चार्जर वॉरंटी मध्ये बदलून देता येणार नाही. ही बाब विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारकर्त्यास कळविली व त्यानंतर दि. 18/06/2015 रोजी तक्रारकर्त्याने पुर्ण रक्कम भरुन टर्बो चार्जर विकत घेतला. यात विरुध्द पक्ष क्र. 3 चा दोष नाही.
5) अशाप्रकारे उभय पक्षांचे म्हणणे व दाखल वाहनाचे जॉबकार्ड इ. दस्त मंचाने तपासले तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेले सर्व दस्त मंचाने तपासले. यावरुन मंचाचे असे मत आहे की, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना या बाबी मान्य आहेत की, तक्रारकर्त्याने त्याचे वाहन जे विरुध्द पक्ष क्र. 1 निर्मीत होते ते दिनांक 16/11/2012 रोजी विरुध्द पक्ष क्र. 2 कडून दाखल बिलानुसार रक्कम भरुन विकत घेतले होते व वाहनाच्या चार फ्री सर्व्हिसिंग तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 जे विरुध्द पक्ष क्र. 1 चे डीलर आहेत, त्यांचेकडे केल्या. अशा परिस्थितीत तक्रारकर्ते हे विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 चे ग्राहक आहेत, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना ही बाब कबूल आहे की, विरुध्द पक्ष क्र. 1 हे वाहन निर्माते आहे व विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 हे विरुध्द पक्ष क्र. 1 चे अधिकृत विक्रेते व अधिकृत सर्व्हिस सेंटर आहेत. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर वाहनाची हमी वाहन खरेदी केल्यापासून 24 महिन्यांकरिता किंवा गाडीचा प्रवास 75000 किलोमिटर होईपर्यंत, यापैकी जे आधी पूर्ण होईल, तोपर्यंत दिली होती. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्त क्र.6, वाढीव हमीकरिता भरलेल्या पैशांची पावती, यावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्त्याने सदर वाहनाची वाढीव हमी पॉलिसी ही विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी दिलेल्या वरील 24 महिन्यांच्या हमी व्यतिरीक्त, त्याबाबतचा प्रपोजल फॉर्म हा विरुध्द पक्ष क्र. 2 कडे रक्कम रुपये 5,800/- विमा राशी भरुन दिनांक 10/12/2012 रोजी विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 तर्फे विरुध्द पक्ष क्र. 1 कडून काढलेली होती व ही हमी, गाडी खरेदी केल्यापासून 24 महिन्यांच्या हमी व्यतिरीक्त अधिक 24 महिन्यांकरिता किंवा गाडीचा प्रवास 1,50,000 किलोमिटर होईपर्यंत होती. सदर दस्तावरुन असाही बोध होतो की, सदर वाढीव हमी पॉलिसी दावा प्राप्त करणेसाठी, विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांनाच सदर दावा हा सादर करणे होता. म्हणून विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी या पॉलिसी बाबत जे जे आक्षेप घेतले ते त्यांनी योग्य तो कागदोपत्री पुरावा दाखल न केल्यामुळे विचारात घेतले नाही. कारण रेकॉर्डवर हया वाढीव हमी पॉलिसीबद्दल फक्त प्रपोजल फॉर्म हा दस्त दाखल आहे. युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी लिमीटेड व ग्लोबल अॅडमिनीस्ट्रेशन सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमीटेड यांनी ही पॉलिसी दिली व तक्रारकर्त्याचा त्यांच्याशी करार झाला आहे, या बाबी विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सिध्द केलेल्या नाही. दाखल जॉबशिट – वर्कशॉप प्रतीवरुन असा बोध होतो की, तक्रारकर्त्याच्या गाडीतील पुअर पीक अप फॉल्ट ज्यामुळे गाडीतील टर्बो चार्जर अॅसे हा पार्ट खराब झाला, हा वाढीव हमी कालावधीतच निर्माण झालेला दोष आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांनी, त्याबद्दल योग्य ती कार्यवाही विरुध्द पक्ष क्र. 1 च्या मदतीने करणे भाग होती. पण सतत गाडी विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 च्या सर्व्हिस सेंटरला येवुनही, ही बाब त्यांनी दूर्लक्षीत केली आहे, असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने वरील पार्ट फ्री मध्ये बदलुन देण्याकरिता केलेला विमा दावा विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेतर्फे असे कारण देवून नाकारण्यात आला की, तक्रारकर्त्याने कारमधील कुलंट 24 महिन्याच्या आत न बदलल्यामुळे दावा नाकारण्यात येतो. परंतु दाखल मॅन्युअल पुस्तकावरुन असे दिसते की, कारमधील कुलंट बदलण्याची मर्यादा 60,000 किलोमिटर पर्यंत आहे व दाखल जॉब कार्ड प्रतीवरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याच्या वाहनाचा प्रवास हा सदर दोष निघतेवेळी 60,000 किलोमिटरच्या आतच होता, शिवाय कुलंट वगैरे चेक करणे या बाबी विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 च्या कर्तव्याशी निगडीत आहे. ग्राहकाला स्वतःहून या बाबी समजत नसतात, त्या फ्रि सर्व्हिंसिंगच्या वेळीच सर्व्हीस सेंटरवाल्यांनी काळजीपूर्वक पाहावयाच्या असतात. त्यामुळे दावा नाकारणारे कारण बेकायदेशीर व शोधुन काढलेली पळवाट आहे, असे मंचाचे मत आहे. म्हणून विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांची सेवा न्युनता सिध्द झाल्यामुळे, तक्रारकर्ते यांची तक्रार, प्रार्थनेनुसार अंशतः विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 विरुध्द, खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करुन मंजूर केली.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्र. 1ते 3 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळेपणे तक्रारकर्त्यास दिनांक 20/06/2015 रोजीच्या बिलानुसार रक्कम रुपये 41,742/- ( रुपये एकेचाळीस हजार सातशे बेचाळीस फक्त ) दरसाल, दरशेकडा 10 % व्याजदराने दिनांक 20/06/2015 पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत व्याजासहीत द्यावी तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई व प्रकरणाच्या न्यायिक खर्चापोटी रक्कम रुपये 8,000/- (रुपये आठ हजार फक्त) दयावी.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निःशुल्क पुरवाव्या.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri