(घोषित दि. 23.02.2012 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की,
तक्रारदारांनी गैरअर्जदार 1 यांनी उत्पादीत केलेले टाटा इंडिगो हे वाहन खरेदी केले असून सदर वाहनाचा टॅक्सी परवाना घेतला आहे. तक्रारदारांच्या गाडीचे दिनांक 06.06.2010 रोजी पुण्याकडे जात असताना नगर जवळ केंडगाव येथे झालेल्या अपघातात बरेच नुकसान झाले. सदर अपघाता बाबतची माहिती गैरअर्जदार 2 यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनूसार तक्रारदारांनी क्रेनच्या सहाय्याने वाहन गैरअर्जदार 3 यांचेकडे दूरुस्तीसाठी दिले.
तक्रारदारांच्या अपघातग्रस्त वाहनाची पाहणी विमा कंपनीचे अधिकारी, सर्वेअर व गैरअर्जदार यांच्या अभियंतानी केल्यानंतर दूरुस्ती खर्चाचे अंदाजपत्रक रुपये 2,70,000/- देण्यात आले. तक्रारदारांचा विमा दावा रक्कम रुपये 2,00,000/- चा मंजूर झालेला होता. तक्रारदारांना वाहनाच्या पाहणी करीता हजर राहण्याची सूचना दिलेली नव्हती. वाहनाच्या दूरुस्तीचे अंदाजपत्रकाबाबत तक्रारदारांची संमती घेतली नव्हती. तक्रारदार रक्कम रुपये 76,000/- देण्यास तयार असल्यामुळे त्यापैकी एकूण रक्कम रुपये 50,000/- गैरअर्जदार यांचेकडे जमा केले.
विमा कंपनीच्या सर्वेअर यांनी तक्रारदारांच्या गाडीचे सूटे भाग बदलण्याकरीता विमा दावा रक्कम रुपये 2,00,000/- चा मंजूर केला होता. सर्वेअर यांच्या पाहणीनूसार गाडीचे सूटे पार्ट न बदलता गैरअर्जदार यांनी दूसरेच सुटे भाग बदलले असल्यामूळे विमा कंपनीने फक्त रुपये 1,50,000/- चा दावा मंजूर करता येईल असे कळविले.
तक्रारदारांचे वाहन 14 महीन्यापासून गैरअर्जदार यांच्या ताब्यात आहे. तक्रारदारांचा चरितार्थ सदर वाहनावर अवलंबून असून 14 महीन्याचे वाहन कर्जाच्या परतफेडीचे हप्ते तक्रारदारांना भरणा करावे लागत आहे. त्यामुळे तक्रारदारांना आर्थिक मानसिक त्रास होत आहे.
सदर प्रकरणात गैरअजदार 1 हजर झालेले असून लेखी म्हणणे दिनांक 21.02.2012 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार 1 यांच्या लेखी म्हणण्यानूसार गैरअर्जदार हे सदर वाहनाची उत्पादक कंपनी आहे. गैरअर्जदार 1 यांचा तक्रारदारांच्या विमा दाव्याबाबत तसेच अपघातग्रस्त वाहनाच्या दूरुस्ती बाबत कोणताही संबंध नाही. गैरअर्जदार हे सदर प्रकरणात आवश्यक पक्षकार नाहीत.
सदर प्रकरणात गैरअर्जदार 2 व 3 हजर झालेले असून लेखी म्हणणे दिनांक 27.01.2012 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार 2 यांच्या लेखी म्हणण्यानूसार गैरअर्जदार 2 व 3 हे गैरअर्जदार 1 यांचे वितरक आहेत. गैरअर्जदार यांनी अपघातग्रस्त वाहन जालना येथे दूरुस्तीसाठी आणण्याबाबत सूचना दिलेली नाही. तक्रारदारांनी वाहन दूरुस्तीच्या अडव्हांसपोटी गैरअर्जदार यांचेकडे रक्कम जमा केली आहे.
तक्रारदारांच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर सदर वाहन दूरुस्तीसाठी गैरअर्जदार यांचेकडे आणले असून विमा कंपनीच्या सर्व्हेअर यांना वाहनाच्या नूकसानीबाबत माहीती दिल्यानंतर तसेच वाहन दूरुस्तीची संमती दिल्यानंतर गैरअर्जदार यांनी वाहनाची दूरुस्ती केली. तक्रारदारांनी वाहन दूरुस्तीपोटी रक्कम रुपये 50,000/- गैरअर्जदार यांचेकडे जमा केले असून दुरुस्ती, स्पेअरपार्ट, लेबर चार्जेस वगैरे मिळूण एकूण रक्कम रुपये 3,61,112/- तसेच पार्कींग चार्जेस रुपये 36,000/- बाकी आहे. तक्रारदार सदरची रक्कम जमा न करता गैरअर्जदार यांच्या कर्मचा-यांशी भांडन करुन धमक्या देत आहेत.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. गैरअर्जदार 1, 2 व 3 यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री. विपुल देशपांडे व गैरअर्जदार 1 यांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार व गैरअर्जदार 2 व 3 यांचे विद्वान वकील श्री. संदीप माचवे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांच्या इंडिगो कार एम.एच. 21 – 3911 वाहनाचा दिनांक 06.06.2010 रोजी अपघात झाला. सदर अपघातग्रस्त वाहन दूरुस्त करण्यासाठी गैरअर्जदार 3 यांचेकडे दिले. सदर वाहनाची पाहणी विमा कंपनीच्या सर्वेअर व अभियंता यांनी केली. सदर पाहणी बाबतची माहीती तक्रारदारांच्या गैरहजेरीत सूचना न देता केली. सर्वेअर यांच्या पाहणीनूसार (Estimated Cost) अंदाजपत्रक रक्कम रुपये 2,76,000/- असून त्यापैकी रक्कम रुपये 2,00,000/- विमा दावा कंपनीने देण्याचे मान्य केले. तक्रारदारांनी फरकाची रक्कम रुपये 76,000/- पैकी रुपये 50,000/- चा भरणा गैरअर्जदार यांचेकडे जमा केला. गैरअर्जदार 3 यांनी 14 महिने तक्रारदारांचे वाहन ताब्यात ठेवले असून दूरुस्तीची बिले दिली नाहीत, पाकींग चार्जेसची आकारणी केली. तसेच सर्वेअर यांच्या पाहणीनूसार वाहनाचे सुटे भाग बदलले नसून दूसरे सुटे भाग गैरअर्जदार 3 यांनी बदलले अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार 1 यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांच्या वाहनाची गैरअर्जदार 1 उत्पादीत कंपनी असून विमा कंपनीचा, अपघातग्रस्त वाहनाच्या दूरुस्तीबाबत संबंधित नाही. गैरअर्जदार 1 सदर प्रकरणात आवश्यक पार्टी (Necessary Party) नाही.
गैरअर्जदार 2 यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी वाहन दूरुस्ती पोटी रक्कम रुपये 50,000/- जमा केले आहेत. दूरुस्ती, स्पेअर पार्ट, लेबर चार्जेस वगैरे एकूण रक्कम रुपये 3,61,112/- तसेच पार्कीग चार्जेस रुपये 36,000/- येणे बाकी आहे. तक्रारदारांनी सदरची रक्कम जमा केलेली नसल्यामूळे वाहन ताब्यात दिलेले नाही.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.विपुल देशपांडे यांनी युक्तीवादात नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांना गैरअर्जदार 3 यांनी वाहन दूरुस्तीची बिले दिली नाहीत. त्यामुळे सदरची बिले विमा कंपनीला दाखल करता आली नाहीत. या कारणास्तव विमा कंपनीने विमा दाव्याची रक्कम तक्रारदारांना दिली नाही. गैरअर्जदार 3 यांनी वाहन दूरुस्तीची बिले देण्यास विलंब केल्यामुळे तक्रारदारांचे वाहन दूरुस्तीची रक्कम भरणे शक्य झाले नाही. वाहन ताब्यात न मिळाल्यामूळे आर्थिक नूकसान झाले. सदरचे वाहनावर तक्रारदारांचा चरितार्थ अवलंबून आहे. तसेच 14 महीन्याचे वाहन कर्जाचे परतफेडीची रक्कम भरणा करावी लागत आहे.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेले तक्रारदारांच्या गाडीचे टॅक्स इनव्हाईसचे अवलोकन केले असता रक्कम रुपये 2,35,696/- ची दूरुस्तीचे बिल दिल्याचे दिसून येते. तक्रारदारांना दिनांक 21.02.2012 रोजी गैरअर्जदार 3 यांनी सदर बिल दिल्याचे बिलावरील तक्रारदारांच्या सही वरुन स्पष्ट होते. तक्रारदारांनी गाडी दूरुस्तीची रक्कम दिली नाही. त्यामुळे गैरअर्जदार 3 यांनी सदर गाडी ताब्यात ठेवली. गैरअर्जदार 3 यांची सदरची कृती सेवेतील त्रुटी नाही. परंतू गैरअर्जदार 3 यांनी वाहन दूरुस्तीची बिले देण्यास विलंब केल्यामूळे सदरची बिले विमा कंपनीला देणे शक्य झाले नाही. विमा कंपनीने बिलांच्या अभावी विमा दाव्याची रक्कम अदा केली नाही. तक्रारदारांना गाडी दूरुस्तीचे बिल न देता गैरअर्जदार 3 यांनी सदर गाडी ताब्यात ठेवली.
गैरअर्जदार 3 यांची सदरची कृती सेवेतील त्रुटी असल्याचे न्याय मंचाचे मत आहे. तक्रारदारांना वाहन दूरुस्तीचे बिल न दिल्यामूळे बिलाची रक्कम गैरअर्जदार 3 यांना मिळाली नाही अशा परिस्थितीत गैरअर्जदार 3 यांनी गाडीच्या पार्कींग चार्जेसची आकारणी करणे योग्य नाही असे न्याय मंचाचे मत आहे.
विमा कंपनीच्या सर्वेअर यांनी अपघातग्रस्त गाडीच्या पाहणीनूसार ठरवलेले गाडी दूरुस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रकानूसार गैरअर्जदार यांनी गाडी दूरुस्तीचे काम केले नाही. सदर पाहणीनूसार सर्वेअर यांनी ठरवून दिल्या प्रमाणे गाडीचे सूटे पार्ट न बदलता त्या ऐवजी दूसरे सुटे पार्ट बदलले, गाडी दूरुस्तीचे आवास्तवी बिल दिले अशी तक्रारदारांची तक्रार आहे. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सखोल पुराव्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तक्रारदारांनी या संदर्भात योग्य त्या दिवाणी न्यायालयात दाद मागणे योग्य होईल. असे न्याय मंचाचे मत आहे.
गैरअर्जदार 3 यांनी तक्रारदारांना गाडी दूरुस्तीचे बिल देण्यास विलंब केल्यामूळे तक्रारदारांना गाडीचा वापर करता आला नाही, आर्थिक नूकसान झाले, मानसिक त्रास झाला व सदरची तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे गैरअर्जदार 3 यांनी तक्रारदारांना नूकसान भरपाईची रक्कम रुपये 5,000/- मानसिक त्रास रुपये 2,000/- तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- देणे योग्य होईल. गैरअर्जदार 3 यांना गाडीच्या पार्कींग चार्जेस रक्कम रुपये 36,000/- आकारणी करता येणार नाही असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार 3 यांनी तक्रारदारांना नूकसान भरपाईची रक्कम रुपये 5,000/- मानसिक त्रास रुपये 2,000/- तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- आदेश मिळाल्या पासून 1 महिन्यात द्यावेत. तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी तक्रारदाराकडून पार्कींग चार्जेस बद्दल कोणतीही रक्कम वसुल करु नये.