निकालपत्र :- (दि.07.02.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांनी सामनेवाला वित्तीय कंपनीकडून रक्कम रुपये 2,05,000/- इतके कर्ज घेवून टाटा अस हे चारचाकी वाहन खरेदी केले. सदर वाहन खरेदी करतेवेळेस तक्रारदारांनी रक्कम रुपये 3,000/- स्टॅम्प डयुटी व इतर खर्च सामनेवाला क्र.3 यांचेकडे दिले आहेत. तक्रारदारांनी एकूण 48 हप्त्यांचे चेक दिले होते व संपूर्ण कर्जाची व्याजासह परतफेड रुपये 2,80,400/- इतकी केली आहे. सामनेवाला वित्तीय कंपनीने दि.23.09.2009 रोजी बेकायदेशीरपणे तक्रारदारांच्या खात्यावर रक्कम रुपये 24,132/- इतकी रक्कम दाखविली. याबाबत सामनेवाला कंपनीकडे चौकशी केली असता सामनेवाला कंपनीकडे प्रोव्हिजनची रक्कम शिल्लक असतानाही तक्रारदारांनी भरलेल्या हप्त्यांच्या रक्कमा व्याजात व दंडात वजा करुन दाखलविलेल्या आहेत. गाडीच्या हप्त्याच्य फेडीपोटी खोटी व चुकीची थकबाकी दाखविलेली आहे्. त्याबाबत तक्रारदारांनी वकिलामार्फत नोटीस पाठविली व कर्ज परतफेड झालेबाबत नाहरकत दाखला, वाहनाचे आर.सी.टी.सी.बुक परत करणेबाबत कळविले. त्यानंतरही सामनेवाला यांनी नोटीस पाठवून रक्कम रुपये 13,914/- थकबाकी जमा करावी अथवा वाहन जप्त केले जाईल अशी लेखी सुचना केली. सामनेवाला यांचे कोणतेही कायदेशीर देणे तक्रारदार लागत नाहीत. सबब, तक्रारदारांची तक्रार मंजूर करावी व तक्रारदार हे सामनेवाला यांचे कोणतेही देणे लागत नाही असे आदेश व्हावेत, शारिरीक मानसिक त्रासपोटी रुपये 25,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांचे दि.15.10.2005 रोजीचे पत्र व शेडयुल, खातेउतारा, सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, सामनेवाला यांना दि.23.12.2009 रोजी दिलेले पत्र, सेव्हींग खात्याचा उतारा, सामनेवाला यांनी दि.10.11.2009 व दि.10.12.2009 रोजी पाठविलेली पत्रे, दि.10.12.2009 रोजी सामनेवाला यांनी दिलेला खातेउतारा तसेच पैसे भरलेबाबतच्या पावत्या इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी एकत्रितपणे म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, कर्ज प्रकरणावेळी सदर गाडीकरिता तीन वर्षाचा रुपये 6,000/- दरवर्षी याप्रमाणे रुपये 18,000/- विम्याची रक्कम इन्श्युरन्स प्रोव्हिजन म्हणून कर्जामध्ये समाविष्ठ केली होती. परंतु, प्रत्येक वर्षी रुपये 6,000/- पेक्षा जास्त विमा हप्ता विमा कंपनीकडे भरलेला आहे. सन 2006 ते 2007 साली रुपये 6,824/-, सन 2007-08 साली रुपये 9067/-, सन 2008-09 साली रुपये 8,308/- अशी तीन वर्षांची एकूण रक्कम रुपये 24,199/- एवढी रक्कम विमा कंपनीकडे हप्त्यापोटी भरलेली आहे. रुपये 24,199/- मधून कर्ज प्रकरणवेळेस इन्श्युरन्स प्रोव्हिजनची रक्कम रुपये 18,000/- वजा जाता रुपये 6,199/- इतकी रक्कम विमा कंपनीकडे जादा भरलेली आहे व सदरची रक्कम तक्रारदारांकडून येणे आहे. सबब, आजअखेर कर्जापोटी हप्त्याची व विम्याची रक्कम रुपये 13,914/- व दंडाची रक्कम रुपये 12,471/- अशी एकूण रक्कम रुपये 26,385/- इतकी रक्कम येणेबाकी आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी व सदर रक्कम तक्रारदारांनी भरून एन्.ओ.सी. घेणेचे आदेश व्हावेत. तसेच, कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 50000/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्य म्हणण्याच्या पुष्टयर्थ कर्ज प्रकरण प्रपोजल फॉर्म, करारपत्र व मुखत्यारपत्र, तक्रारदारांना दि.07.08.2008 रोजी दिलेली नोटीस, तक्रारदारांच्या गाडीचे कर्जाचा तपशील दि.27.02.2010, कर्ज परतफेडीचा तपशील, हप्त्यापोटी दिलेले चेक न वटता परत आलेबाबतचा तपशील, वादातीत गाडीच्या विम्याचा तपशील इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकलेला आहे व उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदारांनी तक्रारीत उल्लेख केले प्रमाणे सामनेवाला वित्तीय कंपनीकडून रक्कम रुपये 2,05,000/- इतके कर्ज घेवून चारचाकी वाहन खरेदी केले आहे. उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तसेच सामनेवाला यांचे म्हणण्याचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी कर्ज रक्कमेची संपूर्ण परत फेड केलेचे दिसून येते. तसेच, युक्तिवादाचेवेळेस सामनेवाला यांच्या वकिलांनी सदरची वस्तुस्थिती मान्य केली आहे. परंतु, विमा हप्त्याची रक्कम वाढल्याने वाढलेल्या हप्त्याची रक्कम सामनेवाला यांनी कर्जफेडीच्या हप्त्यापोटी भरणा करुन घेतली आहे असे प्रतिपादन सामनेवाला यांच्या वकिलांनी केले आहे. परंतु, वस्तुस्थितीचा विचार करता याबाबतची कोणतीही कल्पना सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिलेचे दिसून येत नाही. सामनेवाला वित्तीय कंपनीने तक्रारदारांनी दिलेल्या कर्ज हप्त्यातून इतरत्र रक्कम वळती करुन घेणे व त्यानंतर दंडव्याज व इतर चार्जेस लावणे या बाबीवरुन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेचे दिसून येते. विमा हप्ता वित्तीय कंपनीने भरणे हे कराराप्रमाणे अनिवार्य (Mandatory) नाही. तक्रारदारांना त्याबाबत कोणतीही कल्पना न देता तक्रारदारांचे वाहन जप्त करणेबाबत पाठविलेली नोटीस ही सेवेतील त्रुटी आहे. सबब, कर्जाची संपूर्ण परतफेड झालेने सामनेवाला यांनी तक्रारदारांना कर्जफेडीचा नाहरकत दाखला द्यावा व वाहनाचे आर.सी.टी.सी.बुक द्यावे व त्या अनुषंगाने कागदपत्रे द्यावीत. संपूर्ण कर्ज परतफेड झालेने तक्रारदारांना वाहन जप्तीकरिता पाठविलेली नोटीस व त्यामुळे तक्रारदारांना झालेला मानसिक त्रास याबाबतची भरपाई सामनेवाला वित्तीय कंपनीने तक्रारदारांना द्यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला वित्तीय कंपनीने तक्रारदारांना तक्रारीत उल्लेख केलेल्या वाहनाचे कर्ज परतफेडपोटी संपूर्ण कर्ज परतफेड झालेबाबत ना देय प्रमाणपत्र द्यावे. तसेच, सदर वाहनाचे मूळ आर.सी.टी.सी.बुक व अनुषंगाने कागदपत्रे द्यावी. 3. सामनेवाला वित्तीय कंपनीने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवाला वित्तीय कंपनीने तक्रारदारांचा तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |