सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 137/2012.
तक्रार दाखल दि.21-09-2012.
तक्रार निकाली दि.14-10-2015.
आझाद जयसिंग गुजर,
रा.आनेवाडी,मोरघर रोड,
ता.जावली.जि.सातारा. ... तक्रारदार.
विरुध्द
1. टाटा मोटार्स,
पत्ता- बॉम्बे हाऊस,
होमी मोदी रोड, फोर्ट,
मुंबई.
2. हेम मोटर्स प्रा.लि.,
ए-2/ए, जुनी एम.आय.डी.सी.
पुणे बेंगलोर हायवे, सातारा. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.जे.एस.राजेभोसले.
जाबदार क्र. 1 तर्फे – अँड.आर.एम.कुलकर्णी.
जाबदार क्र. 2 तर्फे – अँड.व्ही.डी.निकम.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी असून ते आनेवाडी, मोरघर रोड, ता.जावली, जि.सातारा येथील कायमचे रहिवाशी आहेत. तर जाबदार क्र. 1 ही टाटा कंपनीच्या गाडया बनवणारी कंपनी असून जाबदार क्र. 2 हे जाबदार क्र. 1 ने उत्पादित केलेल्या गाडयांची विक्री करणारे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारदाराने जाबदार क्र. 2 कंपनीच्या नॅनो कार गाडीची जाहीरात बघून दि.18/9/2010 रोजी तक्रारदाराने जाबदार क्र. 2 यांचेकडून नॅनोकार रक्कम रु.1,56,000/- (रुपये एक लाख छपन्न हजार मात्र) या किंमतीस खरेदी केली. प्रस्तुत कार खरेदी करताना तक्रारदाराने जनकल्याण नागरी पतसंस्था या संस्थेचे रक्कम रु.1,35,933/- चे कर्ज 14 टक्के व्याजदराने जनकल्याण नागरी पतसंस्था या संस्थेचे रक्कम रु.1,35,933/- चे कर्ज 14 टक्के व्याजदराने घेतले. प्रस्तुत कारचा रजि.नं.एम.एच.-11 ए.के. 9521 असा आहे. प्रस्तुत कार खरेदी केलेनंतर दि. 16/12/2010 रोजी तक्रारदार हे कुटूंबासमवेत सातारा येथे नातेवाईकांकडे येत असताना सदरची नॅनो कार बंद पडली. ही कार जाबदार क्र. 2 यांनी दुरुस्त करुन दिलेनंतर सतत या कारमध्ये सातत्याने बिघाड होत गेले ब-याच वेळा रात्री अपरात्री रस्त्यावर बिघाड झालेने तक्रारदाराला मोठा मानसीकत्रास सहन करावा लागला. सदरची कारही निकृष्ठ दर्जाची असलेने कारचा सायलेन्सर कार खरेदी केलेनंतर लगेचच रोडवर पडला व खराब झाला. तसेच टायर खराब झालेनंतर टायर बाजारात उपलब्ध नसलेने सदर कार दोन महिने तक्रारदाराचे दारात उभी होती, कारचा फ्यूअल पंप दोनवेळा खराब झाला. तसेच गाडीचे क्लचप्लेट व बेअरिंग अनेकवेळा खराब झाले. गाडी नादुरुस्त अवस्थेत बराच काळ जाबदार क्र. 2 यांचे सर्व्हीस सेंटरला बंद अवस्थेत ठेवण्यात आली त्यामुळे तक्रारदाराला मानसीकत्रास व आर्थिक नुकसान झाले. ब-याच वेळा कारची दुरुस्ती करुनही सदरची कार ही योग्य पध्दतीने चालत नसल्याने व सतत कारमध्ये बिघाड होत असलेने दि.24/4/2012 रोजी कार पूर्णपणे दुरुस्त करुन देणेसाठी दिली असता सदर कारमध्ये Manufacturing defect असलेने ती वरचेवर नादुरुस्त होत असून दुरुस्ती करुनही काहीही उपयोग होत नव्हता हे लक्षात आलेने जाबदाराने प्रस्तुत कार दुरुस्त करण्याचा प्रयत्न देखील केला नाही व प्रस्तुत कार जाबदार क्र. 2 ने तक्रारदार यांना अद्यापपर्यंत परत दिलेली नाही. अशारितीने प्रस्तुत तक्रारदाराचे कारमध्ये निर्मीती दोष Manufacturing defect असलेने वारंवार गाडी दुरुस्त करणे भाग पडत आहे. त्यामुळे सदर कारचा उपभोग तक्रारदार घेऊ शकत नाहीत या वारंवार बिघाडामुळे तक्रारदाराला मानसिकत्रास व आर्थीकत्रास सहन करावा लागला. त्यामुळे गाडी बिघडलेपासून दुसरी गाडी भाडयाने करावी लागत आहे. त्याचा खर्च रक्कम रु.68,000/- झाला आहे. तसेच सदर कारही पूर्णतः निकाली झालेने तिचा योग्य रितीने वापर तक्रारदार करु शकत नाहीत. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदाराला सदर दोषयुक्त गाडीची विक्री केलेली असलेने जाबदार यांचेकडून नुकसानभरपाई मिळणेसाठी प्रस्तुत तक्रारअर्ज या मे मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तीकरित्या रक्कम रु.2,83,067/- (रुपये दोन लाख त्रयाऐंशी हजार सदुसष्ट मात्र) तक्रार दाखल तारखेपासून 18 टक्के व्याजदराने मिळावेत अशी विनंती केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि.5/21 कडे अनुक्रमे जाबदाराला पाठवलेली नोटीस, नोटीस जाबदारांना मिळालेची पोहोचपावती, जाबदार क्र. 2 यांचेकडून आलेली पत्र, दुरुस्ती बिले, नि. 27 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 36 अ सोबत नि. 36/1 कडे तज्ञांचे म्हणणे, नि. 36/3 कडे वादातीत कारचे फोटो, नि.28 व 29 कडे तक्रारदारतर्फे साक्षीदारांचे अँफीडेव्हीट, नि. 37 कडे तज्ञांचे अँफीडेव्हीट,. 39 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडून रक्कम रु.43,000/- (रुपये त्रेच्याळीस हजार मात्र) मोबाईलची किंमत, नुकसानभरपाई व मानसीकत्रास याबाबत मिळावेत अशी विनंती केली आहे.
4. जाबदार क्र. 1 ने नि. 18 कडे म्हणणे नाही आदेश रद्द होणेसाठी अर्ज, नि.19 कडे म्हणणे, नि.19/1 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट,नि. 20 चे कागदयादीने नि. 20/1 ते नि.20/18 कडे अनुक्रमे पॉवर ऑफ अँटोर्नी, वॉरंटी व नि.20/3 ते नि.20/18 कडे जॉबकार्ड नि.30 कडे म्हणणे व त्यासोबतचे अँफीडेव्हट हाच पुरावा समजणेत यावा म्हणून पुरसीस, नि. 33 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.41 कडे लेखी युक्तीवाद, तर जाबदार क्र. 2 ने नि. 16 कडे कैफीयत/म्हणणे, नि. 16/1 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 17 चे कगदयादीसोबत नि. 17/1 कडे टॅक्स इनव्हाईस, नि. 17/2 कडे सर्व्हीस मेटेनन्स शेडयुल, नि. 31 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 38 कडे तज्ञांच्या अहवालावर जाबदार क्र. 2 ने दिलेले म्हणणे, नि.42 कडे प्रस्तुत कामी जामबदार क्र. 2 ने दाखल केलेले म्हणणे, पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे हाच लेखी युक्तीवाद समजणेत यावा म्हणून पुरसीस, वगैरे कागदपत्रे जाबदार क्र. 1 व 2 यांनी याकामी दाखल केली आहे.
प्रस्तुत जाबदार क्र. 1 व 2 ने खालीलप्रमाणे आक्षेप नोदवले आहेत. तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने जाबदार यांनी फेटाळलेली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे ग्राहक या संज्ञेत येत नाही. कारण तक्रारदाराने प्रस्तुतचे वाहन टाटा नॅनो कार ही व्यापारी कारणासाठी जादा नफा मिळविण्यासाठी खरेदी केली असलेने तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत. कारण प्रस्तुत कारचा वापर तक्रारदार हे व्यापारी कारणाकरीता करत आहेत. तक्रारदाराने प्रस्तुत कारमध्ये निर्मीती दोष होता हे दाखवण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा या मे. मंचात दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने केलेली तक्रार ही मोघम स्वरुपाची असून ती फेटाळणेस पात्र आहे. तक्रारदाराने दि. 18/9/2010 रोजी कार खरेदी केली आणि दि. 22/4/2012 पर्यंत प्रस्तुत नॅनो कारचे रनिंग 58160 कि.मी. झालेले आहे. म्हणजेच 19 महिन्यात सदर कार दरमहा सरासरी 3,000/- कि.मी धावली असलेचे स्पष्ट होते. याचा अर्थ प्रस्तुत कारमये कोणतेही निर्मीती दोष नाहीत. त्यामुळे तक्रारदाराने नवीन वाहन जाबदारकडून परत मिळणेची केलेली विनंती फेटाठणेस पात्र आहे. तक्रारदाराने कमी वेळात सदरची कार प्रमाणापेक्षा जास्त चालवल्याने सदर दोष प्रस्तुत कारमध्ये उत्पन्न झालेले आहेत. त्यामुळे प्रस्तुत दोषासाठी नुकसानभरपाई देणेस प्रस्तुत जाबदार हे जबाबदार नाहीत. तेच तक्रारदाराने प्रस्तुत कारचे सर्व्हीसींग वेळच्या वेळी करु घेणे बंधनकारक असतानाही तक्रारदाराने वेळच्यावेळी सर्व्हीसींग केलेले नाही. व एअर पिफल्टर वेळच्या वेळी बदलून घेतलेले नाहीत. सर्व्हीस बुक मध्ये नोंद केलेप्रमाणे तक्रारदाराने वेळच्यावेळी वादातीत कारचे सर्व्हीसींग व इतर कामे करुन घेतली नाहीत. जी तक्रारदाराने वेळच्यावेळी करणे बंधनकारक असते. तसेच तक्रारदाराने जाबदार यांनी दिले मार्गदर्शक तत्वांचे काळजीपूर्वक पालन केलेले नाही जी मार्गदर्शक तत्वे वाहनाच्या व्यवस्थीत व स्मूथ रनिंगसाठी आवश्यक आहेत. वाहनाचा अँबनॉर्मल वापर केला तर त्याचे वॉरंटीला काहीच किंमत नाही व नसते. तक्रारदाराने जाबदाराने दिलेली मार्गदर्शक तत्वे पाळलेली नाहीत व गाडीचा वापर निष्काळजीपणाने, हयगयीने केलेला आहे. त्यामुळे गाडीतील सदर दोषांना जाबदार हे जबाबदार नाहीत. तक्रारदाराने कर्ज घेतलेल्या जनकल्याण नागरी पतसंस्थेत सदर कामी पार्टी केले नाही. त्यामुळे सदर कामी मिसजॉईंडर ऑफ पार्टीची बाधा येते. तक्रारदाराने प्रस्तुत कामी कोणताही तज्ञांचा दाखला/अहवाल मे मंचात दाखल केलेली नाही. त्यामुळे तक्रार अर्ज हा चालणेस पात्र नाही. फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदार क्र. 1 ने दिले आहे.
जाबदार क्र. 2 ने पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवले आहेत. तक्रार अर्जातील मजकूर मान्य व कबूल नाही. जाबदार क्र. 2 ने तक्रारदार यांना वेळोवेळी विक्री पश्चात सेवा दिलेली नाही. प्रस्तुत वाहनात कोणताही उत्पादन दोष नाही. ज्याज्यावेळी तक्रारदाराने वाहन जाबदार क्र. 2 कडे सर्व्हींसींगला दिले त्यात्यावेळी जाबदार क्र. 2 ने वाहनाचे सर्व्हीसींग तक्रारदाराचे सूचनेप्रमाणे करुन दिले होते व आहे व त्याचवेळी सदर वाहनात जाबदार क्र. 2 ला कोणताही उत्पादन दोष आढळून आलेला नाही किंवा वाहनात काही दोष असलेबाबतची तक्रार तक्रारदाराने जाबदारांकडे कधीही केलेली नाही. तथाकथीत दोषासाठी तक्रारदाराने कोणत्याही तज्ञ व्यक्तींचा पुरावा याकामी तक्रारदाराने दाखल केला नाही. त्यामुळे तक्रार अर्ज फेटाळणेस पात्र आहे. प्रस्तुत वाहनात कोणाताही उत्पादन दोष आहे असे मानल्यास सदर वाहन बदलून देण्याची जबाबदारी या जाबदार क्र. 2 ची नाही. सदर तक्रार अर्ज मुदतीत दाखल नाही. त्यामुळे फेटाळणेस पात्र आहे. तक्रारदाराचे निष्काळजीपणामुळे सदर वाहनाचा अपघात मे, 2011 मध्ये झालेने प्रस्तुत वाहन तक्रारदाराने दुरुस्तीसाठी जाबदार क्र. 2 कडे दि.27/5/2011 रोजी जमा केले होते. त्यावेळी वाहनाची मेकॅनिकल दुरुस्ती व कलर करुन तक्रारदाराला दिले होते. तेव्हापासूनच तक्रारदाराचे प्रस्तुत वाहन वापरणेची इच्छा नव्हती व त्यानंतरही वाहनाचा निष्काळजीपणे वापर केलेने, वाहनात काही दोष निर्माण झालेने दुरुस्तीसाठी जाबदार क्र. 2 कडे तक्रारदाराने सन 2012 ला दिले. सदर दोष जाबदाराने वाहनाचे योग्यरितीने सर्व्हीसींग करुन बीलाची रक्कम जाबदाराला अदा करावी व वाहन घेवून जावे असे तक्रारदाराला जाबदार क्र. 2 ने वेळोवेळी तोंदी सांगीतले. मात्र सदर खर्चाची रक्कम बुडविणेचे हेतूने तक्रारदार यांनी खोटया मजकूराची नोटीस सदर जाबदाराला पाठवली व खोटी केस/तक्रार अर्ज दाखल केला आहे. तो खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदार क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेले आहे.
5. प्रस्तुत कामी वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. तक्रारदार यांचे मागणीप्रमाणे जाबदार यांचेकडून रक्कम
मिळणेस पात्र आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदाराने जाबदार क्र.1 कंपनीची टाटा नॅनो कार ही जाबदार क्र. 2 यांचेकडून दि.18/9/2010 रोजी खरेदी केली आहे. ही बाब जाबदार यांनी मान्य केली आहे. सबब तक्रारदार हे जाबदार क्र. 1 व 2 चे ग्राहक आहेत हे निर्विवाद स्पष्ट होत आहे. तसेच प्रस्तुत तक्रारदाराची कार रजि.नं. एम.एच.-11-ए.के.9521 ही दि.16/12/2010 रोजी तक्रारदार हे त्यांचे कुटूंबियांसह नातेवाईकांकडे सातारला येत असता बंद पडली. त्यामुळे कार जाबदार क्र. 2 कडे दुरुस्तीसाठी दिली त्यानंतर सातत्याने व वारंवार सदरचे नॅनो कारमध्ये बिघाड झाल्याने प्रस्तुत नॅनोकार ही वारंवार जाबदार क्र. 2 यांचेकडे दुरुस्तीस दिलेचे तक्रारदाराने नि. 25 चे कागदयादीसोबत दाखल केले नि. 25/1 ते नि. 25/16 कडील मूळ बीलांवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे तक्रारदाराला गाडीची दुरुस्ती व होणारा खर्च यामुळे अत्यंत मानसीक त्रास व आर्थिक त्रास झालेला आहे. त्यानंतर प्रस्तुत कारमधील बिघाड पूर्णपणे काढून अगर दुरुस्त होऊन मिळणेसाठी सदरची कार पुन्हा पूर्णपणे दुरुस्त होऊन मिळणेसाठी पुन्हा जाबदार क्र. 2 यांचेकडे सोडली. परंतू प्रस्तुत कारमध्ये उत्पादन दोष असलेने जाबदार क्र. 2 ने पुन्हापुन्हा सदर कार दुरुस्त करण्याऐवजी प्रस्तुत गाडीतील बरेचसे पार्ट काढलेचे व गाडी नादुरुस्त अवस्थेत असलेचे तक्रारदाराने नि. 36/2 कडील तज्ञ व्यक्तीचे अहवालावरुन व अहवालासोबत दाखल गाडींचे फोटोंवरुन व तज्ञांचे अँफीडेव्हीटवरुन (नि.37)स्पष्ट होत आहे. त्यामुळे जाबदार क्र. 2 ने सदरची गाडीची सर्व्हीस दिली नाही असे तक्रारदाराने कुठेही म्हटलेले नाही. गाडीमध्ये उत्पादन दोष असलेने गाडीत वारंवार बिघाड निमाग्ण होत असलेचे म्हटले आहे. कार खरेदी केलेनंतर अगदी कमी कालावधीतच म्हणजे पहिल्या तीन महिन्यापासूनच गाडीत बिघाड होऊ लागले व गाडी सातत्याने दुरुस्तीसाठी जाबदार क्र. 2 कडे नेणे भाग पडलेले आहे. म्हणजेच प्रस्तुत कारमध्ये उत्पादन दोष (Manufacturing Defect) आहे व होता असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे जाबदार क्र. 1 ने उत्पादन दोष असलेली कार निर्मीती करुन तसेच जाबदार क्र. 2 ने प्रस्तुत कारमधील दोष काढून दुरुस्त देणे हे जाबदार क्र. 2 चे काम व जबाबदारी होती. परंतू जाबदार क्र. 2 नेही प्रस्तुत कार पूर्णपणे दोषमुक्त करुन/व्यवस्थीत दुरुस्त करुन Good Condition मध्ये करुन दिलेली नाही. अद्यापही प्रस्तुत कार जाबदार क्र. 2 चे ताब्यातच आहे. सबब जाबदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराला अनुचीत व्यापारी व्यवस्थेचा अवलंब करुन सेवा देण्यात त्रुटी/कमतरता केली आहे हे दाखल पुराव्यावरुन, कागदपत्रांवरुन व युक्तीवादावरुन स्पष्ट व सिध्द होत आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुत कामी नि. 25 सोबतची दाखल बीले व इतर सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदाराची गाडीचा तज्ञांकडून तपासणी करुन दाखल केलेला रिपोर्ट, तज्ञांचे अँफीडेव्हीट, दाखल बीले वगैरेचे काळजीपूर्वक अवलोकन करता, तक्रारदाराचे प्रस्तुत टाटा नॅनोकार रजि. नं. एम.एच.-11 ए.के. 9531 मध्ये उत्पादन दोष असल्यामुळेच ती खरेदी केलेपासून तीन महीन्यातच वारंवार नादुरुस्त होत होती असे स्पष्ट होते. प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी गाडीचे कर्जाचे व्याज रक्कम रु.35,000/- भरलेबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. तसेच गाडी नादुरुस्त असले कालावधीत भाडयाने गाडी घेतली त्यासाठी रक्कम रु.68,000/- खर्च आला, यासाठीही कोणताही पुरावा मे. मंचात दाखल केलेला नाही. गाडी वापर करताना रोड टॅक्स व इनर टॅक्स हे बंधनकारक असलेने ते मागता येणार नाहीत. मात्र तक्रारदार हे जाबदार यांचेकडून सदर नॅनो कारची किंमत रक्कम रु.1,35,000/- (रुपये एक लाख पस्तीस हजार मात्र) व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- तसेच अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- अशी एकूण रक्कम रु 1,55,000/- (रुपये एक लाख पंचावन्न हजार मात्र) जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तीकपणे मिळणेस पात्र आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रक्कम
नॅनो गाडीची/कारची किंमत रक्कम रु.1,35,000/- (रुपये एक लाख पस्तीस
हजार फक्त) अदा करावे. प्रस्तुत रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून
द.सा.द.शे.9 टक्के व्याज जाबदार क्र. 1 व 2 ने तक्रारदाराला अदा करावेत.
3. जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना
मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- (रुपये पंधरा हजार फक्त)
अदा करावे.
4. जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना
तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त)
अदा करावेत.
5. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45
दिवसात करावी.
6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
8. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 14-10-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (सौ.सविता भोसले)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.