(आदेश पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या) -/// आ दे श ///- (पारीत दिनांक – 08 जुलै, 2011) तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदाराचे म्हणण्यानुसार गैरअर्जदार नं.1 ही कंपनी असून ते वाहन विक्री व वित्तीय सहाय्य करतात आणि गैरअर्जदार नं.2 हे त्यांचे एजंट आहेत. गैरअर्जदाराने माहे जानेवारी—फेब्रुवारी 2009 मध्ये जप्त केलेल्या वाहनांच्या विक्रीसंदर्भात जाहिरात दिली. सदर जाहिरातीचे अनुषंगाने तक्रारदाराने खाजगी व्यवसाय सुरु करण्याचे दृष्टीकोनातून जाहिरातीमधील एक वाहन टाटा सुमो विक्टा ईएक्स, नोंदणी क्रमांक एमएच—40/ए—3929 हे रुपये 3,08,750/- एवढ्या मोबदल्यात गैरअर्जदार नं.2 यांचेकडून खरेदी केले. त्यापैकी बुकींग अमाऊंटपोटी रुपये 25,000/- दिनांक 14/2/2009 रोजी तसेच उर्वरित रक्कम रुपये 2,83,750/- दिनांक 16/2/09 रोजी गैरअर्जदार नं.2 यांचेकडे जमा केली. गैरअर्जदाराने सदर वाहनाचा ताबा तक्रारदार यांना दिला. तक्रारदाराने सदर वाहनाचा ताबा मिळाल्यानंतर त्याची योग्य ती दुरुस्ती करुन त्यात सुधारणा केली. त्यांनी सदर वाहनामध्ये नवीन संगीत संच व बॅटरी बसविली, त्यापोटी तक्रारदारास रुपये 80,000/- एवढा खर्च आला. गैरअर्जदाराने सदर वाहनासंबंधिची कागदपत्रे जसे आरटीओची कागदपत्रे व एनओसी त्यावेळी उपलब्ध नसल्यामुळे सदर कागदपत्रात 40 ते 45 दिवसांत तक्रारदारास सुपूर्द करण्याचे आश्वासन दिले. तसेच गैरअर्जदाराने तक्रारदाराचे नावे प्रमाणपत्र सुध्दा दिले. त्यानंतर तक्रारदाराने वारंवार फोनद्वारे, लेखी तसेच प्रत्यक्ष भेटून वारंवार मागणी करुनही सदर वाहनाची कागदपत्रे तक्रारदारास दिली नाही. तक्रारदाराने प्रादेशिक परीवहन कार्यालय नागपूर (ग्रामीण) येथे एमएच—40/ए—3929 या वाहनाच्या नोंदणीचा तपशिल काढला असता, सदर नोंदणी तपशिलाप्रमाणे वरील क्रमांकाचे वाहन हे टाटा सुमो नसून ते एलएमव्ही ट्रेलर असल्याचे व सदर वाहनाचे मालक मारोती पुरुषोत्तम वाघ, रा. गुंमठाळा, ता. कामठी, जि. नागपूर असल्याचे निदर्शनास आले. गैरअर्जदाराने सदर वाहनासंबंधी खोटे व चूकीचे कागदपत्रे दाखवून तक्रारदाराकडून सदर रक्कम अवैधरित्या प्राप्त केली व अश्वासनाप्रमाणे वाहनासंबंधिची कागदपत्रे उपलब्ध करुन दिली नाही ही गैरअर्जदार यांची कृती सेवेतील कमतरता आहे, त्यामुळे तक्रारदारास आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला, तसेच सदर वाहनापासून मिळणा-या उत्पन्नापासून तक्रारदारास वंचित रहावे लागले. तसेच रुपये 7,88,512/- 12% व्याजासह मिळावी, मानसिक व शारीरिक त्रासासाठी रुपये 1 लक्ष आणि दाव्याचे खर्चाबाबत रुपये 20,000/- मिळावेत व इतर खर्च मिळावा म्हणुन सदरची तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने सदरची तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत आरटीओला दिलेल्या पत्राची प्रत, सौदा रकमेची पावत्या, गैरअर्जदार नं.2 व तक्रारदार योंचतील पत्रव्यवहाराच्या प्रती, नोटीस, पोस्टाची पावती व पोचपावती, वाहनाचा नोंदणी तपशिल इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार नं.1 सतत गैरहजर असल्यामुळे त्यांचेविरुध्द प्रकरण विनाजबाबाने चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. पुढे सदर प्रकरण निकालासाठी राखीव ठेवण्यात आल्यानंतर गैरअर्जदार नं.1 उपस्थित झाले व प्रकरण खारीज करण्यात यावे असा आक्षेपअर्ज दाखल केला. गैरअर्जदार नं.1 यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. गैरअर्जदार नं.2 यांचे कथनानुसार सदर वादग्रस्त वाहन हे टाटा मोटर्सचे वाहन असून गैरअर्जदार नं.2 हे त्यांचे एजंट आहेत. कुठलेही वाहन विक्री करावयाचे असल्यास गैरअर्जदार नं.2 यांना त्यासंबंधी सूचना देतो. गैरअर्जदार नं.2 यांना वाहन विकण्याचे अधिकार असल्यामुळे ते केवळ ग्राहकांशी संपर्क साधून वाहन विक्रीसंदर्भात कारवाई करु शकतात, पांतू कुठल्याही वाहनाची मुळ कागदपत्रे ही गैरअर्जदार नं.1 कडेच उपलब्ध असतात. वाहन विक्रीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गैरअर्जदार नं.2 हे गैरअर्जदार नं.1 यांना वाहन विक्रीची सूचना देऊन विक्री झालेल्या वाहनाची मुळ कागदपत्रे ग्राहकास देण्यासाठी मागवितात. त्याप्रमाणे गैरअर्जदार नं.2 यांनी सदर वाहनाची तक्रारदारास विक्री केल्यावर गैरअर्जदार नं.1 यांना विक्रीची सूचना देऊन मुळ कागदपत्रे पाठविण्याची विनंती केली, परंतू काही कारणास्तव वाहनाची मुळ कागदपत्रे उपलब्ध करुन दिली नाही. म्हणुन गैरअर्जदार नं.2 हे तक्रारदारास वाहनाची मुळ कागदपत्रे उपलब्ध करुन देऊ शकत नाही व या बाबतीत गैरअर्जदार नं.2 हे कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही. कुठल्याही वाहनाची विक्री करणे व विक्री झालेल्या वाहनाचे हस्तांतरण करणे एवढीच जबाबदारी गैरअर्जदार नं.2 यांची आहे. वास्तविक गैरअर्जदार नं.2 यांनी तक्रारदारास त्याचे नावे लेखी प्रमाणपत्र देखील दिलेले आहे. एवढेच नव्हे, तर वाहन खरेदी करतेवेळी गैरअर्जदार नं.2 यांनी वाहनासंबंधी त्यांना जेवढी माहिती होती ती तक्रारदारास दिलेली आहे. तक्रारदाराने वाहन खरेदी करतेवेळी वाहनाबाबत योग्य ती चौकशी करणे गरजेचे होते, तसे तक्रारदाराने केले नाही. तक्रारदार स्वतःचे चूकीकरीता तो गैरअर्जदार नं.2 यांना जबाबदार धरु शकत नाही. जर एजंटने प्रिंसीपलचे वतीने एखादा करार केला असेल तर तो करार वैयक्तिकरित्या एजंटला बंधनकारक राहणार नाही असे गैरअर्जदाराचे कथन आहे. या म्हणण्यापुष्ठ्यर्थ गैरअर्जदार नं.2 इंडियन कॉन्ट्रक्ट कायदा 1872 कलम 230 चा आधार घेतलेला आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता, गैरअर्जदार नं.2 यांनी तक्रारदारास कुठलिही सेवेतील कमतरता दिलेली नाही. म्हणुन सदरची तक्रार खर्चासहित खारीज करण्याची विनंती केली आहे. तक्रारदाराचे म्हणणे, दाखल करण्यात आलेले सर्व कागदोपत्री पुरावे, तसेच त्यांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद पाहता, या न्यायमंचाचे विचारार्थ खालील मुद्दे येतात. अ.क्र. | मुद्दे | निर्णय | 01. | तक्रारदार हा ‘ग्राहक’ आहे काय ? | होय | 02. | सदर तक्रार चालविण्याचा मंचास अधिकार आहे काय ? | होय | 03. | गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेत कमतरता आहे काय ? | नाही | 04. | या तक्रारीचा अंतीम आदेश काय ? | कारणमिमांसेप्रमाणे |
// का र ण मि मां सा // मुद्दा क्र.1 व 2:- मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या “Madan kumar sinfh v/s Disstt. Magislrate Suttanpur & anr.” 2009 NCJ 769 (SC) या निवाड्यातील आशय विचारात घेता, तक्रारदार हा ‘ग्राहक’ आहे व सदरची तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार आहे. मुद्दा क्र.3 व 4:- निर्विवादपणे तक्रारदाराने गैरअर्जदार नं.1 यांनी केलेल्या वाहनाच्या ऑप्शनमधील टाटा सुमो विक्टा ईएक्स, नोंदणी क्रमांक एमएच—40/ए—3929 हे वाहन गैरअर्जदार नं.2 यांचेकडून एकूण रुपये 3,08,750/- एवढ्या मोबदल्यात खरेदी केले होते. कागदपत्र क्र.14 वर दाखल दिनांक 16/5/2009 पत्रावरुन गैरअर्जदार नं.2 यांनी सदर वाहनासंबंधी एनओसी व आरटीओ संबंधातील इतर दस्तऐवजे तक्रारदारास 40 ते 45 दिवसांत मिळतील असे आश्वासन दिलेले होते. तक्रारदाराचे शपथपत्र तसेच गैरअर्जदार नं.2 यांचा जबाब, सदरचे पत्र तसेच इतर कागदपत्रे लक्षात घेता या मंचाचे असे निदर्शनास येते की, सदरची दस्तऐवजे अद्यापही तक्रारदारास प्राप्त झालेली नाहीत. गैरअर्जदार नं.2 यांचे मते वाहनाची मुळ दस्तऐवजे ही गैरअर्जदार नं.1 कंपनीकडे असतात. वाहन विकल्याची सूचना दिल्यावर सदरची मुळ दस्तऐवजे कंपनी गैरअर्जदार नं.2 यांचेकडे पाठविते व गैरअर्जदार नं.2 हे सदर दस्तऐवजे वाहन विकत घेणा-यास देतात. गैरअर्जदार नं.1 कंपनीने सदरची दस्तऐवजे गैरअर्जदार नं.2 यांना न पाठविल्यामुळे तक्रारदारास सदरची दस्तऐवजे देण्यात आली नाहीत. वरील म्हणण्याचे पुष्ठ्यर्थ गैरअर्जदार नं.2 यांनी कुठलाही सुस्पष्ट पुरावा सादर न केल्यामुळे गैरअर्जदार नं.2 यांचे हे म्हणणे या मंचास मान्य करता येणार नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या रजीस्टेशन तपशिलाचा दस्तऐवज लक्षात घेता असे निदर्शनास येते की, एमएच 40/ए—3929 हे वाहन टाटा सुमो (तक्रारदाराने खरेदी केलेले) नसून सदर क्रमांकाचे वाहन हे एलएमव्ही ट्रेलर आहे व त्याचे मालक मारोती पुरुषोत्तम वाघ आहेत. गैरअर्जदार नं.1 यांनी तक्रारदाराचे हे म्हणणे नाकारण्यासाठी कुठलाही पुरावा सादर केला नाही, तसेच गैरअर्जदार नं.1 यांनी मंचासमक्ष उपस्थित होऊन तक्रारदाराचे सदरचे म्हणणे नाकारले नाही. वरील सर्व वस्तूस्थिती व परीस्थिती लक्षात घेता हे मंच या निष्कर्षाप्रत येते की, गैरअर्जदार यांनी तक्रारदाराकडून मोबदला घेऊन वाहन विकल्यावर वाहनासंबंधिची दस्तऐवजे तक्रारदारास न देणे ही गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेतील कमतरता आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2 (1) (ए) मधील ‘डिलर’ ची व्याख्या लक्षात घेता, गैरअर्जदार नं.1 व 2 हे दोघेही तक्रारदाराच्या नुकसान भरपाईस जबाबदार आहेत. परंतू तक्रारदाराने मागीतलेल्या नुकसान भरपाई इतकी रक्कम पुराव्याअभावी या मंचास मान्य करता येणार नाही. वरील सर्व बाबी लक्षात घेता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. -/// अं ती म आ दे श ///- 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास टाटा सुमो विक्टा ईएक्स, नोंदणी क्रमांक एमएच—40/ए—3929 या वाहनाची संबंधित मुळ दस्ऐवजे द्यावीत. 3) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रुपये 10,000/- आणि दाव्याचे खर्चापोटी रुपये 2,000/- याप्रमाणे एकंदरीत रुपये 12,000/- (रुपये बारा हजार फक्त) एवढी रक्कम द्यावी. गैरअर्जदार यांनी उपरोक्त आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून तीस दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |