न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
वि.प. क्र.1 ही चारचाकी वाहन उत्पादित करणारी कंपनी असून वि.प. क्र.2 हे वि.प. क्र.1 यांचे अधिकृत विक्रेते व सेवा देणारे आहेत. यातील तक्रारदार यांनी वि.प. क्र.2 यांचेकडून ता. 31/1/2017 रोजी टाटा एस मॉडेल नं. TATA (ACE) Chasis No. MAT445553HZ143565 and Engine No. 275IDI07NSYSC3708 रक्कम रु.4,03,363/- इतक्या रकमेस खरेदी केलेले होते. सदरचे वाहनाचा वॉरंटी कालावधी हा वाहन खरेदी केलेपासून 2 वर्षे होता. वाहन खरेदी केलेनंतर सदराचे वाहन वापरत असताना वादातील वाहन चालू असताना रस्त्यावर सरळ रेषेमध्ये न जाता वाहन वेगात असताना वाहन सरळ रस्ता सोडून वेडेवाकडे जात असे. तसेच सदर वाहनाच्या इंजिनचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढत असलेबाबतची माहिती तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली होती. सबब, तक्रारदार यांनी सदरचे वादातील वाहन वि.प.क्र.2 यांचे वर्कशॉपमधे नेवून त्याअनुषंगाने वाहनाबाबतची तक्रार वि.प.क्र.2 यांचेकडे नोंदविलेली होती. त्यानुसार वि.प. क्र.2 यांनी वादातील वाहन वॉरंटी पिरेडमध्ये असलेमुळे सदर वाहनाच्या वेळोवेळी दुरुस्त्या करुन दिलेल्या होत्या. तथापि वादातील वाहनाची दुरुस्ती केलेनंतरही सदर वाहनाच्या तक्रारी बंद न होता प्रत्येक वेळी वेगवेगळया दुरुस्त्या करुन वाहनाचे वेगवेगळे पार्ट बदलले गेले. सदरचे पार्ट दुरुस्ती केलेनंतर वाहन सुरळित चालेल व त्यातील दोष दूर होतील अशी वि.प.क्र.2 यांनी वाहन ताब्यात देताना त्यांना हमी दिली. तथापि वाहनातील दोष अद्यापही दूर झालेले नाहीत. सबब, वि.प. यांनी उत्पादित दोष असलेले वाहन तक्रारदार यांना देवून अनुचित प्रथेचा अवलंब केला आहे तसेच तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे. सबब, वि.प. यांनी उत्पादित दोषविरहित त्या कंपनीचे त्याच मॉडलेचे नवीन वाहन देणेबाबत आदेश व्हावेत, वैकल्पिकरित्या वि.प. हे वाहन बदलून देणेस असमर्थ असतील तर वाहनाची संपूर्ण रक्कमरु. 4,03,363/- व त्यावर द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- व नुकसान भरपाईपोटी रु. 50,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत गाडी खरेदीचे बिल, तक्रारदार यांनी गाडी दुरुस्त केलेली बिले इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. प्रस्तुतकामी वि.प. क्र.1 यांनी विहीत मुदतीत म्हणणे दाखल केले नसलेने त्यांचे विरुध्द नो से आदेश नि.1 वर पारीत करण्यात आला.
4. वि.प. क्र.2 यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले आहे. वि.प. क्र.2 यांचे कथनानुसार, तक्रारदार यांना वि.प.क्र.2 यांनी सेवा दिलेली नाही असा कोणताही तकारअर्जामध्ये उल्लेख केलेला नाही. याउलट तक्रारदार यांच्या वाहनाची दुरुस्ती वि.प.क्र.2 यांनी वेळोवेळी करुन दिलेली आहे. त्याबाबत वि.प.क्र.2 यांची कोणतीही तक्रार नाही. वि.प.क्र.2 ही वि.प.क्र.1 यांनी उत्पादित केलेल्या वाहनाची विक्री करतात. वाहन उत्पादनाशी वि.प. क्र.2 यांचा कोणताही संबंध नाही. वि.प. क्र.2 हे फक्त गाडी दुरुस्त करण्याचे काम करतात. वाहन खरेदी केलेपासून सदर वाहनाचा वापर किती किलोमीटर केला याचा उल्लेख तक्रारअर्जात केलेला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या वाहनाचे जॉबकार्ड पाहिले असता ब्रेक सेटींग, व्हील अलाईनमेंट, ब्रेलाई, कुलंट, इ. स्वरुपाचे किरकोळ काम जॉबकार्ड वरुन केल्याचे दिसून येते. ता. 12/7/28 रोजी तक्रारदार यांनी स्वतः प्रस्तुतचे वाहन वापरुन पाहिले. ते वाहन व्यवस्थित असलेचे खात्री करुन सदरचे वाहन तक्रारदार यांनी ताब्यात घेतले. तक्रारदार यांना वॉरंटी काळातील वाहनाची किरकोळ दुरुस्ती करुन दिलेली आहे. या कारणास्तव तक्रारदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करावा असे असे वि.प. क्र.2 यांनी म्हणणे दाखल केलेले आहे.
5. वि.प.क्र.2 यांनी याकामी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.क्र.2 यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
7. वि.प. क्र.1 ही चारचाकी वाहन उत्पादित करणारी कंपनी असून वि.प. क्र.2 हे वि.प. क्र.1 यांचे अधिकृत विक्रेते व सेवा देणारे आहेत. यातील तक्रारदार यांनी वि.प. क्र.2 यांचेकडून ता. 31/1/2017 रोजी टाटा एस मॉडेल नं. TATA (ACE) Chasis No. MAT445553HZ143565 and Engine No. 275IDI07NSYSC3708 रक्कम रु.4,03,363/- इतक्या रकमेस खरेदी केलेले होते. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत अ.क्र.1 ला वि.प. यांचेकडून वादातील वाहन खरेदी केल्याचे टॅक्स इन्व्हॉईस दाखल केलेले असून सदरचे टॅक्स इन्व्हॉईस वि.प. यांनी नाकारलेले नाही. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
8. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून वादातील वाहन खरेदी केलेले होते. तक्रारदारांनी वादातील वाहनाची पूर्ण रक्कम वि.प. यांना रोखीने अदा करुन खरेदी केले होते. याबाबत वाद नाही. सदरचे वाहनाचा वॉरंटी कालावधी हा वाहन खरेदी केलेपासून 2 वर्षे होता. वाहन खरेदी केलेनंतर सदराचे वाहन वापरत असताना वादातील वाहन चालू असताना रस्त्यावर सरळ रेषेमध्ये न जाता वाहन वेगात असताना वाहन सरळ रस्ता सोडून वेडेवाकडे जात असे. तसेच सदर वाहनाच्या इंजिनचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढत असलेबाबतची माहिती तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली होती. सबब, तक्रारदार यांनी सदरचे वादातील वाहन वि.प.क्र.2 यांचे वर्कशॉपमधे नेवून त्याअनुषंगाने वाहनाबाबतची तक्रार वि.प.क्र.2 यांचेकडे नोंदविलेली होती. त्यानुसार वि.प. क्र.2 यांनी वादातील वाहन वॉरंटी पिरेडमध्ये असलेमुळे सदर वाहनाच्या वेळोवेळी दुरुस्त्या करुन दिलेल्या होत्या. तथापि वादातील वाहनाची दुरुस्ती केलेनंतरही सदर वाहनाच्या तक्रारी बंद न होता प्रत्येक वेळी वेगवेगळया दुरुस्त्या करुन वाहनाचे वेगवेगळे पार्ट बदलले गेले. सदरचे पार्ट दुरुस्ती केलेनंतर वाहन सुरळित चालेल व त्यातील दोष दूर होतील अशी वि.प.क्र.2 यांनी वाहन ताब्यात देताना त्यांना हमी दिली. तथापि वाहनातील दोष अद्यापही दूर न होवून वि.प. यांनी उत्पादित दोष असलेले वाहन तक्रारदार यांना देवून अनुचित प्रथेचा अवलंब केला का अथवा तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वादातील वाहन वि.प. यांचेकडून दुरुस्त केलेची तारीख 27/2/2018, 21/3/18, 5/4/2018, 19/5/18, 13/6/18, 19/6/18 आणि 12/7/18 अशी एकूण सात टॅक्स इन्व्हॉईस दाखल केलेले आहेत. सदरचे टॅक्स इनव्हॉईस वि.प. यांनी नाकारलेले नाहीत.
9. प्रस्तुतकामी वि.प.क्र.1 यांनी विहीत मुदतीत म्हणणे दाखल केले नसलेने त्यांचेविरुध्द नो से आदेश करण्यात आला आहे.
10. वि.प. क्र.2 यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन करता तक्रारदार यांना वि.प.क्र.2 यांनी सेवा दिलेली नाही असा कोणताही तकारअर्जामध्ये उल्लेख केलेला नाही. याउलट तक्रारदार यांच्या वाहनाची दुरुस्ती वि.प.क्र.2 यांनी वेळोवेळी करुन दिलेली आहे. त्याबाबत वि.प.क्र.2 यांची कोणतीही तक्रार नाही. वि.प.क्र.2 ही वि.प.क्र.1 यांनी उत्पादित केलेल्या वाहनाची विक्री करतात. वाहन उत्पादनाशी वि.प. क्र.2 यांचा कोणताही संबंध नाही. वि.प. क्र.2 हे फक्त गाडी दुरुस्त करण्याचे काम करतात. वाहन खरेदी केलेपासून सदर वाहनाचा वापर किती किलोमीटर केला याचा उल्लेख तक्रारअर्जात केलेला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या वाहनाचे जॉबकार्ड पाहिले असता ब्रेक सेटींग, व्हील अलाईनमेंट, ब्रेलाई, कुलंट, इ. स्वरुपाचे किरकोळ काम जॉबकार्ड वरुन केल्याचे दिसून येते. ता. 12/7/28 रोजी तक्रारदार यांनी स्वतः प्रस्तुतचे वाहन वापरुन पाहिले. ते वाहन व्यवस्थित असलेचे खात्री करुन सदरचे वाहन तक्रारदार यांनी ताब्यात घेतले. तक्रारदार यांना वॉरंटी काळातील वाहनाची किरकोळ दुरुस्ती करुन दिलेली आहे. या कारणास्तव तक्रारदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करावा असे असे वि.प. क्र.2 यांनी म्हणणे दाखल केलेले आहे. सबब, वि.प. क्र.2 चे म्हणणे तसेच तक्रारदाराचे पुराव्याचे शथपत्राचे अवलोकन करता,
“मी त्यानंतर वि.प. क्र.2 यांचेकडे जावून तेथील वर्कशॉप ऑफिसर श्री गौतम यांची भेट घेवून सदरच्या वाहनाची त्रुटी त्यांना सांगितली. त्यांनी गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेतली असता त्यांनीही गाडीमध्ये दोष असलेचे मान्य व कबूल केले. तसेच सात दिवसांत तुम्हाला चासीसचा रिपोर्ट येईल तेव्हा कळेल. तसेच श्री गौतम यांनी इंजिनिअरना पाठवून देतो त्यांना गाडी दाखवा असे सांगितले. त्यानंतरही वि.प. यांचेकडे वर्कशॉपमधील मेस्त्री यांनीही सदरचा दोष मान्य केला आहे. वि.प. क्र.2 यांचेकडील इंजिनिअरनी वाहनाची तपासणी ता. 12/7/2018 रोजी करण्यासाठी वाहन चालवून बघीतले. परंतु त्यांनी सदर वाहनात कोणताही दोष नाही असे दुरुस्ती बिलावर लिहून दिले. सदर वाहनातील दोष दाखवणेसाठी मी इंजिनियरना थोडे जास्त अंतर जावून हायवेवर वाहन चालवून बघूया अशी विनंती केली असता ती इंजिनियरनी अमान्य केली. तसेच इंजिनियरनी ठराविक पार्ट बदलून घ्यावे त्यानंतर दोष दूर होईल असे सांगितले. त्यामुळे सदरचे वाहन मी वि.प. क्र.2 यांचेकडून 7 ते 8 वेळा रिपेअरी करुन घेतले. सदरच्या दुरुस्त्यांमध्ये मी कथन केलेल्या दोषांबददल कोणतीही दुरुस्ती केलेली नव्हती व नाही.“
असे तक्रारदार यांनी पुराव्याच्या शपथपत्रावर कथन केलेले आहे. सबब, पुराव्याचे शपथपत्रातील कथनांचा विचार करता वि.प. क्र.2 यांना देखील सदर वादातील वाहनामध्ये दोष होता ही बाब मान्य होती व सदरचा दोषांचे निराकरण करुन देण्याची हमी वि.प. क.2 यांच्या इंजिनिअर यांनी दिलेली होती ही बाब सिध्द होते. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. क्र.2 यांच्याकडे वादातील वाहन दुरुस्त केलेल्या टॅक्स इन्व्हॉईसचे अवलोकन करता
ASSY FRONT AXLE, ASSY FRONT SPRING PARABOLIG, WASHER 17 ID, BASS PLATE FRONT PUMP STOP ER, SPLIT PIN 3.2X40, ASSY ORVM LH FACELIFT, ASSY PIPE, ASSY WHEEL CYLINDER, ASSY WHEEL CYLINDER, FRONT LEFT OR RIGHT SPRING RENEWREPL/CE FRONT BOTH SIDE EAF SPRING, REMOVAL & INSTALLATION ON ONE STUB AXLE, ON I BEAMFRONT AXLE R/R, BRAKE LINES RENEWBRAKE LINES RENEW, ADJUSTING TOE IN OF FRONT WHEEL ALONGNMENT DONE (FOC)
असे नमूद आहे. सबब, वादातील वाहनामध्ये बरेच दोष होते ही बाब दिसून येते.
11. तसेच प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी ता. 9/7/2019 रोजी वादातील वाहन तपासणीसाठी आयोगामध्ये कोर्ट कमिशनची यांची नियुक्ती करावी यासाठी अर्ज दिला. सदर तारखेस वि.प. यांनी देखील सदरचे वाहन तपासणी करण्यासाठी तज्ञ व्यक्तींची नांवे आयोगामध्ये सादर केली. सबब, आयोगाने वादातील वाहनातील दोषांची तपासणी करणेकरिता वि.प. यांनी नमूद केलेल्या एम.एस.आर.टी.सी. कोल्हापूर यांची कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती केली व त्यनुसार आयोगामार्फत सत्य परिस्थिती आयोगासमोर येणेसाठी तज्ञांकडून अभिप्राय मागविणेत आला. त्यानुसार ता. 28/9/2019 रोजी यंत्र अभियंता (चालन), रा.प. कोल्हापूर यांनी सदर कामी वादातील वाहनाबाबतचा अहवाल दाखल केला. सदर अहवालाचे अवलोकन करता,
- गाडीची स्पीड वाढविली असता गाडी स्पीडने आपोआप डावीकडे वळत असल्याचे दिसून आले.
- गाडी स्पीडमध्ये चालविल्यावर गाडीची स्टेअरिंग व दिशा नियंत्रण करणे फारच कठिण आहे हे तक्रारदाराचे म्हणणे रास्त असल्याचे अंदाजे तीन किमी गाडी फिरविल्यानंतर निदर्शनास आले.
-
- सदर गाडीचे व्हील अलाईनमेंट गुरुकृपा ऑटोमोबाईल या मान्यताप्राप्त संस्थेकडून योग्य असल्याची खात्री करुन घेण्यात आली व सदरचा दाखला सोबत जोडला आहे.
- व्हील बेसची साईड टू साईड व डायगोनल मापे घेण्यात आली.
-
त्यामध्ये डायगोनल (कर्ण) लांबीमध्ये अर्धा इंच फरक दिसत असून, सदरचा फरक वरील दोषास कारणीभूत असू शकतो,त्यानंतर पुढील कमानीचे हँगर व शॉकल पेन मधील डायगोनलचे अंतर तपासले असता ते दोन्हीकडे समान असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे वरील तपासणीअंती मी दाखला देत आहे की, टाटा एमएच-09-ईएम-2048 ही गाडी ड्रायव्हींग टेस्ट अंती डावीकडे वळते व स्पीड वाढविली असता दिशा नियंत्रणात राहत नाही ही तक्रारदाराची तक्रार रास्त आहे.
असा अहवाल दाखल केला. तथापि वि.प. क्र.2 यांनी ता. 30/3/2021 रोजी सदर अहवालाचे अनुषंगाने तांत्रिक बाबी तसेच केलेले कमिशन याबाबत संदिग्धता असलेने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कोल्हापूर यांना साक्षी समन्स काढणेसठी अर्ज दिला. त्यानुसार साक्षीदार यांना साक्षी समन्स बजावण्यात आले. वि.प. क्र.2 यांनी प्रस्तुतकामी आयोगामध्ये प्रश्नावली सादर करुन साक्षीदार यांची उत्तरे घेण्यासाठी अर्ज दिला व त्यानुसार साक्षीदार यांनी आयोगामध्ये सदर प्रश्नावलीस ता. 4/4/22 रोजी उत्तरे दिलेली आहेत.
12. प्रस्तुतकामी वि.प.क्र.2 यांनी तक्रारदार हे सदरचे वाहनाचा चुकीच्या पध्दतीने वापर करीत असलेमुळे वाहनामध्ये वारंवार दोष उत्पदित झाला असे कथन केले आहे. तथापि दाखल कागदपत्रांवरुन सदरचे वाहन तक्रारदार यांनी चुकीच्या पध्दतीने वापरले असे सिध्द होत नाही. तसेच तक्रारदारांनी सदरचे वाहनाचा वापर चुकीचे पध्दतीने केला. या अनुषंगाने वि.प.क्र.2 यांनी कोणताही परिस्थितीजन्य पुरावा (Circumstantial evidence) सदरकामी दाखल केलेला नाही. वाहन तपासणीवेळी कोर्ट कमिशन यांनी वि.प. क्र.2 यांना समक्ष बोलावले नव्हते व नाही. त्यामुळे कोणत्या वाहनाची तपासणी केली याबाबत संदिग्धता आहे असे वि.प. यांनी त्यांचे लेखी युक्तिवादामध्ये कथन केले आहे. त्याअनुषंगाने प्रस्तुतकामी दाखल केलेल्या साक्षीदार यांच्या प्रश्नावलीचे अवलोकन करता,
प्रश्न क्र. 3. - आपणांस ग्राहक मंचाचा आदेश मिळाल्यानंतर आपण तक्रारदार संतोष गोंधळी व वि.प. टाटा मोटर्स व चेतन मोटर्स यांना वाहन तपासणीची वेळ व तारीख कळविली होती का ?
उत्तर – मा आयोगाने अशा प्रकारे त्यांना प्रत्यक्ष बोलावणेबाबत आदेश दिलेला नाही. टेंपो चालकासमक्ष सदर तपासणी झालेली आहे.
प्रश्न क्र.5 - आपण कोणते वाहन तपासले याची कोणतीही प्रत्यक्ष माहिती टाटा मोटर्स किंवा चेतन मोटर्स याना माहिती आहे किंवा नाही ?
उत्तर - मला याची काही कल्पना नाही. मी आयोगाच्या पत्रानुसार तपासणी अहवाल दिला आहे.
13. सबब, साक्षीदार यांच्या सदर प्रश्नावलींच्या उत्तरांचे अवलोकन करता प्रस्तुतकामी वि.प. क्र.2 यांनीदेखील आयोगामध्ये सदर तज्ञांचे नांव आयोगामध्ये दिलेले होते ही बाब कागदपत्रांवरुन दिसून येते. मा. आयेागाचे आदेशाप्रमाणे तज्ञांचा अहवाल मागविण्यात आलेला होता. तसेच सदर वादातील वाहनाची तपासणी ही टेंपो चालकासमक्ष केली असलेचे दिसून येते. त्याकारणाने सदरच्या वाहनाची तपासणी केली याबाबत संदिग्धता आहे हे वि.प. यांचे कथन पुराव्याअभावी हे आयेाग विचारात घेत नाही. वि.प. यांनी सदर वाहनामध्ये जर काही दोष असतील तर ते दुरुस्त करुन देणेस आम्ही तयार होतो व आहे हे देखील मान्य केलेले आहे. वरील सर्व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करता वादातील वाहनाच्या डायगोनल (कर्ण) लांबीमध्ये अर्धा इंच फरक दिसून येत असून सदरचा फरक वादातील वाहनाच्या दोषांस कारणीभूत असू शकतो व वादातील वाहन ड्रायव्हींग टेस्टअंती डावीकडे वळते व स्पीड वाढविले असता दिशा नियंत्रणात रहात नाही या तज्ञांचा अहवालाचा विचार करता वादातील वाहनामध्ये उत्पादित दोष आहे ही बाब सिध्द होते. सबब, तक्रारदार यांच्या पुरावा शपथपत्रावरुन वि.प.क्र.2 यांनी सदर वाहनाच्या वेगवेगळया दुरुस्त्या करुन वेगवेगळे पार्ट बदलले होते तथापि पार्ट दुरुस्त केल्यानंतरही सदरचे वाहन सुरळित चालत नव्हते ही बाब वि.प. क्र.2 यांनी माहिती होती. वि.प.क्र.2 यांचे इंजिनिअर यांनी सदरचे वाहनातील दोषाचे निराकरण करुन देणेची हमी दिलेली होती. त्याकारणाने सदरच्या वाहनातील दोष दुरुस्त करुन देणे वि.प. क्र.2 हे सदर वाहनाचे अधिकृत विक्रेते व सेवा देणारे असलेमुळे वि.प. क्र.2 यांची देखील जबाबदारी होती या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
14. प्रस्तुतकामी तक्रारदारांनी पुढील वरिष्ठ न्यायालयाचा न्यायनिवाडा दाखल केलेला आहे.
Special Leave Petition No. 21178-21180/2009 before Supreme Court of India dated 24th Nov. 2010
C.N. Anantharam Vs. M/s Fiat India Ltd. & Ors. –
However, in addition to the directions given by the National Commission, we direct that if the independent technical expert is of the opinion that there are inherent manufacturing defects in the vehicle, the petitioner will be entitled to refund of the price of the vehicle and the lifetime tax and EMI alongwith interest @ 12% per annum and costs, as directed by the State Commission.
सबब, वरील सर्व कागदपत्रांचा बारकाईने विचार करता तक्रारदार यांना वि.प. क्र.1 यांनी सदोष वाहन देवून तसेच वि.प. क.2 यांनी विक्रीपश्चात योग्य ती सेवा न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत अनुचित व्यापारी प्रथेचाअ वलंब केला आहे तसेच तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना उत्पादित दोषविरहित त्याच कंपनीचे व त्याच मॉडेलचे वाहन अदा करावे अथवा वैकल्पिकरित्या वि.प. वादातील वाहन बदलून देणेस असमर्थ असलेस वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या यांनी तक्रारदार यांना वाहनाची संपूर्ण रक्कम रु.4,03,363/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 04/08/18 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदारास मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. तक्रारदार यांनी वादातील वाहन वि.प. यांना परत करावे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
मुद्दा क्र.3
15. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून वाहन नादुरुस्त राहिले यासाठी नुकसान भरपाईची रक्कम रु.50,000/- ची मागणी आयेागामध्ये केली आहे. तथापि त्या अनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तथापि दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांच्या वाहनामध्ये दोष होता ही बाब सिध्द होते. त्याकारणाने तक्रारदार हे सदरच्या वाहनाचा योग्यरित्या उपभोग घेवू शकलेले नाहीत. सबब, या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून संयुक्तिकरित्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.25,000/- तसेच खर्चापोटी रक्कम रु.10,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना उत्पादित दोषविरहित त्याच कंपनीचे व त्याच मॉडेलचे वाहन अदा करावे.
अथवा वैकल्पिकरित्या वि.प. क्र.1 व 2 हे वादातील वाहन बदलून देणेस असमर्थ असलेस वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना वाहनाची संपूर्ण रक्कम रु.4,03,363/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 04/08/18 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदारास मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. - वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|