मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई
ग्राहक तक्रार क्रमांक – 19/2010
तक्रार दाखल दिनांक – 23/06/2010
आदेश दिनांक - 22/02/2011
रिता सुधीर देसाई,
रा. रुम नंबर 3, दिघे चाळ नंबर 1,
देवळा पाडा, टाटा पॉवर हाऊस,
बोरवली (पूर्व), मुंबई 400 066. ........ तक्रारदार
विरुध्द
टाटा मेमोरियल हॉस्पीटल,
हॉस्पीटल (कॅन्सर सेक्शन),
डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परेल,
मुंबई 400 012. ......... सामनेवाले
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया
मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ
उपस्थिती - उभयपक्ष हजर
- निकालपत्र -
-
द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया
प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीने नमूद केले आहे की, तिचे पती सुधिर देसाई यांचेवर गैरअर्जदार यांच्याकडे कर्करोगाच्या आजाराकरीता औषधोपचार केले, व त्याकरीता रुपये 28,000/ गैरअर्जदार यांना देण्यात आले होते. तक्रारकर्तीने नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांनी वैद्यकिय सेवेत निष्काळजीपणा केल्यामुळे सुधिर देसाई यांचा मृत्यू झाला. तक्रारकर्तीने नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांनी सुधिर देसाई यांची केमोथेरपी केलेली होती. परंतु गैरअर्जदार यांनी सेवेत त्रृटी दिल्यामुळे सुधिर देसाई यांचा मृत्यू झाला व त्याकरिता तिने गैरअर्जदाराविरुध्द रुपये 20,00,000/- ची नुकसानभरपाईची मागणी केलेली आहे.
2) मंचामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आली होती. गैरअर्जदार हजर झाले व त्यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीने लावलेले सर्व आरोप अमान्य केलेले आहेत. त्यांनी असे नमूद केले आहे की, मयत सुधिर देसाई यांच्या औषधोपचारादरम्यान कोणताच हलगर्जीपणा केलेला नाही.
गैरअर्जदार यांनी नमूद केले आहे की, सुधिर देसाई याला लंग कन्सर होता, तसेच त्याचेवर औषधोपचार करण्यात आले होते. गैरअर्जदाराने नमूद केले आहे की, तक्रारकर्तीच्या पतीला कर्करोग हा अंतिम स्थितीत होता. गैरअर्जदारांनी नमूद केले आहे की, मयत सुधिर देसाई यांची ओ.पी.डी. पेशंट म्हणून तपासणी करण्यात आली होती. गैरअर्जदारांनी नमूद केले आहे की, सुधिर देसाई यांना दिनांक 22/02/2010 रोजी अति दक्षता विभागात आणण्यात आले होते, आवश्यक सर्व औषधोपचार देण्यात आले होते. तसेच मयत सुधिर देसाई यांचे औषधोपचाराबाबत Prognosis and nature of treatment ची कल्पना तक्रारकर्तीला देण्यात आली होती, व त्यांना फक्त Palliative तत्वावर औषधोपचाराबद्दल कल्पना देण्यात आली होती. तसेच तक्रारदार हिने दिनांक 22/02/2010 रोजी स्वतःच्या जबाबदारीवर सुधिर देसाई यांना घरी नेले होते, व त्यानंतर सुधिर देसाईचा मृत्यू झाला त्यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीची तक्रार ही खारिज करण्याबाबत नमूद केले आहे.
प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दिनांक 14/02/2001 रोजी मौखिक युक्तीवादाकरीता आली असता तक्रारकर्तीचा पुकारा केला असता ती गैरहजर होती. गैरअर्जदारातर्फे वकील हजर होते. गैरअर्जदार यांच्या वकीलांचा मौखिक युक्तीवाद ऐकण्यात आला. तकारकर्ती ही दिनांक 30/08/2010, 17/09/2010, 30/09/2010, 05/10/2010, 19/10/2010, 01/11/2010, 30/11/2010, 29/12/2010, 10/01/2011, 19/01/2011 व 14/02/2011 इतक्या तारखांना गैरहजर होती. त्यामुळे तक्रारदार हिने दाखल केलेली तक्रार व दस्तऐवज, तसेच गैरअर्जदार यांनी दाखल केलेला लेखी जबाब, दस्तऐवज व प्रतिज्ञापत्र यांचे अवलोकन केले असता खालीलप्रमाणे निष्कर्ष निघतो -
तक्रारकर्ती ही मयत सुधिर देसाई यांची पत्नी असून तिने गैरअर्जदार यांचेकडून सुधिर देसाई यांच्यासाठी वैद्यकिय सेवा घेतली होती, व त्याकरीता रुपये 28,000/ दिलेले होते, त्यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदार यांची ग्राहक आहे.
प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्तीचे म्हणणे असे आहे की, गैरअर्जदार यांनी वैद्यकिय सेवेत निष्काळजीपणा केल्यामुळे तिचे पती सुधिर देसाई यांचा दिनांक 22/02/2010 रोजी मृत्यू झाला व त्याकरीता रुपये 20,00,000/- नुकसानभरपाईची मागणी केलेली आहे. गैरअर्जदार यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला असून त्यासोबत दस्तऐवज दाखल केलेले आहेत. तसेच तक्रारकर्तीने लावलेले आरोप अमान्य केलेले आहेत. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मयत सुधिर देसाई हा दिनांक 04/01/2010 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे तपासणीसाठी आला होता. त्या दरम्यान तक्रारकर्ती हिच्या पतीला लंग कॅन्सर असल्याचे निदान करण्यात आले होते, गैरअर्जदार यांनी नमूद केले आहे की, तक्रारकर्तीच्या पतीला केमोथेरेपी ही ट्रीटमेंट देण्यात आली होती. तसेच मयत सुधिर देसाई हे ओ.पी.डी. पेशंट म्हणून गैरअर्जदार यांचेकडे आले होते. मयत सुधिर देसाई याला लंग कॅन्सर असल्यामुळे व तो अंतिम टप्यावर होता त्यामुळे Palliative ट्रीटमेंट करण्यात आली होती, जेणेकरुन सुधिर देसाई हा जास्तीत जास्त काळ जगू शकेल. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांवरुन असे दिसून येते की, सुधिर देसाई याला दिनांक 22/02/2010 रोजी गैरअर्जदार यांचेकडे सिरियस कंडिशनमधे आणण्यात आले होते. गैरअर्जदार यांच्या डॉक्टरांनी मयत सुधिर देसाई यांच्या प्रकृतीबाबत नातेवाईकांना संपूर्ण कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे तक्रारकर्तीने सुधिर देसाई यांना स्वतःच्या जबाबदारीवर घरी नेले होते, ही बाब गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांवरुन सिध्द होते. मंचाच्या मते मयत सुधिर देसाई याला अंतिम टप्यावर लंग कॅन्सर झाला होता, तसेच गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला सेवेत कोणतीच त्रृटी दिलेली नाही, असे मंचाचे मत आहे.
मंचाने वैद्यकिय निष्काळजीपणाबद्दल तक्रारकर्तीला दस्तऐवज दाखल करण्याबाबत जे.जे. हॉस्पीटल मुंबई यांना दिनांक 13/05/2010 रोजी पत्र पाठविले होते. परंतु त्यांच्यामार्फत कोणताच अहवाल प्राप्त झाला नाही. तसेच तक्रारकर्तीला सदर प्रकरणात अनेकवेळा संधी देऊनही तक्रारकर्तीने कोणताच पुरावा दाखल केला नाही. मंचाच्या मते “Res Ipsa Loquitur” तत्वाच्या आधारे आम्ही तक्रारीचे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीच त्रृटी केलेली नाही. आम्ही मा. सर्वोच्च न्यायालय यांनी व्ही. कृष्णन राव विरुध्द निखिल सूपर स्पेशॅलिटि हॉस्पीटल आणि इतर या न्याय निवाडयाचा आधार घेतला. तसेच तक्रारकर्तीने तिला अनेक वेळा संधी देऊनही आपली तक्रार पुराव्यानिशी सिध्द केलेली नाही त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार ही खारिज करण्यास पात्र आहे. सबब मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहेत
- अंतिम आदेश -
1) तक्रार क्रमांक 19/2010 खारिज करण्यात येते.
1)
2) उभयपक्षांनी स्वतःचा खर्च स्वतः सोसावा.
2)
3) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी.
दिनांक – 22/02/2011
ठिकाण - मध्य मुंबई, परेल.
(भावना पिसाळ) (नलिन मजिठिया)
सदस्या अध्यक्ष
मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई
एम.एम.टी./-