जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 576/2010.
तक्रार दाखल दिनांक : 19/11/2010.
तक्रार आदेश दिनांक : 18/09/2012.
निकाल कालावधी: 01 वर्षे 10 महिने 00 दिवस
श्री. बाळू भिवा गंजाळे, वय 27 वर्षे, व्यवसाय : ट्रॅक्टर मालक,
रा. कोन्हेरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
डिव्हीजन मॅनेजर, टाटा ए.आय.जी. जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
202-ए, द ओरियन, दुसरा मजला, 5-कोरेगांव पार्क रोड,
पुणे – 411 001. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारयांचेतर्फेविधिज्ञ: एस.एस. बनसोडे
विरुध्दपक्षयांचेतर्फेविधिज्ञ: जी.एच. कुलकर्णी
निकालपत्र
सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी शेती कामासाठी खरेदी केलेल्या ट्रॅक्टर रजि. नं. एम.एच.13/ए.जे.2872 चा विरुध्द पक्ष यांच्याकडे पॉलिसी नं. 0150810141 अन्वये दि.11/2/2010 ते 10/2/2011 कालावधीकरिता विमा उतरविलेला आहे. दि.14/10/2010 रोजी त्यांचा ट्रॅक्टर मौजे तेलंगवाडी येथे मोहन मारुती जाधव यांची शेतजमिनीमध्ये नांगरण काम करीत असताना गट नं.102 मधील विहिरीमध्ये पडला आणि ट्रॅक्टरचे नुकसान झाले. सदर घटनेची नोंद मोहोळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 304/2010 प्रमाणे करण्यात येऊन गुन्हा नोद झाला आहे. अपघातामध्ये त्यांच्या ट्रॅक्टरचे रु.1,12,168/- चे नुकसान झाले असून तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मिळण्याकरिता सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे दाखल केली आहेत. परंतु दि.31/8/2010 च्या पत्राद्वारे ट्रॅक्टरवर जास्त व्यक्ती बसल्याचे कारण देऊन तक्रारदार यांनी त्यांचा विमा दावा नामंजूर केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये पुढे असे नमूद केले आहे की, ट्रॅक्टरवर ड्रायव्हरशिवाय अन्य कोणतीही व्यक्ती बसलेली नव्हती आणि पाठीमागे जोडलेल्या नांगरावर व्यक्ती बसलेली होती. विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे ट्रॅक्टर दुरुस्ती खर्च रु.1,12,168/- व्याजासह मिळावा आणि मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रार खर्च रु.3,000/- मिळावा, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर दि.29/6/2011 रोजी लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी तक्रारदार यांची तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांना विमा पॉलिसी निश्चित अटी व शर्तीस अधीन राहून निर्गमित केलेली होती. ट्रॅक्टरचा दि.14/7/2010 रोजी अपघात होऊन नुकसानीची सूचना मिळाल्यानंतर त्यांनी सर्व्हेअस व लॉस असेसर यांची नियुक्ती करुन स्पॉट सर्व्हे करुन घेतला आहे. तसेच त्यांनी तक्रारदार यांना वाहनाची कागदपत्रे, क्लेम फॉर्म, पोलीस पेपर्स, इस्टीमेट इ. कागदपत्रे मागणी केली आणि वेळोवेळी तक्रारदार यांनी कागदपत्रांची पूर्तता केली. विरुध्द पक्ष यांनी नियुक्त केलेल्या सर्व्हेअर व लॉस असेसर यांनी पॉलिसी अंतर्गत अंतीमत: रु.52,000/- दुरुस्ती खर्चाचे निर्धारण केले आहे. विरुध्द पक्ष यांनी कागदपत्रांची छाननी केली असता ट्रॅक्टर हेडवर चार व्यक्ती असल्याचे निदर्शनास आले. तक्रारदार यांनी दि.17/7/2010 च्या जबाबामध्ये 3 छोटी मुले ट्रॅक्टरवर असल्याचे व त्यापैकी महादेव भारत सुळे याचा घटनास्थळी मृत्यू झाल्याचा व इतरांना रुग्णालयात दाखल केल्याचा जबाब दिला आहे. ट्रॅक्टरची आसन व्यवस्था केवळ एकाच व्यक्तीची असताना ड्रायव्हरसह पाच व्यक्ती ट्रॅक्टरवर असल्यामुळे नुकसान भरपाई देण्याकरिता ते जबाबदार नाहीत. त्याप्रमाणे तक्रारदार यांना कळविण्यात आलेले असून त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे.
3. तक्रारदार यांनी दाखल केलेला तक्रार-अर्ज, विरुध्द पक्ष यांची कैफियत, दोन्ही पक्षांनी दाखल कागदपत्रे, प्रतिज्ञालेख, लेखी युक्तिवाद यांचे सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केले असता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारणमिमांसा देऊन पुढील आदेश पारीत करण्यात आले.
3.1) सदर तक्रार-अर्जामध्ये तक्रारदार यांचा शेती कामासाठी खरेदी केलेला ट्रॅक्टर अर्जात नमूद केलेल्या वर्णनाप्रमाणे दि.14/10/2010 रोजी मौजे तेलंगवाडी येथे मोहन मारुती जाधव यांचे शेतजमिनीमध्ये नांगरण काम करीत असताना गट नं.102 मधील विहिरीमध्ये पडला आणि ट्रॅक्टरचे नुकसान झाले. या घटनेची नोंद मोहोळ पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. 304/2010 प्रमाणे करण्यात आली आहे. घटनेबाबत विरुध्द पक्ष यांना त्वरीत कळविले आहे. विरुध्द पक्ष यांच्याकडे विमा उतरला असल्याने ट्रॅक्टर नुकसानीकरिता रु.1,12,168/- ची मागणी केली असता विरुध्द पक्ष यांनी दावा नामंजूर केला आहे. त्यास कारण देताना कागदपत्रांची छाननी केली असता हेडवर 4 व्यक्ती असल्याचे निदर्शनास आले. महादेव भारत सुळे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. ट्रॅक्टरची आसन व्यवस्था केवळ एक व्यक्तीची असताना ड्रायव्हरसह 5 व्यक्ती ट्रॅक्टरवर असल्याने नुकसान भरपाई देण्याकरिता विरुध्द पक्ष हे जबाबदार नाहीत, असे कारण नमूद केले आहे. विरुध्द पक्ष यांनी सर्व्हेअर यांच्यामार्फत सर्व्हे रिपोर्ट घेऊन रु.52,000/- दुरुस्ती खर्च निर्धारण केला आहे. परंतु केवळ एक व्यक्तीचे आसन असताना 5 व्यक्ती ट्रॅक्टरवर असल्याने नुकसान भरपाई देण्याचे नाकारले आहे. या मुद्याची दखल घेतली असता घडलेली घटना व त्याचे स्वरुप पाहिले असता ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे, विहिरीत ट्रॅक्टर पडलेला आहे, हे मान्य व गृहीत धरणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक आहे. चौकशी अधिकारी एन.जी. कुलकर्णी, अडव्होकट यांनी चौकशी अहवाल दाखल केलेला आहे. त्यामध्ये 5 व्यक्ती बसल्याने निष्काळजीपणाने ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे, असे नमूद केले आहे. म्हणून विरुध्द पक्ष हे अशी विमा रक्कम देण्यास तयार नव्हते व नाहीत. वास्तविक पाहता, झालेला अपघात हा मान्य व गृहीत धरणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक आहे. सदर तक्रार-अर्जामध्ये ट्रॅक्टरच्या झालेल्या नुकसानीबाबत नुकसान भरपाई रक्कम मागणी केली आहे. मयत किंवा जखमी व्यक्तीकरिता दावा रक्कम मागणी केलेली नाही. विमा उतरला असल्याने कोणत्याही परिस्थितीत तक्रारदार अथवा विमाधारक यांना विमा पॉलिसीत मान्य केल्याप्रमाणे रक्कम देणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक आहे. ट्रॅक्टरचा अपघात झाल्याने ट्रॅक्टरचे नुकसान झालेले आहे. तक्रारदार यांनी रु.1,12,168/- ची मागणी केली आहे. परंतु ती मागणी योग्य व बरोबर होती व आहे, हे स्पष्ट करण्याकरिता मंचासमोर अखेरपर्यंत सविस्तर कागदपत्रे दिलेली नाहीत अथवा इस्टीमेट दाखल केलेले नाही. त्यामुळे मंचास पडताळणी व अवलोकन करण्यास मिळालेले नाही. याउलट विरुध्द पक्ष यांनी सर्व्हेअर श्री. सुनिल राऊत यांचा सर्व्हे रिपोर्ट दाखलकेला आहे. त्यामध्ये रु.53,126/- नुकसान खर्च जबाबदारी सर्व्हेअर यांनी स्वीकारण्यास हरकत नाही, असे मत व्यक्त केलेले आहे. म्हणून झालेल्या नुकसानीकरिता तक्रारदार यांना सर्व्हेअर रिपोर्टप्रमाणे रक्कम रु.53,126/- देणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक आहे. विरुध्द पक्ष यांनीही सर्व्हेअर अहवाल हा मान्य केलेला आहे. मंचासमोर अहवाल अमान्य असल्याबाबत कोणतेही आक्षेप घेतलेले नाहीत. सर्व्हेअर यांच्याकडे आवश्यक ते कागदपत्रे तक्रारदार यांनी दिलेले होते व आहेत. त्या आधारेच सर्व्हेअर यांनी सदरची किंमत दि.30/7/2010 रोजी अहवालाने नमूद केली आहे. परंतु ती रक्कम त्वरीत तक्रारदार यांना देण्याचा प्रयत्न विरुध्द पक्ष यांनी केलेला नाही. तक्रारदार यांचा दावा जाणीवपूर्वकरित्या देण्यास नाकारले आहे. ही सेवेतील त्रुटी, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा आहे. ट्रॅक्टरवर 5 व्यक्ती बसल्या, या कारणाने विमा दावा देण्याचे नाकारणे हेही कायदेशीररित्या योग्य व बरोबर नाही. विरुध्द पक्ष यांनी 2008 (2) सी.पी.आर. 140 (एन.सी.) ‘संतोष /विरुध्द/ नॅशनल इन्शुरन्स कं.लि.’ याबाबतचा न्यायिक दृष्टांत दाखल केला आहे. परंतु या न्यायिक दृष्टांतामधील वस्तुस्थिती व तक्रारीतील वस्तुस्थिती वेगवेगळी असल्याने या तक्रार-अर्जास तो लागू पडत नाही. म्हणून दखल घेण्यात आली नाही. तक्रारदार यांना विहीत मुदतीत विमा रक्कम देण्यास टाळले आहे. म्हणून आदेशाप्रमाणे विमा दावा रक्कम व व्याज, अर्जाचा खर्च देण्यास विरुध्द पक्ष हे जबाबदार आहेत. सेवेतील त्रुटी, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केला आहे, हे मान्य मंचाने केले असल्याने आदेश.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार-अर्ज अंशत: मंजूर करण्यात आला आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना सर्व्हेअरच्या रिपोर्टप्रमाणे विमा रक्कम रु.53,126/- द्यावी.
3. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम रु.53,126/- वर सर्व्हेअरचा अहवाल दि.30/7/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने रक्कम फेड होईपर्यंत व्याज द्यावयाचे आहे.
4. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.5,000/- द्यावेत.
4. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना वरील आदेशाप्रमाणे संपूर्ण देय रक्कम या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.
5. आदेशाच्या सहीशिक्क्याची प्रत उभयतांना नि:शुल्क देण्यात यावी.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/श्रु/12912)