जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांक :19/01/2010 आदेश पारित दिनांक :19/10/2010 तक्रार क्रमांक :- 55/2010 तक्रारकर्ता :– श्री. मनीष ज्ञानेश्वर हिवसे, वय अंदाजेः 30 वर्षे, व्यवसायः धंदा, राह. शारदा सिल वर्क्स, गिट्टीखदान, काटोल रोड नागपूर. -// वि रु ध्द //- गैरअर्जदार :– टाटा फायनान्स लिमिटेड, नारंग टॉवर्स, आकाशवाणी चौक, सिव्हील लाईन्स्, नागपूर. तक्रारकर्त्याचे वकील :– श्री. अमित खरे. गैरअर्जदाराचे वकील :– श्री. एस.ए. आशिरगडे. गणपूर्ती :– 1. श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष 2. श्री. मिलींद केदार - सदस्य (मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 19/10/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 19.01.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडून कर्ज घेऊन टाटा एस हे वाहन खरेदी केले. सदर वाहनाची किंमत रु.2,37,314/- होती व त्याकरता गैरअर्जदारांकडून रु.2,10,000/- एवढे कर्ज घेतले होते असे तक्रारीत नमुद केले आहे. 3. तक्रारकर्त्याने सदर तक्रारीच्या परतफेडी करता 36 धनादेश गैरअर्जदारांना दिले होते. तक्रारकर्त्याला दरमहा रु.7,450/- या नुसार मासिक किस्त दर महिन्याच्या 1 तारखेला द्यावयाचे होते. यासंबंधीचा तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचेमध्ये लेखी करार झाला होता. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदारांना धनादेशाव्दारे संपूर्ण रकमेची परतफेड केली. परंतु गैरअर्जदाराने एप्रिल-2008 मध्ये तक्रारकर्त्याने दिलेला धनादेश तारखेच्या पुर्वीच दोन दिवस आधी बँकेत जमा केला, त्यामुळे तो वटविल्या गेला नाही यामध्ये तक्रारकर्त्याचा कोणताही दोष नसतांना त्याचेवर दंड आकारण्यांत आला. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने सदर वाहनाचा विमा काढला असतांना सुध्दा गैरअर्जदाने कायदेशिर वाहनाचे विमाकृत रकमेचे प्रपत्र पाठविले नाही ही त्यांचे सेवेतील त्रुटी असुन त्याकरीता तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. 4. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला बजाविण्यांत आली असता त्यांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याला रु.2,10,000/- एवढे कर्ज देण्यांत आले होते ही बाब मान्य केलेली आहे व व्याजासह रु.2,61,800/- 35 महिन्यात तक्रारकर्त्याकडून घेणे असे नमुद केले आहे. त्यांनी आपल्या उत्तरामधे तक्रारकर्त्याकडून रु.24,063/- घेणे असल्याचे म्हटले आहे व तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे नाकारलेले असुन प्रस्तुत तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 5. सदर तक्रार मंचापुढे दि.12.10.2010 रोजी युक्तिवादाकरीता आली असता मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीलांमार्फत ऐकूण घेतला तसेच मंचापुढे दाखल दस्तावेज व दोन्ही पक्षांचे कथन यांचे निरीक्षण करता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. उभय पक्षांचे कथनावरुन व मंचासमक्ष दाखल दस्तावेजांवरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडून रु.2,10,000/- एवढे कर्ज घेतले होते यावरुन तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा सेवाधारक/ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 7. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास कर्जाच्या परतफेडीच्या संदर्भात 36 धनादेश दिले होते व सदर धनादेश दर महिन्याचे 1 तारखेचे होते व त्यानुसार गैरअर्जदार सदर धनादेश वटवित होते, ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.3 वरुन स्पष्ट होते. 8. तक्रारकर्त्याने दिलेला एप्रिल महिन्याचा धनादेश हा दि.01.04.2008 चा असतांना सदर धनादेश आधीच्या तारखेस गैरअर्जदाराने बँकेत वटविण्याकरता टाकला होता. त्यामुळे तो परत आला ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज पान क्र.20 वरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने दिलेला धनादेश आधीच्या तारखेस वटविण्याकरता टाकण्यात आल्यामुळे त्यामध्ये तक्रारकर्त्याचा कोठलाही दोष नसुन ही गैरअर्जदाराचे सेवेतील त्रुटी व निष्काळजीपणा आहे असे मंचाचे मत आहे. त्याकरीता तक्रारकर्त्याला दोषी धरता येऊ शकत नाही किंवा तक्रारकर्त्यास कोणत्याही प्रकारे गैरअर्जदार दंड आकारु शकत नाही असे मंचाचे मत आहे. 9. तकारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमुद केले आहे की, एप्रिल-2008 मधे दिलेल्या धनादेशाची रक्कम रु.7,450/- देण्यांस तो तयार आहे. सदर रक्कम स्विकारुन गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास नाहरकत प्रमाणपत्र द्यावयास पाहिजे ही तक्रारकर्त्याची मागणी न्यायोचित असल्यामुळे सदर मागणी मान्य करण्यांत येते. 10. तक्रारकर्ता वाहनाचा विमा स्वतः काढीत होता ही बाब त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन स्पष्ट होत असतांना गैरअर्जदाराने दि.01.05.2008 रोजी विम्याकरता रु.2,599/- वळते केल्याचे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज पान क्र.15 वरुन स्पष्ट होते. जर गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचे वाहनाचा विमा उतरविला होता तर त्याने तक्रारकर्त्यास विमा प्रपत्र द्यावयास पाहिजे होते. तसे न करणे ही गैरअर्जदारांची सेवेतील त्रुटी असल्याचे मंचाचे मत आहे. 11. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याकडून रु.24,063/- घेणे असल्याचे म्हटले आहे, परंतु त्याबद्दल योग्य असे स्पष्टीकरण दिलेले नाही. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याने कर्जाच्या मासिक हप्त्यांच्या स्वरुपात धनादेश दिले होते व एप्रिल-2008 चा धनादेश वगळता तक्रारकर्त्याचा कोणताही धनादेश परत आलेला आहे किंवा वटविला गेला नाही हे सिध्द होत नाही . त्यामुळे गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात केलेली मागणी योग्य पुराव्या अभावी खारिज करण्यांत येते व त्यांनी घेतलेले बचावात्मक कथन विचारात घेण्यांत येत नाही. 12. सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याने मानसिक व शारीरिक त्रासाकरीता एक लक्ष रुपयांची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव वाटत असल्यामुळे तक्रारकर्ता हा रु.5,000/- तसेच तक्रारीच्या खर्चाचे रु.1,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. 13. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- ख् 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराला आदेध देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून रु.7,450/- स्विकारुन तक्रारकर्त्यास नाहरकत प्रमाणपत्र 7 दिवसात द्यावे. सदर प्रमाणपत्र 7 दिवसांत न दिल्यास पुढील प्रत्येक दिवसाला रु.500/- याप्रमाणे दंड देय राहील. 3. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.1,000/- अदा करावे. 4. गैरअर्जदारांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावी. (मिलींद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |