निकालपत्र :- (दि.28/07/2010) ( सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :-यातील तक्रारदाराने दि.31/01/2010 रोजी सामनेवाला क्र.1 या मोबाईल कंपनीच्या सिमकार्डची खरेदी सामनेवाला क्र.2 यांचेकडून केली. त्याचा क्र.8149715868 असा आहे. खरेदी करत असतानाच तक्रारदाराने सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. तरीही सदरहू सिमकार्ड वरचेवर बंद होत राहिले. तक्रारदाराने एकूण 6 वेळा सामनेवालांकडे आवश्यक कागदपत्र जमा केली तरीही प्रस्तुत सिमकार्ड तक्रारदाराच्या नावावर झाले नाही. तक्रारदाराने आपली कागदपत्रे तक्रारदाराने सामनेवाला कंपनीच्या अधिकृत कार्यालयामध्ये दि.23/03/2010 व 31/03/2010 रोजी कागदपत्रे जमा केली आहेत व तशी पोचही घेतली आहे. असे असूनही सामनेवालाने आपली मोबाईल सेवा वरचेवर खंडीत केल्यामुळे तक्रारदाराला मोठा मानसिक त्रास झाला व वकीलांची फी व केस दाखल करण्यासाठी कराव्या लागणा-या इतर गोष्टींसाठी खर्च विनाकारण झाला. म्हणून तक्रारदाराने मूळ तक्रार अर्जात दि.14/06/2010 रोजी दुरुस्ती मागून आपला झालेला खर्च रु.6,000/- व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- इतकी मागणी केली आहे. (2) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवालांकडे कागदपत्रे जमा केलेली नोंद असणारा दि.10/03/2010 व दि.02/0222010 व 09/02/2010 रोजीचे कागद, समनेवाला क्र.1 यांचेकडे तक्रार केलेला अर्ज इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (3) सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या कथनात सिम कार्ड सामनेवाला क्र.2 कडून सामनेवाला क्र.1 यांचेकडे आले व कागदपत्राप्रमाणे सदर सिम कार्ड मिलींद दत्तात्रय पोतदार कोल्हापूर यांचे नांवे दिले होते व आहे. सदर सिमकार्ड दि.29/01/2010 रोजी सुरु झाले. सदरचे सिमकार्ड दिलेनंतर ते व्यवस्थित चालू होते तथापि सामनेवाला कंपनीतर्फे कागदपत्रांची छाननी करुन ग्राहकाचे रहाते पत्त्याची व नावाची खातरजमा करतेवेळी सदरचे सिमकार्ड हे मिलींद पोतदार हे वापरत नसून दुसरेच कोणीतरी वापरते याची खात्री झालेने सामनेवाला कंपनीने कंपनीचे व केंद्र आणि राज्य शासनाचे निर्देशाप्रमाणे सदरचे सिमकार्ड दि.06/02/2010 रोजी बंद केले होते. सदरचे सिमकार्ड बंद केलेनंतर ''एस.एस.कम्यूनिकेशन'' यांनी सदरचे सिमकार्ड हे तक्रारदार वापरत असलेचे सांगून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करीत आहोत असे सामनेवाला यास सांगून सिमकार्ड चालू करुन ग्राहकाची सेवा पूर्ववत सुरु करावी म्हणून विनंती केली. त्यानंतर दि.25/02/2010 रोजी सदरचे सिमकार्डची सेवा पुर्ववत केली आहे. तेव्हापासून आजतागायत सिमकार्डची सेवा अखंडीतपणे सुरु आहे. तक्रारदाराने एस.एस.कम्युनिकेशन कडे कागदपत्र जमा केलेबाबत सामनेवाला कंपनीस काहीही कल्पना नाही. तक्रारदाराने प्रत्यक्षात दि.23/03/2010 रोजी सामनेवाला कंपनीकडे योग्य ते कागदपत्रे सादर केली आहेत. त्यानंतर सदरचे सिमकार्ड तक्रारदाराचे नांवे केले आहे. सदर प्रकारामध्ये सामनेवाला कंपनीचा काहीही दोष नसून त्यांनी ग्राहकांचे सेवेत त्रुटी केलेली नाही. तक्रारदाराने सामनेवाला कंपनीकडे दि.31/03/2010 रोजी दाखल केलेला तक्रार अर्ज याकामी त्यांनी हजर केलेला असून त्यामध्ये सिमकार्ड चालू असलेचे स्पष्ट कथन केले आहे. (4) सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदार हे दि.23/03/2010 व 31/03/2010 हे दोन दिवस सोडून तक्रारदार त्यापूर्वी कधीही सामनेवालांकडे आले नव्हते.योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तक्रारदाराचे सिमकार्ड व्यवस्थित सुरु आहे.त्यामुळे मानसिक त्रासाबद्दल व तक्रारीचया खर्चाबद्दल तक्रारदाराने केलेली मागणी पूर्णपणे खोटी व लुबाडणूकीची आहे. म्हणून सदरची तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत सिमकार्ड नं.8149715868 वरुन दि.29/01/2010 ते 31/03/2010 पर्यंत केलेले व आलेले फोन कॉल्सचे कॉल डिटेल्स रजिस्टर दाखल केले आहे.
(6) या मंचाने तक्रारदाराचे व समनेवाला वकीलांचे युक्तीवाद ऐकले. तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासले.
(7) तक्रारदाराने दि.29/01/2010 रोजी सामनेवाला क्र.2 कडून सिमकार्ड खरेदी केल्याचे आपल्या कथनात म्हटले आहे. त्याच दिवशी व त्यानंतरही सुमारे चारपाच वेळा सर्व आवश्यक कागदपत्रे सामनेवाला क्र.2 कडे आपण दाखल केली होती असा त्यांचा दावा आहे. त्यांनी सदर कागदपत्रांची जी पोच दाखल केली आहे.त्यावर सामनेवाला क्र.2 चा शिक्का तारीख किंवा कागदपत्रे पोचल्याची तारीख यापैकी काहीही सबळ पुरावा नाही. त्यामुळे त्यांचे त्याबद्दलचे कथन हे मंच ग्राहय धरु शकत नाही. (8) सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या कथनात तक्रारदाराचे सिमकार्ड दि.29/01/2010 रोजी सुरु केल्याचे मान्य केले आहे तसेच सामनेवाला कंपनीतर्फे कागदपत्रांची छाननी केल्यावर सदरचे सिमकार्ड सामनेवाला क्र.2 कडून आलेल्या कागदपत्रांनुसार मिलींद पोतदार यांचे नांवे दिल्याचेही मान्य केले आहे. सामनेवाला क्र.2 कडून आलेल्या सिमकार्ड धारकाच्या नावाची व पत्त्याची छाननी केल्यावर सदर सिमकार्ड मिलींद पोतदार यांच्याऐवजी दुसरीच व्यक्ती वापरत असल्याचे लक्षात आल्यावर राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे सदर सिमकार्ड दि.06/02/2010 रोजी बंद केले. त्यानंतर समनेवाला क्र.2 कडून दि.25/02/2010 रोजी तक्रारदाराच्या नावाची कागदपत्रे सामनेवाला क्र.1 कडे पोचल्यावर दि.25/02/2010 रोजी पासून सिमकार्डची सेवा पूर्ववत सुरु केली असल्याचे कथन केल आहे व त्याप्रमाणे त्यांनी तक्रारदाराने केलेल्या कॉल्सचा पूर्ण तपशीलवार रेकॉर्डही दाखल केले आहे. (9) सामनेवाला क्र.1 यांचे सदर कथन व रेकॉर्ड यांचे काळजीपूर्वक अवलोकन केल्यावर सामनेवाला क्र.1 ने कुठलीही सेवात्रुटी केली नसल्याच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.सिमकार्डची सेवा देण्यापूर्वी कार्डधारकाच्या कागदपत्रांची छाननी करुन घेणे मोबाईल कंपनी वर शासकीय नियमानुसार अनिवार्य आहे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या योग्य कागदपत्रांची पूर्तता होईपर्यंत सामनेवाला क्र.1 यांनी त्यांची सेवा खंडीत केली यात सामनेवालांची कुठलीही सेवा त्रुटी नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.सबब हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळणेत येते. 2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |